'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 20 September 2011

साहेब


राजकारण म्हणजे गुंडापुंडाचा, काळं बेरं करणा-या, चालू लोकांचा धंदा. राजकारणाच्या नादाला भल्या माणसानं लागू नये, असं म्हणतात. मग मनात विचार येतो, राजकारणात कधी चांगली माणसं नव्हती का? नाहीत का? डोळ्यापुढं नावंच येत नाहीत. बोटावर मोजण्याएवढीही नाहीत. पण असा एक भला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिला होता. मी पाहिला होता. त्यांचं नाव साहेबराव बुट्टेपाटील. पुण्यातल्या खेड तालुक्याचे माजी आमदार.

राजकारणाचं अध्यात्मिकरण व्हायला पाहिजे, अशी कल्पना महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडली होती. ती प्रत्यक्षात किती उतरली, हे आपण पाहतोच आहोत! पण बुट्टेपाटलांनी ही कल्पना खरी करून दाखवली. एकदा मिळालेला आमदारकीचा कालावधी संपताच या माणसानं पहिल्यांदा घरातला सरकारी टेलिफोन बंद केला. दुस-या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आणि नेते शरद पवारांनी खूप आग्रह केला. पण ते निग्रहापासून ढळले नाहीत. आमदारकीची झूल उतरवून त्यांनी शांतपणं वकिलीचा काळा कोट चढवला आणि आपलं मूळचं काम पुन्हा सुरू केलं.

त्यांच्याबद्दल यशवंतराव चव्हाण म्हणाले,राजकारणसंन्यास अनेक घेतात. कपडे उतरवतात व पुन्हा चढवतात. आणि राजकीय वारूवर पुन्हा स्वार होतात. पण खेड आळंदी विधानसभा मतदार संघातले बुट्टेपाटील यांनी राजकारण संन्यास घेतला तो कायमचा. असा लोकनेता फार दुर्मिळ असतो.

कुठून आली असेल त्यांच्यात ही संन्यस्थ, तटस्थ वृत्ती? उत्तरही लगेच मिळालं. पाटील होते वारकरी. वडिलांचं नाव विठ्ठल. शेतकाम सांभाळून ते नित्यनेमानं आळंदी पंढरीची वारी करायचे. त्यांचं गाव वराळे. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं. तोच भामचंद्र. जिथं तुकोबारायांना आत्मानुभूती आली. खाली उतरून त्यांनी सावकारीची गहाणपत्रं इंद्रायणीत सोडून दिली. अशा या भामचंद्राचे संस्कार पाटलांवर होते.   

पुढच्या आयुष्यात काय करायचं, हे त्यांना नीट उमगलं होते. गावोगावी फिरून त्यांनी देणग्या गोळा केल्या. आणि भीमेच्या काठी कॉलेज उभं केलं. उन्हातान्हात राबणा-या शेतक-यांच्या मुलांना त्यांना उच्च शिक्षण द्यायचं होतं.

आमदारांच्या पुस्तकासाठी भटकत होतो, तेंव्हा त्यांची गाठ पडली.
म्हणाले, काय करतोस? काय शिकलास?’
म्हटलं, एम. ए. मराठी. पीएच. डी. करतोय.
लेक्चरर होण्यासाठी जी परीक्षा असते, ती दिलीयेस का?
म्हटलं, हो. ती पास झालोय.
त्यावर म्हणाले, मग असं कर, आत्ताच्या आत्ता जा. प्राचार्यांना भेट. कालच माझ्या कॉलेजातले मराठीचे प्राध्यापक रिटायर झालेत. त्यांच्या जागी रुजू हो.

अशा रितीनं मी अचानक लेक्चरर झालो. 

अशा चारित्र्यवान, वारकरी माणसाच्या संस्थेत काम करतोय, याचा कोण अभिमान वाटायचा.
धांगडधिंगा करणा-या पोरांना तुम्ही कोणाच्या कॉलेजात शिकताहात याची आठवण करून द्यायचो. रानात राबणा-या तुमच्या वडिलांनी या कॉलेजसाठी कसे घामाचे पैसे दिलेत, हे सांगायचो. धनवानांच्या देणग्यांना न भुलता या कॉलेजला हुतात्मा राजगुरूंचंच नाव कसं दिलं गेलं, हे ठसवायचो. कॉलेजच्या भिंतीवर गुटखा खाऊन थुंकणार नाही, असा त्यांच्याकडून शब्द घ्यायचो.


सगळे प्राध्यापक मोठ्या आदरानं नि आपुलकीनं त्यांना साहेब म्हणायचे.

साहेबांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. सगळे वाट पाहत होते. त्यांच्या परतण्याची. गर्दी ओसरल्यावर मीही त्यांना भेटणार होतो. तुकोबारायांचे अभंग शिकवतोय, असं सांगून त्यांची शाबासकी घेणार होतो. पण पंढरीरायाला ते मान्य नव्हतं.

चार दिवसांनी तुळशीच्या पानांत ठेवलेला त्यांचा देहच खेडमध्ये आला.
टाळ मृदुंगाच्या गजरात आम्ही जातो आमुच्या गावा म्हणत वारकरी त्यांना कॉलेजच्या आवारात घेऊन आले.
चिता धडाडली.
थोरला भाऊ अण्णा शेजारी उभा होता. मी त्याला म्हणालो,गड्या आपला घास संपला आता इथला...

त्यानंतर काही दिवसांनी पायजमा टोपी घातलेले कॉलेजचे एक ज्येष्ठ संचालक रस्त्यात भेटले. ओळख झाल्यावर त्यांनी जवळ येत तोंडावरून मायेनं हात फिरवला. म्हणाले,लेकरा, तो तू आहेस व्हय. जातानाही माझा साहेब पुन्हा पुन्हा बजावत होता, त्या पोराला आपल्याकडं घ्या. मी शब्द दिलाय त्याला...

त्यानंतर ब-याच नोक-या केल्या. बरेच साहेब पाहिले. पण असा साहेब पुन्हा दिसला नाही. विठुरायाच्या मूर्तीवर दह्या दुधाच्या अभिषेकासारखा बरसणारा तो आवाज पुन्हा ऐकायला मिळाला नाही.       

           (बुट्टेपाटलांच्या निधनानंतर मी त्यांच्यावर 'केसरी'त लिहिलेला लेख)


No comments:

Post a Comment