'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 15 September 2011

शांताबाई


शांता शेळकेंची एक आठवण आहे. त्या माझ्या गावच्या. म्हणजे, मी त्यांच्या गावचा. मंचरचा!
पुण्यात राजन खान नावाचे एक अत्यंत खटपटे गृहस्थ आहेत. एसपी कॉलेजात असताना मी शेपटासारखं त्यांच्या मागे मागे फिरे.

एकदा ते म्हणाले, 'आपापल्या तालुक्याची इत्थंभूत माहिती देणारं फोन डिरेक्टरी टाईप एक पुस्तक आपण लोकांना देऊ. मोफत. तू तुझ्या तालुक्यापासून सुरुवात कर.' मी म्हणालो, आणि त्यासाठी पैसे? म्हणाले, आपण जमवायचे. म्हणजे तू. अहो, मला कोण ओळखणार आणि कोण पैसे देणार? म्हणाले, जा. आता नोकरी शोधत हिंडालच ना, मग पहिल्यांदा 'नकार झेलायला' शिका. जाहिरातीही गोळा करा. 

अगदी कुत्र्यासारखा फिरलो. अखेर पुस्तक झालं. त्याचं नाव आंबेगाव दर्शक. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं गावाचं नाव मोठं केलेल्या लोकांचा जीवनगौरव करायचं ठरवलं. पहिलं नाव होतं शांता शेळकेंचं. त्यांचं सगळं बालपण मंचरमध्ये गेलं. त्यांचा जुना वाडाही आहे तिथं. (त्याची दुर्दशा झाल्याची बातमीही मी पेपरात दिली होती.)
असं म्हणतात, त्यावेळी मंचरकरांकडून मिळालेल्या वागणुकीमुळं शांताबाईंच्या मनात मंचरविषयी काही अढी होती. त्यामुळं मंचरला येता का? असं त्यांना विचारणंही अवघड होतं. पण शांताबाईंनी काही क्षण विचार केला. आणि हो म्हणाल्या! कंपनी म्हणून अरुणा ढेरे सोबत आल्या. वयस्कर शांताबाईंना स्टेजवर काही चढता आलं नाही. त्यांच्यासाठी खालीच खुर्ची ठेवली. प्रेक्षकांच्या अगदी समोर. खूप आयाबाया जमल्या होत्या. आजूबाजूच्या गावातल्या. मंचरच्या कोष्टी आळीतल्या. शांताबाईंना निरखित होत्या. त्यांना पाहून शांताबाई हरखल्या. आठवणींत बुडून गेल्या. नाकाशी बोटं नेत म्हणाल्या, माझ्या बोटांना अजून वास येतोय. सुताचा. त्याच्या रंगाचा... त्यानंतर काही दिवसांनीच शांताबाई गेल्या.

त्यानंतर शांताबाई पुन्हा भेटल्या. आचार्य अत्रेंचा अभ्यास करताना. अजूनही गावी गेलो की शांताबाई भेटतात. त्यांच्या आजोळी. खेड अर्थात राजगुरूनगरला. माझंही आजोळ तेच. गावची वेस. त्यापुढचं मारुतीचं मंदिर. जस्संच्या तसं आहे. त्यांनी धूळपाटीत वर्णन केलंय तस्सं. वेशीआतचा त्यांच्या मामाचा वाडा मात्र गायब झालाय. तो शोधायचा आता बालभारतीच्या जुन्या पुस्तकात..!

                                                         (कृपया फोटोवर क्लिक करा)
                                                        
                                                                             

2 comments:

 1. pan shant baina MASWADYA khu awadyachya
  ase tyani TV var mulakhatit sangitale hote ani tyamadhe Mancharcha ullekh pan kela hota
  hi mulakhat me pahili hoti

  Narendra Hole

  ReplyDelete
 2. होय, नरेंद्र. मासवड्या हा खास खेड, मंचर, जुन्नरचा पदार्थ. खातील ते विसरूच शकणार नाहीत त्याचा जुंदरी झटका :)

  ReplyDelete