'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 2 October 2013

शिक बाबा शिक, लढायला शिक!

गेल्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो. वाघोलीच्या एका शाळेत. तिथं शाळेचे माजी विद्यार्थी जमले होते. संघटना स्थापन करायला. या संघटनेच्या माध्यमातून ते आपत्तीग्रस्तांना मदत करणार आहेत. सामाजिक कामांना हातभार लावणार आहेत. कारण त्यांनाही 20 वर्षांपूर्वी असाच कुणी तरी मदतीचा हात दिला होता. त्यांची कथा मी लिहिली. ती साप्ताहिक 'चित्रलेखा'नं 'कव्हर स्टोरी' म्हणून प्रसिद्ध केली.


‘‘पहाटेच्या साखरझोपेत होतो आम्ही. ग्रामप्रदक्षिणेला निघालेल्या रामपालखीच्या टाळमृदुंगाची लय कानावर येऊ लागली होती. पण अंथरुणातून उठवत नव्हतं. अचानक कुत्रांनी कालवा केला. पाठोपाठ धडामधुडूम आवाज झाले. आम्ही लगबगीनं उठून बाहेर आलो. तर परिसरात मोठा धुराळा उठलेला. माणसं सैरावैरा पळत असलेली. भोवताली अंधार. काही कळंना...’’
  
‘‘बाबा ओरडत होते, आरं ये, कुणाचं ट्रॅक्टर हाय? भित्ताडाला धडाकलंय त्ये...तोपर्यंत आजीनं शर्टाला धरून मला फराफरा ओढत बाहेर आणलं...’’

‘‘गावाबाहेरच्या मंदिरात जिथं झोपलो होतो तिथली घंटा आपोआप वाजायला लागली. भानावर आलेले जाणते ओरडू लागले, भूकंप भूकंप!! गावात पळत निघालो तर सगळी घरं एकमेकांवर कोसळून रस्ता बंद झालेला...’’

‘‘आरं धरण फुटलंया पळा पळा..ढिगाऱ्यातून माणसांना बाहेर काढणारी माणसं जीव घेऊन पळत सुटली. ती थेट डोंगरावर जाऊन बसली. पुन्हा खाली उतरंचनात...’’

‘‘खबर कळली तसा गावाकडं निघालो. जीवाचा दगड करून उध्वस्त झालेली गावं ओलांडत किल्लारीत पोहोचलो. तिथलं दृश्य सांगण्यापलिकडचं. रस्त्याच्या कडेला प्रेतांचा खच पडला होता. पळतच गावाकडं निघालो. आपल्या गावाचं, घराचं, माणसांचं काय झालं असेल?...’’

अशा नाना आठवणी सांगणाऱ्यांमध्ये शेवटी आपली आठवण सांगत भूतकाळात शिरलेल्या गौतम बनसोडेंचा गळा भरून येतो. बीएसएनएलमध्ये मोठ्या पदावर असलेले बनसोडे आणि त्यांचे सगळे उच्चपदस्थ सहकारी मित्र एकत्र येऊन 20 वर्षांपूर्वीच्या त्या महाप्रलयंकारी घटनेच्या आठवणी जागवत होते. लातूरचा भूकंप!! देशाला हालवून टाकणाऱ्या या घटनेला येत्या 30 सप्टेंबर 2013 रोजी 20 वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं अशा घटनांविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्याजवळच्या वाघोली इथल्या भारतीय जैन संघटनेच्या संस्थेत दोन दिवसांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय.
या दोन दिवसांत एक छोटासा पण महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे, इथल्या वसतीगृहात राहून गेलेल्या गेल्या 20 वर्षांतील विद्यार्थ्यांच्या संघटनेची स्थापना करणं. आपापले अनुभव सांगणारे हे अधिकारी अर्थात संस्थेचे माजी विद्यार्थी त्यासाठीच इथं आले होते. भूकंपाच्या कटू आठवणी बाजूला सारत ते जगण्याची लढाई लढले आणि जिंकलेही. इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी, आपत्तीग्रस्तांना मदत करता यावी, सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागावी यासाठी हे सुमारे अडीच हजार विद्यार्थी आता आपापल्या व्यावसाय, नोकऱ्यांमध्ये स्थिरावल्यावर संघटना बांधणार आहेत.

एखाद्या भयपटातल्या घटना एकामागोमाग एक वेगानं घडाव्यात तशा खऱ्याखुऱ्या घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या.  
लातूरच्या औसा तालुक्यातील दाऊ लिंबाळा गावचा गौतम बनसोडे त्यावेळी गावात नव्हता. मराठवाड्यातील अनेक लहान मुलं पोट भरण्यासाठी पुण्यासारख्या शहरात येतात. हॉटेलात वगैरे काम करतात. तसाच गौतमही आला. ज्या हॉटेलमध्ये काम करत होता, त्या हॉटेलच्या मालकीणीनं भूकंपाविषयी सांगितलं. तिथून तो आणि त्याचा मित्र गावी निघाला. रस्त्यातच त्यांनी तो भयानक विध्वंस पाहिला. त्यांच्या वयाची अनेक मुलं आपल्या उध्वस्त घरांच्या ढिगाऱ्यांभोवती फिरत होती. ढिगाऱ्याखालून निघणारी आपले आईवडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, गुराढोरांची प्रेतं पाहत होती. खात्यापित्या घरातली, अचानक अनाथ झालेली ही मुलं अन्नपाणी घेऊन आलेल्या ट्रक्समागं भुकेल्या पोटानं धावत होती. शाळा तर केव्हाच भुईसपाट झाली होती. ती कधी उभी राहील, याचा काही भरवसाही नव्हता. अशी तब्बल पाच हजार निराधार मुलं भूकंपग्रस्त भागात भटकताना दिसत होती. 

या परिसरात तळ ठोकून गावकऱ्यांना अन्नपाणी, वस्त्र, निवाऱ्याची मदत करणारे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी ही मुलं पाहिली. मुलांच्या कोवळ्या मनावर या भीषण आपत्तीचा कायमचा परिणाम होऊ नये, त्यांचं जगणं कोमेजून जाऊ नये म्हणून त्यांनी या मुलांना पुण्याला न्यायचा बेत आखला. मोठं होईपर्यंत त्यांच्या राहण्या-खाण्यापिण्याची, शिक्षणाची व्यवस्था करण्याचं ठरवलं. त्यांच्या या कल्पनेला मुख्यमंत्री शरद पवार आणि राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी संमती दर्शवली. भूकंपग्रस्त जिल्ह्यांमध्ये मग संघटनेकडून सर्व्हे केला गेला. बाराशे शाळकरी मुलांना पुण्याला नेण्याचं ठरलं. पण भेदरलेले पालक मुलांना सोडायला तयार होईनात. कुणी म्हणे या मुलांचं धर्मांतर केलं जाईल, कुणी म्हणे या मुलांना मायबाप, गावापासून कायमचं तोडलं जाईल.. पण या सगळ्या अफवांचं निरसन केलं गेलं. आमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल पण त्यांना सुरक्षित जागी ठेवा.. असं वारंवार सांगत पालकांनी भरल्या डोळ्यांनी मुलांना निरोप दिला.

मुलं पुण्यात आली खरी पण त्यांचं भेदरलेपण काही जाईना. पुण्यातल्या पिंपरीतील आत्मनगर भागात त्यांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली होती. पण मुलं उंच बिल्डिंगमध्ये जायला तयार होईनात. त्यांनी पुण्यात येईपर्यंत दोन मजलीसुद्धा घरं पाहिली नव्हती. गावात जी माडीची उंच घरं होती, त्यांची भूकंपात काय अवस्था झाली ती त्यांनी अनुभवली होती. इथल्या उंच बिल्डिंगवरून जाणाऱ्या ढगांकडं पाहून बिल्डिंग हालत असल्याचा त्यांना भास व्हायचा. त्यामुळं आम्ही खाली जमिनीवरच झोपतो, असं ही मुलं म्हणू लागली. अखेर मानसोपचारतज्ज्ञांचं पथक बोलावलं गेलं. ससून हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख, अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या टीमनं प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला. त्यांची भीती दूर केली. मुलं कशीबशी बिल्डिंगमध्ये राहायला तयार झाली. त्या रात्री एक मुलगा बाथरुममध्ये गेला. त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच पाण्याचा नळ पाहिला. नळ चालू केला तर त्याला प्रचंड प्रेशर. तो घाबरून तसाच पळाला. त्या आवाजानं सगळ्या मुलांमध्ये गोंधळ उडाला. भूकंप भूकंप म्हणून मुलं पळू लागली...

भूकंपाच्या त्या धक्क्यातून सावरायला मुलांना बरेच दिवस लागले.
नंतर या मुलांसाठी जैन संघटनेनं पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये 12 एकर जागा घेतली. वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्र’, पुणे (Wagholi Educational Rehabilation Center (WERC) , Pune) या नावाची आपत्तीग्रस्त मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी कायमस्वरुपीची संस्था स्थापन केली. जागतिक बँकेनं यासाठी सुसज्ज इमारत उभी करून दिली. तीन लाख स्क्वेअर फुटांवर उभ्या राहिलेल्या या इमारतीत वसतीगृह, शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा आहेत.  
सध्या या वसतीगृहात 840 विद्यार्थी राहतात. त्यात डहाणू आणि अमरावतीतील धारणी तालुक्यातील 400 आदिवासी मुलं आहेत. तसेच जवळपासच्या कॉलेजांमध्ये जाणाऱ्या बाहेरगावच्या 275 मुलींची ना नफा ना तोटा तत्त्वावर या वसतीगृहात राहण्याची सोय करण्यात आली आहे.

लातूरच्या भूकंपग्रस्त 1200 मुलांसोबतच मेळघाटाच्या कुपोषणग्रत भागातील 360, जबलपूर दुर्घटनेतली 50, जम्मू काश्मीरमधील 450 भूकंपग्रस्त मुलं आणि सुमारे 750 अनाथ मुलं या वसतीगृहानं सांभाळली आहेत. पण यात लक्षणीय ठरली ती लातूर भूकंपातील मुलं. कारण या मुलांपासूनच या पुनर्वसन प्रकल्पाचा पाया घातला गला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं आता स्वत:च्या पायावर तर उभी राहिलीतच पण त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपलीय.

1993च्या भूकंपानंतरचा जबलपूर, भूज, जम्मू-काश्मीरचा भूकंप असो की  अंदमान, तमिळनाडूमधील त्सुनामी. महाराष्ट्रातील आणि बिहारमधील मोठा पूर, दुष्काळ असो की उत्तराखंडमध्ये नुकतीच कोसळलेली आपत्ती, या सर्व नैसर्गिक संकटांमध्ये हे विद्यार्थी मदतीला धावले आहेत. संस्थेनं जणू भावी काळासाठी हे सामाजिक कार्यकर्तेच घडवले आहेत. या बांधिलकीचं एक उदाहरण म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी एक असलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील कानेगावचा गणेश बाबर. टॅक्स कन्सल्टन्ट असलेला गणेश महिन्यातला एक तरी रविवार समाजसेवेसाठी देतो. त्यानं डॉ. नरेंद्र दाभोळकरांसोबत काम केलंय. डॉ. बाबा आढाव, डॉ. अभिजित वैद्य यांच्या कामात सहभागी झालाय. गावाकडं जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्यासोबतच केरळमधल्या अट्टापट्टी या आदिवासी भागात जाऊन त्यानं आदिवासींसाठी काम केलंय. दूधभेसळीविरुद्ध तो वेळोवेळी रस्त्यावर उतरलाय. त्यासाठी त्यानं पोलिसांचा प्रसादही खाल्लाय. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करत नाही, म्हणून त्यानं सरकारलाच कोर्टात खेचलंय. अंगमेहनतीची कामं करणाऱ्या हमालांना सकस आणि पौष्टीक आहार मिळतो का याचा त्यानं सर्व्हे केलाय. एम.कॉम. करताना बेस्ट स्टुडंट म्हणून गौरवला गेलेला गणेश असा सामाजिक कार्यातही बेस्ट कामगिरी करतोय.

वाघोलीच्या संस्थेत शिकून तिथंच शिक्षक झालेला अशोक स्वामी लातूरच्या नदी हातरगा गावातला भूकंपग्रस्त विद्यार्थी. भूकंपानं धरण फुटल्याची अफवा ऐकून त्याच्या गावातल्या माणसांनी गावाशेजारच्या डोंगरावर आश्रय घेतला. सरकारनं नंतर तिथंच त्यांचं पुनर्वसन केलं. आपलं पुनर्वसन करणाऱ्या समाजाचं ऋण  अशोक स्वामी विसरलेला नाही. म्हणून तर देशात जिथं जिथं आपत्ती ओढवली तिथं तिथं तो जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत मदतीला धावून जातो. महापालिकेच्या शाळेत आसरा घेतलेल्या पुण्यातल्या 20 हजार पूरग्रस्तांना त्यानं जेवण वाटायचं काम केलं. मांढरदेवी दुर्घटना, मध्यप्रदेशातील जबलपूर, जम्मू काश्मीरचा भूकंप, तामीळनाडूतील त्सुनामी अशा अनेक आपत्तींच्या वेळी त्यानं मदतकार्यात सक्रीय सहभाग घेतलाय.
इंजीनिअर झालेला उस्मानाबादमधील माकनी गावचा संजय राजपूत आता यशस्वी खाजगी कॉन्ट्रॅक्टर झालाय. पुण्यात आला तेव्हा उंच बिल्डिंगमध्ये जायचीही भिती वाटणाऱ्या संजयनं पुण्यात पिसोळी आणि हिंजवडी भागात 16 आणि 28 मजली बिल्डिंग उभ्या केल्यात.
 
पुणे विद्यापीठाच्या तळेगाव ढमढेरे कॉलेजात प्राध्यापक झालेला पदमाकर गोरे उस्मानाबादमधील बेंडकाळ गावचा. तो म्हणतो, इथं केवळ आमचं शैक्षणिक पुनर्वसनच झालं नाही तर आमचं आणि आमच्यानंतरच्या पिढ्यांचं आयुष्य उभं राहिलं. इथं आम्ही मान्यवरांची व्याख्यानं ऐकली. त्यांनी आम्हाला मोठं होण्याची स्वप्नं दाखवली. आम्ही ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवली. इथं आलेली बाराशेपैकी 700 मुलं शैक्षणिक करिअरमध्ये यशस्वी झाली. उरलेली मुलं गावाकडं परतली. पण वाया नाही गेली. ती उत्तम गावकरी बनली, शेतकरी बनली. महत्त्वाचं म्हणजे समाजबांधीलकी मानणारी माणसं बनली.

नंतर या भूकंपग्रस्त मुलांमध्ये इतर ठिकाणची आपत्तीग्रस्त, अनाथ, आदिवासी मुलंही सामील झाली. मेळघाटातील कुपोषणग्रस्त भागातील पन्नालाल धुर्वे हा त्यापैकीच एक. मातृभाषा कोरकू असणाऱ्या पन्नालालला धड मराठी किंवा हिंदी बोलता यायचं नाही. त्याच्यासारखी मेळघाटातली साडेतीनशे मुलं इथं आली होती. त्यांचाही भाषेचा प्रॉब्लेम. मग त्यांच्यासाठी संस्थेनं मराठी भाषेचे स्वतंत्र क्लास लावले. त्यातून 100 मुलं पुढं सरकली. नोकरी व्यवसायाला लागली. त्यांच्यात उच्चशिक्षण घेणारा पन्नालाल एकटाच. तो पुणे विद्यापीठात हिंदी एम.ए. झालाय. प्राध्यापकीसाठी आवश्यक असणारी नेट परीक्षाही पास झालाय. पण सध्या तो स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास करतोय. दरम्यान प्राध्यापकाची नोकरी मिळाली तरी तो स्पर्धा परीक्षेची तयारी सोडणार नाही. कारण त्याला त्याच्या जिल्ह्यात जाऊन प्रशासन अधिकारी बनायचं. त्याच्या गावात धड रस्ते नाहीत. दवाखाना नाही. शाळा नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गावात या पायाभूत सुविधा नेण्यासाठी, दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी त्याला झटायचंय.

बोलता बोलता गौतम बनसोडेला आपल्या गावच्या मित्रांची आठवण होते. गावातल्या नापास मुलांनाही अशा शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे होती. त्यांनाही कुणी तरी व्यावसायीक शिक्षणासाठी मदत करायला पाहिजे होती. स्ट्रगलच्या काळात मदतीची खरी गरज असते. इथलं आमचं सुविधाजनक शिक्षण संपल्यावर खरी लढाई सुरू झाली. पुण्यात राहायला जागा नाही. खर्च करायला पैसे नाही. हाताशी कुठलीही नोकरी नाही. आम्ही मुलं पुणे विद्यापीठात पॅरासाईट म्हणून राहिलो. कधी वसतीगृह अधिक्षक आला तर गच्चीवर पाण्याच्या टाकीआड जाऊन लपायचो. तिथंच झोपायचो. असे दिवस काढले. आता पुण्यात स्वत:चं घर घेतलंय.

अशाच दिवसांबद्दल सांगितलं बाबासाहेब हरीभाऊ दूधभातेनं. लातूरच्या हसलगन, गावातला दूधभाते सध्या पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे. वाघोलीची संस्था सोडल्यानंतर त्यालाही हलाखीत दिवस काढावे लागले. त्यानं कमवा आणि शिका योजनेमध्ये काम केलं. विद्यापीठाच्या गेटवर एक एसटीडी बूथ होतं. दिवसभराची लेक्चर्स संपली की रात्री उशीरापर्यंत या बूथवर थांबायचं काम केलं. तो सांगतो, गावी आईवडील आहेत. शेती करतात. धाकटा भाऊ इथंच एम.एस्सी. बीएड. शिकून गावी गेलाय. मीही गावी जातो अधूनमधून. पण पूर्वीचं गाव आता राहिलेलं नाही. माझ्या लहानपणी गावात चौसोपी घरं, दारापुढं निजामकालीन आड आणि भलीमोठी बारव, बुरुज, वडापिंपळाची झाडं, त्यांच्या भोवतीचे दगडी पार, मन प्रसन्न करणारी मंदिरं होती. भूकंपानं हे सारं मातीआड लोटलं. आमचं बाळपणच हिरावून घेतलं म्हणा ना. आता माळरानावर सिमेंटची घरं उभी राहिलीत. त्यांच्यात फार जीव रमत नाही. असो. पण या संस्थेच्या माध्यमातून आमचे गावचे ऋणानुबंध अधिकच घट्ट झालेत. भूकंपग्रस्त भागातील प्रत्येक गावातील एक तरी मुलगा वसतीगृहात होता. त्यामुळं आजही कुठल्याही गावात जा. आपुलकीनं विचारपूस होते. आग्रहानं आणि मायेनं दोन घास खाऊ घातले जातात. आम्ही सर्वांनी मिळून मराठवाडा भूमिपुत्र संघटना स्थापन केलीय. दर दिवाळीत आम्ही गावाकडं गेट टुगेदर करतो. संघटनेच्या माध्यमातून गावी सरकारी योजना पोचवण्याचा प्रयत्न करतो.

आत्तापर्यंत आम्ही गावच्या दोन हजार मुलांना मदत केलीय. आता भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यानं आमच्या भूमिपुत्र संघटनेचं काम वाढवणार आहोत.
पुनर्वसनाचा हा सारा पसारा उभा करणारे शांतिलाल मुथ्था 20 वर्षांपूर्वीचा सगळा पट उलगडून दाखवतात. त्यांनी आपल्याला थोरल्या भावासारखा आधार दिला म्हणून सगळी मुलं त्यांना भाऊम्हणतात. जन्मानंतर सहा महिन्यांनी आई गमावलेल्या शांतिलाल यांनी स्वत: पोरकेपण अनुभवलंय. तेही बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावचे. त्यांचं सगळंच शिक्षण होस्टेलमध्ये झालं. ते बीडमधील एका जैन विद्यार्थी वसतीगृहात राहायचे. वसतीगृहाला डोनेशनची गरज असायची. त्यासाठी विद्यार्थ्यांना लग्नात वाढपी म्हणून काम करायला लागायचं. शांतिलालभाऊंनी हे काम केल्यामुळं लग्नामध्ये किती अनाठायी खर्च येतो, हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात सामुदायिक विवाहाची चळवळ उभी केली. सर्व जातीधर्माचे हजारो सामुदायीक विवाह घडवून आणले. त्यासाठी महाराष्ट्रभर फिरले. गावोगावी जैन संघटनेचे कार्यकर्ते उभे केले. लातूर भूंकपग्रस्तांच्या मदतीला हेच कार्यकर्ते धावून आले. 1985मध्ये त्यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र जैन संघटना पुढीला काळात भारतीय जैन संघटना बनली.

शांतिलालभाऊ सांगतात, ‘‘असं काम करताना तुम्हाला खूपच पेशन्स आणि सातत्य ठेवावं लागतं. अशा कामांमध्ये आपण कल्पनाही करत नाही, अशा अडचणी येतात. उदाहरणंच सांगायची तर अलिकडंच आम्ही मेळघाटाच्या कुपोषणग्रस्त आदिवासी भागातून साडेतीनशे मुलं पुण्यात शिकायला आणली. यात प्रामुख्यानं ज्यांना आई वडील नाहीत, अशी मुलं होती. काही दिवसांनी असं लक्षात आलं की तिथून आणलेली सातवी, आठवी, नववीची मुलं 10वीत पासच होत नाहीत. आठवी, नववीतील या मुलांना स्वत:चं नावसुद्धा लिहिता येत नव्हतं, असा मेळघाटातल्या शिक्षणाचा दर्जा. यामुळं आमच्या निकालाची टक्केवारी खूप घसरली. पण यातून आम्ही शिकलो. सध्या मेळघाट आणि ठाणे कोसबाडमधील आदिवासी मुलं इथं शिकायला आणतो पण अगदी पाचवीपासूनच. त्यांचा शैक्षणिक पायाच भक्कम करतो. त्यामुळं आता आमचा दहावीचा निकाल 97-98 टक्के लागतो. हे झालं संस्थांतर्गत अडचणीचं उदाहरण.

दुसरं उदाहरण राज्यकर्ते कसे वागतात, त्याचं. तामीळनाडूत त्सुनामीचं संकट आलं तेव्हा आम्ही कार्यकर्ते मदतीला धावून गेलो. वाघोलीप्रमाणंच तामीळनाडूत पुनर्वसन केंद्र उभारायचं आम्ही ठरवलं. त्यासाठी समाजातील लोकांची जागाही मिळवली. प्रकल्प उभारणीचा खर्चही आम्हीच करणार होतो. पण मुख्यमंत्री जयललितांनी या प्रकल्पाला परवानगी दिली नाही. आमच्यासोबत स्वत: शरद पवारसाहेब जयललितांकडे आले. त्यांच्यासमोर जयललिता हो म्हणाल्या. पण नंतर त्यांनीच विविध परवानग्या अडवल्या. आता यासाठी आम्ही चेन्नई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
तसाच अनुभव जम्मू काश्मीर भूकंपाच्या वेळचा. 2005मध्ये तिथली 500 भूकंपग्रस्त मुस्लिम मुलं आम्ही शिकायला पुण्याला आणली. सोनिया गांधींनी स्वत: श्रीनगरला येऊन या मुलांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. मुलांनी इथं शिकायचं आणि परीक्षा तिकडं जाऊन द्यायची, अशी योजना होती. अभ्यासक्रमातील भाषेतवगैरे फरक पडायला नको म्हणून आम्ही तिथले शिक्षक मुलांसोबत आणले. ही प्रक्रिया खूपच यशस्वी झाली. मुलांनी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परीक्षा दिली. पण त्यानंतर कुठं तरी माशी शिंकली. तिथल्या लोकांनी आमची मुलं पुन्हा महाराष्ट्रात नेऊ नयेत म्हणून तिथल्या सरकारच्या विरोधातच याचिका दाखल केली. अगदी त्यात बारकौन्सिलही सहभागी झालं. त्यामुळं त्या मुलांना काही परत आणता आलं नाही!

अशा नाना प्रकारच्या अडचणी येतात. पण आम्ही त्यामुळं डगमगत नाही. पुन्हा नव्या जोमानं काम करायला सुरुवात करतो. म्हणून तर आम्ही आपत्तीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथकपणे काम करतो. मदतकार्याची मोहीम फत्ते करतो. आता तर आमचे हक्काचे आणि प्रशिक्षित सैनिक या कामासाठी तयार झालेत. ते म्हणजे आमच्या वसतीगृहातले विद्यार्थी. इथं शिकून मोठे झालेले हे विद्यार्थी स्वेच्छेनं नैसर्गिक आपत्तीच्या मदतकार्यात सहभागी होतात. आम्ही वर्षानुवर्षे निष्ठेनं केलेल्या कामाचं हे फळ आहे. माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे?’’

आठवण लातूर भूकंपाची
  • 8 हजार लोक मृत्यूमुखी
  •  16 हजार लोक जखमी
  •  16 हजार जनावरांचा मृत्यू
  •   52 गावं जमीनदोस्त
  •   30 हजार घरं भुईसपाट
  •  3 लाख लोक बेघर


भारतीय जैन संघटनेचं आपत्तीग्रस्तांसाठी काम
संघटनेनं लातूर भूकंपाच्या पहिल्या दिवसापासून महिनाभर रोज सुमारे 10 हजार लोकांची जेवणाची सोय केली. त्यासोबतच कपडे आणि संसारपयोगी वस्तूंचं वाटप, मृतदेहांचं सामूहिक दहन अशी कामं युद्धपातळीवर केली. मुलांना शाळेसाठी पुण्यात आणण्याचं काम मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सहमतीनं केलं.

इतर ठळक कामे
 
·        1993 - लातूर भूकंप – 1200 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पुनर्वसन. पाचवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा
·        1997 – मेळघाट पुनर्वसन प्रकल्प – 350 मुलांची 10 वर्षांची शिक्षणाची सुविधा
·        1997 – जबलपूर भूकंप – 50 मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन
·        2001 – गुजरात भूकंप – 90 दिवसांत 368 शाळांची उभारणी करून सरकारकडं हस्तांतरीत
·        2002 – अकोला पूर – 15 हजार पूरग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा उभारणी
·        2004 – त्सुनामी – 6 कॅम्पच्या माध्यमातून तामीळनाडूत 11 शाळा आणि 34  प्राथमिक आरोग्य केंद्रांची एका वर्षात अंदमान आणि निकोबार बेटांवर उभारणी
·        2005 – जम्मू आणि काश्मीर भूकंप – सुमारे 15 हजार भूकंपग्रस्तांसाठी 870 प्री फॅब्रिकेटेड (PRE-FABRICATED) घरांचा पुरवठा
·        2005-06 महाराष्ट्रातील पूर – पूरग्रस्तांना संसोरोपयोगी साहित्याचं वाटप
·        2008 – बिहार पूर – 181 दिवसांमध्ये दीड लाख पीडितांवर औषधोपचार
·        2013 – महाराष्ट्रातील दुष्काळ – बीडच्या दुष्काळग्रस्त भागात 115 तळ्यांची खोदाई. सात जिल्ह्यात 28 जनावरांच्या छावण्यांची उभारणी आणि व्यवस्थापन