'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 31 January 2012

पहिली युती

भाग १४ : पहिली युती
बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण कोणी काहीही करोत पण बाळासाहेब पक्के राजकारणीआहेत, हेच खरं. कारण ज्या काळात प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं नव्हतं, ज्या काळात राजकीय युत्यांचा फंडा फेमस झाला नव्हता, त्या काळात त्यांनी पहिली युती एका राष्ट्रीय पक्षाशी केली होती. 

१९६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं युती केली होती, प्रजा समाजवादी पक्षाशी. पदार्पणातच या युतीनं मैदान मारलं. महानगरपालिकेत प्रथमच लढणा-या सेनेला १४०पैकी ४२ जागा मिळाल्या. तर प्रजा समाजवादीला १२ जागा मिळाल्या. 

खरं तर या युतीचा फायदा प्रजा समाजवादीपेक्षा शिवसेनेलाच जास्त झाला. त्यांची एक जागाही कमी झाली. याचं कारण युतीमध्ये शिवसेना सुरुवातीपासूनच डॉमिनेटींग राहिली. म्हणजे युतीत पहिलं नाव यायचं ते शिवसेनेचं.शिवसेना-प्रजासमाजवादी युती असं या युतीला संबोधलं जाई. 
प्रचाराच्या पोस्टर्सवर तर चक्कशिवसेना पुरस्कृत प्रजासमाजवादी उमेदवार असं लिहिलं जात होतं. प्रजासमाजवादीचा उमेदवार म्हणजे शिवसेना पुरस्कृत, किंमत कमी!’ अशा त्या वेळच्या विनोदाची आठवण ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सांगतात.
युतीची सगळी सूत्रंच शिवसेनेच्या हातात होती. सेनेनं दिल्या तेवढ्या जागा प्रजा समाजवादीनं विनाशर्त मान्य केल्या.

या युतीपूर्वी ठाकरेंनी मार्मिकमधून प्रजासमाजवादीच्या नेत्यांचा तसा यथेच्छ समाचार घेतला होता. पण सेनेचं ठाणे, मुंबईतलं वाढतं बळ पाहून प्रा. मधू दंडवते आदी नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला.

पुढच्या काळात शिवसेनेशी अनेकांनी समझोता केला. पण एस. एम. जोशी यांच्या संयुक्त समाजवादी पक्षानं मात्र कधीही शिवसेनेशी युती केली नाही. याच पक्षाच्या नेत्या मृणाल गोरे यांनी तर अगदी स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी शिवसेनेशी जवळीक केली नाही. 
याहीपुढचा कट्टरपणा दाखवला तो कम्युनिस्ट पक्षानं. त्यांनी शिवेसेनेसोबत युती करण्याचा विचारही मनाला शिवू दिला नाही. उलट मुंबईत बलवान असलेल्या या पक्षानं शिवसेनेला विरोध करण्याचं धोरण ठेवलं. कम्युनिस्टांना मोडून काढण्याचा निश्चय करूनच शिवसेना १९६८च्या निवडणुकीत उतरली.
  
दुसरीकडं मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून इतर पक्षही हडबडले होते. हातातली मराठी मतं निसटून नयेत म्हणून मुंबई काँग्रेसनं तर ८० उमेदवारांच्या पहिल्या यादीत तब्बल ३४ मराठी भाषिकांना उमेदवारी दिली होती!

प्रजासमाजवादी पक्षासोबत युती करण्यात बाळासाहेबांचे काही आडाखे होते. भविष्यात देश पातळीवर आपल्यावर टीका होणार, शिवसेनेला विरोध होणार हे ते जाणून होते. त्यावेळी संसदेत आपली बाजू मांडणारा कोणीतरी असावा, या भूमिकेतूनच त्यांनी दूरदृष्टीनं ही युती केल्याचं सांगितलं जातं. 
त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रजा समाजवादी पक्षानंही संसदेत सेनेची वकिली केली. निमित्त होतं, दळवी बिल्डिंग प्रकरणाचं. हे प्रकरण फेब्रुवारी १९६८मध्ये भूपेश गुप्ता, चित्त बसू, ए. पी. चटर्जी यांनी संसदेत उपस्थित केलं. तेव्हा गृहमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांना उत्तर देताना तारेवरची कसरत करावी लागली होती. 

दळवी बिल्डिंगवरचा हल्ला प्रकरण म्हणजे मुंबईतल्या कम्युनिस्टांच्या वर्मावर केलेला आघात होता. या हल्ल्यामुळं कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला. शिवसेनेनं कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात अर्थात गिरणगावात भक्कमपणे पाय रोवले. अशा या ऐतिहासिक दळवी बिल्डिंग प्रकरणाविषयी उद्याच्या भागात.

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/01/36671

Monday 30 January 2012

ठाण्यावर भगवा

भाग १३ : ठाण्यावर भगवा
शिवसेनेनं विरोध केल्यानं लोकसभेच्या १९६७च्या निवडणुकीत कृष्ण मेनन यांचा पराभव झाला. यामुळं सेनेच्या अंगात बारा वाघांचं बळ संचारलं. त्यातच ठाणे नगरपालिकेची निवडणूक आली. या निवडणुकीच्या मैदानात आपण उतरायचं, असं बाळासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ठरवलं. 

बाळासाहेबांचं हे मित्रमंडळ म्हणजे, प्रबोधनकारांकडं नियमित येणारे समीक्षक आणि विचारवंत धोंडो विठ्ठल देशपांडे, मार्मिकचे लेखक प्रा. स. अ. रानडे, एड. बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख, पद्माकर अधिकारी आदी मंडळी. हे लोक आपापले नोकरीधंदे सांभाळून संध्याकाळी शिवसेनेचं काम करण्यासाठी येत. यापैकी देशमुख आणि देशपांडे हे सिव्हिल इंजीनिअर होते. 

शिवसेनेच्या नव्याने स्थापन होणा-या शाखांशी, तरुणांशी माधव देशपांडे संपर्क ठेवून असत. त्यांनी १९६७-६८च्या मुंबई, ठाणे, पुणे या निवडणुकांमध्ये तिकीट वाटण्यापासून ते प्रचारापर्यंतची सर्व कामे केली.
ठाणे नगरपालिका निवडणुकीच्या वेळी या मित्रमंडळाला येऊन मिळाले, मनोहर जोशी, त्यांचे भाचे सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर.
   
त्या काळात बाळासाहेबांकडं स्वत:ची गाडी नव्हती. पण जोशी मामा भाच्याकडं स्वत:च्या मोटारी होत्या. बाळासाहेबांनी सुरुवातीला बराचसा प्रवास या गाड्यांमधूनच केला. मनोहर जोशी कधी गाडी चालवत तेव्हा माझा ड्रायव्हर एलएलबी आहे’, असं बाळासाहेब गमतीनं म्हणायचे.

१३ ऑगस्ट १९६७ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. शिवसैनिकांनी प्रचारानं ठाणे ढवळून काढलं. बाळासाहेबांसोबत मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी प्रचाराच्या मैदानात उतरले.

मतदानाच्या दिवशी ठाण्यात पाऊस सुरू होता. तरीही ७० टक्के मतदारांनी मतदान केलं. १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले. त्यामुळं शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला. या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले.

ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी एड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वत: शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले. त्यावेळच्या भाषणात ते म्हणाले, ‘‘जनतेच्या हितासाठी लढणारी संघटना ठाण्यात उतरण्याचा १०० वर्षांतील हा पहिलाच प्रसंग होय. 
पुष्कळ लोक म्हणत होते की, शिवसेना नष्ट होईल. आम्हाला फक्त जनताच नष्ट करू शकेल. नगरपालिकेत खूप लाचलुचपत आहे असे म्हणतात. ती आम्ही साफ गाडून टाकू. 
लोक आम्हाला देशप्रेमाचे धडे देतात. आम्हीही भारतमातेचीच लेकरं आहोत. प्रथम आम्ही देशच मानतो आणि नंतर महाराष्ट्र. पण महाराष्ट्र जगला तरच देश जगेल, हेही ध्यानात ठेवा. ठाणे शहरात आम्ही सुधारणा करू शकलो नाही तर आम्हाला खुशाल आणि जरूर बाहेर काढा.’’

या विजयामुळं शिवसेनेचा वट वाढला. एरवी शिवसेनेला जमेतही न धरणारे पक्ष शिवसेनेचं कौतुक करू लागले.
शिवसेनेच्या या विजयावर बोलताना प्रजासमाजवादी पक्षाचे नेते डॉ. जी. जी. पारीख म्हणाले, अन्य प्रांतातील एकूण प्रांतीय राजकारणाची दिशा लक्षात घेता, शिवसेनेचा विजय अगदी अपेक्षित असाच आहे. 
या निर्विवाद विजयामुळं शिवसेना मराठी भाषिक जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब व्यक्त करणारा राजकीय पक्ष म्हणून विकास पावेल, असं मानण्यास प्रत्यवाय नाही. शिवसेनेच्या काही मागण्यांशी मीही सहमत आहे.’’ युतीच्या राजकारणाची ही नांदी होती. त्याविषयी उद्याच्या भागात. 
'नवशक्ति'तील लिंक -http://61.8.136.4/nav/2012/01/31/36547  

Sunday 29 January 2012

सदाशिवसेना ते वसंतसेना

भाग १२ सदाशिवसेना ते वसंतसेना
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना जनतेच्या रोषाचा वणवा अंगावर घ्यावा लागला. यात सर्वाधिक भाजून निघाले ते मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि सदोबा कान्होबा पाटील उर्फ स. का. पाटील! त्यांच्यावर तोफा डागण्यात आघाडीवर होते, आचार्य अत्रे आणि त्यांच्या मागोमाग व्यंगचित्रकार बाळ ठाकरे.

मुंबई हे कॉस्मॉपॉलिटन अर्थात बहुसांस्कृतिक शहर आहे’, अशी भूमिका घेत
स. का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्राला जोडण्यास विरोध केला होता. त्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं संबोधलं जाई. त्यामुळं तेच पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या टार्गेटवर आले. अत्र्यांनी तर १९४८ पासूनच नवयुगमधून पाटलांवर नेम धरला होता. १९५० पासून बाळासाहेबही अत्र्यांच्या जोडीला आले. नवयुगचे कव्हर्स बी. के. ठाकरेंच्या धमाल व्यंगचित्रांनी सजले. या चित्रांमध्ये मुख्य पात्र असे मोरारजी किंवा स. का. पाटील.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अत्र्यांनी पाटलांची केलेली जाहीर हजामत तर प्रसिद्धच आहे. एका सभेत स. का. पाटील म्हणाले यावश्चंद्रदिवाकरौ (म्हणजे आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत) ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यावर अत्र्यांनी सूर्य आणि चंद्रनावाचा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणाले, ‘‘जसे काही चंद्र सूर्य याच्या बापाचे नोकर. जणू सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि रामा हर्डीकर’’.

सदोबा कोळसे पाटील, द्विभाषिकवादी सदोबा, अशा विशेषणांनी अत्र्यांनी स. का. पाटलांना या काळात हिणवलं.

अत्र्यांचीच री पुढं बाळासाहेबांनी ओढली. ‘मार्मिकमधून त्यांनी स. का. पाटलांना यथेच्छ ओरबाडलं. पुढं याच पाटलांनी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली. निवडणूक होती १९६७ची. माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. दाक्षिणात्य म्हणून त्यांना विरोध करत शिवसेनेनं काँग्रेसचे मराठी उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे तसंच इतर तीन काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेनं पंचमहाभूतांना गाडा असं आवाहन करत प्रचार केला. परिणामी मेनन, अत्रे पडले. तसंच सूत्रधार स. का. पाटलांना पाडून जॉर्ज मुंबईचे अनभिषिक्त सम्राट बनले. पण यानिमित्तानं काँग्रेसला म्हणजेच पाटलांना मदत करणा-या शिवसेनेला सदाशिवसेना म्हणून विरोधकांकडून हिणवलं जाऊ लागलं.

पुढं मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनीही हाच काँग्रेसी धूर्तावा वापरला. मुंबईतलं विशेषत: गिरणगावातलं कम्युनिस्टांचं बळ ही काँग्रेसची डोकेदुखी होती. नाईकांनी हा कम्युनिस्ट साप पाव्हण्याच्या अर्थात शिवसेनेच्या काठीनं मारायचा ठरवला. सेना रस्त्यावर उतरून राडे करू लागली. पण सरकार त्याविरोधात काहीही कारवाई करेना. 
उदाहरणच द्यायचं तर १९६९च्या मुंबईतल्या दंगलींचं देता येईल. दोन-तीन दिवस दादरमध्ये दगडफेक, लुटालूटजाळपोळ आणि हिंसाचार सुरू होता. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोलापुरात जाऊन बसले होते. 
१९६२ ते १९७४ या आपल्या चौदा वर्षांच्या कालखंडात नाईकांनी असंच धोरण ठेवलं. नंतरच्या काळात वसंतदादा पाटलांनी नाईकांचाच वारसा चालवला. त्यामुळं शिवसेना म्हणजे वसंतसेना आहे, अशी टीका विरोधक करू लागले. 

याच पार्श्वभूमीवर आली ठाणे महापालिकेची निवडणूक. इथं शिवसेनेनं पहिल्यांदा भगवा फडकवला. तो इतिहास उद्याच्या भागात. 
'नवशक्तिती'ल लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/29/36197

Friday 27 January 2012

राडा


भाग ११ : राडा
राडा हा शब्द कानावर पडला की मागून आवाज कुणाचा, शिवसेनेचा!’ हा प्रतिध्वनी ऐकायला येतो. दाक्षिणात्य लोक आपल्याच शहरात राहून आपल्याच हाता-तोंडचा घास हिरावून घेत आहेत. नोकरीधंदे बळकावून बसले आहेत. त्यांना हुसकावले पाहिजे. त्यासाठी बजाओ पुंगी, हटाओ लुंगी असं आवाहनमार्मिकमधून होऊ लागलं होतं. मराठी मनं चेतवली जात होती. त्याला संघटनात्मक रुप देण्यासाठी शिवसेनेची पायाभरणी सुरू झाली होती. 

५ जून १९६६च्या अंकात चौकट प्रसिद्ध झाली. यंडुगुंडुंचे मराठी माणसांच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची नोंदणी सुरू होणार!’त्यानंतर चौदाच दिवसांनी म्हणजे १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. 

३० ऑक्टोबरच्या शिवसेनेचा पहिल्या मेळाव्यातल्या भाषणात बाळासाहेब गरजले, ‘‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दाचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं तर काय परिणाम होतील याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यकाळात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील.’’ बस्स! चेतलेल्या तरुण मनांना एवढ्या ठिणग्या पुरेशा होत्या. या सभेहून परतणा-या जमावानं दादर भागात मोठी दगडफेक केली. उडप्यांच्या हॉटेलांची आणि रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉल्सची मोडतोड झाली. राड्याची ही सुरुवात होती. अर्थात सुरुवातीचं टार्गेट होते, दाक्षिणात्य लोक.
  
१९६७च्या निवडणुकीत राड्याला अधिकृत कारण मिळालं. माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे दाक्षिणात्य उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. त्यांना विरोध करायचा म्हणून प्रचाराच्या काळात लालबाग, परळ, काळाचौकी परिसरातल्या उडपी हॉटेलांमध्ये घुसखोरी सुरू झाली. दाक्षिणात्यांच्या हॉटेलात गटागटाने घुसायचं. बिल न देताच तिथले पदार्थ फस्त करायचे, असे प्रकार सर्रास सुरू झाले.

या प्रचाराच्या काळातच चेंबूर परिसरातल्या दाक्षिणात्यांची वस्ती असलेल्या एका झोपडपट्टीस आग लावून देण्यात आली.
काळा चौकी परिसरातील दाक्षिणात्यांच्या हॉटेलावर २९ फेब्रुवारी १९६७ रोजी केलेल्या दगडफेकीत ३२जण जखमी झाले. यात चार शिवसैनिकांना अटकही झाली. बाळासाहेबांनी मात्र या सर्वांना शाबासकी दिली.

यानंतर शिवसेनेनं टार्गेट केली ती मुंबईतली थिएटर्स. इथं सिनेमे दाखवून दाक्षिणात्य निर्माते पैसे मद्रासला घेऊन जातात. मराठी माणसाच्या या पैशाने यंडुगुंडूची घरे भरू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती. यातूनच फेब्रुवारी १९६८मध्ये लालबाग परिसरातल्या प्रसिद्ध गणेश टॉकीजवर हल्ला चढवला गेला. तिथं सुरू असलेला आदमी सिनेमा बंद पाडण्यात आला.

१ मार्च १९६८ रोजी तर मुंबईतल्या १७ थिएटर्सवर एकाच वेळी हल्ला चढवून हिंदी आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या सिनेमांचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं. अर्थात हे राडे तसे सौम्य होते. कारण १९६८च्या निवडणुकीत शिवसैनिकांची गाठ पडली ती कडव्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी. त्यानंतर ख-या अर्थाने मोठे राडे सुरू झाले. त्याविषयी आपण पुढं बोलणारच आहोत.

पण विशेष म्हणजे सुरुवातीला हे राडे बघत पोलीस आश्चर्यकारकरित्या गप्प होते. कारण तेहीमराठी होते ना! मात्र सरकारचीच हे राडे थांबवण्याची इच्छा नव्हती, हे हळू हळू स्पष्ट होऊ लागलं. आणि त्यानंतर शिवसेना म्हणजे सदाशिवसेना, वसंतसेना असल्याची टीका होऊ लागली. त्याविषयी उद्याच्या भागात.

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/28/35719

Wednesday 25 January 2012

झपाटलेला शिवसैनिक

भाग १० : झपाटलेला शिवसैनिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी तरुणांमध्ये असं कोणतं रसायन भरलं, की ज्यामुळं हे तरुण बेभान शिवसैनिक बनले? कोणाशीही पंगा घ्यायला तयार झाले? कुठलंही आव्हान झेलायला तयार झाले? बेधडकपणे समोरच्याला भिडू लागले? हे रसायन होतं, शिवसेनाप्रमुखांच्या लेखणीत अन् वाणीत. बाळासाहेबांच्या लेखणीतून आणि वाणीतून उकळत्या लाव्हारसासारखे बाहेर पडणारे शब्द मराठी तरुणांच्या रक्ताचा थेंब न थेंब तापवत होते. हे शब्द होते मराठी असल्याचा स्वाभिमान जागवणारे. मार्मिकमधल्या वाचा आणि उठा या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण रस्त्यावर उतरले.

ठोकशाहीचं समर्थन करत ठाकरेंनी पहिला हल्ला चढवला तो गांधीजींच्या अहिंसेवर. या अहिंसा तत्वज्ञानाची त्यांनी षंढ म्हणून खिल्ली उडवली. या नपुंसक अहिंसेनंच देशाचं वाटोळं केलं, हे त्यांचं म्हणणं तरुणांना पटू लागलं.

मराठी माणूस गुंड का नाही? मराठी माणूस हातभट्ट्या का चालवत नाही? तो मटक्याचं बेटींग का घेत नाही?’ असे प्रश्न ते जाहीर सभांमधून विचारीत. या खिजवण्यातून मराठी तरुणांना बरोब्बर मेसेज मिळाला. 
मला मर्द शिवसैनिक हवेत. शेळपट, नामर्दांची फौज नको अशा आशयाच्या मार्मिकमधल्या लिखाणांतूनकार्टून्समधून आणि जाहीर सभांमधील भाषणांतून मराठी तरुणांच्या मनात जोश आणि त्वेषाचा दारुगोळा ठासला गेला. मग हे तरुण रस्त्यावर उतरून काहीही करायला तयार झाले. 

महत्त्वाचं म्हणजे, शिवसेनाप्रमुख नेहमीच या तरुणांच्या पाठीशी उभे राहिले. राजकारणी उघडपणे जे करत नाहीत ते बाळासाहेबांनी केलं. त्यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक कृत्याचं जाहीर समर्थन केलं. त्या कृत्य़ाची जबाबदारी घेतली. शिवसैनिकांना शाबासकी दिली.

सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख हे नातं अत्यंत जिव्हाळ्यानं परस्परांशी घट्ट जोडलेलं होतं. लॉकअपमधल्या शिवसैनिकांना जामीन मिळवून देणं असो, त्यांच्या घरातल्यांना दिलासा देणं असो, शिवसेनाप्रमुख स्वत: जायचे. सैनिकांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचे. शिवसैनिक भेटायला आला तर उठून उभे राहायचे. त्याला दरवाजापर्यंत सोडवायला जायचे. त्यामुळं बाळासाहेबांच्या शब्दाखातर हजारो शिवसैनिकांनी तळहातावर शीर घेतलं.

बाळासाहेबांचे शब्द वाचकांवर भूल टाकत. त्यांचं भाषण म्हणजे बेस्ट ऑडिओ व्हिज्युअल परफॉर्मन्स आणि हिप्नॉटिझमचा प्रयोगच. तो ऐकून, पाहून हजारोंचा समूह मंत्रमुग्ध होई. त्यांच्या इशा-यावर डोलू लागे, गर्जू लागे, बेधुंद होऊन नाचू लागे.
शिवसेनाप्रमुखांनी घाटी म्हणून अवमानीत होणा-या मराठी माणसाच्या अस्मितेचा अंगार फुलवला. त्यांच्या रुपानं मुंबईतल्या मराठी माणसाला संरक्षणाची ढालच मिळाली.

बाळासाहेब हे तरुणांचे हिरो बनले. त्यासाठी बाळासाहेबांनी आपली इमेजही जाणीवपूर्वक उभी केली. किरकोळ शरीरयष्टीचे बाळासाहेब सुरुवातीला लांब बाह्यांचा शर्ट इन करून वावरत. त्यानंतर व्यक्तिमत्वाला रुबाबदारपणा यावा म्हणून त्यांनी गळाबंद जोधपुरी वापरायला सुरुवात केली. 
नंतर पांढराशुभ्र कॉलरचा झब्बा लेंगा घालायला सुरुवात केली. त्यानंतर भाषण करताना खांद्यावर शाल आली. गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा आल्या. यातून संकटातून तारणारा महामानव, अशी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा उभी राहिली. 

याच दरम्यान बेरोजगार तरुणांना कायदा हातात घेऊन अन्यायाविरुद्ध लढणारा अमिताभचा अँग्री यंगमॅन थिएटरमध्ये पाहायला मिळू लागला. अमिताभचा नायक आणि बाळासाहेब यांच्यात कमालीचं साम्य असल्याचा साक्षात्कार या तरुणांना झाला. त्यामुळं बाळासाहेबांच्या हुकमतीखाली शिवसैनिक होऊन रस्त्यावर राडा करावा, असं मुंबईतल्या प्रत्येक मराठी तरुणाला वाटू लागलं. तसं तो प्रत्यक्षपणे करूही लागला. त्याच्या या राड्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक -  http://61.8.136.4/nav/2012/01/26/35514

Tuesday 24 January 2012

अड्डे ते शाखा

भाग ९ : अड्डे ते शाखा
मार्मिकमधले विचार वाचून बेरोजगार मराठी तरुण अस्वस्थ झाले. नाक्या-नाक्यांवर जमून चर्चा करू लागले. हे सारं बदललं पाहिजे, असं म्हणू लागले. सुरुवात म्हणून त्यांनी परिसरातल्या नागरी समस्यांना हात घातला. कचरा, सांडपाणी, नळाचं पाणी आदी तक्रारी घेऊन ते वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ लागले. नंतर तर केवळ नागरी समस्याच नाही तर अगदी गल्लीतली, घरांमधली भांडणंही हे तरुण सोडवू लागले. त्यामुळं गांजलेल्या मराठी माणसांना या अड्ड्यावरच्या तरुणांचा मोठाच आधार वाटू लागला.

सुरुवातीला हे अड्डे अगदी घराच्या ओट्यांवर, चाळींच्या जिन्याखाली, दुकानांच्या बाकड्यांवर असे जागा मिळतील तिथं सुरू झाले. भाऊ पाध्येंनी राडा या आपल्या कादंबरीत या अड्ड्यांचं नेमकं वर्णन केलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या अड्ड्यांना बळ मिळालं. त्यांचं हळू हळू शाखांमध्ये रुपांतर होऊ लागलं. गोरेगावचे विलास अवचट किंवा गिरणगावातल्या बाळकृष्ण नर यांच्याकडं सुरुवातीच्या या शाखांच्या मोठ्या मनोरंजक आठवणी आहेत. गिरणगावातले शिक्षक असलेले रमेश लब्दे यांनी तर पहिली शाखा काढली मॉडर्न मिलच्या कोप-यात मुतारीच्या जागेवर, गटारावर. ती पंधरा वेळा पाडली आणि बांधली. त्यावर केवळ छप्पर टाकलं जायचं.

अशा शाखांमधून कामाला सुरुवात करूनच शिवसेनेचे नेते पुढं आले. गिरगावातले प्रमोद नवलकर प्रजासमाजवादी पक्षाच्या जिन्याखालच्या जागेत लोकांच्या तक्रारी ऐकत बसत. ही जागा अपुरी पडू लागल्यानं ते रस्त्यावरच्या सुपारीच्या दुकानात खुर्ची टाकून बसू लागले. तीही जागा अपुरी पडू लागल्यानं गिरगावातल्याच एका मोकळ्या जागेवर शिवसैनिकांनी शाखा बांधून टाकली. मुंबईतल्या शिवसेनेच्या बहुतेक शाखा अशाच रातोरात उभारल्या गेल्या.

सुधीर जोशींनीही न. चि. केळकर रस्त्यावरच्या आपल्या यशवंत भोजनालयाच्या गच्चीवर एक शाखा बरेच दिवस चालवली.
परळचे वामनराव महाडिक शाखेचं बांधकाम होईपर्यंत आपल्या घरासमोरच टेबल टाकून बसायचे.
शिवशाहीतील गडांच्या बुरुजांच्या आकारातल्या या शाखा ठिकठिकाणी दिसू लागल्या. खरं तर शाखा ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या जवळ जाणारी. पण या शाखांमधले सैनिक मात्र रस्त्यावर उतरून लढत. लोकांच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस धावपळ करत.

त्यामुळं या शाखा म्हणजे नागरिकांना आपल्या व्यथा, गा-हाणी मांडण्याचं हक्काचं ठिकाण बनलं. अडचणीत सापडलेल्या मराठी माणसाला मदत करणं, हे या शाखांचं आद्य कर्तव्य बनलं. याशिवाय या शाखांवर रोजगार मार्गदर्शन, व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, विविध स्पर्धा व्यायामशाळा उभारणी अशा गोष्टीही होऊ लागल्या. रक्तदानासाठी तर शिवसैनिक कधीही धावून जात.

महागाईतही शाखांवरचे शिवसैनिक सामान्य माणसाच्या मदतीला धावत.
सणासुदीच्या काळात शिवसेना शाखांसमोर रास्त दरात नारळ, उदबत्या विकायला ठेवल्या जात. साठेबाजी करणा-यांच्या विरोधात धडक कारवाई केली जाई. गोडाऊन उघडून त्यातला माल लोकांना रास्त दरात विकून टाकला जाई. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी हा तर त्या काळी परवलीचा शब्द बनला होता.

पण नंतर पक्षासाठी निधी गोळा करण्याचं कामही याच शाखांमधून सुरू झालं. मात्र ते काहीही असो. शिवसेनेचं ८० टक्के समाजकारणाचं धोरण या शाखांनी मनापासून राबवलं. अर्थात हे सारं करत होते, सच्चे, कडवे, मराठीप्रेमानं झपाटलेले शिवसैनिक. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/25/35071