आमचे परममित्र श्री. सचिन शंकर परब थोर परंपरा असलेल्या दैनिक 'नवशक्ति'चे संपादक झाले. पहिल्याच आठवड्यात त्यांना तुकोबारायांची आठवण झाली. निमित्त, संत तुकाराम सिनेमाला पाऊणशे वर्षे पूर्ण झाल्याचं. त्यांनी मला विषय सांगितला. लिहायला बसलो न् भलतीच तंद्री लागली. त्यांनी तो लेख आजच्या रविवार पुरवणीत छापलाय...
परवा टळटळीत दुपारी देहूत पोहोचलो. नको गर्दीची भानगड म्हणून. तशी एरवीही देऊळवाड्यात फारशी गर्दी नसतेच. पण शांत, निवांतपणासाठी दुपारसारखी वेळ नाही.
अचानक एकामागून एक माणसं येऊ लागली. दिसेल त्याच्या पाया पडू लागली. माणसांच्या, दगडी भिंतींच्या, त्यावरील चित्रांच्या, खांबांच्या. एकमेकांच्या. लगबग करून रांगेत उभी राहू लागली. माना उंचावून अधिरतेनं पुढं सरकू लागली. मी अल्लद बाजूला झालो. पाहू लागलो. दोन तीन लक्झ-या आल्या होत्या भरून. खान्देशातून. मी पिंपळाची सावली पकडली. समोर वीणेकरी दिसत होता. दर्शन करून, मंदिर फिरून आलेली माणसं त्याच्या पायावर डोकं टेकवत होती. पुन्हा उठून झरझर पाय-या उतरून खाली येत होती. वीणेची संथ लय आणि दगडी गारवा मनात मुरू लागला. डोळ्यांच्या कॅमे-यानं फ्रेम पकडली. टाईट. क्लोज. वीणेक-याचे पाय. त्यावर क्षणभर टेकणारी डोकी. आणि पाय-या उतरणारी, उन्हापावसात राबून निब्बर झालेली, शेतक-यांची पावलं.
कुठल्या काळात, कुठल्या जगात वावरतायत ही माणसं? क्षणभर मनात कीव दाटून आली. देवळात येऊनही कुठला नवस बोलत नाहीत. गा-हाणं घालत नाहीत. सोनं नाणं दान करत नाहीत. नुसतीच तुळशीची दोन पानं वाहून डोकं टेकायचं. यांचा देवही माणसाच्या रुपातला. धोतर, बाराबंदी, डोईला फेटा. मांडी घालून बसलेला. तुकारामबाबा! डोळ्यापुढं उभा राहिला. फत्तेलाल, दामलेंचा ‘संत तुकाराम’ सिनेमातला. लहानपणापासून पाहिलेला. केवढं पुण्य लागलं असेल ‘प्रभात’ला. इथल्या, देशातल्या, परदेशातल्या लोकांसमोर त्यांनी तुकोबाराया सदेह साकार केला. विष्णुपंत पागनिसांच्या रुपातल्या याच तुकोबाचं चित्र आम्ही शाळेतल्या पुस्तकात पाहिलं. आळंदी पंढरीहून आणलेल्या, भिंतीवर लावलेल्या फोटोंमध्ये पाहिलं.
या फोटोपुढं उदबत्या लावून, टाळ्या वाजवत ‘आरती तुकारामा’ म्हटली. अजूनही म्हणत आहोत. पाऊणशे वर्षं झाली. या ‘तुकाराम दर्शना’बद्दल ‘प्रभात’च्या पायावर पहिल्यांदा डोकं टेकवावं. मग पाय-या उतराव्यात. आणि पिंपळाची सावली पकडावी.
डोळ्यांचा कॅमेरा फोकस करावा. एकामागून एक उतरणारी, शेतात राबून निब्बर झालेली पावलं टिपत राहावीत. डोळ्यापुढं तुकारामबाबा उभे राहतात. पण भलत्याच रुपात. फत्तेलाल दामलेंचे पांढ-या स्वच्छ कपड्यातले, चेह-यावर सारे सात्विक भाव दाटलेले, मऊ, मृदू आवाजात बोलणारे, भोळेभाबडे तुकोबाराय. त्याच्या जागी मिशांना पिळ भरलेले, धुवट बाराबंदीच्या बाहया सरसावलेले, हातात सोटा घेतलेले देहूचे तुकोबा उभे राहतात.
‘काय रे? रांडेच्या xxx मी... नेभळट दिसतो काय तुला’? असं दरडावतात. आता पुढचा प्रसंग टळावा म्हणून मी घाईगडबडीनं कॅमेरा बंद करतो. आणि देवळातून सटकतो. घाईघाईनं कॅमे-याची लेन्स बदलतो.
वाईड अँगल लेन्समधून देहू आणि परिसर न्याहाळू लागतो. तोच बारा मावळ, तोच भंडारा, तोच भामचंद्र, तीच इंद्रायणी, काठावरचं तेच नांदुरकीचं झाड, आणि तोच डोह. ज्यात तुकारामाच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या. आता मला पु. ल. देशपांडे आठवतात. त्यांच्या ‘तुका म्हणे’ नाटकातली पात्रं जिवंत होतात. देहूजवळच्या सुदुंब-यातले तेली समाजाचे संताजी जगनाडेबुवा. तुकोबांचे लेखक. मंबाजीबुवाला ऐकवतायत, ‘‘केवढ्या भ्रमात आहात तुम्ही मंबाजीबाबा! या वह्या बुडवून अभंग बुडणार? त्याचं नावच ‘अ-भंग’ आहे. त्यांना भंग नाही. मी लिहिलेलं महाराजांचं कवित्व तुम्हाला बुडवता आलं. पण या गेन्या चांभाराच्या तोंडातले अभंग कुठे नेऊन बुडविणार? आज या देहू गावात रोज सकाळी जात्यावर हेच अभंग गायले जातात. मोटेवरचा बैल या अभंगाच्या नादानं शेतं पाजतो. आई लेकराला पोटाशी घेऊन झोपताना या अभंगांची अंगाई गाते. लोहाराच्या मेटावर विठ्ठल नामाच्या गजरात लोखंडाचे घण बसतात. सोनाराचे नाजूक हात या अभंगाच्या तालावर दागिने घडवतात. लोहगावचा रावा महार रस्ते झाडताना हे अभंग गातो. बारा मावळच्या मनात जाऊन बसलेले हे अभंग कसे बुडवणार तुम्ही?’
दुस-या दृश्यात जगनाडेबुवा, अभंग बुडवण्याची आज्ञा देऊन पश्चाताप पावलेले रामेश्वर भटजी आणि त्यांची पत्नी जानकी मावळ खो-यात खेडोपाड्यात, बांधाबांधावर फिरताना दिसतायत. ते काही तरी मागतायत. गोळा करतायत. कागदावर टिपून ठेवतायत. त्याविषयी जगनाडेबुवा सांगतायत, ‘‘वह्या विसर्जित केल्या आणि मी, आई आणि रामेश्वरबाबा निघालो. आईनं गावोगावच्या जात्यावरनं आणि पाळण्याकडनं तुमचे अभंग वेचले. मी शेतमळ्यांतून फिरलो आणि रामेश्वरबाबा गृहस्थांच्या घरात हिंडले. गावागावांतून सा-या मावळ प्रांतात पाखरांसारखं भिरभिर फिरलो आणि हे तुळशीचं बी गोळा करून आणलं.’’
पण या अभंगांमध्ये असं आहे तरी काय? असं विचारायला मी तोंड उघडणार तोच पु. लं.च्या बाजूने प्रचंड देहाचे सुटाबुटातले आचार्य अत्रे येतात. आमची दखलही न घेता इंद्रायणीकडं पाहत आपल्या पहाडी आवाजात अभंग म्हणू लागतात. त्याला जोडून निरुपणही.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले. जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे?
अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो?’’
निरुपण संपवताना अत्रे अचानक आमच्याकडं मोहरा वळवतात. म्हणतात, ‘काय हो, तुम्हाला मी केलेली मराठी माणसाची व्याख्या ठाऊक आहे काय? ‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार’’ चला म्हणून दाखवा एक तरी अभंग.’ आमची उडालेली गाळण पाहत म्हणतात, ‘बरं हे सांगा, तुकाराम सिनेमातल्या शेळपट तुकारामापेक्षा त्याची बाईल ‘आवडी’ उजवी न् खणखणीत का वठलीय?’ आमच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता तेच म्हणतात, अहो जिजाईचा अभिनय करणारी ती गौरी नावाची नटी अक्षरओळख नसलेली अडाणी बाई होती!’ आणि अत्रे आपल्याच हास्याच्या गडगडाटात हरवून जातात.
मी हळूच भंडा-याच्या वाटेला लागतो. तुकाराम मनात घुमू लागतो. व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तुकाराम सिनेमानं बाजी मारली. गो-या लोकांनी तोंडाचा आ करून या कुणबटाचे विचार ऐकले. त्यानंतरही तुकारामांवरचे सिनेमे आले आणि गेले. पाऊणशे वर्षे झाली. पण ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’, किंवा ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा’ असं ठणकावणारे तुकोबा कुठल्याच सिनेमात दिसले नाहीत.
माझ्या तर मनात अनेक पटकथांच्या लडी उलगडतायत. तुकोबांच्या जीवनातल्या ओपनिंग शॉटसची तर गर्दी झालीय. कोणता घ्यावा न् कोणता नको. ‘तुकाराम, तुकाराम नाम घेता कापे यम’ असं म्हणत, शेताच्या बांधावर बाजरीची भाकरी आणि खर्डा हातावर घेऊन खाणारा शेतकरी. तुकारामांचा आवडीचा अभंग म्हणून दाखवणारा त्यांचा लाडका टाळकरी. तुकयाचे अभंग लिहिणारा कडूस गावचा गंगाधरबुवा मवाळ किंवा संताजी जगनाडे. सावकारीची गहाणखतं इंद्रायणीत सोडताना साक्षीदार असलेला तुकयाबंधू कान्होबा, भामनाथाच्या डोंगरावर चार दिवस उपाशी बसलेल्या तुकोबांना भाकरी घेऊन जाणारी कजाग जिजाई, तुकोबांच्या पाईकीच्या अभंगातून प्रेरणा घेत स्वराज्यासाठी जीवाची कुरवंडी करणारा शिवबाचा एखादा मावळा, तुकोबांच्या आयुष्याचा झगडा प्रत्यक्ष पाहणारी सिऊर गावची संत बहेणाई, अभंग बुडवून पश्चाताप पावलेले रामेश्वर भट, शेतातली कामं सुरू करण्यापूर्वी पहाटेच देवळात जमून तुकोबांची भजनं म्हणणारे गावकरी, (प्रत्यक्ष पांडुरंगही गडबडीनं कमरेवरचे हात काढून वीटेवरून खाली उतरेल, असा टाहो फोडून म्हटली जाणारी वारकरी भजनाची ही धुमाळी अजूनही कुठल्याच सिनेमात दिसलेली नाहीत.)
वह्या बुडवल्याच्या निषेधात तुकोबा १४ दिवस ज्या शिळेवर बसले होते ती शिळा, तुकारामांच्या काळातली राजकीय, सामाजिक उलथापालथ आणि भयाण दुष्काळाच्या साक्षीदार असणा-या देहूतल्या विठोबा रखुमाईच्या मूर्ती, अशी कितीतरी दृश्ये. दुसरीकडं ‘डिस्कव्हरी’चा एक सर्व्हे सुरू आहे. शेक्सपिअरच्या जन्मभूमीत राहणा-या किती नागरिकांना शेक्सपिअरच्या साहित्यातले उतारे पाठ आहेत. आणि महाराष्ट्रातल्या अडाणी लोकांना तुकारामाचे किती अभंग पाठ आहेत...
रिमिक्स होऊद्या, रिमेक होऊद्या, थ्रीडी येऊद्या, डिजिटल येऊद्या. पण प्रतिभावंतहो, तुकारामावर पुन्हा एखादा खणखणीत न् ठणठणीत सिनेमा येऊ द्या हो. तुमचं ऑस्करबिस्कर झक् मारत त्याच्या मागं येतंय की नाही ते बघा.