यंदाच्या 'शब्द रुची' दिवाळी अंकासाठी लेख लिहायचा होता. खरं तर डेडलाईन महिनाभराची होती. पण, नाही जमलं वेळ द्यायला. शेवटच्या क्षणी घाईघाईत लेख लिहून काढला. विषय महत्त्वाचा होता. त्यावर काम करणं गरजेचं होतं, अशी चुटपूट लागून राहिली आहे खरी पण किमान विषयाला स्पर्श तरी केल्याचं समाधान आहे. विषय आहे, भीमा आणि चंद्रभागा या दोन स्वतंत्र नद्या आहेत का?...
नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ न शोधण्याच्या संकेतामुळं आपण आपली मुळं विसरलो. थोर, उदार परंपरेचा शोध घेणं विसरलो. आपल्या समृद्ध सांस्कृतिक प्रतिकांना उजाळा देणं विसरलो. असंच एक प्रतीक म्हणजे, पंढरीचा श्री विठ्ठल आणि चंद्रभागेचं वाळवंट. या वाळवंटातील भेदाभेदविरहीत प्रेमाचा संदेश देत शेकडो वर्षे वाहणारी भीमा म्हणजेच चंद्रभागा नव्हे, तर त्या दोन्ही स्वतंत्र नद्या आहेत, असं संशोधन सध्या समोर येतं आहे. त्यावरील हे विश्लेषण...
भीमा नदी पंढरपुरात चंद्रकोरीप्रमाणं वळण घेते म्हणून तिथं भीमेचं नाव चंद्रभागा पडलं, असा आत्तापर्यंत सर्वमान्य झालेला समज. हा समज खोटा ठरवणारं संशोधन सध्या पुढं येत आहे. ते म्हणजे भीमा आणि चंद्रभागा ही एकच नदी नाही, तर त्या दोन्ही स्वतंत्र नद्या आहेत.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल आणि लेखक वा. ल. मंजुळ यांनी अलिकडच्या काळात हा मुद्दा उचलून धरला आहे.
भीमा नदीच्या उगमाविषयी एक कथा पुराणात सांगितली जाते. वासुदेवानंद सरस्वती यांनी संस्कृत सरिता स्तोत्र लिहिलं आहे. त्यात एक भीमा नदी स्तोत्र आहे. त्यात श्री शंकरानं भीमाशंकराच्या डोंगरावर दैत्याचा वध केला. त्यानंतर त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिथं तपश्चर्या करणाऱ्या भीमक राजानं तो घाम तसाच नदीरुपानं वाहू देण्याची विनंती केली. त्या घामाचीच नदी झाली. तिला भीमक राजाचं भीमा हे नाव मिळालं. या नदीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. तिला महानदी असंही संबोधलं जाऊ लागलं. मत्स्य, ब्रह्म, वामन आदी पुराणांतून आणि महाभारतातून या नदीचे उल्लेख येतात.पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला उगम पावणाऱ्या सुमारे सव्वासातशे किलोमीटर लांबीच्या भीमेनं महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि कर्नाटकातील विजापूर गुलबर्गा या जिल्ह्यांतील प्रदेश सुजल सुफल केला आहे. भीमेला वाटेत भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, कुंडली, माणगंगा, घोड, नीरा, सीना आदी नद्या मिळतात. भीमेवर एकूण २२ धरणं आहेत. अशा या भीमेच्या किनाऱ्यावर भीमाशंकरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकराचं मंदिर, सिद्धटेक इथं अष्टविनायकांपैकी एक असलेलं गणपतीचं मंदिर, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूरचं दत्त मंदिर, श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, श्री क्षेत्र हेरूरचं हुलकांतेश्वर मंदिर आदी तीर्थक्षेत्रं आहेत. याशिवाय भीमाकाठचं सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणजे, लोकदेव श्री विठ्ठलाचं श्रीक्षेत्र पंढरपूर. ज्या संतांनी विठ्ठलाचा महिमा वाढवला, त्यांनी विठ्ठलासोबत भीमेचा आवर्जून उल्लेख केला आहे. किंबहुना भीमा आणि श्रीविठ्ठल यांचा वेगळा उल्लेख होऊच शकत नाही.
तसेच भीमेचा 'भीवरा' असाही उल्लेख संतांच्या अनेक अभंगांतून झालेला दिसतो. 'माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी' असं संत एकनाथमहाराज म्हणतात. नीरा, भामा आदी नद्या भीमेला येऊन मिळतात, त्या सर्व उपनद्यांचा एकत्रित उल्लेख म्हणून तिला भीवरा नदी म्हणतात, असं काहीजण सांगतात. तर, खुद्द क्षेत्र पंढरपुराच्या पंचक्रोशीतील देवतांच्या जवळच्या नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडं पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सति, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, या भीमेला मिळतात. त्यामुळंही संतांनी भीमेचा 'भीवरा' असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं. भीमा नदीचा लिखित उल्लेख इसवीसन १२२६च्या सोळखांबी शिलालेखात आहे. त्यात भीमरथी नदीच्या काठी पंडरंगे नावाचं महाग्राम वसल्याचं नमूद केलं आहे. १३०५मध्ये लिहिल्या गेलेल्या कृष्णकर्णामृतम् या ग्रंथात भीमेच्या काठी असलेल्या या सावळ्या देवानं आपले हात कमरेवर ठेवले असल्याचा उल्लेख आहे. १४९० ते १५०८ या काळात निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्यानं लिहिलेल्या नृसिंहप्रसाद ग्रंथातील तीर्थसार भागातील कथेनुसार सांगायचं तर, यात पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे.
याशिवाय पंढरपुरात भीमेसोबतच सोबत चंद्रभागा नदीचाही उल्लेख होतो. शापित चंद्रानं पंढरपुरात येऊन भीमेत स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली. त्यामुळं तिचं नाव चंद्रभागा पडलं, अशी एक पौराणिक कथा आहे. 'पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे' एवढीच इच्छा शेकडो मैल चालून पंढरीत आलेला वारकरी उराशी बाळगतो. याशिवाय त्याचं देवाकडं काहीही मागणं, गाऱ्हाणं नसतं.
'अवघीच तीर्थे घडली एक वेळा। चंद्रभागा डोळा देखिलिया।।' असं वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचं स्थान अनन्यसाधारण आहे.
आता चर्चेत आलेल्या मुद्द्यानुसार लेखक वा. ल. मंजुळ प्रश्न उपस्थित करतात की, पंढरपुरातील रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये भीमा तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिलं. एवढ्या थोड्या अंतरासाठी नदीचं नाव बदलल्याचं उदाहरण दुसरं कुठं का आढळत नाही?
मंजुळ यांच्या या सवालात तथ्य असल्याचं जाणवतं. कारण, एकाच नदीला अनेक नावं असण्याची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रेला तिबेटमध्ये वेगळं तर भारतात वेगळं नाव आहे. तर वैनगंगा नदी वर्धेला मिळते आणि प्राणहिता बनून आंध्र प्रदेशात जाते. दुसरीकडं अमेझॉन नदीला तर स्थानिकांनी तीन-चार वेगवेगळी नावं दिली आहेत. निग्रो नदीला मिळण्यापूर्वीचे ती सॉलिमॉएस असते तर, पेरूमध्ये ती वेगळ्या नावानं ओळखली जाते. नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवराच्या आधी 'कागेरा' असते. संगमानंतरही नद्यांची नावं बदलल्याची उदाहरणं आहेत.
अर्थात पाचेक किलोमीटरच्या अंतरात नदीचं नाव बदलल्याचं उदाहरण नाही. अपवाद चंद्रभागा नदीचा. मग चंद्रभागा नदी हे स्वतंत्र प्रकरण आहे का? तर, मंजुळ म्हणतात, त्याचं उत्तर होय असं येतं. कारण स्कंद पुराणात पंढरपुरात चंद्रभागा नावाचं सरोवर होतं, असा उल्लेख आहे. आता पुराणामध्ये जरी असा उल्लेख असला तरी, अलिकडच्या काळात त्याबाबत काही पुरावा किंवा धागेदोरे आहेत का? तर आहेत! स्कंद पुराणात पंढरपुरात चंद्रभागा नावाचं सरोवर असल्याचा उल्लेख आहे. हे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ, (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचं आहे) होतं असं सांगतात. या सरोवराला मोठा पाट काढून दिला असावा, असाही अंदाज आहे. या अंदाजाला बळकटी देणाऱ्या काही बाबी आहेत.चंद्रभागा सरोवरातून जो पाट काढून दिला, त्या ठिकाणाला आता चौफाळा म्हणतात. कालांतरानं सरोवर आटलं. अवतीभोवती वस्ती झाली. चौफाळ्यात दीडशे वर्षांपूर्वी गोपाळकृष्णाचं मंदीर बांधताना पायामध्ये एक मोठा वाळूचा पट्टा सापडला. तो काय असावा तर, त्यावळचे लोक म्हणाले, हीच चंद्रभागा. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असं दिसतं.
विष्णुपदाच्या अलिकडं भीमा आणि चंद्रभागेचा संगम झाला होता म्हणे. आता त्या संगमाच्या खाणाखुणा सापडत नाहीत, पण विष्णुपदापलिकडं पुष्पा नदी भीमेला येऊन मिळते. ती मूळची यमुना नदी आहे, असं मानतात. पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे गोकुळचा श्रीकृष्णच. तो गोकुळातून पंढरपूरला आला, तेव्हा येताना सोबत गोवर्धन डोंगर आणि यमुना नदीही घेऊन आला. हा गोवर्धन डोंगर सध्याच्या गोपाळपुरात आहे. या डोंगरावर मंदिर आहे. तिथून ही यमुना नदी वाहत येते. डोंगराच्या एका बाजूकडून मंगळवेढ्याकडं एक रस्ता जातो आणि दुसरा रस्ता कासेगावकडं जातो. कासेगावकडून पुष्पा नदी वाहत येते. ती मूळची यमुना, असं म्हटलं जातं.
चंद्रभागा किंवा भीमा हे तीर्थ दैवत आहे. या देवतेचं रुप 'हरी' या स्वरुपात आढळतं. 'जय जय रामकृष्ण हरी' यातील हरी ही ती तीर्थ देवता. ही देवता भीमा नदीत आहे. पुंडलिकाच्या मंदिरासमोर या देवतेच्या मंदिराचा ४० बाय ४०चा चौथरा सध्या शिल्लक आहे. त्यावरचं मंदीर मात्र वाहून गेलं आहे. मुंबई विद्यापीठात मिळालेल्या स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आहे.
मुनिश्वरा (पुंडलिका) तुझीये प्रीती।
पश्चिमाभिमुखी मी श्रीपती।।
गुप्त राहीन तुझीये तीर्थी ।
तीर्थ मूर्ती(हरी) सर्वोत्तम।।
असं स्कंद पुराणातील महात्म्यात म्हटलंय. म्हणजे पुंडलिकामागं विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा पात्रात तीर्थमूर्ती हरि पश्चिमाभिमुखी उभा आहे. आता या वाहून गेलेल्या मंदिराचा भला मोठा चौथरा शिल्लक आहे. म्हणजेच हे मंदिर चंद्रभागेत नाही.
हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख काशिनाथ उपाध्याय (बाबा पाध्ये) यांनीही केला आहे. त्याचा संग्रह मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ आणि क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. एव्हढंच नाही तर दीक्षा मंत्रातही 'राम, कृष्ण, हरि' असा तीन देवतांचा उल्लेख येतो.
आता या ठिकाणी चंद्रभागा नावाचं सरोवर होतं, या दाव्याला बळकटी देणारे काही मुद्दे आहेत. निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्यानं नृसिंहप्रसाद या ग्रंथात तीर्थसार (१४९० ते १५०८) कथा लिहिली आहे. या कथेनुसार पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे. तिथं पुंडरीक नावाचा माणूस पुष्करिणीच्या तीरावर आश्रम बांधून राहात होता. तो आपल्या आईवडिलांची करीत असलेली सेवा पाहून भगवान कृष्ण प्रसन्न झाले आणि पुंडरीकास 'वर माग' असं सांगितलं. तेव्हा पुंडरीकानं हे क्षेत्र माझ्या नावानं म्हणजेच 'पुंडरीक क्षेत्र' म्हणून प्रसिद्ध व्हावं, असा वर मागितला. त्याची विनंती मान्य करुन भगवंतानं त्याला मी इथं गुप्त रुपाने वास करीन असं आश्वासन दिलं. यातील पुष्करिणी म्हणजेच चंद्रभागा सरोवर.
भक्त पुंडलिक चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करत होते असेही उल्लेख आहेत.
अशा प्रकारची सरोवरतीर्थे भारतात अनेक ठिकाणी आढळतात. त्यापैकी एक विशेष उल्लेखनीय आणि योगायोग म्हणावा असं चंद्रभागा नावाचंच सरोवर ओरिसातील भुवनेश्वर येथील कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ आहे. या पवित्र सरोवरात स्नान करण्यासाठी माघ सप्तमीला मोठी गर्दी होते. इथं स्नान करून सूर्याची आराधना केल्यास सर्व तीर्थांचं फळ मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीकृष्णाचा पुत्र सांब याचा कुष्ठरोग या सरोवरातील स्नान केल्यानं बरा झाला, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. हे सूर्यमंदीर पूर्वी सांबपूर म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील मुलतानमध्ये होतं. ज्यांनी श्री विठ्ठल चालता-बोलता केला, ते देवाचे लाडके आणि वारकऱ्यांचा समतेचा संदेश देशभर पोचवण्याचा वसा घेतलेले संत नामदेव या मुलतानपर्यंत गेल्याचे दाखले आहेत.
समता-बंधुभावाचे विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी नामदेवांनी ज्या गोष्टी केल्या असाव्यात, त्यात लोकांचं जगणं सुविधाजनक करणारे पाण्याचे स्रोत अर्थात तळी किंवा सरोवरं निर्माण करणं, हा मोठा भाग होता. फिरत फिरत पंजाबात गेलेल्या नामदेवांनी घुमान इथल्या जंगलात वास्तव्य केलं आणि तिथं दोन तळी खोदली. अजूनही ती तापियाना आणि नामियाना नावानं प्रसिद्ध आहेत. किंबहुना ज्या नामदेवांनी शीख धर्माचा पाया खोदला त्या शीख समाजाच्या गुरुद्वारासमोर संत नामदेवांशी नातं सांगणारं पाण्याचं तळं असतंच. नामदेवांच्या चरित्रात या सरोवरांचे संदर्भ अनेकदा येतात. हे चमत्कार त्यांच्या 'सोशल इंजीनिअरिंग'शी जोडणारे आहेत. खत्री समाजाचा त्यांचा प्रसिद्ध शिष्य केशो अर्थात केसो कलंधर महारोगाला कंटाळून आत्महत्या करायला निघाला होता. कोणाच्या तरी सांगण्यावरून तो घुमानला नामदेवांकडे गेला. नामदेवांनी त्याला तळ्यात स्नान करायला सांगितलं आणि त्याचा कुष्ठरोग बरा झाला. सध्याच्या पाकिस्तानातील भावलपूर इथं केशोचा आश्रम आजही कलधारीकी गद्दी म्हणून प्रसिद्ध आहे. केशोप्रमाणे इतरांचेही रोग या तळ्यात स्नान केल्यानं बरे झाले, असं म्हणतात.
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या मुलतान जिल्ह्यात नामदेवांनी मोठं कार्य केलं. अजूनही या जिल्ह्यातील दुनियापूर, भावलपूर, पक्काव रोड, लाहोर, अमृतसर, मुलतान, लायलपूर, जालंदर, लुधियाना, अंबाला, रोहोटक, भिवानी, हिसार या सर्व गावी नामदेवांची लहान मोठी मंदिरं आहेत. त्यामुळं इथल्या चंद्रभागा सरोवरतीर्थालाही नामदेव गेले असणार. देशभर फिरत असले तरी नामदेवांचा जीव अडकला होता तो पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या पायाशी. ते अधून-मधून पंढरपूरला येत होते. त्यामुळं सध्याच्या प्रति पंढरपुरांच्या धर्तीवर नामदेवांनी समतेशी नातं सांगणारं, दुःखापासून मुक्ती देणारं म्हणून पंढरपूरच्या सरोवराचं नाव (प्रति) चंद्रभागा ठेवलं असावं का? कारण वारकरी संगीतही नामदेवांनी अशाच प्रकारच्या देशभ्रमंतीतून अनुभवलेल्या, मिळवलेल्या लोकसंगीतातून साकारल्याचे दाखले आहेत.
संत नामदेवांचे समकालीन किंवा त्यांच्या नंतरच्या इतर संतांच्या अभंगांत चंद्रभागा आणि भीमा ही दोन स्वतंत्र तीर्थे असल्याचा अनेकदा उल्लेख येतो. ज्यांना संत नामदेवांचा अवतार समजतात, त्या संत तुकारामांच्या अभंगांत असे बरेच उल्लेख आहेत.
उंदड पाहिले उदंड ऐकिले।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे।।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।
ऐसा विटेवर देव कोठे।।
किंवा
रम्य स्थळ चंद्रभागा। पांडुरंगा क्रीडेसी॥
भीमा दक्षिणमुख वाहे। दृष्टी पाहे समोर।।
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका॥
किंवा
आवडे पंढरी भीमा पांडुरंग।
चंद्रभागा लिंग पुंडलिक।।
तर स्वतः नामदेवमहाराज आपल्या अभंगांमधून भीमा आणि चंद्रभागा ही दोन तीर्थे असल्याचे सूचित करतात. ते आपल्या वेगवेगळ्या अभंगांमधून म्हणतात,
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी।
तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी।।
किंवा
भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी।
दावीं दृष्टीभरी निरंतर॥
किंवा
जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा।
भीमा चंद्रभागा पुंडलिक॥
यामधून भीमा आणि चंद्रभागा स्वतंत्र असण्यास बळकटी मिळावी.
या सर्व अभंगांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, तो संत जनाबाईंच्या अभंगात. संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राबणाऱ्या या अनाथ स्त्रीला नामदेवांनी आपला अध्यात्मिक वारसदार बनवून टाकलं. याचा अर्थ जनाबाई तेवढ्या तोलामोलाच्या आणि कर्तृत्त्ववान होत्या. भारतभ्रमणावर गेलेल्या नामदेवांच्या पाठीमागं त्यांनी संतचळवळ अत्यंत समर्थपणं सांभाळली, पुढं नेली. लोकप्रिय तर एवढ्या की, त्यांच्या ओव्या गायल्याशिवाय पहाटे घरोघरची जाती फिरायची नाहीत.
आपल्या अभंगांतून जीवनाचं सार अत्यंत सोप्या शब्दांत सांगणाऱ्या या थोर कवयित्रीनं आपलं संपूर्ण आयुष्य पंढरपुरात काढलं. रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या भीमा, चंद्रभागेची नाना रुपं जनाबाईंनी अनुभवली असणार. आपल्या अभंगांतून त्या नदीशी असलेलं अलवार नातं उलगडत राहतात. 'येगं येगं विठाबाई' अभंगात त्या लिहितात, "भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा"...आपल्या पंढरीच्या आईच्या वैभवाचा उल्लेख करताना त्या भीमा आणि चंद्रभागा दोन स्वतंत्र नद्या आहेत, असं सहज सांगून जातात.
तशा भारतात चंद्रभागा नावाच्या इतरही नद्या आहेत. अगदी महाराष्ट्रातही अमरावतीत एक चंद्रभागा वाहते. चिखलदऱ्यामध्ये उगम पावणारी ही नदी पूर्णा नदीची उपनदी आहे.
चिनाब किंवा चंद्रभागा नावाचीच नदी पंजाबातून पाकिस्तानात वाहत जाते. पावसाळ्यात ती रौद्ररूप धारण करते. तिच्या त्या रुद्र रुपापुढे आणि चिवट, शूर पंजाबी सैनिकांपुढे जगज्जेत्या सिकंदरालाही हार पत्करावी लागली होती. पंढरपूरहून निघालेले संत नामदेव या ठिकाणी आले होते. अलिकडच्या काळात भूदान चळवळीच्या निमित्तानं त्याच ठिकाणी गेलेल्या विनोबा भावेंना नामदेवांची आठवण झाली. ते उद्गारले, ज्या पंजाबी लोकांना तलवारीच्या बळावर जिंकणं सिकंदराला जमलं नाही, त्या लढवय्या पंजाबी लोकांना नामदेवांनी प्रेमानं जिंकलं! चंद्रभागेच्या त्या प्रेमाचा धागा पंढरपुरातील चंद्रभागेशी थेट जोडलेला आहे.
जेव्हा देव आणि त्याचं देऊळ हे धर्मठकांची मक्तेदारी झाली, सर्वसामान्यांना देवाच्या साध्या दर्शनाचाही अधिकार नाकारण्यात आला, तेव्हा वारकरी संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. तिथं चोखोबासारख्या यातीहीन संताला ज्ञानेश्वर माउलींसारखे संत उराउरी भेटले. त्याचा मोह निर्गुण निराकाराची भक्ती करणारे उत्तर भारतातील महान संत कवी कबीर यांनाही पडला. ते चंद्रभागेच्या वाळवंटातील तो सगुण साकार प्रेमखेळ अनुभवण्यासाठी काशीहून पंढरपुरात आले आणि नंतर मग दिंडी घेऊन येतच राहिले.
आजही चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी हा प्रेमखेळ मांडतात आणि शेवटी सामूहिकपणे तुकोबारायांनी मागितलेलं मागणं मागतात.
हेचि व्हावी माझी आस।जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरि।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ॥
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेंचि दान॥
भीमा आणि चंद्रभागा ही एकच नदी आहे की, दोन या प्रश्नाचे पक्के उत्तर संशोधकांना कधी सापडेल हे माहिती नाही. पण, एक नक्की भीमा-चंद्रभागेत स्नान करून वाळवंटात अनादी काळापासून रंगणारा वारकऱ्यांचा प्रेमकल्लोळ अनंत काळापर्यंत रंगतच राहील.
No comments:
Post a Comment