''राजकीय सत्ता कोणाचीही असो; वारकरी संतांनी हिंदू-मुस्लिम एकोपा कायम ठेवला. इतरही सर्व पंथांशी सलोखा ठेवला. वारकरी विचारांनी प्रभावित असलेल्या महादजी शिंदेंसारख्या राज्यकर्त्यानं वारकरी भजन आणि त्यातील विचार जपण्याचा प्रयत्न केला. आजही वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आजच्या काळात महाराष्ट्रात जी सलोख्याची वीण दिसते, ती वारकरी संप्रदायाच्या लोकांनी विणली आहे, असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो...'' संत साहित्याचे विश्लेषक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी 'सकाळ'च्या 'विठाई'साठी दिेलेल्या मुलाखतीत केलेले चिंतन...
प्रश्न : वारकरी आषाढी वारीसाठी चालतात ते केवळ भौगोलिक अंतर नाही, तर ती माणसा-माणसांतील अंतर कमी करण्यासाठीही केलेली वाटचाल आहे. वारकऱ्यांचा समतेच्या विचारांचा झेंडा घेऊन संत नामदेवांनी समन्वयाचा संदेश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नेला. देशपातळीवर किंवा महाराष्ट्रातही या समन्वयाच्या पाउलखुणा कुठं पाहायला मिळतात?
उत्तर : आपण ज्या अंतराचा उल्लेख केला, आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर हे भौगोलिक अंतर झाले. हे अंतर वारकरी कापतातच; पण एकमेकांच्यामधील जे अंतर आहे, माणसा-माणसातले जे अंतर आहे ते कमी करणे फार महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय असेल, तर माणसा-माणसातलं अंतर कमी करणे. हाच संतांचा संदेश होता. त्यामुळं आपण आज जरी शब्द वापरला असला ‘सलोख्याची वारी’ तरी महाराष्ट्रात आज जो काही सलोखा काही शतकं टिकून राहिला, त्याचं खूपसं श्रेय आपल्याला संतांच्या शिकवणुकीला आणि वारकऱ्यांच्या कार्याला दिलं पाहिजे.
वारी ही मुळातच सलोख्यावर आधारित आहे. समता हा वेगळा मुद्दा आला, आपण त्याचाही उल्लेख केला; पण एकमेकांमध्ये प्रत्यक्ष मिसळणं, समता हा एक तात्त्विक मुद्दा आहे. व्यवहारात ज्या वेळी तुम्ही प्रत्यक्ष उतरता त्या वेळी तुमच्या एकमेकांबद्दल ज्या काही कृती असतात, त्यातून ते दिसते. त्यामुळे या बाबतीत आपण आता नामदेवांचाही उल्लेख केला, की पंजाबमध्ये जाऊन काम करणं. ज्या कामापासून स्फूर्ती घेऊन नंतरच्या काळात गुरुनानक यांनी एक स्वतंत्र धर्म निर्माण केला. अशा काळामध्ये एखादी गोष्ट आपण म्हणू, की भारतातला जो धर्म आहे; मग तो हिंदू धर्म म्हणा किंवा इतर कोणताही धर्म म्हणा, त्या धर्मामध्ये सगुणाच्या उपासनेला जास्त महत्त्व आहे. बहुतेक लोक मूर्तिपूजा करणारे होते.
अगदी मागील शतकात निर्माण झालेला प्रार्थना समाज वा ब्राह्मो समाजसुद्धा याला विरोध करणाराच होता; पण ते अपवाद आहेत. याची गाठ केव्हा तरी निराकाराची उपासना करणाऱ्या दुसऱ्या एका जगभर साम्राज्य स्थापन करायला निघालेल्या धर्माशी पडली. त्याला ज्यांना शक्य झालं त्यांनी प्रतिकार केला. पण एकूण समाजामध्ये जे काही वातावरण आहे, ते कसं नीट राखलं पाहिजे, यासाठी संतांनी मनापासून प्रयत्न केले. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं महाराष्ट्र हा अल्लाउद्दीन खिल्जीकडे जाण्यापूर्वीच समाधिस्थ झाली होती.
नामदेवांच्या गुरुग्रंथ साहिबामधील पद पाहिलीत तर असं लक्षात येईल, की त्यांनी दोन विरोधी दिसणाऱ्या धारांमध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते असे म्हणतात, की मूर्ती फुटल्याने देव फुटत नाही, तर या म्हणण्याला फार अर्थ आहे, की मूर्ती प्रतीक आहे. तुम्ही परमेश्वर मानता, तो तुमच्या आवाक्यात यावा म्हणून तुम्ही मूर्तीची स्थापना केली आणि जर ती कुणी फोडली तर त्यामुळे धर्म संपला असे म्हणायची गरज नाही. एका बाजूला या धर्माच्या इथल्या लोकांना, मूर्तिपूजकांना बळ देणारा मुद्दा आहे. शेवटी आपण एकच आहोत, हा जो मुद्दा आहे तो संत एकनाथ महाराजांनी खूप प्रकर्षाने मांडला आहे. कारण एकनाथ महाराजांच्या काळामध्ये देवगिरी (दौलताबाद) ही निजामशाहीची राजधानी होती.
अशा परिस्थितीत एकनाथांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली, की दोन धर्म आहेत हिंदू आणि मुसलमान. यांच्यामध्ये संघर्ष होता कामा नये, ही भूमिका एकनाथ मांडत. त्यांच्या भारुडामध्ये हिंदू-तुर्क संवाद हे भारूड खूप महत्त्वाचे आहे. या भारुडामध्ये हिंदू मुसलमान धर्माची निंदा करतो आणि मुसलमान हिंदू धर्माची निंदा करतो आणि हळूहळू त्यांच्या लक्षात येतं, की आपल्या धर्मांमध्ये तसा काही फार फरक नाही आणि मग दोघे सांगतात, की आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केलं आहे. यामुळे संघर्षापासून सुरवात झाली, ती सलोख्यात संपते. दोघे एकमेकांना आलिंगन देतात. या तत्त्वाची प्रॅक्टिस वारीमध्ये पाहायला मिळते. वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आज सलोख्याची वीण महाराष्ट्रात आहे, ती वारकरी संप्रदायाच्या लोकांनी विणली आहे, असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो.
प्रश्न : संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी, त्यांचे गुरू चाँद बोधले आणि नंतरची सूफी परंपरा वारकऱ्यांकडे आली असं म्हणता येईल का?
उत्तर : त्यातली एक शाखा तुम्हाला शेख महंमद श्रीगोंदेकर यांच्या रूपाने श्रीगोंद्यात दिसते. आता शेख महंमद बाबाजी आहेत ते अभंग रचतात मराठीमध्ये, ते योगसंग्राम नावाचा योगावरचा ग्रंथ लिहितात, ते विठ्ठलाची उपासना करतात. त्याचा अर्थच मुळात असा होतो, की त्यांनाही भेद मान्य नाही. सगळ्या प्रक्रियेमध्ये परंपराही सांगते, की शेख महंमद बाबा आणि तुकाराम महाराज यांचे जवळचे संबंध होते. या आधुनिक जगात त्यांना तुम्ही दंतकथा म्हणायचं असेल तर म्हणा; पण त्या कथांच्या मागचं लॉजिक महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं देहूला आणि तिकडं शेख महंमद बाबांनी आग विझवण्याचे हावभाव केले, हात चोळले. तर ते लोक म्हणाले, की तुम्ही काय करताय? तर ते म्हणाले, तिकडं तुकोबांचं कीर्तन चालू आहे तिथं आग लागली आहे, ती मी विझवली. मंडपात आग लागली आहे हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी तिथं जाऊन पाहिलं तर तसंच घडलं होतं. तिथं आग लागली होती आणि ती विझलीसुद्धा होती. या वेळी प्रश्न असा पडतो, की तुकाराम महाराज आणि शेख महंमद बाबा यांच्यामधला जो परस्पर संबंध आहे तो संबंध या कथेच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. अशा वेळी विशेषतः बुद्धिवादी लोकांची गल्लत काय होते, ते असा प्रश्न उपस्थित करतात, की असं कसं घडेल? काही लोकं म्हणतील, की शेख महंमद बाबा आणि तुकाराम महाराज समकालीन होते की नाही? पण तुम्ही ज्या वेळेला सगळ्या प्रश्नांकडे सामाजिक अंगाने बघता तेव्हा हे लक्षात येतं, की तुमचे हे प्रश्न निरर्थक आहेत.
प्रश्न : असं म्हटलं जातं की, ‘ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेखा.’ संतांचा हा वारसा आहे, त्याबद्दल सांगा...
उत्तर : ही परंपरा निर्माण झाली त्यामध्येही कबीर यांचा समावेश होतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्यांना पूज्य श्री संत कोण हे सांगितलेलं आहे. जणू काही ते गुरुस्थानी आहेत. असे कोण, तर यामध्ये त्यांनी चार लोकांची नावं सांगितली. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि कबीर आहेत. म्हणजे तुकोबांना कबीर महत्त्वाचे वाटणं, त्यांना तुकोबांनी गुरुस्थानी मानलं हे बरंच काही सांगून जाते आणि वारकरी संप्रदायामध्ये कबिरांचे दोहे म्हटले जातात. वैशिष्ट्य म्हणजे उत्तरेतील इतर संतांची आपल्याकडं वचनं वगैरे म्हटली जात नाहीत; पण कबिरांची म्हटली जातात. कारण कबीर हा वारकऱ्यांना आपलाच वाटतो. हे एक वेगळेपण आहे.
![]() |
संत कबीर यांची पंढरपुरातील कबीर मठातील समाधी. |
प्रश्न : जसं कबिरांच्या दोह्यांमध्ये पांडुरंग किंवा विठ्ठलाचा उल्लेख आहे तसं जनाबाईच्या अभंगांमध्ये पण हा उल्लेख आहे आणि तो देखील फार सुंदर आहे. हा उल्लेख पहाटे काकड आरतीमध्ये सर्व वारकरी म्हणतात, याविषयी काय सांगाल?
उत्तर : याबद्दल थोडी अडचण आहे. कारण कबीर उत्तरकालीन होते, कदाचित तो अभंग जनाबाईचा नसेल; पण हा माझा मुद्दा नाही. कुणीतरी जनाबाईच्या नावानं तो अभंग रचला. जनाबाईंचं नाव आहे म्हणून कुणाला तरी वाटलं असेल की, आपण जनाबाईंच्या नावानं अभंग रचावा, त्यांनी रचला. कुठल्याही सामाजिक जाणिवा व्यक्त करणारं हे काव्य आहे. इथं इतिहासशास्त्र जास्त असण्यापेक्षा समाजशास्त्र जास्त आहे.
प्रश्न : अलीकडच्या काळात टीव्ही चॅनेल्सवरूनपण दाखवतात, वारी निघाल्यावर तुकोबारायांची पालखी निघते, तेव्हा पहिली आरती त्यांची होते तिथं वेशीबाहेर जो अनगडशहा बाबांचा दर्गा आहे, तीही याच पद्धतीची परंपरा आहे का?
उत्तर : म्हणजे देहूची हद्द सोडल्यानंतर पहिल्यांदा पालखी थांबते आणि पहिली आरती होते, देहूबाहेर अनगडशहा बाबांचा दर्गा आहे. अनगडशहा बाबा हे तुकोबाकालीन त्यांचे मित्र असणारे एक सूफी संत होते. पुण्यात त्यांचं मुख्य ठिकाण आहे. पुण्यातल्या गुरुवार पेठेमध्ये त्यांचा दर्गा असणं, तुकोबांची पालखी थांबणं या गोष्टी सलोख्याचे द्योतक आहे. तुकोबांचे दख्खनी भाषेतील अभंग आहेत. उदाहरणार्थ अल्ला देवे, अल्ला खिलावे. एकनाथांचे तर किती तरी आहेत.
राजकीय संघर्ष काहीही असो; लोकांनी एकमेकांशी असलेला सलोखा सोडू नये, असा संतांचा प्रयत्न. उर्दू उत्तरेत तशी दख्खनी भाषा ही दक्षिणेत निर्माण झाली. पर्शियन आणि स्थानिक मराठी भाषा आणि थोडं फार कन्नड अशी मिळून ही दख्खनी भाषा तयार झाली होती. या भाषेत तुकोबाराय अभंग लिहीत होते. महाराष्ट्रात तुकोबांच्या काळात ती बोललीही जायची. नंतरच्या काळात ज्यांनी तुकोबांच्या गाथेचं संपादन केलं त्यांनी या भाषेला हिंदुस्तानी भाषेतील अभंग असं चुकीचं नाव दिलं. ते हिंदुस्तानी भाषेतील नाही तर दख्खनीतील अभंग आहेत.
![]() |
अनगडशाहबाबा यांचा देहू येथील दर्गा. |
प्रश्न : मधल्या काळात एक अशी टीका होत होती की, वारकऱ्यांचा राजकीय, सामाजिक घडामोडींशी काही संबंध नाही. ते उगाच शेतीची कामंधामं सोडून पंढरपूरला जातात. त्यामुळं इतिहासावर आणि आजच्या काळावरही संतांच्या विचारधारेचा प्रभाव कुठं आणि कसा पडला आहे, ते सांगा.
उत्तर : सरदार महादजी शिंदे यांनी जशी तलवार गाजविली तसेच अभंगही रचले आहेत. त्यांनी भगवद्गीतेवर एक मराठी टीका लिहिली. तिचं नाव ‘माधव दासरी’. त्यात विठ्ठलावर अभंग आहेत. महादजी शिंदे हे कृष्णभक्त होते, सर्वधर्म समभाव बाळगणारे होते. त्यांचे एक गुरू बीडजवळचे सूफी होते. तिथं ते वारंवार यायचे. मथुरेला त्यांनी तळ टाकला होता. जवळजवळ वर्षभर दिल्लीचा बादशहा जो इंग्रजांनी अलाहाबादला डांबून ठेवला होता, त्याची दिल्लीला जाण्याची इच्छा होती; पण इंग्रजांची तयारी नव्हती. त्यांची राजधानी कलकत्याला होती. बंगालचा सुभा त्यांच्या ताब्यामध्ये होता. बादशहा सतत सांगायचा, मला जायचं आहे. महादजी आले आणि त्यांनी हेस्टिंगच्या देखत त्याला उचललं आणि आपल्या ताब्यात घेतलं. दिल्लीत वातावरण थोडं वेगळं होतं म्हणून मधल्या काळात त्यांनी बादशहाला मथुरेत ठेवलं.
महादजी कृष्णभक्त होते. आपण मथुरेतच थांबावं, अशी त्यांची इच्छा होती. बादशहा तख्तावर असला, तरी प्रत्यक्ष कारभार महादजी बघायचे. बादशहाला नंतर मथुरेत कंटाळा येऊ लागला. त्याने आग्रह धरला की, माझं तख्त दिल्लीलाच असलं पाहिजे. मग महादजींनी त्याला दिल्लीला हलवलं. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की महादजींच्या काळामध्ये काही दिवस मथुरा ही भारताची अघोषित राजधानी होती. बादशहा महादजींच्या पद्धतीनं सगळं वागत होता. महादजी भजन करायचे. महादजींनी जी भजनाची परंपरा सुरू केली ती परंपरा ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या राजघराण्यामध्ये कित्येक पिढ्या अबाधित होती. माधवराव शिंदेंच्या वडिलांपर्यंत तिथं भजन व्हायचं. महाराज स्वतः वीणा घेऊन उभे राहायचे. त्या वेळेला तत्कालीन सगळे मोठे गायक-वादक तिथं येत. ज्याला आपण ग्वाल्हेर घराणं म्हणतो त्यातले आणि बाहेरचे म्हणजे बडे महंमद खाँ, हाद्दू खाँ, हसु खाँ, बिनकाल मोहम्मद अली तिथं यायचे आणि हे सगळे लोक अभंग म्हणायचे. या सगळ्या मंडळींनी एकदा पंढरपूरला येऊन भजन केलं होतं.
या गोष्टी लोकांना माहीत नाहीत नीट. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्यावर महाराजांचा खूप विश्वास होता. ते चांगले वरिष्ठ अधिकारी होते. एकदा ते ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारातलं भजन पाहिलं आणि मग त्यांनाही असं वाटलं की, आपणही भजन करायला पाहिजे. आपलीही परंपरा आहे. मग त्यांनी बडोद्याला येऊन स्वतःचं भजनी मंडळ काढलं. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. त्यामध्ये अब्दुल करीम खाँ यांचाही समावेश होता. अशा पद्धतीनं वारकरी संगीत आणि शास्त्रीय संगीत यांची देवाण-घेवाण झाली. बडोद्याच्या या संपतरावांनी भजनाचं पुस्तकच काढलं. भजनाला जे प्रत्यक्ष येत त्या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. असा हा सर्व मोठा पट आहे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती अशी सलोख्याची आहे, हे आपल्या लोकांना माहीत नाही.
![]() |
डॉ. सदानंद मोरे |
प्रश्न : आपण या काळात ‘सकलजनवाद’ मांडत आहात. ही संकल्पना नेमकी काय आहे?
उत्तर : मी १९९२-९३ मध्ये ‘तुकाराम दर्शन’ जेव्हा लिहिलं त्या वेळी ‘बहुजनवादा’चा उल्लेख सतत होत होता. काही लोक अभिजनवाद आणि बहुजनवाद यांमध्ये वाद उभा करण्याचा प्रयत्न करत होते. मला असं वाटलं की, वारकऱ्यांच्यामध्ये तरी अशा प्रकारचा काहीही भेद नाही. तुम्ही पाहिलं तर, एकनाथ पंडित होते. भागवतावर त्यांनी भाष्य लिहिलं. दुसऱ्या बाजूला ते बहुजनांच्या लोकपरंपरेतील भारुडपण लिहायचे. म्हणजे संत एकनाथ हे अभिजनपण आहेत आणि बहुजनपण आहेत. या विचारधारेनं सर्वांना आत्मसात केलं आहे. म्हणून मी त्याला ‘सकलजनवाद’ असं नाव दिलं.
डॉ. सदानंद मोरे यांच्या मुलाखतीची यू ट्यूबवरील लिंक -
No comments:
Post a Comment