'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 31 July 2011

बोलबच्चन

वर्तमानपत्र म्हणजे एक गंभीर प्रकार. तेही पुण्यातलं म्हणजे अतिगंभीर. आता त्यात विनोदी नावाखाली काहीतरी पाणचट छापायला संपादकाचं काळीज वाघाचं पाहीजे. यमाजी मालकर नावाच्या संपादकांकडं असं काळीज होतं. त्यांनी चक्क 'सकाळ' या पुण्यातील दैनिकातील रविवार पुरवणीत माझा 'बोलबच्चन' नावाचा कॉलम छापायला परवानगी दिली होती. धन्य ते संपादक! धन्य ते पुणेकर वाचक!!

( कृपया फोटोवर क्लिक करा )

Friday 29 July 2011

बंडखोर अत्रे

पीएच. डी. करताना मला भलतेच अत्रे सापडले. म्हणजे त्याला 'ठाऊक नसलेले' म्हणा, 'उपेक्षित', 'बंडखोर', 'दुर्लक्षित', 'खरे' असं काहीही म्हणा. 'शेतात सापडेला मोहरांचा हंडा', असं बहिणाईच्या  कवितांचं वर्णन आचार्य अत्र्यांनी केलं होतं. 
असंच गुप्तधन महाराष्ट्रात दडलं आहे. आणि ते म्हणजे, अत्रेय विचार. 
हे विचार जागे करणारे आहेत, भान देणारे आहेत. अंजन घालणारे आहेत. क्रांती घडवणारे आहेत. नुकतंच अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यानिमित्तानं 'आयडीयल इंटरनॅशनल २०११' हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या अंकासाठी ही अत्रेय विचारांची झलक दाखवणारा लेख मी लिहिला होता. 

                                                                        ( कृपया फोटोवर क्लिक करा )

Tuesday 26 July 2011

मार्मिक

मार्मिकला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयबीएन-लोकमतमध्ये असताना मी एक डॉक्युमेंटरी बनवली होती. त्या डॉक्युमेंटरीचं हे स्क्रिप्ट. यथावकाश व्हिडिओही टाकेन.


मार्मिक
मराठी व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक' झालाय 50 वर्षांचा. 'मार्मिक' म्हटलं की आठवतात ती राजकीय व्यंगचित्रं..1960 ते 1985 पर्यंत पंधरा वर्षं मराठी मनावर गारुड केलं होतं ते मार्मिक मधल्या व्यंगचित्रांनी आणि ती मार्मिकपणं समाजमनाला भिडवणा-या बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकारानं.

Wednesday 20 July 2011

।।श्री गणेश लीळा।।

तुम्ही लीळाचरित्र कधी वाचलंय का? नाही? मग मी लिहिलेलं 'ळ'च्या बाराखडीतलं श्री गणेश लीळा चरित्र वाचा. सकाळ पेपरनं एका दिवाळी विशेषांकात छापलं होतं.



तमाशा कर्जाच्या गाळात!

महाराष्ट्रातील तमाशा कला कर्जाच्या गाळात रुतलीय. 
२००६च्या फेब्रुवारीत मी लेख लिहिला होता. 
त्या परिस्थितीत काही सुधारणा तर नाहीच. पण आर्थिक दलदलीत ही कला गायब होण्याची भीती निर्माण झालीय.


                                                            (कृपया फोटोवर क्लिक करा)
                                                                (कृपया फोटोवर क्लिक करा)

Monday 18 July 2011

मिरच्याचं खळं

जुनी बाचकी चाळत होतो. बाहेर पाऊस पडत होता. काही कात्रणं हाताशी लागली. सालं आपण फारच शेंडा बुडखा नसलेलं लिहित होतो. 
आता तरी कुठं मोठा तुरा आलाय? पण ठीकै. काही तरी खरडत राहणे हीच थोर गोष्ट. 
मानवेतिहासातल्या लिपीच्या महान शोधाचे आपण वाहक आहोत. भरोसा काय, उद्या जगबुडी झाली न् आपण इतिहास जमा झालो तर? मग काही हजार वर्षांनतर उत्खनन करणा-यांना वा परग्रहावरील जीवांना इथले अवशेष सापडतील. त्यात आपलं हे अक्षरधन. डिकोडींग करून वाचतील.  
म्हणून लिहायला पाहिजे.
तर ही शेंडा बुडख्यावाली कात्रणं. एग्रोवन नावाच्या ऐतिहासिक पेपरातील. 
'मिरच्याचं खळं'...


                                                          ( कृपया फोटोवर क्लिक करा )


                                                          ( कृपया फोटोवर क्लिक करा )

Wednesday 6 July 2011

संत संताबाई


वारकरी सांप्रदाय म्हणजे बंडाचा इतिहास. ज्ञान कडीकुलुपात बंद करणा-यांविरुद्ध संत ज्ञानदेवांनी पहिल्यांदा गोदावरी काठी बंडाचा झेंडा उभारला. तर इंद्रायणीकाठी भामनाथाच्या डोंगरावर देहुच्या तुकोबारायांनी बहुजनांसाठी बंडाची पताका फडकावली. त्यांचाच वारसा चालवणारं एक फारसं परिचित नसलेलं नाव म्हणजे पंढरपूरच्या संत संताबाई.

विठ्ठल दर्शनासाठी बंड 
विठ्ठल दर्शनासाठी चर्मकार समाजातल्या या संत संताबाईंनी विठ्ठलमंदिरात  बंड केलं होतं.
साडेतीनशे वर्षांपूर्वी संताबाईंचा जन्म पंढरपुरातल्या अणवली इथल्या घोडके कुटुंबात झाला. वडिल निस्सीम विठ्ठल भक्त असल्याने बालपणापासूनच संताबाईंना पांडुरंगाच्या भक्तीची आवड लागली. वडिलांसोबत संताबाई पंढरपूरला येत. पण दलित समाजाच्या असल्यानं त्यांना थेट दर्शन घेता येत नसे. त्यामुळं एक दिवस त्यांनी सवर्णांच्या रांगेत प्रवेश मिळवला आणि कोणालाही न जुमानता विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
वाढत्या वयासोबत संताबाईची ही विठ्ठल वाढतच गेली. तिच्या पंढरपूरच्या वा-या वाढल्या विठ्ठलाच्या भजनातच त्यांचा जीव रमू लागला.

विठूरायाचं वेड लागलेल्या संताबाई अणवली ते पंढरपूर अशा वा-या करू लागल्या. लग्न झाल्यावरही त्यांच्या या वा-या थांबल्या नाहीत. उलट रात्री अपरात्रीही त्या सासरहून पायी पंढरीला जाऊ लागल्या.
मोहोळच्या संताराम देवळे या इसमासोबत संताबाईचं लग्न झालं. पण तिचं मन संसारात रमलं नाही.
विठूरायाच्या भक्तीनं वेड लावलेल्या संताबाईचं मन संसारात रमलं नाही. अगदी रात्री अपरात्रीही त्या मोहोळहून पंढरपूरला जाऊ लागल्या. त्यामुळं सासरच्या लोकांनी तिला घरातच डांबून ठेवायला सुरुवात केली.
पण सासरच्या विरोधाला न जुमानता संताबाई पंढरपूरला जातच राहिल्या. शेवटी सासरच्या लोकांना तिच्या भक्तीची सत्यता पटली. त्यांनी संताबाईला संसाराच्या बंधनातून मुक्त केलं. आणि संताबाई पंढरपुरातच येऊन स्थायिक झाल्या.
अनेक बहुजन संतांप्रमाणं संत संताबाईंही उपेक्षित राहिल्यात. खुद्द पंढारपुरातही त्या फारशा कोणाला माहीत नाहीत. पण सातासमुद्रापलिकडचे संशोधक संताबाईवर संशोधन करत आहेत. येत्या आषाढी एकादशीला तिचं चरित्रही प्रकाशित होणार आहे.

संताबाईंवर संशोधन
दुर्देवानं संताबाईचे अभंग उपलब्ध होत नाहीत. अमेरिकेच्या कार्लेमन कॉलेजमधील इतिहासाच्या प्रोफेसर संताबाईंवर संशोधन करतायत. तर लातूरच्या एका भाविकानं नुकतंच संताबाईचं चरित्र लिहिलंय.
या क्रांतीकारी संताबाईचा संपर्क बहुजनांचे कैवारी छत्रपती शाहू महाराजांशी होता. संताबाईच्या समाज कार्याची शाहूमहाराजांनी दखल घेतली होती. महाराजांनी तिला पंढरपुरात जमिन घेऊन दिली.
समाजातल्या उपेक्षित वर्गातल्या या महिला संतांचे विचार आता संशोधातून जनतेसमोर येत आहेत. यातून वारकरी पंथाच्या विचारांना एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे.
संताबाईचे अभंग जरी अजून प्रकाशात आले नसले तरी तिच्या आठवणी भाविकांनी जपून ठेवल्यात. पंढरपुरात संताबाईचा मठ आहे. तर मोहोळमध्ये संताबाईची समाधीही आहे.

पंढरपुरात समाधी 
आपल्या माहेरात अर्थात पंढरपुरात संत संताबाईनं समाधी घेतली. या समाधीवर उभारलेल्या मठाचा सध्या जिर्णोधर सुरू आहे. समाधीपुढचं हे विठ्ठल रुखुमाईचं मंदिर शंभर वर्षांपूर्वी बांधल्याचं सांगितलं जातं. इथं संताबाईच्या काळातल्या खडावा आणि पाळणा आदी वस्तूही जतन करण्यात आल्यात. संताबाईंचे आकर्षक मुखवटेही मठात पाहायला मिळातात.

संताबाईच्या सासरमध्ये अर्थात मोहोळमध्येही तिच्या स्मृती पाहायला मिळतात. या जुन्या वाड्यात भिंतीवर लावण्यात आलेल्या या चित्राची भाविक आस्थेनं पूजा करतात. इथं संताबाईंची समाधीही उभारण्यात आलीय. संताबाईच्या या आठवणीच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतायत.
.............................................................................................

संत मायबाई


प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. अशीच एक महान माऊली विदर्भात होऊन गेली. जिच्या मार्गदर्शनामुळे श्री साईबाबा, गजानन महाराज, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज आदी थोर संत उदयाला आले. तिचं नाव जानकूबाई उर्फ मायबाई.

देशविदेशातील लाखो लोक ज्यांचे भक्त आहेत, त्या शिर्डीच्या साईबाबांना लोककल्याणाची प्रेरणा दिली ती एका निरक्षर महिलेनं. तिचं नाव जानकूबाई उर्फ संत मायबाई. विदर्भातील मोर्शी तालुक्यातील शिरखेडच्या देशपांडेच्या वारकरी घरात मायबाई जन्मल्या. त्यांचं माहेरचं नाव भागूबाई. अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यातील कु-हा गावच्या सीताराम देशपांडेंशी भागूबाईचं लग्न झालं. सासरच्यांनी तिचं नाव जानकू असं ठेवलं. लग्नानंतर जानकूचं वागणं खूप विक्षिप्त झालं. पण सीताराम यांनी ते मोठ्या मनानं सहन केलं.

संतांचा सहवास
सीतारामपंत पुढं वर्ध्यातील आर्वीत येऊन स्थायिक झाले. या ठिकाणी त्यांचा देहांत झाला. जानकू आणि त्यांचा मुलगा पांडुरंग पोरके झाले. या दरम्यान जानकूबाईंना संतांचा सहवास लाभला. त्यातूनच त्यांना आत्मभान आलं. दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. मग रोज अगदी भिक्षा मागून त्यांनी गरीबांना अन्नदान सुरू केलं. त्यांच्या या कार्यामुळं तसंच विठ्ठलभक्तीमुळं त्यांना लोक संत मायबाई असं, संबोधू लागले. गोरगरीबांची सेवा करण्याचा हा मंत्र मायबाईंनी आपल्या अनुयायांनाही दिला. त्यातूनच मग श्री साईबाबा, गजाननमहाराज, ताजुद्दीनबाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज आदी संत उदयाला आले.

विदर्भ म्हणजे उपेक्षेचा धनी. पण याच विदर्भातील अनेक संतांनी वारक-यांचा समतेचा विचार समाजात रुजवण्याचं मोठं कार्य केलं. याच संतांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे, संत मायबाई. मायबाईंनी अनेक महापुरुषांच्या मनात ज्ञानज्योती पेटवल्या.

नाथपंथीय परंपरा
नाथपंथीय गुरू मच्छींद्रनाथाचा अनुग्रह गोरक्षनाथांना झाला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना उपदेश दिला. तर गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या बंधूला ज्ञानदेवांना हा गुरुपदेश केला. याच परंपरेतले हैबतीबाबा. त्यांचा अनुग्रह मायबाईंना मिळाला.

1857च्या बंडाशीही संत मायाबाईं जोडलेल्या होत्या, असं सांगितलं जातं. उठावातील स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी आपल्या मठात आश्रय दिला होता. साईबाबा, ताजुद्दीनबाबा, गजाननमहाराज यांनाही आपल्या कार्याची प्रेरणा मायबाईंच्या मठातूनच मिळाली.

मायबाईंचा वारसा ख-या अर्थाने चालवला तो संत अडकोजी आणि संत तुकडोजी महाराजांनी. आर्वीच्या फिसके घराण्यातला वाया गेलेला आडकू नावाचा मुलगा मायबाईंच्या मार्गदर्शनामुळं पुढं संत अडकोजी महाराज म्हणून प्रसिद्ध पावला.
 अडकोजींची कृपा वरखेड यावलीच्या बंडुजी ब्रम्हभट्टाचा पुत्र माणिकवर झाली. हाच माणिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणून उदयाला आला.

मायबाईंच्या आठवणी
ग्रामगीता लिहून आणि आपल्या खंजिरी भजनांतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेडोपाड्यांना जाग आणली. अडाणी निरक्षर जनतेला ज्ञानाची वाट दाखवली. त्यांचा हाच वसा आज त्यांचे शिष्य मोठ्या समर्थपणे चालवत आहेत. स्वत: आत्मविश्वासानं जगा आणि इतरांनाही जगायला बळ द्या, अशी शिकवण संत मायबाईंनी दिली. या माऊलीच्या आठवणी विदर्भातील जनतेनं जपून ठेवल्यात. आर्वी इथं त्यांच्या जुन्या मठाच्या जागेवर आता भव्य मंदिर उभारण्यात आलंय. यात मायबाईंची सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे. मायबाईंचा हा मठ म्हणजे एके काळी अनाथांचा आसरा बनला होता. आताही इथं भाविकांची वर्दळ सुरू असते.

मायबाईंनी सुरू केलेला गोकुळ अष्टमी उत्सव इथं उत्साहानं साजरा होतो. इथंच आडकोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मायबाईंचा अनुग्रह झाला. या संतांचा वारसा आता संत अच्युत महाराज चालवतात. त्यांच्या विचारांचा प्रसार करतात.

अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कार यांना भुलू नका. आपल्या कामातच राम शोधा. संसारातच विठ्ठल रखुमाई आणि गावातच पंढरपूर शोधा, असे मायबाईंचे विचार त्यांचे अनुयायी घरोघर पोहचवतात.
..............................................................................................................

संत सोयराबाई

समतेचं तत्वज्ञान रुजवणा-या वारकरी पंथानं अनेक वास्तव चमत्कार घडवलेत. त्यातला एक अदभुत चमत्कार म्हणजे संत सोयराबाई. उपेक्षित आणि दारिद्र्यात जीवन जगणार्‍या या माऊलीनं लिहिलेले अभंग ऐकले किंवा वाचले तरी आपल्याला जीवन धन्य झाल्याचा अनुभव येतो.





अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग... किशोरी आमोणकरांनी गायलेला हा नितांतसुंदर अभंग ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगही विरघळला असेल. पण हा अभंग कोणी लिहिलाय माहिती आहे? संत सोयराबाईंनी! होय, तीच ती निरक्षर, अठराविश्व दारिद्र्य झेलत, गावकुसाबाहेरचं उपेक्षित जीणं जगणारी चोख्याची महारी. सर्व संतांच्या अभंगाहून गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग. आणि त्याहूनही गोड आहेत ते त्यांच्या पत्नीने, संत सोयराबाईनं लिहिलेले अभंग. अर्थात यामागे प्रेरणा आहे ती चोखोबांचीच.

संत चोखोबांचे कुटुंब मंगळवेढ्याचे. अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली सर्व उपेक्षा या कुटुंबानं काकणभर अधिकच सहन केली. अशा वेळी कुटुंबप्रमुखाला म्हणजेच चोखोबाला जगण्याचं बळ दिलं ते पंढरीच्या विठुरायानं.
आणि पत्नी सोयराबाईनं. तिनं चोखोबाच्या संसारात कष्ट तर उपसलेच पण चोखोबाच्या विठ्ठल भक्तीतही ती सोबत राहिली. त्याही पुढे जाऊन तिने चोखोबांप्रमाणेच अभंगरचनाही केली. त्यातून वारकरी पंथाची समतेची शिकवण ती आवर्जून सांगत राहिली.

सखा पांडुरंग
गावकुसाबाहेर राहणार्‍या चोखोबांच्या कुटुंबाला वारकरी संतांचा सहवास लाभला. साहजिकच पंढरीचा विठुराया त्यांचा सोबती झाला. त्यांची सुख दु:खं जाणून घेणारी प्रेमळ मायमाऊली बनला.
संत ज्ञानदेव, नामदेवांच्या संगतीत चोखामेळ्याला पांडुरंग भक्तीची गोडी लागली आणि या कुटुंबाचं जीवनच बदलून गेलं. सोयराबाईला वाटत होती मूलबाळ नसल्याची खंत. पांडुरंगानं त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली. आणि ते याचकाच्या रुपानं त्यानं सोयराबाईच्या हातचा दहीभात खाऊन तिला आशीर्वाद दिला. देवाच्या आशीर्वादानं या दाम्पत्याला कर्ममेळा नावाचा मुलगा झाला.
वारकरी संतांचा चोखोबाच्या घरी राबता होता. एकदा चोखोबाच्या घरी स्नेहभोजनाला जमलेला संत मेळा पाहून देवालाही राहवलं नाही. तेही या पंगतीत सहभागी झाले. स्वत: बनवलेलं जेवण सोयराबाईंनी आग्रह करून वाढलं आणि जेवणारे सारे तृप्त होऊन गेले.


क्रांतीकारक अभंग
चोखा मेळ्याला संसारात साथ देणारी सोयराबाई ख-या अर्थानं लखलखली ती तिच्या रसाळ अभंगवाणीतून. साध्या, सोप्या रसाळ भाषेत तिनं जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलं. अर्थात तिचं हे सारं तत्त्वज्ञान अनुभवातून आलं होतं.
देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ज्या काळात पराकोटीचा जातीभेद पाळला मानला जात होता, त्या काळात महार समाजातल्या या भाबड्या बाईनं अशा प्रकारचे क्रांतीकारक अभंग लिहिले.
‘‘आमुची केली हीन याती तुज का न कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमच्या चित्ता’’
आम्हाला अस्पृश्य का केलेस, असा सवाल सोयराबाई अभंगातून देवाला विचारते. अभंगाच्या माध्यमातूनच समाजाशी झगडते, स्वत:शी वाद घालते.

सोयराबाईचे अवघे ६२ अभंग सध्या उपलब्ध आहेत. पण जे आहेत ते आपल्याला हलवून सोडणारे आहेत. डोळ्यात अंजन घालणारे आहेत. वेशीबाहेरच्या या माऊलीचं हे सारं शब्दवैभव अचाट करणारं आहे.  

निर्मळाचे अभंग
रसाळ अभंग लिहिणार्‍या संत चोखोबांना काळाच्याही पुढची दृष्टी होती. आपल्या कुटुंबालाही त्यांनी या ज्ञानभक्तीत सहभागी करून घेतलं. सोयराबाईसोबतच चोखोबाची बहीण निर्मळाही सुंदर अभंग लिहू लागली. सोयराबाईप्रमाणं निर्मळेचीही भाषा रोख ठोक आहे. तिनं तर थेट आपल्या गुरुला म्हणजेच संत चोखामेळ्यालाही खडसावलं. बाळंतपणाच्या काळात सोयराबाईला एकटं सोडून आल्याबद्दल ती अभंगातून चोखोबाची कानउघाडणी करताना दिसते.
विठुरायाही या नणंद भावजयींच्या अडीअडचणींना धावतो. सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी श्री विठ्ठलच निर्मळेचं रुप घेऊन चोखोबाच्या घरी येतो. अशा या थोर संत कुटुंबांचे १३वे वंशज अजूनही पंढरपूरला राहतायत. चोखोबांचा वारकरी वारसा चालवतायत.

वारकरी ध्वजा- बहिणाबाई


जातीपातींची बंधनं तोडून वारकरी पंथाची ध्वजा फडकावण्याचं महान काम केलं, संत बहिणाबाईनं. ब्राम्हण जातीतल्या बहिणाबाईनं कुणबी समाजातल्या तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं. आणि संतसाहित्यात मोलाची भर घातली. 

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस ही वारकरी सांप्रदायाची रचना सांगितली ती संत बहिणाबाईंनी. वारकरी पंथाचं तत्वज्ञान सांगणा-या बहिणाबाईंचा जन्म औरंगाबादमधील देवगावचा. वयाच्या तिस-याच वर्षी त्यांचं लग्न झालं, एका ३० वर्षांच्या बीजवराशी.
बहिणाबाईंचे पती मराठवाड्यातल्या शिऊर गावचे कर्मठ ब्राम्हण. लहानग्या बहिणाबाईला या नव-याचा जाच होऊ लागला. बहिणाबाईंनी आईवडील आणि नव-यासोबत गाव सोडलं. कोल्हापूरला एका बहिरंभट नावाच्या ब्राम्हणाच्या घरात त्यांना आश्रय मिळाला. इथंच त्यांना अध्यात्माची गोडी लागली.

तुकोबारायांचा दृष्टांत
एका लहान प्रसंगाने बहिणाबाई तुकोबारायांशी जोडल्या गेल्या. बहिरंभटाच्या घरी त्यांच्या एका गायवासरावर जीव जडला. यातील वासराचा मृत्यू झाल्याने दु:खाने बहिणाबाई बेशुद्ध पडल्या. या अवस्थेतच त्यांना तुकोबारायांचा दृष्टांत झाला.
तुकोबारायांच्या भेटीची ओढ लागलेल्या बहिणाबाईंना तुकोबारायांनी दृष्टांत देऊन रामकृष्ण हरीहा मंत्र दिला. तुकोबारायांचा ध्यास घेतलेल्या बहिणाबाईंच्या नव-याचं मनही नंतर पालटलं. आणि ते दोघेही देहूला पोहोचले. देहूत त्यांना तुकाराममहाराजांचं मार्गदर्शन मिळालं. आणि तुकोबारायांप्रमाणंच त्यांनी आयुष्यभर संसारात राहून परमार्थ केला.

शिऊरमध्ये अभंगलेखन
तुकोबारायांचे मार्गदर्शन घेऊन बहिणाबाई आपल्या सासरी म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिऊर इथं परतल्या. इथंच बहिणाबाईंनी विपुल अभंग लिहिले.
बहिणाबाईचे असे अनेक अभंग वारकरी गातात. पदे, आरत्या, हमामा, पाळणा, पिंगा, झिंपा, सौरी, डोहो अशी विविध प्रकारची रचना बहिणाबाईंनी केली.  त्यात काही हिंदी रचनाही आहेत.
तुकोबारायांप्रमाणे या अभंगांतून बहिणाबाईंच्या शब्दांना धार चढते. भोंदू संत, भ्रष्ट ब्राम्हण, अनिती, दुराचार व्यसने यांवर बहिणाबाई कोरडे ओढतात.

आपल्या अभंगातून बहिणाबाईंनी क्रांतीकारक विचार मांडले. बौद्धत्त्वचिंतक अश्वघोष यांनी लिहिलेल्या ब्राम्हण्यविध्वंसक ‘वज्रसूचि’वर बहिणाबाईंनी अभंगात्मक भाष्य केलं. ही वज्रसूचि जन्माधिष्ठीत ब्राम्हण्याला विरोध करते. वारकरी पंथाने सांगितलेला समतेचा विचार बहिणाबाईंनी ख-या अर्थाने उंच नेला.

शिऊरमध्ये भव्य मंदिर
संत बहिणाबाईचे अभंग तर अमर झाले आहेतच, पण तिच्या आठवणीही वारक-यांनी जपून ठेवल्यात. शिऊरमध्ये तिचे भव्य मंदिर उभारण्यात आलंय, तर देहूत बहिणाबाईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.
इथं बहिणाबाईची समाधीही आहे. तुकारामांची रांगडी भाषा बोलणा-या बहिणाबाई मूळच्या औरंगाबादमधील वैजापुरातल्या शिऊर गावातल्या. गावच्या या थोर लेकीचं गावक-यांनी भव्य मंदीर बांधलंय. इथं नियमितपणे भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. मंदिराच्या भिंतीवर संगमरवरी दगडांवर बहिणाबाईंचे अभंग कोरण्यात आलेत. महिला भाविकांची मंदिरात सतत वर्दळ असते.

 देहूत बहिणाबाईंची मूर्ती
बहिणाबाईंची अशीच आठवण जपलीय ती संत तुकोबारायांच्या देहू नगरीनं. इथं बहिणाबाईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. 
बहिणाबाईंची ही स्मारकं माणुसकी शिकवणारी तसंच सर्वांना सर्व धर्म समभावाची प्रेरणा देणारी ठरली आहेत.
.............................................................................

संत जैतुनबी



वारकरी पंथानं समाजात सर्व धर्म समभावाचा विचार रुजवला. त्याची जोपासना केली. आपण म्हणाल, या वारकरी संतांना तर शेकडो वर्ष होऊन गेली. अलिकडच्या वर्षांमध्ये असा एखादा संत झालाय का? त्याचं उत्तर आहे, संत जैतुनबी उर्फ जयदास महाराज !

मुस्लिम संत परंपरा
वारकरी पंथाचं समन्वयाचं तत्वज्ञान या महिलेनं अगदी हल्लीच्या काळातही जगून दाखवलं. मात्र त्यासाठी त्यांना घ्यावी लागली वारक-यांची बंडाची पताका. मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही लोकांचा विरोध पत्करून त्यांनी लहान वयातच विठ्ठलाची भक्ती सुरू केली.

बारामतीजवळच्या माळेगावात गवंडी व्यवसाय करणारे मकबूल सय्यद यांची ही मुलगी. मकबूल यांचे गवंडी मित्र गुण्याबुवा अर्थात हनुमानदास महाराज हे वारकरी. त्यांच्याकडून लहानगी जैतुनबी हरिपाठ शिकली. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत वाचण्याची तिला आवड लागली. आणि ती चक्क कीर्तनही करायला लागली. चोवीसाव्या वर्षी तर तिने स्वत:ची दिंडीही सुरू केली.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
याच काळात जैतुनबी स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाली. सातारच्या नाना पाटलांच्या पत्री सरकारच्या कार्यात त्या सहभागी झाल्या. 
हळू हळू जैतुनबीला होणारा विरोध मावळला. आणि तिच्या कीर्तनाला लोक गर्दी करू लागले. साध्या जैतुनबीचं रुपांतर कीर्तन, प्रवचन करणा-या ह. भ. प. संत जयदास महाराज यांच्यात झालं.
संत लतिफा मुसलमान यांच्यासारख्या मुस्लिम वारक-यांचा आदर्श जैतुनबींच्या समोर होताच. पण आपल्या अनुभवातून जैतुनबींनी स्वत:चं तत्वज्ञान मांडलं. आपल्या कीर्तन, प्रवचनांतून त्या मानवतेचा धर्म सांगू लागल्या.

संत कबीर, संत शेख अहमद, संत लतिफा मुसलमान आदी मुस्लिम वारकरी संतांनी हिंदू मुस्लिम ऐक्य तसंच सर्वधर्म समभावाचा प्रसार केला. त्यांचाच आदर्श जैतुनबींनी डोळ्यासमोर ठेवला. प्रत्येक धर्म मानवताच शिकवतो. हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका, असं आवाहन त्या करत.
‘‘आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नही
लेकीन खुदा के नुरसे, आदम जुदा नही’’ असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं होतं.

मुस्लिम धर्माचं आचरण 
विठ्ठलभक्तीत रमलेल्या जैतुनबींनी मुस्लिम धर्माच्या आचरणाकडंही दुर्लक्ष केलं नाही. त्या नियमित नमाज अदा करत. रोजे ठेवत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्व दिंड्यांचे मिळून एकच कीर्तन करण्याचा दंडक आहे. पण इथंही जैतुनबींनी आपला स्वतंत्र वारकरी बाणा दाखवला. जैतुनबींच्या कीर्तनासाठी त्यांची दिंडी चक्क पालखी सोहळ्यापासून काही अंतर ठेवून चालू लागली.

पंढरीच्या वाटेवरच मरण यावं, अशी प्रत्येक वारक-याची इच्छा असते. ते भाग्य जैतुनबींच्या वाट्याला आलं. गेल्या वर्षी माऊलींच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या वाटेवर असताना पुण्यात जैतुनबींचं निधन झालं. जैतुनबींनी दाखवलेल्या मार्गावरून त्यांची दिंडी आता चालत आहे.
कीर्तन, प्रवचनातून जैतुनबी सांगत असलेले विचार सर्वसामान्यांना पटणारे होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होत असे. जन्मगाव माळेगाव, कर्मभूमी पंढरपूर आणि जैतुनबींनी सुरू केलेली दिंडी यांच्या माध्यमातून त्यांचे विचार जतन केले जात आहेत.

जैतुनबींचा वारसा
गेल्या वर्षी जैतुनबींचं निधन झालं. त्यांचा वारसा त्यांच्या सहका-यांनी सुरू ठेवलाय.
जैतुनबींच्या जन्मगावी माळेगाव इथंही त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यात आल्यात. त्यांच्या घरासमोरच त्यांची समाधी उभारण्यात आलीय. शेजारपाजारच्या बायका जैतुनबींच्या आठवणी सांगतात.
जैतुनबी यांची कर्मभूमी पंढरपूर इथं त्यांचा भव्य मठ आहे. राज्यभरातून येणा-या गोरगरीब, गरजू भाविकांची इथं राहण्याची सोय होते. इथं आता जैतुनबींचीही मूर्ती बसवण्यात आलीय. त्यांना मिळालेली सन्मानचिन्हंही इथं पाहायला मिळतात.
जातीधर्माच्या नावावर समाजात दुहीची बीजं रोवणा-यांच्या डोळ्यात जैतुनबींचं हे कार्य अंजन घालणारं आहे. आणि सर्वधर्म समभावाचं त्याचं आचरण प्रत्येकानं अंगीकारावं असंच आहे.
............................................................................................................................

सासुरवाशीण सखूबाई


संत सखूबाईची कराडच्या मंदिरातील मूर्ती

सासुरवाशिणीचं दु:ख काय असतं याची कल्पना या महिला स्वातंत्र्याच्या काळातल्या सुनांना येणार नाही. पण सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या महिलांचं विश्व होतं, ते फक्त चूल आणि मूल. पण ही चौकट मोडण्याचं धाडस केलं ते कराडच्या एका सासुरवाशिणीनं, संत सखूबाईनं.

कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र आहे, एका सासुरवाशिणीचं, संत सखूबाईचं. सखूबाई होती एक सामान्य महिला. झाडलोट, दळण कांडण, धुणीभांडी करणारी, गाईगुरांमध्ये रमणारी. दृष्ट लागण्याजोगा संसार होता. आणि आणखी एक म्हणजे सखूबाईला असणारं देवधर्माचं वेड. पण तिची हीच देवभक्ती तिच्या खाष्ट सासूला पाहवेना. मग सुरू झाले सासूरवासाचे वेगवेगळे प्रकार. भल्या सकाळी उठल्यापासून ते रात्री उशीरा झोपेपर्यंत सासूचा हा जाच सखूबाईला अगदी नकोसा होई. अशा वेळी तिला आधार वाटे तो तिच्या देवाचा. कमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या विठुरायाचा.
संत सखूबाई न बोलता खाष्ट सासूचा जाच सहन करे. पण एकदा सखूबाई विठ्ठलाच्या ओढीनं व्याकूळ झाली.

नाद विठ्ठल विठ्ठल
सखूबाईचं हे गा-हाणं जणू देवानं ऐकलं. नदीवर पाणी भरायला गेलेल्या सखूबाईला टाळ मृदुंगाचा घोष ऐकू येऊ लागला. हा नाद जणू तिच्या आत्म्याला साद घालू लागला. आषाढी एकादशीसाठी नाचत गात निघालेली वारक-यांची दिंडी पाहून सखूबाई तल्लीन झाली. आणि सखूबाई पंढरीला निघाली. तोपर्यंत शेजारीण घागर घेऊन सखूच्या घरी पोहोचली. घडलेला प्रकार समजताच सासूचं माथं भडकलं. तिनं सखूबाईला घेऊन यायला तिच्या मुलाला फर्मावलं. नव-यानं दिंडी गाठली आणि मारझोड करतच सखूबाईला तो घरी घेऊन आला. नव-यानं आणि सासूनं मिळून सखूबाईला विना अन्नपाण्याचं एका खोलीत डांबून ठेवलं. देवाचा धावा करण्याशिवाय मग सखूबाईच्या हातात काहीच राहिलं नव्हतं.
सखूबाईच्या आर्त हाकेनं प्रत्यक्ष पांडुरंग व्याकूळ झाले. आणि त्यांनी सखूबाईसाठी स्त्रीवेष घेतला.

पांडुरंग झाले सखूबाई
स्त्रीरूप घेऊन पांडुरंग सखूबाईला जिथं बांधलं होतं, तिथं हजर झाले. तिचं दु:ख जाणून घेतलं. म्हणाले, तू पंढरीला जा. पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये. तोपर्यंत इथं तुझ्या जागी मी थांबतो.
सखू पंढरपुराला गेली. पांडुरंगाचं सावळं रुपडं पाहून धन्य धन्य झाली. आणि तिथंच तिने प्राण ठेवले.
दिंडीसोबत आलेल्या गावक-यांनी सखूबाईचे पंढरपुरातच अंत्यसंस्कार केले.
इथं करवीरमध्ये पांडुरंग सखूबाईचं सारी कामं करत होता. मात्र आता रुक्मिणीला चिंता वाटू लागली, आता पांडुरंगाला सखूबाईच्या घरीच अडकून राहावं लागेल म्हणून. मग रुक्मिणीमातेनं सखूबाईच्या अस्थी जमा करून तिला जिवंत केलं.
रुक्मीणी माता सखूला जिवंत करते. त्यानंतर सखू तिच्या सासरी परतते.

इकडं पंढरपूरला गेलेले गावकरी करवीरमध्ये परतात. आणि पंढरपूरचा प्रकार सांगायला सखूच्या घरी जातात. पण तिथं घरात काम करणारी सखूबाई पाहून त्यांना मोठंच आश्चर्य वाटतं.
गावक-यांच्या कहाणीवर सखूबाईच्या सासूचा विश्वास बसत नाही. ती त्यांना पिटाळून लावते. पण रस्त्यात त्यांना पंढरपूरहून जिवंत होऊन आलेली सखूबाई भेटते. तिला घेऊन ते पुन्हा सासूसमोर जातात. दोन्ही सखूबाई समोरासमोर येतात. सर्वांना तो भुताचा प्रकार वाटतो. आणि त्याचवेळी सखूच्या रुपातला देव प्रकट होतो. या प्रसंगानंतर सखूबाईचं नशीब पालटलं.

कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर गावक-यांनी संत सखूबाईचं मंदिर उभारलंय. इथं सखूबाईंनं जिवंतपणीच घेतलेली समाधी पाहायला मिळते.
आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून सखूबाईच्या समाधीचं दर्शन घ्यायला येतात.
महिला स्वातंत्र्यांची पताका फडकावणा-या या आद्य माऊलीचा महिमा एकमेकाला सांगतात. आणि सखूबाईचे अभंग म्हणत पंढरपूरची वाट चालू लागतात.
.............................................................................................................

गणिका कान्होपात्रा



विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत कान्होपात्रा. आजही ज्यांना समाजात मानाचं स्थान नाही, अशा एका गणिकेच्या पोटी कान्होपात्राने जन्म घेतला. आणि आपल्या विचारांनी वारकरी पंथात उच्च स्थान मिळवलं.

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥...अशी देवाची आर्त विनवणी करणारी कान्होपात्रा म्हणजे मंगळवेढा गावची कान्होपात्रा गणिका. या युवतीवर जबरदस्ती केली जात होती, ती चक्क बादशाहाच्या सैनिकांकडून. आणि कुणीही मदतीला येत नसल्यानं ती विठुरायाचा धावा करत होती. मंगळवेढ्याच्या शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी जन्मलेली कान्होपात्रा ऐषोआरामी वातावरणात वाढली. आपला व्यवसाय कान्होपात्रेनं पुढं चालू ठेवावा, असं शामाला वाटत होतं. पण एकही पुरुष माझ्याशी लग्न करण्याच्या लायकीचा नाही, असं म्हणत तिने जणू बंडच पुकारलं. अशा वेळी कान्होपात्रेला आठवला तो पंढपुरात विटेवर उभा असलेला अनाथाचा नाथ. वारक-यांसोबत ती पंढरपुरात पोहोचली आणि विठुरायाच्या दर्शनानं देहभान हरपून गेली.

समाजव्यस्थेविरोधात बंड
कान्होपात्रेनं जे काही केलं ते खरं तर तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरोधातलं बंड होतं. कारण वेश्येला कशाला हवा नकार देण्याचा आणि स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार, असा खडा सवाल त्यावेळी केला गेला.
काळाला न रुचणारे असे धाडसी विचार कान्होपात्रेने आपल्या अभंगांतून व्यक्त केले. तिला हे धाडस आलं अनुभवातून. आईचा वेश्याव्यवसायच पुढं चालवला पाहिजे ही समाजाची सक्ती तिनं धुडकावली आणि स्वतंत्र वाट चोखाळली. अर्थात यासाठी तिला पाठबळ मिळालं होतं, ते वारकरी विचारांचं. मंगळवेढ्यातील संत चोखोबाचं. श्री विठ्ठलाच्या मंदिरात, वारक-यांच्या निकोप मेळ्यात कान्होपात्रेचा जीव रमून गेला. कान्होपात्रेचे सुस्वर आणि रसाळ अभंग ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करू लागले.

बादशाहाची वाईट नजर
कान्होपात्रेच्या सुस्वर गायनाची आणि लावण्याची चर्चा अगदी बिदरच्या बादशाहापर्यंत पोहोचली. आणि त्याला या कलावतीची अभिलाषा निर्माण झाली. शेवटी ज्या गोष्टीला नकार देऊन कान्होपात्रानं मंगळवेढा सोडलं होतं, तीच गोष्ट पुन्हा तिच्या समोर उभी राहिली. राजाच्या सैनिकांनी मंदिर वेढलं. आता आपल्यासाठी लाखो वारक-यांचं भक्तिस्थान असलेलं श्री विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त होईल, अशी भीती कान्होपात्रेला वाटली. सैनिकांकडं तिनं विठ्ठलाच्या दर्शनाची परवानगी मागितली. तिनं धावत जाऊन पांडुरंगाच्या पायाला मिठी घातली आणि आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला...
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस हृदयात ॥..कान्होपात्रेचा टाहो देवानं ऐकला आणि देवाच्या पायावरच कान्होपात्रेनं देह ठेवला. पुजा-यांनी मंदिराच्या आवारातच तिचं दफन केलं. तिथं आता एक तरटीचं झाड उगवलंय. त्याखाली कान्होपात्रेची छोटी मूर्ती उभी आहे.

गणिकेची पूजा
एखाद्या गणिकेची अर्थात वेश्येची पूजाअर्चा होताना तुम्ही कुठं पाहिलंय? होय, तिचं नाव संत कान्होपात्रा. प्रत्येक वारक-याच्या देव्हा-यावर तसंच कान्होपात्रेच्या मंगळवेढा या जन्मगावी आणि प्रत्यक्ष पंढरीतील पांडुरंगाच्या मंदिरात तिची नित्य पूजा होते. खेड्यातल्या महिला तल्लीन होऊन अतिशय भक्तिभावानं या गणिकेसाठी अर्थात वेश्येसाठी अभंग गातात. पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात एका कोप-यात संत कान्होपात्रेची समाधी आहे. तिच्या दर्शनासाठी आयाबाया गर्दी करतात. कान्होपात्रेची दुसरी मूर्ती आहे, मंगळवेढ्यात. पंढरपूरजवळचं हे मंगळवेढा गाव म्हणजे संतांची भूमी. संत दामाजी, संत चोखामेळा हे संत याच गावचे. गावच्या या लेकीचा लोकांना अभिमान आहे. गावात तिचं छोटसं देऊळ आहे. तिथं दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते.

संत जनाबाई

वारकरी पंथाचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी एकट्या जनाबाईचं चरित्र पुरेसं आहे. कोण कुठली खालच्या जातीतली, शेण गोवर्‍या गोळा करणारी, दुसर्‍याच्या घरी झाडलोट करणारी दासी जनी, पण वारकर्‍यांनी तिला खूप मोठं स्थान दिलंय.

संत जनाबाईने लिहिलेले अभंग गाऊनच वारकर्‍यांची पहाट होते. नित्यनियमाचे भजनही जनाबाईच्या अभंगांशिवाय होत नाही. नामदेवाच्या घरी दासी अर्थात मोलकरीण म्हणून राहिलेली अनाथ जनाबाई अर्थातच उपेक्षित होती. कारण पंढरपुरातल्या संत नामदेवांच्या गजबजलेल्या म्हणजे तब्बल १४ जणांच्या कुटुंबात आश्रीत जनीकडं लक्ष द्यायला वेळ तरी कोणाला असणार?

जनी दिवसभर राब राब राबते. दळण दळते, पाणी भरते, शेण्या थापते. पडेल ते काम करते. तिच्या मदतीला कोणीच येत नाही. मग प्रत्यक्ष विठुरायाच तिला काम करू लागतो. एवढंच काय पण तिला अंघोळ घालतो, तिची वेणीफणी करतो. देवाचे पदक चोरीला गेल्याचा आळ घेतला गेल्यावर जनीच्या बाजूने उभे राहणारे कोणीच नाही, त्यावेळीही ती देवाचाच धावा करते.दळीता कांडिता तुज गाईन अनंता म्हणणारी जनाबाई आणि तिचे अभंग भाबड्या वारक-यांना आपले वाटतात. म्हणून तर तिच्या नावाचा जयघोष करत, तिच्या पादुका पालखीत घालून हजारो वारकरी दरवर्षी नाचत गात पंढरपूरला जातात.

संतमांदियाळीला कौतुक
नामदेवाच्या घरी दासी म्हणून राहणार्‍या अनाथ जनीचे संतमांदियाळी कोण कौतुक होते. पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या संतांचा पाहुणचार संत नामदेव आणि जनाबाई मोठ्या आपुलकीनं करीत. पंढरीचा विठोबा आणि संतांचं मायलेकराच्या नात्याचं वर्णन जनाबाईनं विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळाया अभंगातून अतिशय सुंदरपणे वर्णन केलंय.

सर्व संतांचं आणि त्यांच्या कार्याचं वर्णन जनाबाईंनी आपल्या अभंगातून केलं आहे. संत नामदेव आणि ज्ञानदेवांसोबतच ती संत चोखोबा, सेना न्हावी आदींचे वर्णन करते. नामदेव तर जनाबाईची प्रेरणा. जनाबाई नामदेवाला पावलोपावली सोबत करते. कीर्तनात त्याच्या पाठीशी उभी राहते. नामदेवाच्याच प्रेरणेने मी अभंग लिहू शकले, अशी कृतज्ञता ती व्यक्त करते. या दासी जनीचं मोठेपण ज्ञानदेवांनी ख-या अर्थानं ओळखलं होतं. ते जनीच्या घरी जातात, तेव्हा त्यांना तिथं देव जनाबाईचे अभंग लिहिताना दिसतो. जनाबाईची कामे करून देताना दिसतो. तर ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर असं जनाई मोठ्या आत्मीयतेनं म्हणते.

या सर्व संतमांदियाळीच्या ओढीनं उत्तरेतून आलेल्या संत कबिरांनाही जनाबाईचं केवढं कौतुक आहे. जनी म्हणजे संतांमधील काशीआहे, असं वर्णन ते आपल्या दोह्यांमधून करतात.
सारे आयुष्य नम्र दासी म्हणून जगलेल्या जनाबाईच्या अभंगातून नंतर स्त्रीमुक्तीचा हुंकार उमटतो. डोईचा पदर आला खांद्यावर, भरल्या बाजारा जाईन मी असे ती बिनदिक्कतपणे ठणकावते. स्त्रीमनाचे खरेखुरे प्रतिबिंब जनाबाईच्या अभंगात पडलेले दिसते.
जनाबाईच्या जीवनाचा आढावा घेता, ती संत नामदेव आणि ज्ञानदेवांच्या जीवनकार्याला प्रेरणा होती, हे वास्तव लक्षात येते.

अभंगांना खडीसाखरेची गोडी
शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.
पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.
पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्‍या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरिला पंढरीचा चोर या अभंगातून ती सांगते. माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडेसारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.


जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. दळीता कांडिता तुज गाईन अनंताहे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला लेकुरवाळा विठूराया संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.
नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावेहा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.

जनाबाईच्या पाऊलखुणा
अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणार्‍या या दासीनं एक असामान्य काम केलं. ते म्हणजे, तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले. आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली.
तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणार्‍या संत अशी जनाबाईची ओळख. अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणार्‍या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदातीरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला. दमा आणि करुंड अशी त्यांच्या आईवडिलांची नावं. हे दोघंही पंढरपूरच्या विठूरायाचे निस्सीम भक्त होते. दोघंही पंढरीची वारी न चुकता करत. जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडिल दामाशेटी यांच्या पदरात टाकलं. तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठूरायाचं दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवांच्या घरी विठूभक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले.  त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं.

जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ. स. १३५० मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली.
अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.

जनाबाईच्या माहेर म्हणजे, परभणीतलं गंगाखेड गाव. याच गावात जनाबाईचा जन्म झाला. पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकर्‍यांनी समाधी बांधलीय. जनाबाईला जातं ओढू लागणार्‍या देवाची मूर्ती इथं दिसते. तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबिरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते.

संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाडकष्ट आले. पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं. जातं, मडकी, गोवर्‍या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत.


Friday 1 July 2011

ग्यानबा तुकाराम


खापर खापर पणजोबा हेच करायचे.
आजोबांनी ते जपलं, वाढवलं.
वडील त्यांच्या वाटेवरून चालत आहेत.
आम्ही चाकोरी बदलली.
पण शेवटी सगळ्या वाटा तिथंच तर जाऊन मिळतात.
हे आषाढाचं आभाळ असं दाटून आलं ना की, शेकडो चुंबक लावल्याप्रमाणं जीवाला ओढणी लागते. कुठल्या तरी माध्यमातून तो जोडून घेतोच.
सावळा विठुराया आणि पंढरीची वाट...
ही वाट उजळवणा-या आमच्या मायमाऊल्या कुठं तरी लुप्त झाल्यात.
मंगळवेढ्याच्या वेशीखाली, विठ्ठल मंदिरातल्या तरटीच्या मुळांखाली, पंढरीबाहेरच्या पडक्या मठात, पोपडे उडालेल्या भिंतीत, कृष्णेच्या काठी, विदर्भ, मराठवाड्यातल्या मातीत...आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
मी मराठी बातम्यांमध्ये रोज एका महिला संतावर स्पेशल प्रोग्रॅम दाखवत आहोत. आवर्जून पाहा, वाचा – ‘माझे पंढरीचे आई’...
संत मुक्ताबाई


संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव...एकाने भेदभाव दूर सारणा-या वारकरी पंथाचा पाया घातला तर दुस-याने या पंथाचा झेंडा देशभर फडकावला. या दोघांच्याही हातून हे थोर कार्य घडून आलं ते एका छोट्या चुणचुणीत मुलीमुळं. होय, तिचं नाव मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानदेवांची धाकटी बहिण मुक्ताबाई. आपल्यापासून वयानं मोठ्या असणा-या या दोघा संतांना मुक्ताईनं वेळीच कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि या संतांनी मानवतेचा इतिहास घडवला.

अनुभव झाला गुरू
इंद्रायणीकाठी देवाच्या आळंदीत १२७९ मध्ये मुक्ताबाईचा जन्म झाला. खेळण्याबागडण्याच्या वयात इतर भावंडांप्रमाणंच छोट्या मुक्ताच्या वाट्यालाही उपेक्षा, वनवास आला. कारण लग्नानंतर संन्यास घेऊन पुन्हा संसारात रमल्यामुळे त्यांच्या मात्यापित्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं. या दोघांनी नंतर इंद्रायणीत देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि या भावंडांचं छत्र हरपलं. या भावंडांवरही बहिष्कार टाकण्यात आला. पण या अनुभवातून ही भावंडं तावूनसुलाखून निघाली.

भातुकली खेळण्याच्या वयातच मुक्ताईवर जबाबदारी पडली. वाळीत टाकलेलं जीवन, समाजाकडून अवहेलना, आप्तांचं झिडकारणं, शेजा-या पाजा-यांकडून अपमान यांनी मुक्ताबाईचं बालपण करपून गेलं. याच कटू अनुभवांचा परिणाम मुक्ताबाईच्या स्वभावावर झाला. वागण्यात आणि काव्यातही एक फटकळपणा उतरला.

तर ज्ञानदेव झाले नसते
सर्वात धाकटी असूनही मुक्ताबाईनं आपल्या मोठ्या भावंडांना आईच्या प्रेमानं सावरलं. आणि प्रसंगी कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वडिलांसारखी कठोरही झाली. त्यामुळंच मुक्ताबाईनं वेळीच फटकारलं नसतं तर ज्ञानदेव घडलेच नसते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.संत मांदियाळीत मुक्ताईचं नाव मानानं घेतलं जातं. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान हे साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश तर इटुकली मुक्ताई म्हणजे आदिमायेचा अवतार, असं संत नामदेवांनी म्हटलंय. आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊनही या भावंडांची उपेक्षा, वनवास संपला नाही.

निवृत्तीनाथांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यासाठी मुक्ताई खापराचं भांडं आणायला कुंभाराकडे गेली. पण विसोबा खेचर नावाच्या निष्ठूर माणसानं हे भांडं काही तिला मिळू दिलं नाही. अशा वारंवार होणा-या अवहेलनेला ज्ञानदेवही कंटाळले. विश्वशांतीचं पसायदान मागणारे ज्ञानदेव मग अपमानाने चिडले, संतापले. दार बंद करून घरात बसले. जेवायलाही येईनात. सा-या जगावरच ते रुसले होते. मग मुक्ताईनं वडिलकीची भूमिका घेतली. ज्ञानदेवाची समजूत घालण्यासाठी दाराशी बसून तिनं जे अभंग आळवले ते अमर झाले.

या अभंगांमुळेच ज्ञानदेव पुन्हा भानावर आले. अज्ञानाची कवाडं उघडण्याचं आवाहन मुक्ताईनं या ताटीच्या अभंगांतून केलं. राग, अहंकार, असूया सोडून इतरांवर प्रेम करण्याचा संदेश तिनं या अभंगांतून दिला. मुक्ताईच्या या अभंगांमधूनच संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुढं प्रेमाचा वर्षाव करणारी विश्वाची माऊली झाले.

तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l
या अभंगांतून मुक्ताबाईच्या व्यक्तिमत्वातील समंजसपणा, सामाजिक भान, सर्वसामान्यांच्या कल्याणाची भावना व्यक्त झाली आहे. आणि हे भान ते आपल्या ज्ञानवंत भावाला अर्थात ज्ञानदेवालाही मिळवून देतात. त्यामुळंच ज्ञानदेवासह सर्वच भावंडांनी धाकट्या मुक्ताईला वडिलकीचा मान दिला.

संत मांदियाळीवर अधिकार
मुक्ताबाईचा हा वडिलकीचा अधिकार केवळ ज्ञानदेवादी भावंडांवरच नव्हे, तर संपूर्ण संत मांदियाळीवर चालत होता. ज्ञानाच्या अहंकारात जो जो बुडाला त्याला बौद्धीक फटके देत भानावर आणण्याचं काम मुक्ताईनं केलं.
वारकरी पंथांची पताका देशभर नेणा-या संत नामदेवांनीही त्याचा अनुभव घेतला.
संत नामदेवराय हे विठुरायाचे लाडके. देवासोबत थेट गप्पा गोष्टी करणा-या, त्याच्यासोबत जेवणा-या नामदेवाचं इतर संतांना केवढं तरी अप्रूप होतं. साहजिकच नामदेवांमध्ये एक सुप्त अहंकार निर्माण झाला होता. ज्ञानदेवादी भावंडांची नामदेवांशी पहिल्यांदा भेट झाली. या भावंडांनी केलेल्या नमस्काराला नामदेवांनी बरोबरीचा प्रति नमस्कार केला नाही. नामदेवांना गर्वाची बाधा झाल्याचं चाणाक्ष मुक्ताबाईच्या लक्षात आलं. आणि तिनं तिथल्या तिथं झणझणीत शब्दात नामदेवाची कानउघाडणी केली.

दुसरा प्रसंग नामदेवाच्या परीक्षेचा. पंढरीला जमलेल्या संतमेळ्यात सर्वांच्या संतपणाची परीक्षा करण्याची आयडिया मुक्ताईचीच. ती वयोवृद्ध गोरोबाकाकांना त्यांच्या थापटीनं प्रत्येकाची मडकी अर्थात डोकी थापटून चेक करायला सांगते. सर्व संत या थापट्या सहन करतात. पण नामदेव चिडतात. त्यावरून हे मडकं अजून कच्चंच आहे, असं सांगत मुक्ताई नामदेवाला भानावर आणतात. आत्मपरीक्षण करायला लावतात...
अखंड जयाला देवाचा शेजारl कारे अहंकार नाही गेलाll
मान अपमान वाढविसी हेवाl म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शनाl
आधी अभिमाना दूर करा ll

अहंकार गळून पडलेल्या नामदेवांनी पुढं देशभर भ्रमण करत वारकरी पंथ सर्वदूर पोहोचवला. म्हणूनच आपल्या अभंगातून संत नामदेव मुक्ताईचं ऋण व्यक्त करत राहतात.

लहान वयात मोठा अभ्यास
अगदी लहान वयात मुक्ताबाईनं मोठा अभ्यास केला होता. या अभ्यासाला चिंतन, अनुभव आणि सामाजिक भानाची जोड मिळाली होती. त्यातूनच केवळ योगाभ्यास हेच जीवन मानणा-या योगी चांगदेवांना तिनं वास्तवात आणलं.

आपलं योग-सामर्थ्य दाखवण्यासाठी वर्षानुवर्षे तप करणा-या योगीराज चांगदेवांना संत ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. पण ज्ञानदेव वयानं खूप लहान असल्यानं मायना न लिहिता त्यानं ज्ञानदेवांना कोरंच पत्र लिहिलं. ते पाहून वर्षे तप करून मुक्ताईनं मोठी मार्मिक टिपण्णी केली. मग चांगदेव जिवंत वाघावर बसून ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले तर ही भावंडं निर्जीव भिंतीवर बसून चांगदेवाल सामोरी गेली. त्यांच्यामध्ये सखोल चर्चा झाली. त्यातून मुक्ताईच्या ज्ञानाची अनुभूती चांगदेवांना आली. आणि त्यांनी लहानग्या मुक्ताईला चक्क गुरूमाऊली मानलं.

चांगदेवाला बाळ मानून रचलेली मुक्ताईची पाळणागीतं प्रसिद्ध आहेत. संत परंपरेत मुक्ताईची मानाचं पान नेहमी प्रथम मांडलं जातं. याचं कारण म्हणजे मुक्ताईची प्रखर बुद्धीमत्ता, अभ्यास, व्यासंग आणि ज्ञान इतरांनाही देण्याचं समाजभान. आपल्या कर्तृत्वानं मुक्ताईनं वारकरी पंथाला मोठीच झळाली प्राप्त करून दिलीय.

मुक्ताईचा मान मोठा
वारकरी पंथात मुक्ताईला मोठा मान आहे. अजूनही गावोगाव, घरोघर मुक्ताईचे अभंग म्हटले जातात. जळगावमध्ये मुक्ताईचं मोठं मंदिर आहे. तिथून दरवर्षी मुक्ताईची दिंडी पंढरपूरला जाते. तर पंढरपूरमधल्या मुक्ताईमठात दर्शनासाठी हजारो वारकरी गर्दी करतात.

.............................................................................................


याच काळात महिला संतांवर मी लिहिलेला लेख 'लोकसत्ता'ने छापला. ही त्याची लिंक - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170432:2011-07-14-14-47-35&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194


पीडीएफ - http://epaper.loksatta.com/8031/indian-express/16-07-2011#p=page:n=33:z=2