'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 20 December 2010

अमृताचा घनू

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा ८२वा वाढदिवस होता. 'आयबीएन-लोकमत'तर्फे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींची दीर्घ मुलाखत घेतली. मी ती शब्दबद्ध केली. लोकमतनं ही मुलाखत सर्व आवृत्त्यांमध्ये छापली...



लता मंगेशकर ..!
कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर... गेली ६८ वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे... या गानकोकिळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवले आहेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी....


पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी तू गेली ६८ वर्षे गातेस. १९४२ला बाबा गेले, त्याच वर्षी तू गायला सुरुवात केलीस. आता मागे वळून बघताना तुला काय वाटते?

लता मंगेशकर - गेले ते दिवस खूप चांगले गेले. मी ६८ वर्षांपेक्षा जास्त गाते आहे. ९ वर्षांची असताना सोलापूरला थिएटरमध्ये बाबांसोबत मी क्लासिकल प्रोग्रॅम केला. १९३८-३९ सालची ही गोष्ट आहे. त्याच्याही आधी मी गात होते. बाबांसोबत मी अनेक कार्यक्रम केले. आपली बलवंत संगीत मंडळी कंपनी बंद झाल्यानंतर मी बाबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात गायले.

बहुजनांचे कैवारी ठाकरे आणि अत्रे...

माझा द्रष्टा मित्र सचिन परब प्रबोधनकार ठाकरेंची वेबसाईट बनवत होता. मला म्हणाला, पत्रकार आचार्य अत्रेंवर पीएच. डी. केली आहेस ना, मग दे एक लेख लिहून. अत्रे आणि ठाकरेंवर. म्हटलं, आनंदानं! त्याप्रमाणं लेख लिहिला. त्यानं तो छापला...



महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांचे स्मरण केले जात आहे.
समारंभ, सत्काराचे कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्र संस्कृतीचे गोडवे गायले जात
आहेत. आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे आकडे सादर केले जात आहेत...सगळीकडं
असा उत्सव सुरू असताना एका बाबीकडं मात्र दुर्लक्ष होत आहे. केले जात आहे. ती
बाब म्हणजे महाराष्ट्राचा पुरोगामीपणा, सामाजिक न्यायाचा, सुधारणांचा वारसा. त्याची आठवणही कोणाला होताना दिसत नाही. नेत्यांनी ती दिली, तरी जनतेला त्यांचा भरोसा वाटणार नाही. राजकारणाचा धंदा थाटणार्‍या मंडळींपैकी आता कुणीही आपला कैवार घेणार नाही, याची लोकांना पक्की खात्री झालेली आहे.
अशा वेळी काही वर्षांपूर्वी मराठी मनांवर राज्य करणार्‍या दोघा शिलेदारांची,
रयतेच्या कैवार्‍यांची महाराष्ट्रातील जनतेला तीव्र आठवण येत आहे. अत्रे आणि
ठाकरे!...महाराष्ट्राच्या समाजजीवनातील दोन जागले... त्यांच्या कार्याविषयी,
मैत्रीविषयी अनेक चर्चा, किस्से, वाद, अफवा प्रत्येक मराठी माणसाने ऐकलेल्या
असतात. पण सर्वच लोकोत्तर पुरुषांचे दुदैर्व त्यांच्याही वाट्याला आले. ते
म्हणजे त्यांचे खरे विचार बाजूला पडले...ठाकरे फोटोपुरते आणि अत्रे विनोदापुरते
उरले.

Saturday 18 December 2010

महाराष्ट्राची थोर कॉपी परंपरा

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी केलेल्या थेट आरोपाला राज ठाकरेंनी थेट उत्तर दिलं. मुद्दा होता कॉपीचा. मला लिहावं वाटलं. मी 'लोकप्रभा'च्या टोकेकरांना विचारलं. ते म्हणाले वा व्वा रंगराव, पाठवा लगोलग. पाठवला. त्यांनी तो लेख थेट कव्हर स्टोरी म्हणूनच छापला...

दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले, राज माझी कॉपी करतो. तर त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेनंच पहिली कॉपी केलीय प्रबोधनकार आणि आचार्य अत्र्यांची! त्यामुळं या दोन महाराष्ट्र पुरुषांची मूळ कॉपी काय होती, त्याची ही एक झलक..

शिवाजी पार्क दिनांक - २४ जानेवारी २००९.. प्रचंड जनसमुदायासमोर एका युवा नेत्याचं भाषण सुरू होतं.
‘शिवाजी महाराज की म्हटलं की ज्याच्या तोंडून जय येतो तो मराठी.. शिवरायांचं चरित्र वाचताना किंवा ऐकताना ज्याच्या अंगावर काटा येतो तो मराठी..’
शब्द तडातड उडत होते.. वाणीचा दांडपट्टा लखलखत वाक्यांचे हवेत सपासप तुकडे उडवत होता. थेट काळजात घुसणाऱ्या शब्दांनी मनं रोमांचित होत होती. लाखोंचा समुदाय भारला जात होता.. मुद्दा होता, मराठी स्वाभिमानाचा.. सभा होत राहिल्या, गर्दी वाढत गेली, पण या नव्या पक्षाकडं, त्याच्या युवा नेत्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. मात्र लोकसभा निवडणुकीत या नवख्या पक्षानं पाणी दाखवलं. बडय़ा पक्षांना दखल घ्यावी लागली. सगळ्यात सावध झाला तो मराठी बाणा जपणारा मूळ पक्ष शिवसेना.. त्यातून बाहेर पडून नवी ललकारी ठोकणारा महाराष्ट्र निर्माण पक्ष आणि त्यांचा नेता राज ठाकरे. विधानसभा निवडणुकीत तब्बल १३ आमदार निवडून आणून या पक्षानं मैदान मारलं. मुद्दा होता मराठीचा. मराठीच्या राजकारणाचा..

धन्य तो सुखसोहळा अनुपम्य

पंढरीची वारी हा आमचा कुळधर्म, कुळाचार. पण मी कायमच त्यापासून दूर राहिलो. शिक्षणाच्या निमित्तानं, नवविचारांची बाधा झाल्यानं...पण 'तुझी वाट पाहत मी विटेवर ताटकळलोय', असा जणू विठुरायाचा सांगावा आला. नोकरीच्या निमित्तानं का होईना वारीच्या रिपोर्टींगला जावं लागलं. काय असतो हा आनंदानुभव, याविषयी लिहिलं होतं, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या जुलै २००७च्या वारी विशेषांकात...




राना-शिवारात पेरणीची लगबग उडालेली. भरभर चाललेल्या कारभाऱ्याच्या पाभारीमागे चपळाईने घेवड्या-चवळीची ओळ पेरणारी घरधनीण , त्यांच्यामागे झपाट्याने वाफे पाडणारा कुळव. मुसकी घालून नेटाने औत पळवणारे ढवळे-पवळे. बापाच्या हाळीसरशी बियाणांची ओटी घेऊन धावणारी पोरं. अशी शिवारभर नुसती झुंबड. बोलायला उसंत नाही. कारण या पेरणीवरच वर्षभराची बेगमी अवलंबून. मात्र एवढ्या धांदलीतही पायाखालची ओलसर माती कसलीशी अनामिक हुरहुर जागवते.

टाळ-मृदुंगाची लय मनात घुमू लागते. दिंड्या-पताकांचे भार न् त्यात हिंदोळणारा रथाचा कळस डोळ्यासमोर दिसू लागतो. माऊली! माऊली!! बळीराजा मनोमन दंडवत घालतो. ज्येष्ठाच्या तोंडावर साऱ्या महाराष्ट्राला पावसाच्या प्रतीक्षेबरोबरच पंढरीच्या वाटेची अशी ओढ लागते. पोरं-बाळं , गुरा-ढोरांची निरवानिरव करत कुटुंबाचा पोशिंदा देहू, आळंदीतल्या ज्ञानोबा, तुकारामाच्या पालख्यांच्या प्रस्थानाची वेळ गाठतो.

उत्तम शुभशकुन

सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राला एक उत्तम शुभशकुन झाला. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे साहित्य संमलेनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या निवडीनिमित्तानं लिहिलेला हा लेख...



भाद्रपदाचं टळटळीत ऊन सहन करणार्‍या आणि नेहमीच्या धावपळीत मग्न असणार्‍या मुंबई शहरात मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी राजकीय वगैरे नसल्यानं तिथं फारशी गर्दी नव्हती. पण महाराष्ट्रभर या निकालाची उत्सुकता लागली होती. निकाल जाहीर झाला. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयी...पन्नाशीतल्या महाराष्ट्रानं समाधानानं कूस वळवली!

Monday 13 December 2010

गाता गाता मज मरण यावं...

८०व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उमपांची मुलाखत घ्यायला गेलो तेंव्हा शाहिरांनी 'गाता गाता मरणाची इच्छा' इच्छा पहाडी आवाजात गाऊन दाखवली होती.. नियतीनं त्यांची ही इच्छा पूर्ण केली. त्यांच्या निधनानंतर ही मुलाखत 'लोकसत्ता'नं छापली. बहुधा शाहिरांची ही शेवटचीच  मुलाखत...


शनिवार, २७ नोव्हेंबर २०१०

प्रश्न- तुमच्या आवाज काहीतरी वेगळा आहे. एरवी ऐकायला न मिळणारा दुर्मिळ आहे. त्यासाठी काही खास सराव केला का?

उमप - अहो, हा आवाज अनुवंशिक आहे. माझ्या वडिलांचा आवाज असाच होता. आत्या आणि ते या उंच काकसूरात ‘भेदिक’ म्हणजे अध्यात्म सांगणारे गाणे गात. त्या गाण्याने आमची नायगावची चाळ दणकून जायची. असा आवाज अनुवंशिकतेनेच मिळतो. माझ्या रक्तातच गाणं आहे. माझे आजोबा लोकगीतं गायचे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिकणी हे आमचं गाव. तमाशात किंवा भारुडात गाणाऱ्या माणसाला सर्व लोकांपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी उंच सुरात गावे लागे. तेव्हा लाऊडस्पीकर नव्हते. त्या उंच पट्टीतील गाण्याने गळा तयार झाला. पुढच्या पिढीत तो अनुवंशिकतेने आला.