'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 6 April 2012

दावडीची ठाकरवाडी

पैसा म्हणजे परमेश्‍वर. पैसा हसवतो. पैसा रडवतो. पैसा घडवतो. पैसा बिघडवतो. पैसा अगदी माणसाचं माकड करून टाकतो. तरी सारं जग पैशाभोवतीच फिरतं. या पैशानं माणसांची दुनिया अगदी उलटी-पालटी करून टाकलीय. ही दुनिया पाहायची असेल तर पुण्याजवळचा चाकण, खेड परिसर एकदा फिरून यावा...


आले.. आले.. आले... मुंबईतले सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी अभयशेठ गावडे आले. दरसाल ते यात्रेसाठी घसघशीत देणगी देतात बरं का. यंदाही ते आपला नावलौकीक राखणार आहेत. लाऊडस्पीकरवरून गावचे कारभारी माऊलीअप्पा यात्रेला गावी आलेल्या मुंबैकराला असं हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. मग कांजी केलाला खादीचा शर्ट न् डोक्यावर कडक धारेची भगवान टोपी घातलेला मुंबईकर वाजत्र्यांच्या कडकडाटात, गुलालाच्या उधळणीत तरंगतच मांडवात येतो. दोनऐवजी चार हजारांची रोख देणगी देतो. या सोहळ्याची मुंबईकर आणि त्याचं गाव वर्षभर वाट बघत असतं.
दुसरीकडं मुंबैकर घरी आला म्हणजे मुंबईचा हलवा, पोराटोरांना नवे कपडे, वाणसामान, शेजारच्यांना काहीबाही, असं काय काय...