'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday 22 October 2016

जनाबाई पायरी

संत जनाबाई. नुसत्या आठवणीनंही गहिवरून यावं, अशी माउली. तेराव्या शतकात या अनाथ जनाबाईंनी जे कर्त्तृत्त्व गाजवलंय, त्याला तोड नाही. लोकप्रियता एवढी की, तेव्हा घरोघरची जाती तिच्या ओव्यांशिवाय फिरायची नाहीत. आजही तिचे शब्द लाखो महिलांना जगण्याचं बळ देतात. जनाबाईंचं कर्तृत्व ठळक करायचं म्हटलं तर, संत नामदेव भारतभ्रमणाला गेले असताना त्यांच्या पाठीमागे सांभाळलेला आणि वाढविलेला समतेचा संदेश रुजवणारा वारकरी संप्रदायाचा डोलारा. त्या एका गोष्टीसाठी आपण जनाईचं जन्मोजन्मी ऋणी राहायला हवं. 'रिंगण'च्या संत जनाबाई विशेषांकासाठी लिहिलेला हा लेख...


देऊळ बंद होण्याची वेळ झाली होती. घाईघाईनं नामदेव पायरीवर डोकं ठेवलं. तर एकदम डोक्यात वीज लखलखली. ही तर जनाबाईंची पायरी! पुन्हा डोकं टेकवलं...जनामाऊली माफ कर. आम्ही तुला विसरतो आहोत. आम्हाला माहितीये की, तुला नामदेवांपासून वेगळं नाही करता येत. पण तू वेगळीच होतीस माऊले. तुझ्या मोठेपणाचं मोजमाप आमच्यानं होणार नाही. तुझ्यासारखी तूच, हे पांडुरंगानंही मान्य केलंय. विठोबाचं दर्शन घेईपर्यंत आणि नंतरही जनाबाई अशा 'आंतर्बाही' भरुन राहिल्या होत्या.

या जनामाऊलीनं आम्हाला बोलायला शिकवलं. चालायला शिकवलं. कष्ट, हालअपेष्टांतही जगायला शिकवलं. संत जनाबाई! आठवल्या तरी गहिवर दाटून यावा. साखरमाया करणाऱ्या आज्जी, आई, बहिण, मावशीची सय यावी, अशा जनाबाई. लहानपणीच अनाथ झालेल्या जनाबाई पुढं मर्‍हाटी मुलुखातील घराघरांत भरुन राहिल्या. भल्या पहाटे जात्यावरच्या ओव्यांमधून गात राहिल्या. भजन-कीर्तनांमधून कानात घुमत राहिल्या. या जनाबाईंनी केलं काय, तर आमची आणि सावळ्या विठोबाची गाठ घालून दिली. नामदेवरायांनी विटेवरचा श्री विठ्ठल बोलता केला, तर जनाबाई त्याला प्रत्येक देव्हारयात घेऊन गेल्या. 
समतेच्या वारकरी विचारांना दूर दूरच्या खेडोपाड्यांत, निरक्षर बायाबापड्यांच्या घरात पोचवलं, ते जनाबाईंनीच. वारकरी संप्रदायाचा खराखुरा विस्तार केला तो संत जनाबाईंनीच. कारण जनाबाई जनसामान्यांची भाषा बोलल्या. त्यांचंच जगणं जगल्या. म्हणूनच रंजल्या-गांजल्या कष्टकर्‍यांना, दबल्या-पिचल्या सासुरवाशिणींना, पंढरीच्या वाटेवर चालणाऱया बायाबापड्यांना जनाबाई त्यांच्याच वाटल्या. जनाबाईंनी त्यांना मनातली सुख दु:ख बोलायला शिकवलं. आयुष्याशी झगडायला शिकवलं. देवाशी भांडायला शिकवलं. जडशीळ जातं ओढतानाही गाणं म्हणायला शिकवलं.

नामदेवांनी उभारलेल्या वारकरी चळवळीच्या प्रपंचाचं जातं जीवशिवाचा खुंटा करून ओढणारी ही म्हातारी ज्ञात माहितीनुसार तब्बल ८७ वर्षे जगली. ज्ञानदेवांदी भावंडं एकापाठोपाठ एक समाधिस्त झाल्यानंतर संत नामदेवांनीही महाराष्ट्र सोडला. वारकरी संप्रदायाची समतेची पताका खांद्यावर घेऊन ते उत्तर भारतात निघून गेले. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळ कशी सुरू राहिली, याच्या इतिहासातील नोंदी अजून सापडलेल्या नाहीत. एक नक्की दीर्घायुष्य लाभलेल्या जनाबाईंनीच ज्ञानदेव-नामदेवांची ही चळवळ अत्यंत समर्थपणे पुढं नेली. लहानग्या ओढाळ नामदेवाला विठ्ठलमंदिरात नेणा-आणणार्‍या जनाबाई मोठेपणीही नामदेवांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. अगदी सख्ख्या कुटुंबालाही नामदेव नकोसा झाला तेव्हा ही दासी जनीच नामदेवाच्या सोबत राहिली. 
कीर्तनरंगी नाचत जगभर ज्ञानदीप लावण्याची शपथ घेतलेल्या या महान संताची एका युगातच नाही तर चारही युगात सतत या दासीनं पाठराखण केली. हे चौयुगांचं अवतार मिथकही लक्षात घेण्यासारखं आहे. हिरण्यकश्यपूच्या कुळातील प्रल्हाद म्हणजे नामदेव आणि त्याची दासी पद्मिणी म्हणजे जनाबाई, रामअवतारात नामदेव अंगद तर जनाबाई कैकयीची दासी मंथरा, कृष्णजन्मात नामदेव उद्धव, तर जनाबाई कुब्जा दासी. हे सगळे अवतार म्हणजे उपेक्षित, वंचितांचा इतिहास. प्रत्येक युगात जनाबाई उपेक्षितांचं प्रतिनिधीत्व करत आल्यात. त्यांच्या आवाजाला उद्गार देत आल्यात, असा त्याचा अर्थ.

जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की. 
अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत झालेल्या अभ्यास, चिंतनातून जनाबाईंचं व्यक्तिमत्व प्रगल्भ झालं. प्रत्येक संताचं मूल्यमापन करण्याची नैतिक क्षमता त्यांच्याकडं आली. जनाबाईंनी लिहिलेल्या अभंगांमुळंच तर हे संत आपल्यापर्यंत पोहोचले. ज्ञानदेवादी भावंडांनीही जनाबाईंच्या प्रतिभेला नमस्कार केला. संतमेळ्यात जनाबाईंचं स्थान एवढं उंचावलं की त्या या संतमेळ्याच्या मार्गदर्शक, समीक्षक बनल्या. संत ज्ञानदेव-नामदेवांच्याही सल्लागार बनल्या. कीर्तनात त्या 'हां आता ज्ञानदेवा, तुम्ही अभंग बोला' असं अधिकारवाणीनं सांगू लागल्या. एवढंच नाही तर समतेच्या धाग्यानं समाज जोडण्यासाठी तीर्थाटनाला निघालेले ज्ञानदेव-नामदेव जनाबाईंशी विचारविनिमय करूनच निघतात. 
प्रत्येकवेळी जनाबाईंवर निर्धास्तपणे भार टाकून ते आळंदी-पंढरपूर सोडतात. याचा अर्थ जनाबाई तेवढ्या सक्षम होत्या. वारकरी पंथाचं त्या नेतृत्व करू शकत होत्या. हिंदू धर्मातील कर्मकांडांनी कळस गाठलेल्या त्या यादव काळात बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभव, नाथ आदी संप्रदायही निष्प्रभ झाले होते. अशा काळात वारकऱ्यांची समतेची विचारधारा नव्यानं रुजवण्याची  गरज होती. गरज होती, समन्वयाची. नांदेवरायांनी ती जबाबदारी जनाबाईंवर टाकली आणि जनाबाईंनी ती अत्यंत समर्थपणे पार पाडली. त्यासाठी भारतभर मुळं रोवलेल्या नाथ संप्रदायाशी त्यांनी नातं जोडलं. ज्ञानदेवांचे थोरले बंधू समवयस्क निवृत्तीनाथ यांच्याशी संवाद वाढवला. गोरक्षनाथांना विस्तार केलेल्या नाथपंथाचं खतपाणी वारकरी संप्रदायाला घातलं. 'मच्छींद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनीप्रति, गहीनीप्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले' अशी परंपरा ज्ञानेश्वरमाऊली सांगतात. ती परंपरा जनाबाईंनी अंगी मुरवून घेतली होती. म्हणून तर त्यांनी गोरक्षनाथांचा प्रसिद्ध पाळणा त्या लिहू शकल्या. त्यासाठी जनाबाई योग शिकून योगिनी बनल्या. कुंडलिनी शक्तीसारख्या योगाच्या शिखरावर त्या पोहोचल्या, पण तिथं फार काळ रमल्या नाहीत. 
'दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू' म्हणत त्या सर्वसामान्यांना समजणाऱ्या वारकरी पंथात पुन्हा रममाण झाल्या. नाथपंथाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात वारकरी पंथाला वाट दाखवणाऱ्या निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, विसोबा खेचर या विभूतींच्या त्या कायम संपर्कात राहिल्या, या समन्वयाचा नामदेवांच्या विस्तारकार्याला खूप उपयोग झाला.
ज्ञानदेवांच्या संगतीत तर जनाबाईंचं आयुष्य झळाळून गेलं. ज्ञान आणि नामभक्तीचा संगम जनाबाईंनी घडवला. विश्वबंधुतेचं पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांप्रमाणे जनाबाई
आपल्या एका अभंगात 'झाले सोयरे त्रिभुवन' अशी ग्वाही देतात. संपूर्ण विश्वाशी 'सोईरपण' जोडण्याची जनाबाई ही इच्छा कालातीत आहे. या ज्ञानांचा देव असणाऱ्या ज्ञानदेवांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी इच्छा जनाबाई एका अभंगात व्यक्त करतात. 'रिंगण'च्या याच अंकात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत प्रतिमा जोशी या इच्छेचं विश्लेषण करतात. म्हणजे असा ज्ञानवंत आमच्या म्हणजे वंचित, उपेक्षितांच्या, दलितांच्या घरात जन्माला यावा, जो आमचा उद्धार करेल. त्यानंतर सातशे वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले! प्रतिमाताईंचं हे विश्लेषण नवी दृष्टी देणारं आहे. संतांच्या कार्याचं महत्त्व सांगणारं आहे. पूर्वजन्मांच्या कथाही आपल्याला याच दृष्टीकोनातून समजून घेता येतील.

ज्ञानदेवादी जातीच्या ब्राम्हण भावंडांशी जनाबाईंचं जेवढं सख्य आहे, तेवढाच लळा त्यांनी इतर बहुजन संतांना लावला आहे. या सर्व संतांना कडेखांद्यावर घेतल्याचं 'विठु माझा लेकुरवाळा' असं लोभस आणि वारकरी संप्रदायाचं सार सांगणारं चित्र जनाबाईंनीच रेखाटलं आहे. शैव-वैष्णवांचा वाद मिटवण्यातही जनाबाईंनी पुढाकार घेतला आहे.
त्या काळात सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैताच्या भिंती उंच झाल्या होत्या. त्या भिंती जमीनदोस्त करून, परस्परविरोधाचं साचलेलं मळभ दूर करून विठ्ठलभक्तीचं सर्वांना सामावून घेणारं स्वच्छ मोकळं आभाळ जनाबाईंनीच दाखवलं. या शूद्र, दासी महिलेला आणि तिच्या सगुण सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी निर्गुणोपासक संत कबीर काशीहून पंढरपुरात आले. जनाबाईंना भेटल्यानंतर जनी म्हणजेच 'काशी' असल्याचे साक्षात्कारी बोलले. नामदेव-जनाबाईंनी त्यांना विठोबाला भेटवलं. चंद्रभागेच्या वाळवंटात नेलं. ज्याच्या आईवडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपुरात आले, त्या पुंडलिकाचं दर्शन घडवलं. सर्व संतमेळ्याची ओळख करून दिली. वारकरी विचारांचा अत्युच्च अविष्कार असणाऱ्या नामदेवांच्या कीर्तनाची अनुभूती दिली. यानंतर कबीर वारकरीच होऊन गेले. काशीहून त्यांची दिंडी पंढरपूरला नियमित येऊ लागली. ऐक्याचा हा ओघ अखंड वाहत राहिला. 

इंद्रायणीकाठच्या तुकोबारायांना तब्बल  चारशे वर्षांनी या सगुण-निर्गुण ऐक्याचा साक्षात्कार झाला. 'सगुण निर्गुण एकु गोविंदु रे' असा निर्वाळा त्यांनी दिला. वारकरी विचारांच्या नाळेनं संत कसे जोडले गेले होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'नामदेव-जनाबाई' आणि 'तुकाराम-बहिणाबाई' हे नातं. वाल्मिकींप्रमाणे शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या संत नामदेवांचे अभंग अपुरेच राहिले. ते पुढं तुकाराममहाराजांनी पूर्ण केले. त्याबाबत 'संत नामदेवच आपल्या स्वप्नात आले. सोबत पांडुरंग होते. त्यांनीच अभंग लिहिण्यास आपल्याला सुचवलं', असं एका अभंगात तुकाराममहाराज सांगतात. यावेळी नामदेव आणि देवासोबत संत जनाबाईही असल्या पाहिजेत. कारण वारकरी संप्रदायाचा पाया रचताना आणि त्याचा विस्तार करताना जनाबाई त्यांच्या अखंड सोबत होत्या. पुढं या वारकरी विचारांवर 'कळस' चढवणाऱ्या तुकोबारायांसोबत 'फडकती ध्वजा' बनून संत बहिणाबाई उभ्या होत्या. 'ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस' या अभंगात हे चित्र लख्खपणे दिसलं आहे. जनाबाई नसत्या तर नामदेवांच्या वारकरी विचारांचा विस्तार होणं कठीण होतं आणि संत बहिणाबाई नसत्या तर इंद्रायणीच्या डोहातून तुकोबांचे बुडविलेले अभंग वर आले नसते! नामदेव-तुकोबांप्रमाणंच जनाई-बहिनाईचं नातं होतं. 
वारकऱयांची समता ही बौद्ध परंपरेतून आल्याचं भान या दोघींना होतं. म्हणून तर 'आता बौद्ध झाला सखा माझा' असं जनाबाई म्हणतात, तर 'कलियुगी बौद्धरुप धरी हरी। तुकोबा शरिरी प्रवेशला।।' असं संत बहिणाबाई सांगतात. बहिणाबाई तर बौद्ध विचारवंत अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अनुवाद बहिणाबाई करतात. संत नामदेव आणि संत जनाबाईंच्या अभंगांचा मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगांवर पडलेला दिसतो. पक्षी, कुत्रा, मांजर काहीही कर पण आम्हाला पुन्हा जन्म दे, असं संत जनाबाई म्हणतात. तर त्याच प्रकारे मोक्ष नाकारताना 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' असं तुकाराम महाराज म्हणतात. 'नाठाळाच्या माथी' सोटा हाणायला निघालेले तुकोबा पाहिले की, अंगणात उभे राहून थेट देवाला शिव्या घालणाऱ्या जनाबाई दिसतात. 
वृक्ष लागले अंबरी। डोलतात नानापरी।।
फणस कर्दळी गंभेरी। आंबे नारळ खर्जुरी।।...असं निसर्गाचं, वृक्षवेलींचं जनाबाईंनी केलेलं मनोहारी वर्णनाचं प्रतिबिंब तुकोबारायांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरें...' या अभंगात पडलेलं दिसतं. संत जनाबाईंच्या कवितेची दाट सावली 'जन खेळकर' करणाऱ्या संत एकनाथांच्या रचनांवरही पडली. 'माझे अचडे बछडे। छकुडे गं राधे रुपडे।।...' अशी अंगाईगीतासारखी जनाबाईंची अभंगशैली नाथमहाराजांनी अनेक अभंगांमध्ये वापरली. तर
'खंडेराया तुज करिते नवसू। मरूं दे रे सासू खंडेराया।।...'
या जनाबाईंच्या रचनेसारख्या भारुडरचना एकनाथांनी विपुल केल्या. त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, आपली समीक्षकाची भूमिका बजावताना जनाबाईंनी ज्ञानेश्वरीवरही भाष्य केलं. त्या काळात संतांच्या काव्यात आपलं काव्य घुसडण्याचा अश्लाघ्य प्रकार सुरू होता. किमान ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत तरी असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना     
गीतेवरील आन टीका। त्यांनीं वाढीयेली लोकां।।
रत्नकटक ताटामाजीं। त्यानें ओगारिलें कांजी।। असं जनबाईंनी म्हटलं.
म्हणजे कुणी ज्ञानेश्वरीत प्रक्षेप करण्याचा  प्रयत्न केला तर त्याने 'रत्नजडीत सोन्याच्या ताटात कांजी ओतल्यासारखे' अभद्र वाटेल. जनाबाईंची हीच भूमिका पुढं संत एकनाथांनी निभावली. नंतरच्या काळात त्यांना ज्ञानेश्वरीतले प्रक्षेप काढून ज्ञानेश्वरी शुद्ध करावी लागली. त्यानंतर जनाबाईंच्याच शब्दात
ज्ञानेश्वरी पाठी। जो ओवी करेल मऱ्हाटी।।
तेणे रत्नखचिताचिया ताटी। जाण नरोटी ठेविली।।
असं एकनाथमहाराज बजावतात. जनाबाईंचा प्रभाव असा वर्षानुवर्षे दिसत राहतो.
ज्ञानदेव सर्व संतांना आदरस्थानी. ज्ञानामृत पान्हावणाऱ्या या विश्वाच्या माऊलीला 'माऊली' असं नामदेव-जनाबाईंनीच पहिल्यांदा संबोधलं.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।।
असं नामदेव म्हणतात, तर 
मायेहूनि माय मानी। करी जिवाची ओंवाळणी।। असं जनाबाई माऊलींविषयी म्हणाल्या. संतांमध्येही भेद निर्माण करू पाहणाऱ्यांनी 'माऊली' या संबोधनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वारकऱ्यांना तो समजलाय. म्हणून तर ते परस्परांना 'माऊली' म्हणत एकमेकांच्या पायाशी वाकतात.
जनाबाईंनी सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत, भक्ती-ज्ञान, शैव्-वैष्णव, सवर्ण-शूद्र स्त्री-पुरुष, यांची यशस्वी सांगड घातली. हे सगळं करून जनाबाई रमल्या त्या खेडोपाड्यातल्या निरक्षर, कष्टकरी बायाबापड्यांमध्ये. ज्ञानदेवांना माऊली, विठ्ठलाला विठाबाई, पंढरीचे आई, अचडे बछडे म्हणणाऱ्या, गाईला गाऊली म्हणणाऱ्या, हरिणी-पाडसाची आणि गाय-वासराच्या प्रतिमा वापरत पंढरपूरला माहेर संबोधणाऱ्या जनाबाईंचं गाणं मऱ्हाटमोळ्या भोळ्या महिलांना फार फार आवडतं. जनाबाईंचे स्वानंदाचे डोल ऐकताना
जशी मोहोळाशी लुब्ध माशी। तशी तूं सखी माझी होसी।।
सुख दु:ख सांगेन तुजपाशी। माझा जीव होईल खुषी।। अशी जनाबाईंप्रमाणेच त्यांची अवस्था होते.
आपल्याला काम करु लागणाऱ्या देवाचं अत्यंत लोभस चित्र जनाबाईंनी अभंगांतून रेखाटलं आहे. जनाबाईंना झाडलोट करू लागणारा, गोवऱ्या वेचू लागणारा, सडा सारवण करू लागणारा, चारी हातांनी जनाबाईंचं धुणं धुवून टाकणारा, साळी कांडून देणारा, तुळशीच्या वनात डोईला लोणी लावून देणारा, अंघोळीसाठी पाणी आणून देणारा, वेणी घालून देणारा विठुराया जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो.

अशी अलवार अभंगरचना करणाऱ्या जनाबाईंचे शब्द प्रसंगी पेटते पलिते होऊन येतात. मग त्या नामदेवाला आणि प्रत्यक्ष देवालाही सोडत नाहीत.
राजाई, गोणाई। अखंडित तुझ्या पायी।।
मज ठेवियले द्वारी। नीच म्हणोनि बाहेरी।।
अशी त्यांना सांभाळणाऱ्या नामदेव कुटुंबाची अब्रू त्या वेशीवर टांगतात. तर अंगणात उभे राहून
अरे अरे विठ्या।... तुझी रांड रंडकी झाली।।
तुझे गेले मढे। तुला पाहूनि काळ रडे।।
अशा विठोबाला कचाकचा शिव्या घालते.

देवाचं पदक चोरल्याचा प्रसंग हा जनाबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. चोरीचं केवळ निमित्त होतं. खरा राग होता तो हा की, या जनाबाईंनी देव आणि भक्त यांच्यातली दलाल आणि दलाली संपविली होती. जनाबाईंनी देवाचं अप्राप्य असं देवपण घालवून त्याला माणसात आणून बसवलं. त्याला श्रमजिवी केलं. त्याला अंगणात उभं राहून शिव्या घातल्या. तरीही तो मुकाट्यानं जनाबाईंच्या मागोमाग फिरत राहिला. त्यामुळं कष्टकरी जनतेला हा देव आपला वाटला. शिवाय आईवडिलांना न सांभाळणारे, सज्जनांची निंदा करणारे, विद्येचा गर्व करणारे, स्त्रीलंपट लोकच मग ते उच्चवर्गीय असले तरी शूद्रच, असा उपदेश जनाबाई करू लागल्या. 
जनाबाईंनी देव सोपा करून ठेवल्यानं, त्याला रोजच्या जगण्यात आणून ठेवल्यानं देवाच्या दलालांची दुकानं बंद झाली. त्यातून त्यांनी जनाबाईंच्याच अभंगांचा आधार घेऊन जनाबाईंवर देवाच्या गळ्यातलं किंमती पदक चोरल्याचा आरोप ठेवला. जनाबाईंना मारहाणही करण्यात आली. 'धाविन्नले चाळीस गडी जनीवरी पडली उडी...' असं जनाबाई त्या प्रसंगाचं वर्णन करतात. अर्थात त्यातूनही जनाबाई हिकमतीनं स्वत:ला वाचवतात. बहुदा या प्रसंगातून संत नामदेव अंग काढून घेतात आणि देव गप्प बसतो. त्यामुळं जनाबाई संतापतात. पुढचे काही अभंग मग 'नामयाची दासी' अशी नाममुद्रा वाचायला मिळत नाही. अर्थात पदकाच्या चोरीची शिक्षा म्हणून सुळावर जातानाही त्या देवाकडं 'माझ्या नामदेवाला सांभाळ' अशी प्रार्थना जनाबाई करत होत्या. 

आपली चळवळ पुढं नेताना सर्व संतांनी अभंगलेखन हे जीवितकार्य मानलं. प्रसंगी लेखनिक घेऊन ते अभंग लिहित राहिले. जनाबाईंच्याच एका अभंगानुसार
बहुजन समाजातील सर्व संताना कुणी ना कुणी 'लेखकु' मिळाला. जनाबाईंचे अभंग मात्र प्रत्यक्ष देवानंच लिहिले. याचा अर्थ जनाबाईंनी त्यांचे अभंग स्वत: लिहून काढले. एवढं त्या नीट लिहू, वाचू शकत होत्या. ज्ञानदेवांनीही थोरवी गावी एवढा त्यांचा अभ्यास, चिंतन होतं.
तत्कालीन संतांना प्रेरणा देणाऱ्या जनाबाई आधुनिक मराठी कथा, कांदबऱ्या कवितांमध्येही झिरपल्यात. खान्देशकन्या बहिणाबाईंच्या घरोट्यातून 'अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' असे जनाबाईंचेच शब्द बाहेर पडतात.
'मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो'
असे शिव्या देणारे नामदेव ढसाळ देवालाही शिव्या घालणाऱ्या जनाबाईंचे खापर नातूच!
'कोसला'तील पांडुरंग सांगवीकर बहिणीच्या मृत्यूनंतर 'तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशयही गेलं...' असं म्हणतो तेव्हा 'मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे...' हा जनाबाईंचा अभंग हटकून आठवतो. तर त्यांच्याच कवितेतील 'विठू चिकटला पारंबिला' वाचताना जनाबाईंच्या अभंगातील 'विठो वटावरि पारंबिया जाले' ही ओळ आठवते. परभणीचे कवी इंद्रजित भालेराव त्यांच्या 'वेचलेल्या कविता'संग्रहात 'उभी होती बाजारात। जनी माझी हजारात' असं म्हणतात तेव्हा इथल्या मातीत झिरपलेल्या जनाबाईंच्या प्रतिभेचे निर्मळ झरे मराठीत वाहू लागल्याची खात्री पटते.
आजही मराठी माणूस साडेसातशे वर्षांपूर्वीच्या जनाबाईंचीच भाषा बोलतो. या भाषेत ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा खरपूसपण आहे. आंबेमोहेर भाताचा मत्त सुवास आहे, वऱ्हाडी ठसका आहे, कोल्हापुरी तिखटजाळ आहे.
ये गं ये गं विठाबाई। माझे पंढरीचे आई।।
किंवा 
नामदेवा पुत्र झाला। विठो बारशासी आला।।
अंगडे टोपडे पेहरण। शेला मुंडासे घेऊन।।
जनाबाईंची हीच भाषा महाराष्ट्राची प्रमाणभाषा. ती महाराष्ट्रात वर्‍हाड, खान्देष, कोकणात सर्वत्र समजते. बोलली जाते.

जनसामान्यांना खरा देव, धर्म दाखवण्यासाठी अहोरात्र धडपडणार्‍या नामदेवांना देवाच्या दलालांनी अपार छळलं होतं. ''माशांची घोंगाणी, जनांची निंदणी। सोशी नामदेव अंत:करणी।।'' असं जनाबाई म्हणतात. तर खुद्द नामदेव ''तुझा माझा देवा का रे वैराकार। दु:खाचे डोंगर दाखविसी।। या अभंगात शेवटी "नामा म्हणे देवा करा माझी कीव। नाही तरी जीव घ्यावा माझा।।" असं म्हणतात. अशी खरं तर ढेपाळून जाण्याची परिस्थिती. पण नामदेव कुटुंबातली ही खमकी आत्या हे सगळं सावरते. 'तू इकडची चिंता करू नकोस मी समर्थ आहे,' असं उत्तरेत निघालेल्या नामदेवांना सांगत कमरेला पदर खोचून उभी राहते. चोखामेऴा कुटुंब, सावता माळी, नरहरी सोनार आदी बहुजन समाजातील संतांना आधार देते. शूद्रातिशूद्रांना आत्मभान देण्याचं आपलं उद्दीष्ट संत नामदेव उत्तर भारतात सर करतात. अठरापगड जातींमधून संत घडवतात. त्यांना आत्मभान देतात, वारकरी चळवळीचा डोलारा सांभाळतात, हे सारं अविश्वनीय आहे. अशा कर्तृत्ववान जनाबाईंची कथा, इतिहास स्वतंत्र आहे. तो उलगडण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाही. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कदाचित तो सापडेलही, पण तो शोधण्यात इतिहासकारांना स्वारस्य नाही आणि अनुयायांना 'पोथी'पलिकडं पाहायचं नाही.

इतरांविषयी लिहिणाऱ्या जनाबाईंविषयी कोणीही खुद्द नामदेवांनीही लिहून ठेवलेलं नाही. मधल्या काळात महिपतीबुवा ताहराबादकरांनी भक्तिविजय ग्रंथात जनाबाईंविषयी लिहिलं ते, नामदेवांच्या चरित्राचा एक भाग म्हणून. पण त्यामुळं एक झालं, जनाबाई सर्वांपर्यंत पोहोचल्या. नाही तर जनाबाईंचे उपलब्ध अभंग हेच त्यांचं चरित्र, हीच त्यांची ओळख. अर्थात ८७ वर्षे जगलेल्या जनाबाई फक्त ३४८ अभंग लिहितील असं वाटत नाही. बहुतेक अभंग काळाच्या उदरात गडप झालेत. डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी पीएच. डी. करताना जनाबाईंचे ४३ अभंग आणि १० ओव्या उजेडात आणल्या. बाकी आनंद आहे. अजूनही जनाबाईंच्या अभंगांची स्वतंत्र गाथा नाही. संस्कृती टिकवण्याचा ठेका घेतलेल्यांना, आपल्या पाच दहा चिल्लर कवितांचं पुस्तक छापण्याचा अट्ट्हास करणाऱ्या भरल्या पोटाच्या कोणाही प्राध्यापकाला किंवा आधुनिक कवीला जनाबाईंचा गाथा स्वतंत्रपणे छापावा वाटलेलं नाही. नाही म्हणायला 'स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास' असं जनाबाईंनी सांगितलं म्हणून स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो नामदेव आणि जनाबाई यांचा संबंध  जनाबाईंची लैंगिक मनोवस्था यांच्यावरच थांबला!

आता काळ बदलला. महिला शिकल्या. मोठमोठी पदं भूषवू लागल्या. कारभार सांभाळू लागल्या. मायबाप सरकारच्या कृपेमुळं घर आणि रेशनकार्ड नावावर झाल्यानं कागदोपत्री का होईना महिला कुटुंबप्रमुख झाल्या. दुसरीकडं बडव्यांच्या तावडीतून विठोबा मुक्त झाला. देवाला महिला पुजारीही मिळाल्या. त्याच वेळी जनाबाईंनी आत्मभान दिलेल्या मायमाऊल्यांना विठोबाच्या आणि संत ज्ञानदेव-तुकोबांच्या मंदिरात कीर्तन-प्रवचन करू दिलं जात नाही. ज्ञानदेवांच्या अजानवृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचू दिली जात नाही. बहुदा त्यासाठी आता पुन्हा जनाबाईंना जन्म घ्यावा लागेल. मग त्या अंगणात उभं राहून या झारीतल्या शुक्राचार्यांना, धर्मठकांना कचकचीत शिव्या घालतील. त्यांची रांड रंडकी करतील. त्यांचे मढे बाहेर काढतील!
असं रणचंडीचं रूप धारण करण्याआधी
गाणं गाणाऱ्या जनाबाई खूपदा गूढ हसतात.
यातिहीन चोखामेळा। त्यासी भक्तांचा कळवळा।।...
देव बाटविला त्याणे। हांसे जनी गाय गाणें।।
बहुदा संतांचा वारसा सांगत आम्ही असे दुटप्पी वागतो; तेव्हा जनाबाई अशा गूढ हसतात.

आता नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला गेलं की, दचकायला होतं. त्या दगडी पायरीआडून जनाबाई आपल्याकडं पाहून  हसत आहेत, असं वाटत राहातं.

No comments:

Post a Comment