'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 30 August 2011

वायाळ गुरुजी

धोतर, टोपी घातलेले अण्णा क्लिक झाले. मीडियाचे, देशाचे हिरो झाले. पण हे होण्याअगोदर अण्णा कित्येक वर्षे राबलेत. गावच्या विकासासाठी त्यांनी दिवसरात्र एक केलेत. असे अनेक अण्णा महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत आहेत. माझ्या ओळखीचे असे एक गुरुजी आहेत, ज्यांना त्यांच्या कामातच रामसापडलाय.




भु-या आला..! म्हणताच, कोंबडीनं पटापट पिलं पंखाखाली घ्यावीत तशी अंगणात खेळणारी पोरंटोरं आज्यांच्या पाठीमागं दडली. झोपड्यांची गवती दारं बंद झाली. आणि कलकलणारी ठाकरवाडी चिडीचूप झाली. कर्ते बापे-बाया रानात गेले असताना वस्तीवर आलेलली ही पीडाच. पांढ-या कपड्यातला माणूस म्हणजे, त्यांच्या दृष्टीने पीडाच. कारण असा माणूस असायचा एखादा तणतण करत आलेला मळेवाला. किंवा हक्काचे मजूर न्यायला आलेला बागायतदार. त्याला ठाकरी भाषेत म्हणायचं भु-या’.
पण यावेळचा भु-या जरा वेगळा होता. शुभ्र पायजमा, शर्ट, गांधीटोपी. चेह-यावर मायाळू भाव. हे होते, गुरुजी. वाडीवर शाळा सुरू करायला आलेले, वायाळगुरुजी. गुरुजींना शाळेची इमारत काही दिसेना. झोपड्या बंद. विचारावं कोणाला?
गुरुजी समजले. उमजले. शाळा सुधारली तर ठाकरवाडी सुधारेल. मग त्यांनी कंबरच कसली.

Sunday 28 August 2011

सिर्फ आधी जित हुई है...


चिल्यापिल्यांच्या हातून ज्यूस पित अण्णा उपोषण सोडताहेत. सर्व चॅनेल्सवर फक्त आणि फक्त अण्णाच आहेत. बाहेर पावसाची संततधार सुरू आहे. सुटीचा दिवस आहे. सगळेजण टीव्हीला खिळून आहेत.
गेले १३ दिवस २४ तास लाईव्ह दिसणा-या अण्णांचा मी सारखा विचार करतो आहे. उसळणारा जनसागर पाहून त्यांच्या उत्साहानं धावत सुटण्याचा..त्यांच्या हसण्याचा.. त्यांच्या तालावर टाळ्या वाजवण्याचा.. त्यांच्या भाषणांचा.. त्यांच्या घोषणांचा..त्यांच्या बसण्याचा.. कूस बदलून झोपण्याचा..त्यांच्या गर्दीत हरवलेल्या नजरेचा..त्यांच्या उपोषणाचा.
त्यांची ती शुभ्र कपडे, ती टोपी, ते धोतर, ती कोपरी. सरकारकडून निराशाजनक बातमी आल्यावर नेटानं उठून उभं राहणं. हात उंचावणं. चेह-यावर अधिकाधिक निग्रह येणं.
चहा पिता पिता आम्ही कॉमेंट पास करत असतो.
‘‘अण्णांची लॉटरी लागली यार!
अण्णा काय झकास हिंदी बोलायला लागलेत नाही?
कपडे बाकी कडक इस्त्रीचे आहेत हां अण्णांचे.
स्टेजमागं जाऊन खात असणार अण्णा काही तरी.
अण्णा त्या सीव्हिल सोसायटीच्या हातातलं बाहुलं आहेत.
अण्णा फक्त मेणबत्तीवाल्यांचं प्रतिनिधित्व करतायत.
अण्णांचे जुने साथीदार कुठे गेले रे?
अण्णा पक्का नगरीआहे. भल्याभल्यांना गुंडाळून ठेवलं राव त्यानं.
त्यांचा आता त्यांच्या टीमवर विश्वास राहिलेला नाही.
अण्णा आपले निश्चयी चेह-यानं स्टेजवर बसून असतात. गर्दीकडं बघत.
परवा संसदेत लालूजी भाषण करताना म्हणाले, जुनी माणसं आहेत बाबांनो ही. उपासतापासाची सवय असते त्यांना. हटायची नाहीत. कालच्या भाषणातही तेच म्हणाले. पण अण्णांच्या उपासाबाबत त्यांनाही शंका वाटलीच.
अण्णा खरंच एवढे दिवस उपाशी कसे राहिले? आमच्याकडं एक जुने चळवळीतले कार्यकर्ते आले होते. त्यांना विचारलं, खरंच भूक कशी काय सहन होत असेल हो, एवढे दिवस? तर ते म्हणाले, मीही केलं होतं सहा दिवस उपोषण. पहिल्या दिवशी फार भूक लागते. पण दुस-या दिवशी डोकं जाम दुखायला लागतं. मग नंतर भूक कमी होते. शेवटी मनाच्या निग्रहावर अवलंबून आहे हो.
भुकेची जाणीव होऊन मी समोरच्या बशीतलं आणखी एक बिस्कीट उचलतो.
गाडी पुन्हा अण्णांच्या सहका-यांवर घसरते. रोज सिनेमास्टाईल झेंडा फडकवण्याशिवाय त्या किरण बेदींना काही कामच नाही. तिनं आणि त्या केजरीवालांनी अण्णांचं आंदोलन हायजॅक केलंय. हे लोक राळेगणच्या लोकांनाही अण्णांना भेटू देत नाहीत. आपले बाळासाहेब भारीच बोलले. त्या टीमला बसवा म्हणाले उपोषणाला. हा हा हा.
सरकार म्हणतं, त्यांचाही या लोकांवर विश्वास नाही. आम्ही थेट अण्णांशीच बोलू.
असंख्य बूमच्या गर्दीनं घेरलेले केजरीवाल बोलत असतात. बोलत असतात. गळ्याच्या शिरा तटतटलेल्या. चेह-यावरून घाम निथळतोय. डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमलीत. सततच्या धावपळीनं वजन घटलंय. कपडे अधिकच ढगळ होत चाललेत.
म्हणतायत, आम्ही घटनाविरोधी नाही आहोत. आम्ही निवडणूक लढवणार नाही आहोत.
आता अण्णा राजघाटाकडं निघालेत. बापूजींच्या दर्शनाला. वारकरी नाही का, एकादशीनंतरची बारस सोडण्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला जात.
तीन दिवसांनी अण्णा राळेगण सिद्धीला जातील. तिथं गावकरी त्यांचं जंगी स्वागत करतील. मिरवणूक काढतील. दमलेभागलेले अण्णा रात्री उशिरा आपल्या मुक्कामी जातील. यादवबाबांच्या मंदिरात. समाधीपुढं हात जोडतील. मग डोक्यावरची गांधी टोपी काढून तिची व्यवस्थित घडी घालतील. नैतिकता जपणा-यालाच ही टोपी घालायचा अधिकार आहे, असं आपण भाषणात म्हणाल्याचं त्यांना आठवेल. त्यावर ते स्वत:शीच समाधानानं हसतील. आणि शिणलेल्या डोळ्यांनी झोपेच्या आधीन होतील.
त्या रात्री हार घालावा असा गळा आणि आणि धरावेत असे पाय आपल्याच नगर जिल्ह्यात असल्याचा साक्षात्कार वात्रटिकाकार फुटाण्यांना झालेला असेल.
पहाटेच अण्णांना उठवायला त्यांच्या नापासांच्या शाळेतली मुलं येतील. त्यांच्यासोबत अण्णा जॉगिंग करत टेकडीवर जातील. वर पोहोचल्यावर एक दीर्घ श्वास घेतील न् म्हणतील, हां आता काय बरं वाटतंय म्हणता..मग हात उंचावून मोठ्यानं म्हणतील, अभी सिर्फ आधी जित हुई है...आधी. लडाई अभी बाकी है...

Thursday 25 August 2011

मावळ होईल इतिहासजमा !

त्या दिवशी समोरच्या सगळ्या चॅनेल्सवर व्हिज्युअल्स लूप करून करून दाखवली जात होती.. नेम धरून धरून सिनेमातल्यासारखं पोलीस ढिशक्याँव ढिशक्याँव गोळ्या झाडत होते.. लोक पळत होते. पोलीस पाठलाग करत होते. फायरिंग करत होते.. 
थोड्या वेळानं मृतांचे, जखमींचे आकडे झळकू लागले. मग पीडितांचे, पोलिसांचे बाईट. अरे, हे तर ओळखीचे चेहरे. मी मनात म्हणतो. 
उंच दिवालाच्या टोप्या, धुवट नेहरू शर्ट पायजमे, शर्टातून डोकावणा-या तुळशीच्या माळा. भोळी भाबडी, कष्टाळू, मायाळू मावळ परिसरातली मावळी माणसं. अटीतटीचं बोलत होती. फारच अस्वस्थ व्हायला झालं.



रात्री जेवतानाही टीव्हीवर तेच, ढिशक्याँव ढिशक्याँव…घास घशाखाली उतरेना. वाटलं, घाला गोळ्या.. म्हणून ज्यानं गोळीबाराचे आदेश दिले त्याला रात्रीचं जेवण गेलं असेल काय?
कोणाशी तरी बोलावंसं वाटू लागलं. गुरुजींना फोन लावला. ज्ञानदेव लोंढेगुरुजी. रिटायर झालेत. पुण्यात राहतात. नोकरीची सगळी वर्षे मावळातल्या दुर्गम गावांत गेली. गुरुजी म्हणजे मावळ्यांच्या गळ्यातला ताईत. सकाळ संध्याकाळ गुरुजींची चौकशी. राहवलंच नाही तर शाळेत जायचं. गुरुजींना काय हवं नको पाहायचं. घर, संसार, शेतीतल्या बारीकसारीक गोष्टी गुरुजींना सांगायच्या.

Tuesday 23 August 2011

सावध ऐका पुढल्या हाका



मुंबईतल्या धावपळीतून आणि उकाड्यातून सुटका करून घेतली. बायकोपोरासह चार दिवसांसाठी गाव गाठलं. उन्हाळा तिथंही हजर होताच. नांगरलेल्या शेतातली ढेकळं आभाळाकडं तोंड करून पडलेली. तापलेल्या तव्यावर उमललेल्या लाह्यांसारखी. माणसं, गुरं, पखरं सावलीचा आडोसा पकडून चिडीचूप बसलेली. सकाळी उन्हं चढण्यापूर्वी आणि संध्याकाळी उन्हं उतरल्यावर जरा बरं वाटायचं.

एका सकाळी आई म्हणाली, चल रे, आपुन जरा धान्याला ऊन दावू. लै सोंडे झालेत. लिंबाच्या पाल्यालाही दाद देत नाहीत. धान्याला ऊन दाखवायला मदत करणं हा लहानपणीचा माझा आवडता कार्यक्रम. पोत्यातलं धान्य शेणाणं स्वच्छ सारवलेल्या ओट्यावर ओतायचं. हातानं पसरवायचं. तो रवाळ स्पर्श मला फार आवडायचा. धान्य दिवसभर खरपूस तापायचं. त्यातले सोंडकिडे कुठं तरी पळून जायचे. मग संध्याकाळी धान्य पोत्यात भरून, लिंबाच्या पाल्यानं पोत्याचं तोंड बंद करायचं. पोती पुन्हा घरात नेऊन थप्पीला लावायची.

Monday 22 August 2011

आठवणी मृत्युंजयकाराच्या

मृत्युंजयकार शिवाजी सावंतांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत. आठवणी आहेत.  त्यांच्या लेखनिकानं सांगितलेल्या. 'मटा'नं 'अविष्कार' पुरवणीत त्या छापल्या.


                                                             (कृपया फोटोवर क्लिक करा)



फोटोग्राफी

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात एक वर्षाचा रितसर डिप्लोमा करून मी फोटोग्राफर झालो होतो. त्याचा हा पुरावा.smile
                                     
                                     (कृपया फोटोवर क्लिक करा)

काही माणुसकी आहे की नाही?

मावळात गेल्या आठवड्यात आंदोलन करणा-या तीन माणसांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. त्यावरून आठवलं. २००२मध्ये पुण्यातल्या मावळ भागात बिबळ्यांचा मोठा उपद्रव सुरू झाला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनानं उपाय काय केला तर, बिबळ्यांना गोळ्या घालणं! मानवी वस्तीच्याच आस-यानं राहणारे बिबळे म्हणाले असतील, 'अरे, या माणसांना काही माणुसकी आहे की नाही?' 
तर 'आज बिबळ्यांना घालतायत, उद्या इथल्या माणसांनाही गोळ्या घालतील', असं मी म्हणालो. दुर्दैवानं ते खरं झालं. बिबळ्यांच्या या शिरकाणावर मी एक लेख लिहिला आणि मुंबईला 'महाराष्ट्र टाइम्स'ला फोन केला. तिथं होते, आल्हाद गोडबोले. ते म्हणाले करा फॅक्स. केला. ८ सप्टेंबर २००२च्या रविवारच्या 'संवाद' पुरवणीत तो छापून आला.

                                                       (कृपया फोटोवर क्लिक करा)

काही वर्षांपूर्वी पुण्यातून महाराष्ट्र 'टाइम्स'ची 'अविष्कार' नावाची पुरवणी निघत असे. त्यात मी लिहित असे. बिबट्यांच्या प्रश्नावरचाच हा एक लेख. 

                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                           

Sunday 21 August 2011

नातं गांधी टोपीचं

120 वर्षांच्या इतिहासात मुंबईतल्या डबेवाल्यांनी परवा पहिल्यांदाच काम बंद आंदोलन केलं. हे आंदोलन होतं, अण्णांना पाठींबा देण्यासाठी. अण्णा आणि डबेवाल्यांमध्ये एक नातं आहे. गळ्यातल्या तुळशीमाळेचं, गांधी टोपीचं आणि अविरत जनसेवेचं.
यानिमित्तानं आठवलं, पुण्या-मुंबईचं, डबेवाल्यांचं हातातोंडाचं नातं. सुचलेला विषय 'लोकमत'च्या पुरवणीचे संपादक प्रदीप निफाडकरांना सांगितला. त्यांनी तो समूहसंपादक अरुण टिकेकरांना सांगितला. टिकेकर मुंबई-पुण्याच्या इतिहासात रमणारे. चटकन् हो म्हणाले. आणि 'लोकमत'च्या १६ नोव्हेंबर २००३ च्या 'मंथन' या रविवार पुरवणीच्या पहिल्या पानावर 'मुंबईकरांसाठी पुणेकर डबेवाले' नावाचा माझा दणका लेख छापून आला.


                        (कृपया फोटोवर क्लिक करा)

पुणेकर काय खातात?

''पुणेकर काय खातात? किंवा काय खात असत?'' याविषयी जगाला उत्सुकता असणारच! याच विषयावर पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात (शॉर्टकट- रानडे इन्स्टिट्यूट) सन १९९८मध्ये सालाबादप्रमाणे लेखनस्पर्धा झाली. त्याचे कै. चिं. वि. तथा अप्पासाहेब जोग पारितोषिक आम्हांस मिळाले. 'लोकमत'च्या 'सखी' पुरवणीत ते गुरुवार दि. २५ मार्च २००४ रोजी छापले गेले. त्याची ही ओरिजनल कॉपी...

                                                            (कृपया फोटोवर क्लिक करा)


                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

अब बुढ्ढा नही हटेगा



काँग्रेसचे प्रवक्ते खिल्ली उडवत होते, तेव्हा अण्णा राजघाटावर गांधींजींच्या समाधीसमोर ध्यान लावून बसले होते. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ. निश्चल. निग्रही.
म्हटलं, अब बुढ्ढा हटेगा नही भाई...

मित्र म्हणाले, ‘‘म्हातारा भारीचै राव. प्राणायाम शिकवणा-या रामदेवबाबांची पाच दिवसांत हालत पतली झाली. ह्यानं तर सरकारचीच कढी पातळ केली. कुठल्या गिरणीचं पीठ खात असेल कोणास ठाऊक?’’
म्हटलं, महाराज, हा वारकरी आहे, आळंदी पंढरीचा. निर्जळी एकादशी करणारा. माऊलींची वारी करणारा. उपवासाचं काय घेऊन बसलात? या माळक-यानं केव्हाच तुळशीपत्र ठेवलंय देहावर. रामलीला मैदान काल आलं त्यांच्या आयुष्यात. नाही तर कोणीही पीडित गा-हाणं घेऊन आला, की झालंच सुरू अण्णांचं उपोषण, बसल्या जागेवर. राळेगण सिद्धीतल्या यादवबाबा मंदिरात. ते तिथंच राहतात. जेवतात. झोपतात. अगदीच गरज पडली तर आळंदीतलं माऊलींचं मंदीर गाठतात. उपोषण सुरू. त्यातून कोणीही सुटलेलं नाही. आमदार, खासदार, मंत्री, सत्ताधारी, विरोधक.

खरं तर हेही अगदी परवा परवाचं आहे. अण्णा मिलिटरीतून गावी परतले ते डोक्यात कधीही पडणारा खटका घेऊनच. नवी दृष्टी मिळालेल्या अण्णांना दिसलं ते गावचं मागासलेपण. कर्मदारीद्र्य. हिरवाईचा मागमूस नसलेली कोरडवाहू जमीन. पिढ्यान् पिढ्याचं अडाणीपण, त्यातून आलेली गरीबी, हलाखी.. आणि गावभर झोकांड्या खात फिरणारे दारुडे. अण्णांनी ठरवलं, हे दुरुस्त करायचं...मग दारुड्या बाप्यांना बायकांनी वठणीवर आणलं. गावातली दारुची दुकानं बंद झाली. त्यानंतर सुरू झाले, पाणी अडवा पाणी जिरवा, कु-हाडबंदी, चराईबंदी, सामाजिक वनीकरण, बायोगॅस, नापास मुलांचं होस्टेल..असे एक ना अनेक ग्रामविकासाचे विविध प्रयोग. देशभरातले लोक राळेगणचा विकास पाहायला येऊ लागले.

राळेगणची पहिली लागण झाली ती शेजारपाजारच्या गावांना. त्यात पहिला नंबर माझ्या गावचा. गावडेवाडीचा. राळेगणप्रमाणं सुरुवातीला, दारुबंदी. मग साफसफाई, वृक्षलागवड, पाणी अडवा-जिरवा इत्यादी इत्यादी. मला आठवतं, पहिल्यांदा अण्णा गावात आलेले. मी असेन इयत्ता चौथीत. दत्तात्रय गायकवाड गुरुजींनी बसवलेलं
आसं घडलंच नव्हतं कधी
आसं पाहिलंच नव्हतं कधी
या गावामधी हो...
हे स्वागतगीत आम्ही रांगेत उभे राहून म्हटलो. अण्णांनी कौतुक केलं.

भाषणात अण्णा म्हणाले
''आपल्याला देश बदलायचाय. 
देश बदलायचा असेल तर राज्य बदलले पाहिजे.
राज्य बदलायचे असेल तर जिल्हा बदलला पाहिजे.
जिल्हा बदलायचा असेल तर तालुका बदलला पाहिजे.
तालुका बदलायचा असेल तर गाव बदलले पाहिजे.
गाव बदलायचं असेल तर माणूस बदलला पाहिजे.
आणि माणूस बदलण्यासाठी पहिल्यांदा स्वत:मध्ये बदल घडवून आणला पाहिजे..''
अण्णांचं हे भाषण आम्हाला पाठ झालं.

पुढं आमचं अवघं तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव आदर्श गाव, वनराई गाव, स्वच्छ गाव, उर्जा ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव म्हणून गौरवलं गेलं. गावडेवाडी पहायला राष्ट्रपती, पंतप्रधान आले. देशविदेशातल्या मीडियात गावडेवाडी झळकली.. अण्णांचा आशीर्वाद! दुसरं काय?

पंचक्रोशीतलं कोणतंही समाजोपयोगी काम असो. सुरुवात अण्णांच्याच हस्ते. एनसीसीत असताना मावळातल्या उंच डोंगरांवर जाऊन पाणी अडवून जिरवण्यासाठी आम्ही तळी खोदली. अण्णा आले, पाहिलं, पाठीवर थाप टाकली. बस् काय पाहिजे आणखी!
दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांनी डेरा टाकलाय. पाठीशी बापूजी आहेत. समोर जनसागर उसळलाय. अन् आमच्या अंगावर चोरटे रोमांच उभे राहतायत. अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

आदर्श गाव गावडेवाडीच्या विकासाची एक झलक दाखवणारा हा लेख. २० एप्रिल २००५ रोजी सकाळनं छापला होता.
                                                           (कृपया फोटोवर क्लिक करा)