'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 27 October 2021

या 18 ऑक्टोबरला दोन वर्षे झाली त्या ऐतिहासिक घटनेला. होय, ऐतिहासिकच. राजकारणातले वयोवृद्ध सेनापती अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार विधानसभा प्रचाराच्या रणमैदानात उतरले. साताऱ्याच्या सभेत त्यांनी मुसळधार पावसात भिजत भाषण केलं आणि हातातून जवळपास निसटलेली निवडणूक जादूच्या कांडीसारखी त्यांच्या हातात आली... 'सकाळ'चा डिजिटल एडिटर म्हणून काम करताना तो कलाटणी देणारा क्षण मी अनुभवला आणि फेसबुकवर शेयर केला. त्यानंतर अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा पाऊसच सोशल मीडियावर बरसू लागला... दरम्यान मित्रवर्य चन्नवीर भद्रेश्वरठसोबत बोलत होतो. त्यानं या सर्व उस्फूर्त प्रतिक्रियांचं पुस्तक करण्याची कल्पना ऐकवली. ती प्रत्यक्षात उतरवलीही.. त्याच पुस्तकातला हा माझा लेख...

मुळात आम्हा पत्रकारांकडे अंगावर रोमांच येणारी त्वचा आणि संवेदनशील मन असणं वगैरे म्हणजे, अंधश्रद्धा निव्वळ! बातम्या येतात आणि जातात. राजकीय बातम्या तर खिशातल्या. 'मी सांगत होतो, हे असंच होणार म्हणून..', असा अनुभवातून आलेला आत्मविश्वास. व्हिज्युअल्सवर खेळणारे टीव्हीवाले बंधू तर, लहान-मोठ्या बातम्यांचं अख्खं जग 'स्पीड न्यूज'च्या चरकात घालतात. आमच्यातही आहेत, सोईनं लेखणी, वाणी उघडणारे. आणि आम्ही 'सिंहासन'फेम पत्रकार दिगू टिपणीस पंथाचा कर्मठपणा बाळगून! 

पण त्या दिवशी या सगळ्या गाठ सुटल्या. पाऊस सुरू होता. अधूनमधून उभं राहून खिडकीबाहेरच्या रस्त्याचा किती ओढा झालाय, याचा अंदाज घेत होतो. पुण्यातल्या यंदाच्या ऐतिहासिक पावसात अडकल्याचा अनुभव ताजा होता. माहौल निवडणुकांचा होता. कुणाकुणाच्या प्रचारसभा पावसानं रद्द करायला लावल्या होत्या. तशात न्यूजरूममधल्या टीव्हीवर पंतप्रधान मोदींची सभा सुरू झाली. पावसापासून संरक्षणासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त केलेला मंडप दिसत होता. काही कोटींचा! यांना काय ब्वा तोटा... असल्या भावनेनं तिकडं कटाक्ष टाकत होतो.

तेवढ्यात टीव्हीच्या अर्ध्या स्क्रीनवर क्षणभर एक दृश्य झळकलं. धो धो पावसात भिजत एक म्हातारा भाषण करतोय... त्वचा न कळत थरथरली. आणि काटाच आला अंगावर... 'अरे ते चालवा, दुसऱ्या विंडोत मोदींसोबत..,' असं उत्स्फूर्त उद्गारणार, तोच लक्षात आलं, आता आपण टीव्ही न्यूज चॅनलमध्ये नाही आहोत.. मग स्क्रीनभर फक्त मोदी दिसू लागले... आमची घालमेल. साताऱ्याच्या प्रतिनिधीला फोन लावला. द्या तातडीने ते व्हिज्युअल्स, अपलोड करतो. तर तो म्हणाला, सर प्रयत्न करतोय पण, पाऊस प्रचंड पडतोय आणि आम्हीही भिजतोय. त्यानंतर पुढची काही मिनिटं अंगात 'ब्रेकिंग'चं भूत शिरलं. खटपट करून मिळालेली व्हिज्युअल्स मोबाईलवर एडिट केली आणि टेक्स्टसह काही क्षणांत ई सकाळ आणि सोशल मीडियावर अपलोड झाली. कधी नव्हे तो त्याच व्हिडिओचा व्हाटस्अपवर स्टेटस ठेवला. अनेकांचे मेसेज येऊ लागले, आम्हालाही द्या तो व्हिडिओ आणि फोटो... पुढच्या काही क्षणांत मोबाईलमधले सर्व व्हाटस्अपचे स्टेट्स होते, वयोवृद्ध नेते शरद पवार प्रचंड पावसात भिजत भाषण करतानाचे. आम्ही म्हटलं, ही निवडणूक फिरली गड्या आता..! 

इतिहास डोळ्यापुढं घडताना दिसत होता. काय व्यक्त व्हावं हे सुचत नसताना ''असा जिगरबाज नेता आम्ही पाहिला होता..! पुढच्या पिढ्यांना सांगत राहू...'' असं एक वाक्य लिहून पोस्ट शेयर केली. क्षणार्धात ती व्हायरल झाली. लाखो लोकांनी पाहिली.

पवार अनेकांनी अनुभवलेत, पाहिलेत. आमचा तसा फार थेट संबंध नाही. विद्यार्थी बातमीदार असताना पुण्यात एक कार्यक्रम कव्हर करायला गेलो होतो बालगंधर्व रंगमंदिरात. स्टेजवरचा पडदा हळूहळू बाजूला झाला. झगझगीत उजेडात स्टेजवर मान्यवरांची रांग बसली होती. मध्यभागी होते, शरद पवार. प्रेक्षकांना न्याहाळत होते. मला ते एकदमच ओळखीचे, कुटुंबातले वाटले. 

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमचा विद्यार्थी असताना मी 'आमदार कार्यकर्तृत्त्व' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात 1957पासूनच्या आमदारांच्या कामांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आमचे आमदार दिलीप वळसे पाटलांच्या मध्यस्थीनं भीमाशंकर साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्याचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते झालं. एकटाच गेलो होतो भरल्या स्टेजवर. पवारसाहेबांसोबत गोपीनाथ मुंडे होते. पुस्तकाचं रॅपर उघडताना पवारांनी विचारलं, किती आमदार जमवलेत..? आत्ता लक्षात येतंय त्यांच्या डोक्यात आमदारांच्या आकड्यांचा हिशोब फार जुना आहे.

साहेबांचं राजकारण जुनं, सहकारी जुने, स्टाईल जुनी. त्यामुळं या सोशल मीडियाच्या जमान्यात ते तरुणांना अपिल होणार नाहीत, अशी विश्लेषकांची अटकळ होती. पण, या निवडणुकीत शरद पवार सोशल मीडियात भरून उरले.

आपल्याकडं सोशल मीडियाचा गाजावाजा सुरू झाला तेव्हाची गोष्ट आठवते. मी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार नितीन वैद्य यांच्यासोबत काम करत होतो. तेव्हा पवारसाहेबांनी 'नितीन, ही सोशल मीडियाची काय भानगड आहे, मला जरा समजावून सांग', असं म्हणून त्यांच्याकडून सोशल मीडिया समजावून घेतला. त्याचवेळी पवारसाहेबांनी स्वत:चा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. आपल्या कार्यकर्त्यांनाही या माध्यमाची ओळख व्हावी, यासाठी आग्रह धरला. 

सकाळचं 'एग्रोवन' हे देशातलं पहिलं कृषिदैनिक सुरू करण्यापूर्वी आमची तरुण पत्रकारांची टीम कृषिमंत्री शरद पवारांचं त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेली होती. एका लांबलचक टेबलावर आम्ही त्यांच्याभोवती बसलो. मी तर शेजारीच बसून त्यांना अनुभवत होतो. नाश्ता करता करता त्यांंचं बोलणं ऐकलं. ते आम्हाला व्यवस्थित जमिनीवर आणणारं होतं. दैनिकातून शेतकऱ्यांसाठी माहिती देताना काय काळजी घ्यायला हवी, याचं भानं देणारं होतं.

समाजाशी निगडीत प्रत्येक प्रश्न पवारसाहेब बारकाईनं समजून घेतात असं ऐकून होतो. त्याचाही अनुभव घेतला एकदा. मित्र आणि 'भवताल'चा संपादक अभिजित घोरपडे एका सकाळी म्हणाला, 'चल, पवारसाहेबांकडे जाऊ गप्पा मारायला'. गेलो मोदीबागेत. तिथं क्रिम कलरच्या मोठ्या सोफ्यावर साहेब बसले होते. डोक्यावर आई शारदाबाई पवारांचं पोर्ट्रेट. शेजारच्या भिंतीवर रंगबिरंगी झूल असलेला रुबाबदार नंदीबैल आणि त्याचा मालक. आम्ही काढलेला 'भवताल'चा 'जलयुक्त शिवार की नद्यांशी खेळ?' हा विशेषांक त्यांनी वाचून काढला होता. या सरकारी योजनेमुळं खरंच नद्यांचं नुकसान होतंय का, याची त्यांना उत्सुकता होती. तास-दीड तास ते ऐकत होते, मध्येच काही शंका विचारत होते. निघताना त्यांना मी संपादीत केलेली संतसाहित्यावरची काही पुस्तकं दिली.  

अजून एक आठवण, एका वर्षी वडिलांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं. मंदिरात आलेल्या पवार साहेबांनी त्यांची आवर्जून चौकशी केली. ते अजूनही त्याबद्दल कौतुकानं सांगतात.

एरवी 'मी देव, देवळांच्या वगैरे भानगडीत फारसा पडत नाही', असं सांगणारे पवारसाहेब पंढरपूरच्या पालखी प्रस्थानापूर्वी मीडियाचा डोळा चुकवून संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी देहूच्या मंदिरात जातात, तेव्हा ते 'माझे सांगाती' असल्याची भावना घट्ट होते.


No comments:

Post a Comment