आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची पहिली आठवण लिहून ठेवायची असं मध्यंतरी ठरवलं होतं. पण ठरवलेलं काही होत नाही. मुंबईच्या पहिल्या दर्शनाची आठवण लिहून ठेवली होती. परवा सामान उचकताना ते कागद सापडले. खूप विस्कळीत वाटलं. पण म्हटलं चला, आठवण तर आहे, लिहून ठेललेली. टाकूयात ब्लॉगवर...
आई
‘गाडी घोड्याला जप रं बाबा...’ लोकलमधल्या ‘दाबजोर’ गर्दीतून स्वत:ला सोडवून घेताना आई आठवली. मी पुण्याला निघालो की, ती काळजी करत बसायची. पाठ फिरवून निघालो की, म्हणायची, ‘गाडी घोड्याला जप रं बाबा..!’ ट्रॅफिकमधून वाट काढताना आईचे शब्द पुन्हा ऐकू यायचे. आयुष्य रानातल्या वस्तीवर काढलेल्या आईची एकदा पुण्याच्या ट्रॅफिकनं मोठी तारांबळ उडवली होती. गजबजलेल्या चौकांमधली गाड्यांची थप्पी,..हॉर्न..कर्कश ब्रेक..आणि आपल्याच नादात धावणारी गर्दी...आईला हे आवडत नाही. घरी, शेतात, गुराढोरांमध्ये कधी जाईन असं तिला होतं.
कॉलेजसाठी का होईना, शहराची वाट धरावीच लागली. निरोप देताना आईचं पुन्हा ‘गाडी-घोडा’ पालुपद सुरू झालं. म्हणालो, ‘गाडी-घोड्याचा जमाना गेला आई..’ त्यावर ‘कुत्रं मागं लागल्यासारखं जो तो पळत असतो तिथं. माणसाला माणूस वळखीत नाय. जपून राहा...’ असं ती पुटपुटली. आईला अनोळखी असणारी ही गर्दी पहिल्यांदा दिसली सिग्नलला. एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पलटणीच जणू. महाभारताच्या रणांगणाप्रमाणं फक्त ‘आक्रमण..’असं म्हणायचंच तेवढं बाकी.