'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 8 November 2016

भीमा आणि चंद्रभागा

यंदाच्या 'शब्द रुची' दिवाळी अंकासाठी लेख लिहायचा होता. खरं तर डेडलाईन महिनाभराची होती. पण, नाही जमलं वेळ द्यायला. शेवटच्या क्षणी घाईघाईत लेख लिहून काढला. विषय महत्त्वाचा होता. त्यावर काम करणं गरजेचं होतं, अशी चुटपूट लागून राहिली आहे खरी पण किमान विषयाला स्पर्श तरी केल्याचं समाधान आहे. विषय आहे, भीमा आणि चंद्रभागा या दोन स्वतंत्र नद्या आहेत का?...नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ न शोधण्याच्या संकेतामुळं आपण आपली मुळं विसरलो. थोर, उदार परंपरेचा शोध घेणं विसरलो. आपल्या समृद्ध सांस्कृतिक प्रतिकांना उजाळा देणं विसरलो. असंच एक प्रतीक म्हणजे, पंढरीचा श्री विठ्ठल आणि चंद्रभागेचं वाळवंट. या वाळवंटातील भेदाभेदविरहीत प्रेमाचा संदेश देत शेकडो वर्षे वाहणारी भीमा म्हणजेच चंद्रभागा नव्हे, तर त्या दोन्ही स्वतंत्र नद्या आहेत, असं संशोधन सध्या समोर येतं आहे. त्यावरील हे विश्लेषण...

भीमा नदी पंढरपुरात चंद्रकोरीप्रमाणं वळण घेते म्हणून तिथं भीमेचं नाव चंद्रभागा पडलं, असा आत्तापर्यंत सर्वमान्य झालेला समज. हा समज खोटा ठरवणारं संशोधन सध्या पुढं येत आहे. ते म्हणजे भीमा आणि चंद्रभागा ही एकच नदी नाही, तर त्या दोन्ही स्वतंत्र नद्या आहेत.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल आणि लेखक वा. ल. मंजुळ यांनी अलिकडच्या काळात हा मुद्दा उचलून धरला आहे.
भीमा नदीच्या उगमाविषयी एक कथा पुराणात सांगितली जाते. वासुदेवानंद सरस्वती यांनी संस्कृत सरिता स्तोत्र लिहिलं आहे. त्यात एक भीमा नदी स्तोत्र आहे. त्यात श्री शंकरानं भीमाशंकराच्या डोंगरावर दैत्याचा वध केला. त्यानंतर त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिथं तपश्चर्या करणाऱ्या भीमक राजानं तो घाम तसाच नदीरुपानं वाहू देण्याची विनंती केली. त्या घामाचीच नदी झाली. तिला भीमक राजाचं भीमा हे नाव मिळालं. या नदीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. तिला महानदी असंही संबोधलं जाऊ लागलं. मत्स्य, ब्रह्म, वामन आदी पुराणांतून आणि महाभारतातून या नदीचे उल्लेख येतात.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला उगम पावणाऱ्या सुमारे सव्वासातशे किलोमीटर लांबीच्या भीमेनं महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि कर्नाटकातील विजापूर गुलबर्गा या जिल्ह्यांतील प्रदेश सुजल सुफल केला आहे. भीमेला वाटेत भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, कुंडली, माणगंगा, घोड, नीरा, सीना आदी नद्या मिळतात. भीमेवर एकूण २२ धरणं आहेत. अशा या भीमेच्या किनाऱ्यावर भीमाशंकरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकराचं मंदिर, सिद्धटेक इथं अष्टविनायकांपैकी एक असलेलं गणपतीचं मंदिर, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूरचं दत्त मंदिर, श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, श्री क्षेत्र हेरूरचं हुलकांतेश्वर मंदिर आदी तीर्थक्षेत्रं आहेत. याशिवाय भीमाकाठचं सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणजे, लोकदेव श्री विठ्ठलाचं श्रीक्षेत्र पंढरपूर. ज्या संतांनी विठ्ठलाचा महिमा वाढवला, त्यांनी विठ्ठलासोबत भीमेचा आवर्जून उल्लेख केला आहे. किंबहुना भीमा आणि श्रीविठ्ठल यांचा वेगळा उल्लेख होऊच शकत नाही. 

तसेच भीमेचा 'भीवरा' असाही उल्लेख संतांच्या अनेक अभंगांतून झालेला दिसतो. 'माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी' असं संत एकनाथमहाराज म्हणतात. नीरा, भामा आदी नद्या भीमेला येऊन मिळतात, त्या सर्व उपनद्यांचा एकत्रित उल्लेख म्हणून तिला भीवरा नदी म्हणतात, असं काहीजण सांगतात. तर, खुद्द क्षेत्र पंढरपुराच्या पंचक्रोशीतील देवतांच्या जवळच्या नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडं पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सति, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, या भीमेला मिळतात. त्यामुळंही संतांनी भीमेचा 'भीवरा' असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं. भीमा नदीचा लिखित उल्लेख इसवीसन १२२६च्या सोळखांबी शिलालेखात आहे. त्यात भीमरथी नदीच्या काठी पंडरंगे नावाचं महाग्राम वसल्याचं नमूद केलं आहे. १३०५मध्ये लिहिल्या गेलेल्या कृष्णकर्णामृतम् या ग्रंथात भीमेच्या काठी असलेल्या या सावळ्या देवानं आपले हात कमरेवर ठेवले असल्याचा उल्लेख आहे. १४९० ते १५०८ या काळात निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्यानं लिहिलेल्या नृसिंहप्रसाद ग्रंथातील तीर्थसार भागातील कथेनुसार सांगायचं तर, यात पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे.याशिवाय पंढरपुरात भीमेसोबतच सोबत चंद्रभागा नदीचाही उल्लेख होतो. शापित चंद्रानं पंढरपुरात येऊन भीमेत स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली. त्यामुळं तिचं नाव चंद्रभागा पडलं, अशी एक पौराणिक कथा आहे. 'पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे' एवढीच इच्छा शेकडो मैल चालून पंढरीत आलेला वारकरी उराशी बाळगतो. याशिवाय त्याचं देवाकडं काहीही मागणं, गाऱ्हाणं नसतं. 
'अवघीच तीर्थे घडली एक वेळा। चंद्रभागा डोळा देखिलिया।।' असं वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचं स्थान अनन्यसाधारण आहे. 
आता चर्चेत आलेल्या मुद्द्यानुसार लेखक वा. ल. मंजुळ प्रश्न उपस्थित करतात की, पंढरपुरातील रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये भीमा तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिलं. एवढ्या थोड्या अंतरासाठी नदीचं नाव बदलल्याचं उदाहरण दुसरं कुठं का आढळत नाही? 

मंजुळ यांच्या या सवालात तथ्य असल्याचं जाणवतं. कारण, एकाच नदीला अनेक नावं असण्याची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रेला तिबेटमध्ये वेगळं तर भारतात वेगळं नाव आहे. तर वैनगंगा नदी वर्धेला मिळते आणि प्राणहिता बनून आंध्र प्रदेशात जाते. दुसरीकडं अमेझॉन नदीला तर स्थानिकांनी तीन-चार वेगवेगळी नावं दिली आहेत. निग्रो नदीला मिळण्यापूर्वीचे ती सॉलिमॉएस असते तर, पेरूमध्ये ती वेगळ्या नावानं ओळखली जाते. नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवराच्या आधी 'कागेरा' असते. संगमानंतरही नद्यांची नावं बदलल्याची उदाहरणं आहेत. 

अर्थात पाचेक किलोमीटरच्या अंतरात नदीचं नाव बदलल्याचं उदाहरण नाही. अपवाद चंद्रभागा नदीचा. मग चंद्रभागा नदी हे स्वतंत्र प्रकरण आहे का? तर, मंजुळ म्हणतात, त्याचं उत्तर होय असं येतं. कारण स्कंद पुराणात पंढरपुरात चंद्रभागा नावाचं सरोवर होतं, असा उल्लेख आहे. आता पुराणामध्ये जरी असा उल्लेख असला तरी, अलिकडच्या काळात त्याबाबत काही पुरावा किंवा धागेदोरे आहेत का? तर आहेत! स्कंद पुराणात पंढरपुरात चंद्रभागा नावाचं सरोवर असल्याचा उल्लेख आहे. हे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ, (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचं आहे) होतं असं सांगतात. या सरोवराला मोठा पाट काढून दिला असावा, असाही अंदाज आहे. या अंदाजाला बळकटी देणाऱ्या काही बाबी आहेत.चंद्रभागा सरोवरातून जो पाट काढून दिला, त्या ठिकाणाला आता चौफाळा म्हणतात. कालांतरानं सरोवर आटलं. अवतीभोवती वस्ती झाली. चौफाळ्यात दीडशे वर्षांपूर्वी गोपाळकृष्णाचं मंदीर बांधताना पायामध्ये एक मोठा वाळूचा पट्टा सापडला. तो काय असावा तर, त्यावळचे लोक म्हणाले, हीच चंद्रभागा. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असं दिसतं.

विष्णुपदाच्या अलिकडं भीमा आणि चंद्रभागेचा संगम झाला होता म्हणे. आता त्या संगमाच्या खाणाखुणा सापडत नाहीत, पण विष्णुपदापलिकडं पुष्पा नदी भीमेला येऊन मिळते. ती मूळची यमुना नदी आहे, असं मानतात. पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे गोकुळचा श्रीकृष्णच. तो गोकुळातून पंढरपूरला आला, तेव्हा येताना सोबत गोवर्धन डोंगर आणि यमुना नदीही घेऊन आला. हा गोवर्धन डोंगर सध्याच्या गोपाळपुरात आहे. या डोंगरावर मंदिर आहे. तिथून ही यमुना नदी वाहत येते. डोंगराच्या एका बाजूकडून मंगळवेढ्याकडं एक रस्ता जातो आणि दुसरा रस्ता कासेगावकडं जातो. कासेगावकडून पुष्पा नदी वाहत येते. ती मूळची यमुना, असं म्हटलं जातं.


चंद्रभागा किंवा भीमा हे तीर्थ दैवत आहे. या देवतेचं रुप 'हरी' या स्वरुपात आढळतं. 'जय जय रामकृष्ण हरी' यातील हरी ही ती तीर्थ देवता. ही देवता भीमा नदीत आहे. पुंडलिकाच्या मंदिरासमोर या देवतेच्या मंदिराचा ४० बाय ४०चा चौथरा सध्या शिल्लक आहे. त्यावरचं मंदीर मात्र वाहून गेलं आहे. मुंबई विद्यापीठात मिळालेल्या स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आहे.
मुनिश्वरा (पुंडलिका) तुझीये प्रीती। 
पश्चिमाभिमुखी मी श्रीपती।।
गुप्त राहीन तुझीये तीर्थी ।
तीर्थ मूर्ती(हरी) सर्वोत्तम।।
असं स्कंद पुराणातील महात्म्यात म्हटलंय. म्हणजे पुंडलिकामागं विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा पात्रात तीर्थमूर्ती हरि पश्चिमाभिमुखी उभा आहे. आता या वाहून गेलेल्या मंदिराचा भला मोठा चौथरा शिल्लक आहे. म्हणजेच हे मंदिर चंद्रभागेत नाही.

हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख काशिनाथ उपाध्याय (बाबा पाध्ये) यांनीही केला आहे. त्याचा संग्रह मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ आणि क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. एव्हढंच नाही तर दीक्षा मंत्रातही 'राम, कृष्ण, हरि' असा तीन देवतांचा उल्लेख येतो. 
आता या ठिकाणी चंद्रभागा नावाचं सरोवर होतं, या दाव्याला बळकटी देणारे काही मुद्दे आहेत. निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्यानं नृसिंहप्रसाद या ग्रंथात तीर्थसार (१४९० ते १५०८) कथा लिहिली आहे. या कथेनुसार पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे. तिथं पुंडरीक नावाचा माणूस पुष्करिणीच्या तीरावर आश्रम बांधून राहात होता. तो आपल्या आईवडिलांची करीत असलेली सेवा पाहून भगवान कृष्ण प्रसन्न झाले आणि पुंडरीकास 'वर माग' असं सांगितलं. तेव्हा पुंडरीकानं हे क्षेत्र माझ्या नावानं म्हणजेच 'पुंडरीक क्षेत्र' म्हणून प्रसिद्ध व्हावं, असा वर मागितला. त्याची विनंती मान्य करुन भगवंतानं त्याला मी इथं गुप्त रुपाने वास करीन असं आश्वासन दिलं. यातील पुष्करिणी म्हणजेच चंद्रभागा सरोवर.
भक्त पुंडलिक चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करत होते असेही उल्लेख आहेत.अशा प्रकारची सरोवरतीर्थे भारतात अनेक ठिकाणी आढळतात. त्यापैकी एक विशेष उल्लेखनीय आणि योगायोग म्हणावा असं चंद्रभागा नावाचंच सरोवर ओरिसातील भुवनेश्वर येथील कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ आहे. या पवित्र सरोवरात स्नान करण्यासाठी माघ सप्तमीला मोठी गर्दी होते. इथं स्नान करून सूर्याची आराधना केल्यास सर्व तीर्थांचं फळ मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीकृष्णाचा पुत्र सांब याचा कुष्ठरोग या सरोवरातील स्नान केल्यानं बरा झाला, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. हे सूर्यमंदीर पूर्वी सांबपूर म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील मुलतानमध्ये होतं. ज्यांनी श्री विठ्ठल चालता-बोलता केला, ते देवाचे लाडके आणि वारकऱ्यांचा समतेचा संदेश देशभर पोचवण्याचा वसा घेतलेले संत नामदेव या मुलतानपर्यंत गेल्याचे दाखले आहेत. 

समता-बंधुभावाचे विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी नामदेवांनी ज्या गोष्टी केल्या असाव्यात, त्यात लोकांचं जगणं सुविधाजनक करणारे पाण्याचे स्रोत अर्थात तळी किंवा सरोवरं निर्माण करणं, हा मोठा भाग होता. फिरत फिरत पंजाबात गेलेल्या नामदेवांनी घुमान इथल्या जंगलात वास्तव्य केलं आणि तिथं दोन तळी खोदली. अजूनही ती तापियाना आणि नामियाना नावानं प्रसिद्ध आहेत. किंबहुना ज्या नामदेवांनी शीख धर्माचा पाया खोदला त्या शीख समाजाच्या गुरुद्वारासमोर संत नामदेवांशी नातं सांगणारं पाण्याचं तळं असतंच. नामदेवांच्या चरित्रात या सरोवरांचे संदर्भ अनेकदा येतात. हे चमत्कार त्यांच्या 'सोशल इंजीनिअरिंग'शी जोडणारे आहेत. खत्री समाजाचा त्यांचा प्रसिद्ध शिष्य केशो अर्थात केसो कलंधर महारोगाला कंटाळून आत्महत्या करायला निघाला होता. कोणाच्या तरी सांगण्यावरून तो घुमानला नामदेवांकडे गेला. नामदेवांनी त्याला तळ्यात स्नान करायला सांगितलं आणि त्याचा कुष्ठरोग बरा झाला. सध्याच्या पाकिस्तानातील भावलपूर इथं केशोचा आश्रम आजही कलधारीकी गद्दी म्हणून प्रसिद्ध आहे. केशोप्रमाणे इतरांचेही रोग या तळ्यात स्नान केल्यानं बरे झाले, असं म्हणतात. 

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या मुलतान जिल्ह्यात नामदेवांनी मोठं कार्य केलं. अजूनही या जिल्ह्यातील दुनियापूर, भावलपूर, पक्काव रोड, लाहोर, अमृतसर, मुलतान, लायलपूर, जालंदर, लुधियाना, अंबाला, रोहोटक, भिवानी, हिसार या सर्व गावी नामदेवांची लहान मोठी मंदिरं आहेत. त्यामुळं इथल्या चंद्रभागा सरोवरतीर्थालाही नामदेव गेले असणार. देशभर फिरत असले तरी नामदेवांचा जीव अडकला होता तो पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या पायाशी. ते अधून-मधून पंढरपूरला येत होते. त्यामुळं सध्याच्या प्रति पंढरपुरांच्या धर्तीवर नामदेवांनी समतेशी नातं सांगणारं, दुःखापासून मुक्ती देणारं म्हणून पंढरपूरच्या सरोवराचं नाव (प्रति) चंद्रभागा ठेवलं असावं का? कारण वारकरी संगीतही नामदेवांनी अशाच प्रकारच्या देशभ्रमंतीतून अनुभवलेल्या, मिळवलेल्या लोकसंगीतातून साकारल्याचे दाखले आहेत.

संत नामदेवांचे समकालीन किंवा त्यांच्या नंतरच्या इतर संतांच्या अभंगांत चंद्रभागा आणि भीमा ही दोन स्वतंत्र तीर्थे असल्याचा अनेकदा उल्लेख येतो. ज्यांना संत नामदेवांचा अवतार समजतात, त्या संत तुकारामांच्या अभंगांत असे बरेच उल्लेख आहेत.
उंदड पाहिले उदंड ऐकिले।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे।।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर। 
ऐसा विटेवर देव कोठे।।
किंवा
रम्य स्थळ चंद्रभागा। पांडुरंगा क्रीडेसी॥ 
भीमा दक्षिणमुख वाहे। दृष्टी पाहे समोर।। 
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका॥
किंवा
आवडे पंढरी भीमा पांडुरंग।
चंद्रभागा लिंग पुंडलिक।।
तर स्वतः नामदेवमहाराज आपल्या अभंगांमधून भीमा आणि चंद्रभागा ही दोन तीर्थे असल्याचे सूचित करतात. ते आपल्या वेगवेगळ्या अभंगांमधून म्हणतात, 
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी। 
तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी।।
किंवा
भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी। 
दावीं दृष्टीभरी निरंतर॥
किंवा
जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा। 
भीमा चंद्रभागा पुंडलिक॥
यामधून भीमा आणि चंद्रभागा स्वतंत्र असण्यास बळकटी मिळावी.
या सर्व अभंगांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, तो संत जनाबाईंच्या अभंगात. संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राबणाऱ्या या अनाथ स्त्रीला नामदेवांनी आपला अध्यात्मिक वारसदार बनवून टाकलं. याचा अर्थ जनाबाई तेवढ्या तोलामोलाच्या आणि कर्तृत्त्ववान होत्या. भारतभ्रमणावर गेलेल्या नामदेवांच्या पाठीमागं त्यांनी संतचळवळ अत्यंत समर्थपणं सांभाळली, पुढं नेली. लोकप्रिय तर एवढ्या की, त्यांच्या ओव्या गायल्याशिवाय पहाटे घरोघरची जाती फिरायची नाहीत. 

आपल्या अभंगांतून जीवनाचं सार अत्यंत सोप्या शब्दांत सांगणाऱ्या या थोर कवयित्रीनं आपलं संपूर्ण आयुष्य पंढरपुरात काढलं. रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या भीमा, चंद्रभागेची नाना रुपं जनाबाईंनी अनुभवली असणार. आपल्या अभंगांतून त्या नदीशी असलेलं अलवार नातं उलगडत राहतात. 'येगं येगं विठाबाई' अभंगात त्या लिहितात, "भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा"...आपल्या पंढरीच्या आईच्या वैभवाचा उल्लेख करताना त्या भीमा आणि चंद्रभागा दोन स्वतंत्र नद्या आहेत, असं सहज सांगून जातात.

तशा भारतात चंद्रभागा नावाच्या इतरही नद्या आहेत. अगदी महाराष्ट्रातही अमरावतीत एक चंद्रभागा वाहते. चिखलदऱ्यामध्ये उगम पावणारी ही नदी पूर्णा नदीची उपनदी आहे.
चिनाब किंवा चंद्रभागा नावाचीच नदी पंजाबातून पाकिस्तानात वाहत जाते. पावसाळ्यात ती रौद्ररूप धारण करते. तिच्या त्या रुद्र रुपापुढे आणि चिवट, शूर पंजाबी सैनिकांपुढे जगज्जेत्या सिकंदरालाही हार पत्करावी लागली होती. पंढरपूरहून निघालेले संत नामदेव या ठिकाणी आले होते. अलिकडच्या काळात भूदान चळवळीच्या निमित्तानं त्याच ठिकाणी गेलेल्या विनोबा भावेंना नामदेवांची आठवण झाली. ते उद्गारले, ज्या पंजाबी लोकांना तलवारीच्या बळावर जिंकणं सिकंदराला जमलं नाही, त्या लढवय्या पंजाबी लोकांना नामदेवांनी प्रेमानं जिंकलं! चंद्रभागेच्या त्या प्रेमाचा धागा पंढरपुरातील चंद्रभागेशी थेट जोडलेला आहे.


जेव्हा देव आणि त्याचं देऊळ हे धर्मठकांची मक्तेदारी झाली, सर्वसामान्यांना देवाच्या साध्या दर्शनाचाही अधिकार नाकारण्यात आला, तेव्हा वारकरी संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. तिथं चोखोबासारख्या यातीहीन संताला ज्ञानेश्वर माउलींसारखे संत उराउरी भेटले. त्याचा मोह निर्गुण निराकाराची भक्ती करणारे उत्तर भारतातील महान संत कवी कबीर यांनाही पडला. ते चंद्रभागेच्या वाळवंटातील तो सगुण साकार प्रेमखेळ अनुभवण्यासाठी काशीहून पंढरपुरात आले आणि नंतर मग दिंडी घेऊन येतच राहिले.
आजही चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी हा प्रेमखेळ मांडतात आणि शेवटी सामूहिकपणे तुकोबारायांनी मागितलेलं मागणं मागतात.
हेचि व्हावी माझी आस।जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरि।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ॥ 
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेंचि दान॥
भीमा आणि चंद्रभागा ही एकच नदी आहे की, दोन या प्रश्नाचे पक्के उत्तर संशोधकांना कधी सापडेल हे माहिती नाही. पण, एक नक्की भीमा-चंद्रभागेत स्नान करून वाळवंटात अनादी काळापासून रंगणारा वारकऱ्यांचा प्रेमकल्लोळ अनंत काळापर्यंत रंगतच राहील.

Friday 28 October 2016

ओढयाकाठचा पाऊस

गेल्या साली अभिजीत घोरपडेनं 'भवताल'च्या दिवाळी अंकासाठी पावसावरचा ललित लेख मागितला होता. काय लिहावं बरं, असा विचार करत असताना मला गावाकडचं ओढ्याकाठचं घर आठवलं. पावसाच्या बहुतेक आठवणी याच घराशी निगडीत. मग लिहून काढला लेख, पावसाच्या आणि घराच्या आठवणींचा...


सादाळलेल्या भुईच्या ओलाव्यानं अपरात्री जाग येते. माथ्या-पायथ्याच्या भांड्यामध्ये अखंड टप-टप सुरू झालेली असते. मी गुडघे पोटाशी घेऊन ऊब मिळवू पाहतो. चूळबूळ करत कूस बदलतो, पण त्या शेणभुईचा गारवा काही कमी होत नाही. बाहेर पावसाचा जोर वाढत राहतो. सोबत वारा आणि विजा. छातीत धडधडू लागतं. मी अंथरुणात घुरमटून घेतो. गळक्या जागांवर ठेवलेल्या भांड्यांमधलं पाणी आई आणि भावंडं बाहेर टाकत असतात. त्यांच्या हालचाली तेवढ्या जाणवत राहतात. पाणी फेकण्यासाठी त्यांनी दार उघडल्यानंतर फुसांडत वाहणार्‍या पुराची रों रों ऐकू येते. घरासमोरच्या ओढ्याला पूर आल्याचा तो आवाज. मला काळजी वाटू लागते ती, सपरातल्या म्हशींची. डोळ्यातपाऊस घेऊन त्या खूरभर पाणी-चिखलात उभ्या असणार. वाटतं, आज रात्री बहुदा आख्खं जग ओढ्याच्या पुरात वाहून जाणार!

माझं घर दूरवरच्या रानातल्या शेतात. ओढ्याच्या कडेला. तिथून माणसांची वस्तीही लांबच्या हाकेच्या अंतरावर. सोबतीला फक्त मळा, ओढा, झाडं आणि पाखरं. नाही म्हणायला माणसांचा रानात राबता असायचा, पण तो दिवसा. कडुसं पडेपर्यंत. पाणी प्यायला, अवजारं न्यायला कुणी ना कुणी दिवसभर घरी येत राहायचं. अंगावर पोत्याचं घोंगतं घेतलेली ही माणसं पावसापासून आडोसा शोधायला हमखास यायची. गळणार्‍या पन्हाळ्यांच्या आत टेकायची. पाऊस ओसरताच 'कसं काय राहाता बुवा तुम्ही एकांटी...' असं म्हणत काढता पाय घ्यायची.पाऊस रानात दाखल व्हायचा तोच मुळात दांडगाई करत. उन्हाळ्याची सुट्टी सरत आली असायची. जत्राखेत्राही संपलेल्या असायच्या. वावरातली ढेकळं आभाळाकडं तोंड करून पडलेली असायची. आंब्याच्या दाट सावलीतही उन्हाच्या झळा सहन न होऊन टॉमी ल्याह्या ल्याह्या करत शेजारी बसलेला असायचा. ही तापती दुपार उतरणीला लागताच अचानक डोंगरमळ्याकडून पांढरे ढग सरसर आभाळात वर येतात. झटपट काळेजांभळे होतात. पालापाचोळ्याला घेऊन वावटळी गिरक्या घेऊ लागतात. मी आंब्याखालचं अंथरून, उशी आणि पुस्तक घेऊन घराकडं धूम ठोकतो. आई म्हशींना घरालगतच्या सपरात बांधायची लगबग करत असते. मला ती वैरणीच्या वळईवर प्लॅस्टिकचा कागद अंथरून वर दगड, लाकडं ठेवायला सांगते. तोपर्यंत धुळीनं पंचक्रोशी भरून जाते. मग आम्ही धावतच घरात जाऊन दार लावून घेतो.
वावधान सुरू झालेलं असतं. दारावर बाहेरून जणू कुणी जोरजोरानं धडका मारू लागतं. वारं आत घुसू नये म्हणून दाराच्या कोयंड्यात लोखंड अडकवून मी दाराला पाठ लावून उभा राहतो. दार एवढं गदागदा हालतं की, चौकटीसकट उखडेल. आईही दाराशी येऊन मदतीला उभी राहते. घुमणारं वावधान मग कौलारू छप्पराला उचलू पाहतं. त्या धुमशानापुढं दम टाकत आढ्यावरचं एक कौल उचकटतं. तशा कौलांच्या ओळीमागून ओळी भर्रकन उचकटत जातात. मोकळ्या होत जाणार्‍या छतातून भक्कन्‌ उजेड आत येतो. आम्हा दोघांच्याही पोटात खड्डा पडतो. फार फार असुरक्षित, एकाकी वाटू लागतं. मागोमाग वादळ आणि पाऊस घरात घुसतो. दोघं मिळून बराच वेळ दंगा घालतात. आम्ही दाराला चिकटलेलोच. जीव मुठीत धरून.


त्याच वेळी आणखी एक गोष्ट आठवून काळीज लक्‌कन हालतं. ओट्यावरचा जुनंपुरानं महाकाय आंब्याचं झाड घरावर पडलं तर..? अखेर पुरेसं घुमून झाल्यावर वादळ हळू हळू शांत होत जातं. आम्ही बाहेर येऊन पाहतो तर अंगणात फुटलेल्या कौलांचा, कैर्‍यांचा खच. आणि वादळाशी झुंजून दमलेला तो बुजूर्ग आम्रवृक्ष. इतका आवाढव्य आणि उंच की, त्याचे शेंदराच्या रंगाचे आंबे फक्त पोपटच तोडू शकायचे. वर चढून आंबा उतरवण्याची भल्याभल्यांची छाती व्हायची नाही. केवळ वार्‍याच्या झुळुकीनं पडणारे आंबे झेलण्यासाठी पोराटोरांसह जाणतेही गर्दी करायचे. आंबा खाता खाता वर बघत म्हणायचे, 'तोडून टाका बुवा झाड, घर बसवील एखाद्या वावधानात...' वडील फक्त ऐकून घ्यायचे. झाडं तोडायला, गुरं विकायला त्यांचा ठाम विरोध. आंब्यानं मात्र कोणत्याही पावसाळ्यात दगा दिला नाही.

वादळानं घरा दारात घातलेला इस्कोट पाहात असतानाच भदभदीवरुन धो धो आवाज येऊ लागला. आता पूर येणार, असं म्हणेपर्यंत विलक्षण वेगाने गढूळ पाण्याची जीभ ओढ्यातून झेपावत येते. या जीभेला शिवलं की, लुळापांगळाही बरा होतो, असं लोक म्हणायचे. त्या जिभेचा क्षणार्धात जणू सरसरणारा अजगर झाला. ओढयाचं हे रूप एकदम परकं आणि भीतीदायक वाटतं. पुराचं पाणी चढतच राहातं. हळू हळू ओट्यावरच्या आंब्याच्या बुंध्यापर्यंत पोहोचतं. घराच्या उंबर्‍यात आम्ही 'पांडुरंगा, ज्ञानोबामावली' असं म्हणत पूर ओसरायची, वडील आणि भावंडं येण्याची वाट पाहत राहतो.


दर पावसाळ्याला लहानपणचा हा पावसानुभव डोळ्यापुढं उभा राहतो. वेगानं वाहणार्‍या पुराच्या पाण्याची भीती तर अजूनही मनातून गेलेली नाही. मी पहिली-दुसरीत असेन. एकदा खूप पाऊस सुरु असताना शाळेत गेलो होतो. दिवसभर पाऊस पडतच होता. शाळा सुटायच्या वेळी थोडासा उघडल्यासारखा झाला, म्हणून घरी निघालो तर, पुन्हा धो धो. आम्ही मुलं रस्त्यावरच्या बापूनानाच्या कुडाच्या घरात घुसलो. पावसोबा थांबायचं नावच घेत नव्हता. बाहेर एकदम पाणजंजाळ. दारासमोरची झुरी फू फू करीत वाहत होती. संध्याकाळ होत आली तशी भीती दाटून येऊ लागली. आईच्या आठवणीसोबत रडू येऊ लागलं. अचानक ओट्यावर नाना म्हणजे वडील दिसले. डोक्यावर पोत्याचं घोंगतं. धोतराचा ओचा खोचलेले. एकदम जीवात जीव आला. म्हणत होते, चला रे पोराहो... पावसानं जरासाक दम खाल्ला होता, पण झुरीला मोठा जोर आला होता. आम्ही सगळे नानांना चिकटलो. जमेल तेवढ्यांनी त्यांचे हात घट्ट पकडले. कुणी त्यांच्या बंडीच्या लांब बाह्या पकडल्या तर कुणी धोतराचे ओचे. आमचं लटांबर घेऊन ते झुरीच्या त्या वेगवान धारेत उतरले. मी सर्वात लहान. पाण्याला वेग प्रचंड. अचानक पायाखालची वाळू सरकली आणि पाय अधांतरी झाले. ते वेगवान पाणी मला सोबत ओढू लागलं. त्या ओढीनं नानांचा हात सुटला. त्यांच्या तर ते लक्षातही आलं नाही. तेवढ्यात त्यांच्या बंडीचा लांब खिसा माझ्या हातात आला. त्याला धरून जीवाच्या आकांतानं मी लोंबकळत राहिलो आणि वाचलो. तेव्हापासून पुराच्या गढूळ पाण्याची धास्तीच बसली.


या गढूळ पाण्याचा आणखी एक संदर्भ आहे. लहानपणी कुत्र्यांचं न् माझं मोठं 'प्रेम' होतं. घरचा टॉमी कधी प्रेमानं हातापायाला दात लावायचा, तर शाळेत जाताना रस्त्यावरच्या कुत्र्यांना मी आणि माझी सायकल जणू वैरी वाटायची. ते माझ्या पोटर्‍यांना लक्ष्य करायचे. त्यावेळी कुत्रा चावला म्हणजे सरकारी दवाखान्यात जाऊन पोटात १४ अँटीरेबीज इंजेक्शन्स घ्यायची शिक्षा असायची. त्यामुळं बर्‍याचदा कुत्रा चावल्याचं घरी सांगायचो नाही, पण आईला ते बरोब्बर कळायचं. ती भीती घालायची, 'पिसाळलेलं कुत्रं ज्या माणसाला चावतं, तो माणूसही पिसाळतो. इतरांना चावत सुटतो. शिवाय पावसाळ्यातलं पुराचं गढूळ पाणी पाहिल्यावर चांगलं कुत्रंही पिसाळतं. तसंच कुत्रं चावलेला माणूसही गढूळ पाणी पाहून पिसाळतो...' मग मला इंजेक्शन घ्यायला जावंच लागायचं. आताही पूर पाहिला की, आई म्हणायची ती 'गढूळ पाण्याला कुत्रं दचकतं' ही म्हण आठवते.पावसाळ्यात सर्वात मोठ्ठा प्रश्न म्हणजे वाटेचा! एरवीची पायाखालची ती बांधावरची वाट पावसाळ्यात एकदम रुसते. हटून बसते. तिच्या काळ्या मातीचा चिखल एव्हढा चिवट की, त्यातून पाय काढता काढता जीव रंजीस व्हायचा. एका बाजूला खोल ओढा आणि दुसऱ्या बाजूला एका आग्यावेताळाचं शेत. कुठल्याही बाजूला पाय घसरला तरी हरी विठ्ठल! हटवादी शेतकरीदादा वाट नांगरुन तरी ठेवायचा किंवा पेरुन तरी. मग त्यावरून वादावादी. सायकल किंवा मोटरसायकलचं तर पावसाळ्यात कामच नाही. चिखलात अडकलेल्या त्या दोनचाकी वाहनांना खांदा द्यावा लागायचा. नंतर ओढ्यात नेऊन, चिखल काढून सचैल स्नान घालावं लागायचं. ही सगळी यातायात अनुभवून पावसाळ्यात आमच्याकडं यायला लोक टाळायचे. 

एका पावसाळ्यात घरी आजी म्हणजे मामाची आई आली. तसा तिला आमचा पाऊस काही नवा नव्हता. आईला इथं दिल्यापासूनचा इथला पाऊस तिच्या ओळखीचा. पण त्या वर्षी पावसानं आजीला आजारी पाडलं. डॉक्टरकडं नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पावसात तिला घेऊन निघालो तर वाट आडवी आली. त्या दिवशी त्या चिखलवाटेनं अंत पाहिला. आजीला उचलत-ठेवत, चिखलातून पाय सोडवत आम्ही कसं बसं दवाखान्यापर्यंत पोहोचलो. डॉक्टरनं तिला पुण्यात हलवायला सांगितलं. तिथं ती गेलीच. आजही पावसाळ्यात त्या वाटेवरुन जाताना आजी आठवते.अर्थात पावसाळ्यात मळ्यातल्या सगळ्याच वाटा उंचच उंच गवतात लपायच्या. दिवाळीच्या आसपास शेतकरी ते गवत जनावरांसाठी कापून नेईपर्यंत त्या दडूनच असायच्या. दोन्ही बाजूंचं गवत कापल्यावर त्या वाटा केस कापलेल्या शाळकरी मुलासारख्या दिसायच्या.


मला आत्ता आठवतंय, पावसाळ्यात गवत माजलेल्या या वाटांवरून अनवाणी जाताना कधीच भीतीबीती वाटली नाही. नाही म्हणजे या वाटेनं वाटलेली एक भीती आठवतेय. पाचवी-सहावीच्या वयात मळ्यात एक मज्जा आली होती. ती म्हणजे कृष्णधवल टीव्ही. हाकेवरच्या सुंदरनानाच्या घरी ती मौजेची वस्तू होती. त्यावरील रामायण, महाभारत, छायागीत, चित्रहार आणि शनिवारचा मराठी सिनेमा यांनी वेड लावलं होतं. रामायण, महाभारत सकाळी वगैरे असायचं. पण छायागीत, चित्रहार, सिनेमा संध्याकाळी लागायचा. त्यावेळेला सुंदरनानाचं घर माणसांनी तुडुंब भरलेलं असायचं. आम्ही पोरं तर पहिल्या रांगेत नंबर लावून बसलेलो असायचो. दोन तीन तास तो स्वर्गीय आनंद लुटल्यानंतर कुणीतरी भानावर आणायचं. तोपर्यंत बाहेर अंधार पडलेला असायचा. बाकीच्या संवंगड्यांची घरं जवळ असायची. माझं घर मात्र दूर ओढ्याकाठी. आसमंतात अंधार भरून राहिलेला, पावसाची रिपरिप, गवतात लपलेली बांधावरची चिखलवाट आणि मनात दाटू लागलेली भीती. अर्थात ही भीतीपाऊस, पूर, चिखलाची किंवा गवतातल्या विंचु-काट्याची नसायची. तर ती आता नाना रागावतील याची असायची.आजकालची पोरं टीव्हीमुळंच बिघडलीत, असं त्यांचं ठाम मत बनलं होतं. त्यांनी कधी तरी छायागीत, चित्रहार वगैरे पाहिलं असावं. पुढं मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणं खरोखरच बिघडलो आणि टीव्हीमध्ये काम करायला लागलो. असो. तर, श्रावणात वगैरे टीव्ही पाहून मी घरी पोहोचे, तेव्हा नाना पोथी वाचत बसलेले असायचे. मी गुपचूप जाऊन साळसूदपणानं ऐकणार्‍यांमध्ये जाऊन बसायचो. अर्थात त्यापूर्वी आईकडं माझी चौकशी झालेली असायची, पण आईनं काही तरी पानावर पान टाकलेलं असायचं. ते नीट पडलं नसेल तर दुसर्‍या दिवशी का होईना भरपूर खरपूस मार बसायचा. ती श्रावणझड, ते टीव्ही पाहून परतणं, नानांचं पोथीवाचन आणि त्यांच्या बोलण्या-मारण्याची धास्ती हे सारं पावसाळ्याच्या आठवणींमध्ये गुंफलेलं आहे.


याच काळात कधी करी गोयंद्या अर्थात गोविंद मित्र झाला होता. भोळाभाबडा. कामसू. घरातली, शेती, गुरांची सगळी कामं उरकून रात्री अभ्यासाला यायचा. आम्ही दहावीच्या अभ्यासासाठी एक गोठा साफसूफ केला होता. बाहेर कोसळणार्‍या पावसाच्या लयीत, कंदीलाच्या उजेडात आमचा अभ्यास चाले. अर्थात अभ्यास गोयंद्याच करत असे. मला थोड्या वेळानं उठव, म्हणून मी ताणून देत असे. तो पहाटेच मला उठवायचा. त्याला गाईंच्या धारा काढायला घरी जायचं असे. जाग आल्यावर मला बाहेरचा पावसाचा आवाज, कंदिलाची धुरकट काळी झालेली काच आणि जागरणाने डोळे तारवटलेला गोयंद्या दिसे. मला त्याची ओढ्याच्या पाण्यानं स्वच्छ झालेली लांबोळकी लालसर अनवाणी पावलं आठवतात. तो तसाच अनवाणी बांधावरच्या गवता-चिखलातून, ओढ्याच्या पाण्यातून, अंधारातून पळत पळत जायचा-यायचा. मी त्याला म्हणायचो, अरे पायात वहाणा-बिहाणा घालत जा. त्यानं एकदा चांभारी वहाणाही घेतल्या, पण त्या तो फक्त शाळेतच वापरायचा. पुढं मुंबईत एका लोकल अपघातात तो गेला. मनातल्या पावसाळ्याला त्याचीही आठवण चिकटलेली आहे. तसा पावसाळा आमच्या सवयीचा. ओढयातलं गढूळ पाणी हळू हळू निवळत जायचं. अखंड नितळ वाहणारी पाण्याची ती धार आमचं जीवन बनायची. ओढाही पावसाळ्यात जणू कात टाकायचा. काठाची झाडं टवटवीत व्ह्यायची. पानांवर थबकलेले पावसाचे थेंब झटकत वार्‍यासोबत खिदळायची. ओढयाचं ते निव्वळशंख पाणी म्हणजे अखंड मौज. दिवसभर खेळायला दुसरा दोस्त लागायचा नाही. पाण्यात उड्या मारायच्या, डुंबायचं. सायकलीला, म्हशीला, कुत्र्याला अंघोळ घालायची. पाण्यावर गोल गोल फिरणार्‍या चपळ चमकदार पाननिवळ्या पकडायच्या. पुन्हा पाण्यात सोडायच्या. भांड्यानं पाणी झपाझप उपसून काठाच्या वरंगळतीला फेकायचं. पाण्यासोबत फेकल्या गेलेल्या छोट्या छोट्या माशांची चमचणारी पोट पाहायची. पाण्यात शांत उभं राहून लुचणार्‍या माशांच्या पिल्लांकडून तळव्यांना गुदगुल्या करून घ्यायच्या.
ओढयाच्या वरच्या अंगाला एक मज्जेचं ठिकाण होतं. भदभदी! म्हणजे छोटा धबधबा. तिथल्या स्वच्छ खडकांवरून वाहणारं ओढ्याचं नितळ पाणी आणि लख्ख ऊन. गोधडया धुवायला यापेक्षा उत्तम जागा नाही. आईला गोधडया धुवू लागायचं केवळ निमित्त. खरी मजा अंघोळीची. आईच्या 'बास रं आता' म्हणण्याकडं दुर्लक्ष करत पाण्यात डुंबायचं. वर येऊन सुकायचं. पुन्हा डुंबायचं-पुन्हा सुकायचं. या खडकावर वाळवलेल्या गोधड्यांना, शाळेच्या कपड्यांना ओढ्याच्या पाण्याचा ओळखीचा गंध येत राहायचा.


पावसानं तुडुंब भरलेल्या रानातल्या विहिरींमध्ये हातपाय भरून येईपर्यंत डुंबणं म्हणजे स्वर्गीय आनंद. मोठी मुलं, माणसं पाण्यात धबाधब टाकत असलेल्या उड्या, मुटके, सूर पाहून पोहायची सुरसुरी यायची. पाण्याचा तो वास, स्पर्श हवाहवासा वाटायचा. एक दिवस मोठा भाऊ आणि त्याचे दोस्त विहिरीत पोहत होते. मी काठावर बसून मज्जा पाहत होते. 'मला पोहायला शिकवा' या माझ्या धोशाकडं दुर्लक्ष करून ते पाण्यात मस्ती करत होते. माझ्या अंगावर पाणी उडत होतं. शेवटी न राहवून मी पाण्यात उडी ठोकली. ते कोणाच्याही लक्षात आलं नाही. विहीरीत पडल्यावर मी खोल खोल गेलो. श्वास घेता येईना. हातपाय हलवायचंही सुचेना. पट्टीचा पोहणारा असलेल्या काळूरामच्या लक्षात आलं न् त्यानं तातडीनं मानगूट पकडून मला बाहेर काढलं. बाहेर आल्यावर मी फारच घाबरलो होतो. तोपर्यंत घरी खबर कळली होती. एरवी माझ्याकडं दुर्लक्ष करणार्‍या आईनं गेल्या गेल्या खस्सकन जवळ ओढलं आणि मला पोटाशी घेऊन खूप खूप रडली.त्यानंतर मात्र मी पोहायला शिकलोच. अगदी पट्टीचा पोहणारा झालो. मग पावसाळ्यात भरलेली एकही विहीर सोडली नाही. सूर मारून तळाचा दगड वर आणला नाही, अशी विहीर आसपासच्या मळ्यात उरली नाही. 

पावसाळ्यात भरलेल्या विहिरींशी संबंधीत एक प्रसंग आठवतो. गणपती विसर्जनाचा दिवस होता. शिवेवरच्या मळ्यातल्या नव्या मोठ्या विहिरीत आम्ही गणपती विसर्जन केलं. पाऊस पडत होता. पावसातच आम्ही विहिरीत पोहू लागलो. काठावर लाउडस्पीकर दणदणत होता. विहिरीला वेढे मारण्याची स्पर्धा सुरू झाली. वरची पोरं मस्तीत आली होती. त्यांनी आमचा वर चढायचा दोर ओढून घेतला आणि ते घरी निघून गेले. आम्ही भानावर आलो तेव्हा वर कसं चढायचं हे समजेनाच. पोहून पोहून हातपाय भरून आले होते. नंतर लक्षात आलं की, पोहण्यात कच्चा असणारा अशोकही आमच्या सोबत होता. त्याची एकदम भिजलेली शेळी झाली होती. काकडल्याने त्याचे दातावर दात आपटत होते. तो थरथरत कसाबसा कपारीला चिकटला होता. पुन्हा पुन्हा पाण्यात घसरत होता. आम्हाला आमच्यापेक्षाही त्याची चिंता वाटू लागली. प्रसंग बाका होता. पाऊस पडतच होता. त्या प्रसंगातून आमची सुटका कुणी केली हे आठवत नाही. पण त्यानंतर विहिरीत पोहणं सुटलंच. बहुदा पुढं शिकण्यासाठी शहरात गेल्यामुळं असेल. नंतर पुढं अशोकच्याही डोक्यावर परिणाम झाल्याचं आणि काही दिवसांपूर्वीच तो गेल्याचंही ऐकलं. अर्थात अशा काही गोष्टी सोडल्या तर, पावसाळ्यात भरलेल्या त्या विहिरींनी दिलेला पोहण्याचा आनंद पुण्या-मुंबईच्या कुठल्याही स्वीमिंग पूलनं दिला नाही.

पावसाळ्यातल्या रानात आनंदाचे आणखी कंद होते. त्यापैकी एक म्हणजे भुईमुगाच्या शेंगा! शेतातून भूईमुग उपटून आणायचा. शेंगा ओढ्यात स्वच्छ धुवायच्या. मग तुळशीच्या ओट्यावर बसून निवांत रवंथ करायचा. पोट आणि मन तुडुंब भरेपर्यंत शेंगा खायच्या. तीच गोष्ट नंतर हरभर्‍याच्या हिरव्या डहाळयांची. पावसाळ्यातल्या खाण्याच्या अनेक गोष्टी आहे. संततधारेमुळं पीठ-मीठ-तिखट-भाजीचे वांदे व्हायचे. गावात जाता यायचं नाही. अशा वेळी आई जे द्यायची, त्यापुढं पक्वान्न फिकं. तिनं शेतात जाऊन आणलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेच्यासोबत बाजरीची गर्रम गर्रम भाकरी, तांदुळजाची भाजी, उकडलेले कोथिंबीरीचे मुटके, गव्हाचा घाटा, गूळभाकरीचा काला असं काय काय. शाळेतून आल्या आल्या दप्तर घरात फेकायचं. आईच्या नावानं भूक भूक करत शेतात जायचं. तिथं मूग आणि चवळी तरारलेली असायची. त्यांच्या शेंगांचे घोसच्या घोस तोडून तोबरे आणि खिसे भरायचे. त्या शेंगा घरी आणून मीठ टाकून उकडायच्या नि पुन्हा हादडायच्या. होता होता श्रावण यायचा. हिरवी टवटवी, पाखरं, फुलं यांच्या जोडीनं सण यायचे. बांधावरल्या देवाला नैवद्य ठेवायचं काम माझ्याकडं असायचं. पावसानं स्वच्छ अंघोळ घातलेला, हिरव्या गवतात, रानफुलांत बसलेला देव नैवद्य पुढं ठेवला की मोठा प्रसन्न दिसू लागायचा.

श्रावणातली न विसरणारी आठवण म्हणजे पोथी. नागपंचमीला ती घरात सुरू व्हायची. लाल भगव्या कापडात गुंडाळलेला रामविजय ग्रंथ. पोथी ऐकावी ती आमच्या ओढ्याकाठच्या घरातलीच. वडील नाना, भाऊ अण्णा आणि बहिणी वाचायच्या. अत्यंत स्पष्ट, सुस्वर वाचन. वाचन नव्हे गायनच. मल्हार, मालकंस, भैरवीच्या सुरात रामाचा जन्म व्हायचा, तो वनवासाला निघायचा. दशरथाचा मृत्यू व्हायचा. त्या पोथीगायनातील करुणरसानं कालवाकालव व्हायची. रावण, कुंभकर्णाच्या मृत्यूच्या वेळी मनोभावे नारळ फोडायचा. श्रावणात नानांचं पोथीवाचन चाललंय आणि बाहेर पाऊस पडतोय, हे दृश्य माझ्या मनावर कोरलं गेलंय. अजूनही पाऊस पडू लागला की मला त्यात हे पोथीगान ऐकू येतं.

ओढयाकाठच्या या पावसाच्या किती किती आठवणी आहेत. आषाढी वारीवरून चिंब भिजून परतलेले वडील. आम्ही पोरं झोपेतच उठून त्यांच्या पाया पडतोय. भर पावसात म्हैस व्यालीय. तिचं पारडु थंडीनं काकडतंय. त्याला म्हशीसमोर ठेवताच म्हैस तिच्या खरखरीत जीभेनं आपला हात चाटतेय. शाळेच्या वाटेवर पावसानं भिजलेली झाडं वेली हलवून मित्रांच्या अंगावर उडवतोय. रानात गुरं जिकडं जातील तिकडं त्यांच्या मागं फिरतोय. बालभारतीच्या पुस्तकातला भा. रा. तांबेंच्या कवितेतला पिवळ्या उन्हाचं सोनं वाहून नेणारा ओढा तासनतास् न्याहाळतोय  त्याच्या खळाळाच्या तालावर म्हटलेल्या कविता रानभर घुमतायत.


आम्हा सहा भावंडांचं बालपण या ओढ्याकडेच्या रानातल्या घरी गेलं. या घरानं पावसाच्या, झाडं पाखरांच्या सोबत राहायची सवय लावली. त्यामुळं शिक्षण-नोकरीच्या निमित्तानं शहरात गेल्यावर जुळवून घेणं अवघड गेलं. नंतर सरावलो. आता आम्ही भावंडं मुंबई-पुण्याकडं राहतो. घरी असलेला भाऊ पावसाळ्याची ती रस्त्या-बिस्त्याची भानगडच नको म्हणून गावात घर बांधून राहतो. काही दिवसांपर्यंत आईवडील मळ्यातल्या घरात राहायचे. दोघेच. पण पावसाळ्यात गैरसोय नको म्हणून तेही गावातल्या घरी राहायला गेले. अजूनही मळ्यात घर आहे. ओढा आहे. शेत आहे. झाडं आहेत. पाऊस तसाच पडतो. ओढा वाहतो. झाडं आणि पिकं हिरवाईनं नटतात. पण ओढ्यात कुणाचं बालपण मस्ती करत नाही. गोठ्यात म्हैस आणि तिचं पारडू नाही. कुत्र्या मांजरांनी आपापले आसरे शोधलेत. शेतात भुईमूग, मूग, चवळी डवरून येते, पण त्यांच्या शेंगा कुणी तोडत नाही. त्या ओढ्याच्या पाण्यात धुवून तुळशीच्या ओट्यावर बसून कुणी रवंथ करत नाही.खूप आठवण झाली म्हणून एक दिवस एकटाच गेलो. ओढ्याकडंच्या घरी. पाऊस पडून गेला होता. पक्षी किलबिलत होते. घर मात्र एकटं उभं होतं. शांत. भोवताली गवत माजलं होतं. अंगणात पानं, पाचोळा साचला होता. मी शेतात गेलो. भुईमुगाचा पाला उपटून आणला. त्याच्या शेंगा ओढ्यात धुतल्या. वर आलो. तुळशीच्या ओट्यावर बसलो. मनसोक्त शेंगा खाल्ल्या. मग मला फार फार भरून आलं. ओढ्याकाठी पुन्हा खूप पाऊस पडला.

Saturday 22 October 2016

जनाबाई पायरी

संत जनाबाई. नुसत्या आठवणीनंही गहिवरून यावं, अशी माउली. तेराव्या शतकात या अनाथ जनाबाईंनी जे कर्त्तृत्त्व गाजवलंय, त्याला तोड नाही. लोकप्रियता एवढी की, तेव्हा घरोघरची जाती तिच्या ओव्यांशिवाय फिरायची नाहीत. आजही तिचे शब्द लाखो महिलांना जगण्याचं बळ देतात. जनाबाईंचं कर्तृत्व ठळक करायचं म्हटलं तर, संत नामदेव भारतभ्रमणाला गेले असताना त्यांच्या पाठीमागे सांभाळलेला आणि वाढविलेला समतेचा संदेश रुजवणारा वारकरी संप्रदायाचा डोलारा. त्या एका गोष्टीसाठी आपण जनाईचं जन्मोजन्मी ऋणी राहायला हवं. 'रिंगण'च्या संत जनाबाई विशेषांकासाठी लिहिलेला हा लेख...


देऊळ बंद होण्याची वेळ झाली होती. घाईघाईनं नामदेव पायरीवर डोकं ठेवलं. तर एकदम डोक्यात वीज लखलखली. ही तर जनाबाईंची पायरी! पुन्हा डोकं टेकवलं...जनामाऊली माफ कर. आम्ही तुला विसरतो आहोत. आम्हाला माहितीये की, तुला नामदेवांपासून वेगळं नाही करता येत. पण तू वेगळीच होतीस माऊले. तुझ्या मोठेपणाचं मोजमाप आमच्यानं होणार नाही. तुझ्यासारखी तूच, हे पांडुरंगानंही मान्य केलंय. विठोबाचं दर्शन घेईपर्यंत आणि नंतरही जनाबाई अशा 'आंतर्बाही' भरुन राहिल्या होत्या.

या जनामाऊलीनं आम्हाला बोलायला शिकवलं. चालायला शिकवलं. कष्ट, हालअपेष्टांतही जगायला शिकवलं. संत जनाबाई! आठवल्या तरी गहिवर दाटून यावा. साखरमाया करणाऱ्या आज्जी, आई, बहिण, मावशीची सय यावी, अशा जनाबाई. लहानपणीच अनाथ झालेल्या जनाबाई पुढं मर्‍हाटी मुलुखातील घराघरांत भरुन राहिल्या. भल्या पहाटे जात्यावरच्या ओव्यांमधून गात राहिल्या. भजन-कीर्तनांमधून कानात घुमत राहिल्या. या जनाबाईंनी केलं काय, तर आमची आणि सावळ्या विठोबाची गाठ घालून दिली. नामदेवरायांनी विटेवरचा श्री विठ्ठल बोलता केला, तर जनाबाई त्याला प्रत्येक देव्हारयात घेऊन गेल्या. 
समतेच्या वारकरी विचारांना दूर दूरच्या खेडोपाड्यांत, निरक्षर बायाबापड्यांच्या घरात पोचवलं, ते जनाबाईंनीच. वारकरी संप्रदायाचा खराखुरा विस्तार केला तो संत जनाबाईंनीच. कारण जनाबाई जनसामान्यांची भाषा बोलल्या. त्यांचंच जगणं जगल्या. म्हणूनच रंजल्या-गांजल्या कष्टकर्‍यांना, दबल्या-पिचल्या सासुरवाशिणींना, पंढरीच्या वाटेवर चालणाऱया बायाबापड्यांना जनाबाई त्यांच्याच वाटल्या. जनाबाईंनी त्यांना मनातली सुख दु:ख बोलायला शिकवलं. आयुष्याशी झगडायला शिकवलं. देवाशी भांडायला शिकवलं. जडशीळ जातं ओढतानाही गाणं म्हणायला शिकवलं.

नामदेवांनी उभारलेल्या वारकरी चळवळीच्या प्रपंचाचं जातं जीवशिवाचा खुंटा करून ओढणारी ही म्हातारी ज्ञात माहितीनुसार तब्बल ८७ वर्षे जगली. ज्ञानदेवांदी भावंडं एकापाठोपाठ एक समाधिस्त झाल्यानंतर संत नामदेवांनीही महाराष्ट्र सोडला. वारकरी संप्रदायाची समतेची पताका खांद्यावर घेऊन ते उत्तर भारतात निघून गेले. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळ कशी सुरू राहिली, याच्या इतिहासातील नोंदी अजून सापडलेल्या नाहीत. एक नक्की दीर्घायुष्य लाभलेल्या जनाबाईंनीच ज्ञानदेव-नामदेवांची ही चळवळ अत्यंत समर्थपणे पुढं नेली. लहानग्या ओढाळ नामदेवाला विठ्ठलमंदिरात नेणा-आणणार्‍या जनाबाई मोठेपणीही नामदेवांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. अगदी सख्ख्या कुटुंबालाही नामदेव नकोसा झाला तेव्हा ही दासी जनीच नामदेवाच्या सोबत राहिली. 
कीर्तनरंगी नाचत जगभर ज्ञानदीप लावण्याची शपथ घेतलेल्या या महान संताची एका युगातच नाही तर चारही युगात सतत या दासीनं पाठराखण केली. हे चौयुगांचं अवतार मिथकही लक्षात घेण्यासारखं आहे. हिरण्यकश्यपूच्या कुळातील प्रल्हाद म्हणजे नामदेव आणि त्याची दासी पद्मिणी म्हणजे जनाबाई, रामअवतारात नामदेव अंगद तर जनाबाई कैकयीची दासी मंथरा, कृष्णजन्मात नामदेव उद्धव, तर जनाबाई कुब्जा दासी. हे सगळे अवतार म्हणजे उपेक्षित, वंचितांचा इतिहास. प्रत्येक युगात जनाबाई उपेक्षितांचं प्रतिनिधीत्व करत आल्यात. त्यांच्या आवाजाला उद्गार देत आल्यात, असा त्याचा अर्थ.

जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की. 
अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत झालेल्या अभ्यास, चिंतनातून जनाबाईंचं व्यक्तिमत्व प्रगल्भ झालं. प्रत्येक संताचं मूल्यमापन करण्याची नैतिक क्षमता त्यांच्याकडं आली. जनाबाईंनी लिहिलेल्या अभंगांमुळंच तर हे संत आपल्यापर्यंत पोहोचले. ज्ञानदेवादी भावंडांनीही जनाबाईंच्या प्रतिभेला नमस्कार केला. संतमेळ्यात जनाबाईंचं स्थान एवढं उंचावलं की त्या या संतमेळ्याच्या मार्गदर्शक, समीक्षक बनल्या. संत ज्ञानदेव-नामदेवांच्याही सल्लागार बनल्या. कीर्तनात त्या 'हां आता ज्ञानदेवा, तुम्ही अभंग बोला' असं अधिकारवाणीनं सांगू लागल्या. एवढंच नाही तर समतेच्या धाग्यानं समाज जोडण्यासाठी तीर्थाटनाला निघालेले ज्ञानदेव-नामदेव जनाबाईंशी विचारविनिमय करूनच निघतात. 
प्रत्येकवेळी जनाबाईंवर निर्धास्तपणे भार टाकून ते आळंदी-पंढरपूर सोडतात. याचा अर्थ जनाबाई तेवढ्या सक्षम होत्या. वारकरी पंथाचं त्या नेतृत्व करू शकत होत्या. हिंदू धर्मातील कर्मकांडांनी कळस गाठलेल्या त्या यादव काळात बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभव, नाथ आदी संप्रदायही निष्प्रभ झाले होते. अशा काळात वारकऱ्यांची समतेची विचारधारा नव्यानं रुजवण्याची  गरज होती. गरज होती, समन्वयाची. नांदेवरायांनी ती जबाबदारी जनाबाईंवर टाकली आणि जनाबाईंनी ती अत्यंत समर्थपणे पार पाडली. त्यासाठी भारतभर मुळं रोवलेल्या नाथ संप्रदायाशी त्यांनी नातं जोडलं. ज्ञानदेवांचे थोरले बंधू समवयस्क निवृत्तीनाथ यांच्याशी संवाद वाढवला. गोरक्षनाथांना विस्तार केलेल्या नाथपंथाचं खतपाणी वारकरी संप्रदायाला घातलं. 'मच्छींद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनीप्रति, गहीनीप्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले' अशी परंपरा ज्ञानेश्वरमाऊली सांगतात. ती परंपरा जनाबाईंनी अंगी मुरवून घेतली होती. म्हणून तर त्यांनी गोरक्षनाथांचा प्रसिद्ध पाळणा त्या लिहू शकल्या. त्यासाठी जनाबाई योग शिकून योगिनी बनल्या. कुंडलिनी शक्तीसारख्या योगाच्या शिखरावर त्या पोहोचल्या, पण तिथं फार काळ रमल्या नाहीत. 
'दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू' म्हणत त्या सर्वसामान्यांना समजणाऱ्या वारकरी पंथात पुन्हा रममाण झाल्या. नाथपंथाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात वारकरी पंथाला वाट दाखवणाऱ्या निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, विसोबा खेचर या विभूतींच्या त्या कायम संपर्कात राहिल्या, या समन्वयाचा नामदेवांच्या विस्तारकार्याला खूप उपयोग झाला.
ज्ञानदेवांच्या संगतीत तर जनाबाईंचं आयुष्य झळाळून गेलं. ज्ञान आणि नामभक्तीचा संगम जनाबाईंनी घडवला. विश्वबंधुतेचं पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांप्रमाणे जनाबाई
आपल्या एका अभंगात 'झाले सोयरे त्रिभुवन' अशी ग्वाही देतात. संपूर्ण विश्वाशी 'सोईरपण' जोडण्याची जनाबाई ही इच्छा कालातीत आहे. या ज्ञानांचा देव असणाऱ्या ज्ञानदेवांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी इच्छा जनाबाई एका अभंगात व्यक्त करतात. 'रिंगण'च्या याच अंकात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत प्रतिमा जोशी या इच्छेचं विश्लेषण करतात. म्हणजे असा ज्ञानवंत आमच्या म्हणजे वंचित, उपेक्षितांच्या, दलितांच्या घरात जन्माला यावा, जो आमचा उद्धार करेल. त्यानंतर सातशे वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले! प्रतिमाताईंचं हे विश्लेषण नवी दृष्टी देणारं आहे. संतांच्या कार्याचं महत्त्व सांगणारं आहे. पूर्वजन्मांच्या कथाही आपल्याला याच दृष्टीकोनातून समजून घेता येतील.

ज्ञानदेवादी जातीच्या ब्राम्हण भावंडांशी जनाबाईंचं जेवढं सख्य आहे, तेवढाच लळा त्यांनी इतर बहुजन संतांना लावला आहे. या सर्व संतांना कडेखांद्यावर घेतल्याचं 'विठु माझा लेकुरवाळा' असं लोभस आणि वारकरी संप्रदायाचं सार सांगणारं चित्र जनाबाईंनीच रेखाटलं आहे. शैव-वैष्णवांचा वाद मिटवण्यातही जनाबाईंनी पुढाकार घेतला आहे.
त्या काळात सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैताच्या भिंती उंच झाल्या होत्या. त्या भिंती जमीनदोस्त करून, परस्परविरोधाचं साचलेलं मळभ दूर करून विठ्ठलभक्तीचं सर्वांना सामावून घेणारं स्वच्छ मोकळं आभाळ जनाबाईंनीच दाखवलं. या शूद्र, दासी महिलेला आणि तिच्या सगुण सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी निर्गुणोपासक संत कबीर काशीहून पंढरपुरात आले. जनाबाईंना भेटल्यानंतर जनी म्हणजेच 'काशी' असल्याचे साक्षात्कारी बोलले. नामदेव-जनाबाईंनी त्यांना विठोबाला भेटवलं. चंद्रभागेच्या वाळवंटात नेलं. ज्याच्या आईवडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपुरात आले, त्या पुंडलिकाचं दर्शन घडवलं. सर्व संतमेळ्याची ओळख करून दिली. वारकरी विचारांचा अत्युच्च अविष्कार असणाऱ्या नामदेवांच्या कीर्तनाची अनुभूती दिली. यानंतर कबीर वारकरीच होऊन गेले. काशीहून त्यांची दिंडी पंढरपूरला नियमित येऊ लागली. ऐक्याचा हा ओघ अखंड वाहत राहिला. 

इंद्रायणीकाठच्या तुकोबारायांना तब्बल  चारशे वर्षांनी या सगुण-निर्गुण ऐक्याचा साक्षात्कार झाला. 'सगुण निर्गुण एकु गोविंदु रे' असा निर्वाळा त्यांनी दिला. वारकरी विचारांच्या नाळेनं संत कसे जोडले गेले होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'नामदेव-जनाबाई' आणि 'तुकाराम-बहिणाबाई' हे नातं. वाल्मिकींप्रमाणे शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या संत नामदेवांचे अभंग अपुरेच राहिले. ते पुढं तुकाराममहाराजांनी पूर्ण केले. त्याबाबत 'संत नामदेवच आपल्या स्वप्नात आले. सोबत पांडुरंग होते. त्यांनीच अभंग लिहिण्यास आपल्याला सुचवलं', असं एका अभंगात तुकाराममहाराज सांगतात. यावेळी नामदेव आणि देवासोबत संत जनाबाईही असल्या पाहिजेत. कारण वारकरी संप्रदायाचा पाया रचताना आणि त्याचा विस्तार करताना जनाबाई त्यांच्या अखंड सोबत होत्या. पुढं या वारकरी विचारांवर 'कळस' चढवणाऱ्या तुकोबारायांसोबत 'फडकती ध्वजा' बनून संत बहिणाबाई उभ्या होत्या. 'ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस' या अभंगात हे चित्र लख्खपणे दिसलं आहे. जनाबाई नसत्या तर नामदेवांच्या वारकरी विचारांचा विस्तार होणं कठीण होतं आणि संत बहिणाबाई नसत्या तर इंद्रायणीच्या डोहातून तुकोबांचे बुडविलेले अभंग वर आले नसते! नामदेव-तुकोबांप्रमाणंच जनाई-बहिनाईचं नातं होतं. 
वारकऱयांची समता ही बौद्ध परंपरेतून आल्याचं भान या दोघींना होतं. म्हणून तर 'आता बौद्ध झाला सखा माझा' असं जनाबाई म्हणतात, तर 'कलियुगी बौद्धरुप धरी हरी। तुकोबा शरिरी प्रवेशला।।' असं संत बहिणाबाई सांगतात. बहिणाबाई तर बौद्ध विचारवंत अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अनुवाद बहिणाबाई करतात. संत नामदेव आणि संत जनाबाईंच्या अभंगांचा मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगांवर पडलेला दिसतो. पक्षी, कुत्रा, मांजर काहीही कर पण आम्हाला पुन्हा जन्म दे, असं संत जनाबाई म्हणतात. तर त्याच प्रकारे मोक्ष नाकारताना 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' असं तुकाराम महाराज म्हणतात. 'नाठाळाच्या माथी' सोटा हाणायला निघालेले तुकोबा पाहिले की, अंगणात उभे राहून थेट देवाला शिव्या घालणाऱ्या जनाबाई दिसतात. 
वृक्ष लागले अंबरी। डोलतात नानापरी।।
फणस कर्दळी गंभेरी। आंबे नारळ खर्जुरी।।...असं निसर्गाचं, वृक्षवेलींचं जनाबाईंनी केलेलं मनोहारी वर्णनाचं प्रतिबिंब तुकोबारायांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरें...' या अभंगात पडलेलं दिसतं. संत जनाबाईंच्या कवितेची दाट सावली 'जन खेळकर' करणाऱ्या संत एकनाथांच्या रचनांवरही पडली. 'माझे अचडे बछडे। छकुडे गं राधे रुपडे।।...' अशी अंगाईगीतासारखी जनाबाईंची अभंगशैली नाथमहाराजांनी अनेक अभंगांमध्ये वापरली. तर
'खंडेराया तुज करिते नवसू। मरूं दे रे सासू खंडेराया।।...'
या जनाबाईंच्या रचनेसारख्या भारुडरचना एकनाथांनी विपुल केल्या. त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, आपली समीक्षकाची भूमिका बजावताना जनाबाईंनी ज्ञानेश्वरीवरही भाष्य केलं. त्या काळात संतांच्या काव्यात आपलं काव्य घुसडण्याचा अश्लाघ्य प्रकार सुरू होता. किमान ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत तरी असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना     
गीतेवरील आन टीका। त्यांनीं वाढीयेली लोकां।।
रत्नकटक ताटामाजीं। त्यानें ओगारिलें कांजी।। असं जनबाईंनी म्हटलं.
म्हणजे कुणी ज्ञानेश्वरीत प्रक्षेप करण्याचा  प्रयत्न केला तर त्याने 'रत्नजडीत सोन्याच्या ताटात कांजी ओतल्यासारखे' अभद्र वाटेल. जनाबाईंची हीच भूमिका पुढं संत एकनाथांनी निभावली. नंतरच्या काळात त्यांना ज्ञानेश्वरीतले प्रक्षेप काढून ज्ञानेश्वरी शुद्ध करावी लागली. त्यानंतर जनाबाईंच्याच शब्दात
ज्ञानेश्वरी पाठी। जो ओवी करेल मऱ्हाटी।।
तेणे रत्नखचिताचिया ताटी। जाण नरोटी ठेविली।।
असं एकनाथमहाराज बजावतात. जनाबाईंचा प्रभाव असा वर्षानुवर्षे दिसत राहतो.
ज्ञानदेव सर्व संतांना आदरस्थानी. ज्ञानामृत पान्हावणाऱ्या या विश्वाच्या माऊलीला 'माऊली' असं नामदेव-जनाबाईंनीच पहिल्यांदा संबोधलं.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।।
असं नामदेव म्हणतात, तर 
मायेहूनि माय मानी। करी जिवाची ओंवाळणी।। असं जनाबाई माऊलींविषयी म्हणाल्या. संतांमध्येही भेद निर्माण करू पाहणाऱ्यांनी 'माऊली' या संबोधनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वारकऱ्यांना तो समजलाय. म्हणून तर ते परस्परांना 'माऊली' म्हणत एकमेकांच्या पायाशी वाकतात.
जनाबाईंनी सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत, भक्ती-ज्ञान, शैव्-वैष्णव, सवर्ण-शूद्र स्त्री-पुरुष, यांची यशस्वी सांगड घातली. हे सगळं करून जनाबाई रमल्या त्या खेडोपाड्यातल्या निरक्षर, कष्टकरी बायाबापड्यांमध्ये. ज्ञानदेवांना माऊली, विठ्ठलाला विठाबाई, पंढरीचे आई, अचडे बछडे म्हणणाऱ्या, गाईला गाऊली म्हणणाऱ्या, हरिणी-पाडसाची आणि गाय-वासराच्या प्रतिमा वापरत पंढरपूरला माहेर संबोधणाऱ्या जनाबाईंचं गाणं मऱ्हाटमोळ्या भोळ्या महिलांना फार फार आवडतं. जनाबाईंचे स्वानंदाचे डोल ऐकताना
जशी मोहोळाशी लुब्ध माशी। तशी तूं सखी माझी होसी।।
सुख दु:ख सांगेन तुजपाशी। माझा जीव होईल खुषी।। अशी जनाबाईंप्रमाणेच त्यांची अवस्था होते.
आपल्याला काम करु लागणाऱ्या देवाचं अत्यंत लोभस चित्र जनाबाईंनी अभंगांतून रेखाटलं आहे. जनाबाईंना झाडलोट करू लागणारा, गोवऱ्या वेचू लागणारा, सडा सारवण करू लागणारा, चारी हातांनी जनाबाईंचं धुणं धुवून टाकणारा, साळी कांडून देणारा, तुळशीच्या वनात डोईला लोणी लावून देणारा, अंघोळीसाठी पाणी आणून देणारा, वेणी घालून देणारा विठुराया जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो.

अशी अलवार अभंगरचना करणाऱ्या जनाबाईंचे शब्द प्रसंगी पेटते पलिते होऊन येतात. मग त्या नामदेवाला आणि प्रत्यक्ष देवालाही सोडत नाहीत.
राजाई, गोणाई। अखंडित तुझ्या पायी।।
मज ठेवियले द्वारी। नीच म्हणोनि बाहेरी।।
अशी त्यांना सांभाळणाऱ्या नामदेव कुटुंबाची अब्रू त्या वेशीवर टांगतात. तर अंगणात उभे राहून
अरे अरे विठ्या।... तुझी रांड रंडकी झाली।।
तुझे गेले मढे। तुला पाहूनि काळ रडे।।
अशा विठोबाला कचाकचा शिव्या घालते.

देवाचं पदक चोरल्याचा प्रसंग हा जनाबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. चोरीचं केवळ निमित्त होतं. खरा राग होता तो हा की, या जनाबाईंनी देव आणि भक्त यांच्यातली दलाल आणि दलाली संपविली होती. जनाबाईंनी देवाचं अप्राप्य असं देवपण घालवून त्याला माणसात आणून बसवलं. त्याला श्रमजिवी केलं. त्याला अंगणात उभं राहून शिव्या घातल्या. तरीही तो मुकाट्यानं जनाबाईंच्या मागोमाग फिरत राहिला. त्यामुळं कष्टकरी जनतेला हा देव आपला वाटला. शिवाय आईवडिलांना न सांभाळणारे, सज्जनांची निंदा करणारे, विद्येचा गर्व करणारे, स्त्रीलंपट लोकच मग ते उच्चवर्गीय असले तरी शूद्रच, असा उपदेश जनाबाई करू लागल्या. 
जनाबाईंनी देव सोपा करून ठेवल्यानं, त्याला रोजच्या जगण्यात आणून ठेवल्यानं देवाच्या दलालांची दुकानं बंद झाली. त्यातून त्यांनी जनाबाईंच्याच अभंगांचा आधार घेऊन जनाबाईंवर देवाच्या गळ्यातलं किंमती पदक चोरल्याचा आरोप ठेवला. जनाबाईंना मारहाणही करण्यात आली. 'धाविन्नले चाळीस गडी जनीवरी पडली उडी...' असं जनाबाई त्या प्रसंगाचं वर्णन करतात. अर्थात त्यातूनही जनाबाई हिकमतीनं स्वत:ला वाचवतात. बहुदा या प्रसंगातून संत नामदेव अंग काढून घेतात आणि देव गप्प बसतो. त्यामुळं जनाबाई संतापतात. पुढचे काही अभंग मग 'नामयाची दासी' अशी नाममुद्रा वाचायला मिळत नाही. अर्थात पदकाच्या चोरीची शिक्षा म्हणून सुळावर जातानाही त्या देवाकडं 'माझ्या नामदेवाला सांभाळ' अशी प्रार्थना जनाबाई करत होत्या. 

आपली चळवळ पुढं नेताना सर्व संतांनी अभंगलेखन हे जीवितकार्य मानलं. प्रसंगी लेखनिक घेऊन ते अभंग लिहित राहिले. जनाबाईंच्याच एका अभंगानुसार
बहुजन समाजातील सर्व संताना कुणी ना कुणी 'लेखकु' मिळाला. जनाबाईंचे अभंग मात्र प्रत्यक्ष देवानंच लिहिले. याचा अर्थ जनाबाईंनी त्यांचे अभंग स्वत: लिहून काढले. एवढं त्या नीट लिहू, वाचू शकत होत्या. ज्ञानदेवांनीही थोरवी गावी एवढा त्यांचा अभ्यास, चिंतन होतं.
तत्कालीन संतांना प्रेरणा देणाऱ्या जनाबाई आधुनिक मराठी कथा, कांदबऱ्या कवितांमध्येही झिरपल्यात. खान्देशकन्या बहिणाबाईंच्या घरोट्यातून 'अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' असे जनाबाईंचेच शब्द बाहेर पडतात.
'मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो'
असे शिव्या देणारे नामदेव ढसाळ देवालाही शिव्या घालणाऱ्या जनाबाईंचे खापर नातूच!
'कोसला'तील पांडुरंग सांगवीकर बहिणीच्या मृत्यूनंतर 'तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशयही गेलं...' असं म्हणतो तेव्हा 'मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे...' हा जनाबाईंचा अभंग हटकून आठवतो. तर त्यांच्याच कवितेतील 'विठू चिकटला पारंबिला' वाचताना जनाबाईंच्या अभंगातील 'विठो वटावरि पारंबिया जाले' ही ओळ आठवते. परभणीचे कवी इंद्रजित भालेराव त्यांच्या 'वेचलेल्या कविता'संग्रहात 'उभी होती बाजारात। जनी माझी हजारात' असं म्हणतात तेव्हा इथल्या मातीत झिरपलेल्या जनाबाईंच्या प्रतिभेचे निर्मळ झरे मराठीत वाहू लागल्याची खात्री पटते.
आजही मराठी माणूस साडेसातशे वर्षांपूर्वीच्या जनाबाईंचीच भाषा बोलतो. या भाषेत ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा खरपूसपण आहे. आंबेमोहेर भाताचा मत्त सुवास आहे, वऱ्हाडी ठसका आहे, कोल्हापुरी तिखटजाळ आहे.
ये गं ये गं विठाबाई। माझे पंढरीचे आई।।
किंवा 
नामदेवा पुत्र झाला। विठो बारशासी आला।।
अंगडे टोपडे पेहरण। शेला मुंडासे घेऊन।।
जनाबाईंची हीच भाषा महाराष्ट्राची प्रमाणभाषा. ती महाराष्ट्रात वर्‍हाड, खान्देष, कोकणात सर्वत्र समजते. बोलली जाते.

जनसामान्यांना खरा देव, धर्म दाखवण्यासाठी अहोरात्र धडपडणार्‍या नामदेवांना देवाच्या दलालांनी अपार छळलं होतं. ''माशांची घोंगाणी, जनांची निंदणी। सोशी नामदेव अंत:करणी।।'' असं जनाबाई म्हणतात. तर खुद्द नामदेव ''तुझा माझा देवा का रे वैराकार। दु:खाचे डोंगर दाखविसी।। या अभंगात शेवटी "नामा म्हणे देवा करा माझी कीव। नाही तरी जीव घ्यावा माझा।।" असं म्हणतात. अशी खरं तर ढेपाळून जाण्याची परिस्थिती. पण नामदेव कुटुंबातली ही खमकी आत्या हे सगळं सावरते. 'तू इकडची चिंता करू नकोस मी समर्थ आहे,' असं उत्तरेत निघालेल्या नामदेवांना सांगत कमरेला पदर खोचून उभी राहते. चोखामेऴा कुटुंब, सावता माळी, नरहरी सोनार आदी बहुजन समाजातील संतांना आधार देते. शूद्रातिशूद्रांना आत्मभान देण्याचं आपलं उद्दीष्ट संत नामदेव उत्तर भारतात सर करतात. अठरापगड जातींमधून संत घडवतात. त्यांना आत्मभान देतात, वारकरी चळवळीचा डोलारा सांभाळतात, हे सारं अविश्वनीय आहे. अशा कर्तृत्ववान जनाबाईंची कथा, इतिहास स्वतंत्र आहे. तो उलगडण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाही. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कदाचित तो सापडेलही, पण तो शोधण्यात इतिहासकारांना स्वारस्य नाही आणि अनुयायांना 'पोथी'पलिकडं पाहायचं नाही.

इतरांविषयी लिहिणाऱ्या जनाबाईंविषयी कोणीही खुद्द नामदेवांनीही लिहून ठेवलेलं नाही. मधल्या काळात महिपतीबुवा ताहराबादकरांनी भक्तिविजय ग्रंथात जनाबाईंविषयी लिहिलं ते, नामदेवांच्या चरित्राचा एक भाग म्हणून. पण त्यामुळं एक झालं, जनाबाई सर्वांपर्यंत पोहोचल्या. नाही तर जनाबाईंचे उपलब्ध अभंग हेच त्यांचं चरित्र, हीच त्यांची ओळख. अर्थात ८७ वर्षे जगलेल्या जनाबाई फक्त ३४८ अभंग लिहितील असं वाटत नाही. बहुतेक अभंग काळाच्या उदरात गडप झालेत. डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी पीएच. डी. करताना जनाबाईंचे ४३ अभंग आणि १० ओव्या उजेडात आणल्या. बाकी आनंद आहे. अजूनही जनाबाईंच्या अभंगांची स्वतंत्र गाथा नाही. संस्कृती टिकवण्याचा ठेका घेतलेल्यांना, आपल्या पाच दहा चिल्लर कवितांचं पुस्तक छापण्याचा अट्ट्हास करणाऱ्या भरल्या पोटाच्या कोणाही प्राध्यापकाला किंवा आधुनिक कवीला जनाबाईंचा गाथा स्वतंत्रपणे छापावा वाटलेलं नाही. नाही म्हणायला 'स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास' असं जनाबाईंनी सांगितलं म्हणून स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो नामदेव आणि जनाबाई यांचा संबंध  जनाबाईंची लैंगिक मनोवस्था यांच्यावरच थांबला!

आता काळ बदलला. महिला शिकल्या. मोठमोठी पदं भूषवू लागल्या. कारभार सांभाळू लागल्या. मायबाप सरकारच्या कृपेमुळं घर आणि रेशनकार्ड नावावर झाल्यानं कागदोपत्री का होईना महिला कुटुंबप्रमुख झाल्या. दुसरीकडं बडव्यांच्या तावडीतून विठोबा मुक्त झाला. देवाला महिला पुजारीही मिळाल्या. त्याच वेळी जनाबाईंनी आत्मभान दिलेल्या मायमाऊल्यांना विठोबाच्या आणि संत ज्ञानदेव-तुकोबांच्या मंदिरात कीर्तन-प्रवचन करू दिलं जात नाही. ज्ञानदेवांच्या अजानवृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचू दिली जात नाही. बहुदा त्यासाठी आता पुन्हा जनाबाईंना जन्म घ्यावा लागेल. मग त्या अंगणात उभं राहून या झारीतल्या शुक्राचार्यांना, धर्मठकांना कचकचीत शिव्या घालतील. त्यांची रांड रंडकी करतील. त्यांचे मढे बाहेर काढतील!
असं रणचंडीचं रूप धारण करण्याआधी
गाणं गाणाऱ्या जनाबाई खूपदा गूढ हसतात.
यातिहीन चोखामेळा। त्यासी भक्तांचा कळवळा।।...
देव बाटविला त्याणे। हांसे जनी गाय गाणें।।
बहुदा संतांचा वारसा सांगत आम्ही असे दुटप्पी वागतो; तेव्हा जनाबाई अशा गूढ हसतात.

आता नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला गेलं की, दचकायला होतं. त्या दगडी पायरीआडून जनाबाई आपल्याकडं पाहून  हसत आहेत, असं वाटत राहातं.

मानवतेचं गाणं

'रिंगण'चा पहिला म्हणजे संत नामदेव विशेषांक प्रसिद्ध झाल्यावर दुसरा अंक काढणार होतो, त्यांचे लाडके शिष्य संत चोखामेळा यांच्यावर. पण जगाप्रमाणं आमचंही त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं. त्यांच्या अंकासाठी पैसे नाहीत, हे कारण घेऊन त्या वर्षी आम्ही अंकच काढू शकलो नाही. चोखोबाराया, माफ करा म्हणालो. दुसर्‍या वर्षी मात्र आम्ही निर्धार केला आणि संत चोखोबा आमच्या रिंगणात आले. मराठी समाजजीवनात आणि साहित्यात चमत्कार किंवा दंतकथा वाटावी असं चोखोबा आणि त्यांचं कुटुंब. त्यांच्याविषयी 'रिंगण'मध्ये मी लिहिलेला हा लेख...


तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपुरात संत चोखामेळ्याचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरुप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. दुर्देवानं आपल्याला त्यांचं मोठंपण कधीच कळलं नाही. जातीपातींच्या आणि धार्मिक चौकटींच्या बाहेर येऊन आपण त्यांचं दर्शन घेतलंच नाही. आजही ते घेतलं तर आपण मानवी इतिहास नोंदले जाऊ...    

पाऊस दरवर्षी ओढ देतो. चैत्र, वैशाखापासूनच टंचाईच्या झळांना सुरुवात होते. संपत आलेल्या चार्‍याकडं बघत गुरं हंबरत असता. आषाढी वारीला जाण्यापूर्वी चार्‍याच्या बेगमीसाठी वडील पंचक्रोशीत फिरतात. ण प्रत्येकाला आपापली काळजी. अशा वेळी वरच्या मळ्यातले बाळनाना हमखास मदतीला येतात. भोळाभाबडा शेतकरी, पण पोटात माया. एकदा म्हणाले, बुवा आता "…आणखी नका पडू गबाळाचे भरी..." वडील चमकतात. त्यावर बाळनाना हसून म्हणतात, अहो तुमच्याच भजना-कीर्तनात ऐकलंय...
लहानपणीचा हा प्रसंग मला काही दिवसांपूर्वी संत सोयराबाईचे अभंग वाचताना आठवला.
आणिक नका पडू गबाळाचे भरी।
म्हणतसे महारी चोखियाची।।
मी थरारूनच गेलो. प्रस्थापित साहित्यात कधीही न दिसलेलं या दलित महिला संताचं अर्थात संत सोयराबाईचं हे शब्दधन खेड्यातल्या एका निरक्षर शेतकर्‍यानं कसं जपून ठेवलं असेल? शिवाय वेळप्रसंगी ते चपखलपणानं वापरावं, याचं भान त्याला कुणी दिलं असेल?
सुमारे ७०० वर्षांपूर्वी गावकुसाबाहेरच्या अस्पृश्यांच्या वस्तीत राहणार्‍या, नवर्‍यासोबत महारकीची, मोलमजुरीची मिळेल ती कामं करणार्‍या, शिळा भाकरतुकडा खाऊन राबराब राबणार्‍या, जुनेर नेसून फाटका संसार ओढणार्‍या या माऊलीनं कसे लिहिले असतील एवढे नितांतसुंदर, अर्थगर्भ अभंग?
...आणि सार्‍या गावाला 'जी जी', 'जोहार माय बाप' म्हणणारा, त्यांची पडेल ती कामं करणारा, मेलेली गुरं ओढणारा, त्यातून सवड मिळेल तेव्हा पत्नीला लिहायला, वाचायला शिकवणारा, स्वत:च्या कर्तृत्वानं संतपदाला पोहोचलेला सोयराबाईचा पती चोखामेळा.

संत चोखोबा आणि सोयराबाई हे संत दांपत्य म्हणजे भारतीय समाजातील एक सांस्कृतिक चमत्कारच. ज्यांना महार जातीचे, अस्पृश्य म्हणून समाजानं अत्यंत हीन, अमानवी वागणूक दिली त्याच समाजाचं भलं चिंतणारे अभंग या उभयतांनी लिहिले. त्यांच्या जन्म मृत्यूची नेमकी नोंद, नावा-गावाचा वास्तव इतिहास अजूनही सापडत नाही. तो नोंदवून, जपून तरी कोण ठेवणार होतं? तरी हे उभयता टिकले. तब्बल सातशे वर्षे टिकले. ते केवळ त्यांच्या प्रतिभेवर, शब्दसामर्थ्यावर, अभंगावर! कुटुंबप्रमुख म्हणून चोखोबाच्या नावा-गावाची, जन्ममृत्यूची काही का होईना नोंद सापडते. सोयराबाईंची तर तीही नाही.
काहींच्या मते बुलडाण्यातील मेहुणपुरा गाव चोखोबांचे जन्मस्थळ, काही म्हणतात पंढरपूर. तर अनेकजण म्हणतात, मंगळवेढ्यातच चोखोबांचा जन्म झाला. प्रा. देविदास इथापे यांच्या मते १४ जानेवारी १२६८, शके ११९० ही चोखोबांची जन्मतारीख आहे. चोखोबांच्या आईचे नाव सावित्रीबाई तर वडील सुदामा येसकर. चोखोबांच्या बहिणीचे नाव निर्मळा, मेहुण्याचे नाव बंका आणि मुलगा कर्ममेळा. त्यांच्या आणि इतर समकालीन संतांच्या अभंगांमधूनच या सर्वांची आपल्याला ओळख होते. सध्या संत चोखामेळा यांचे ३५८, सोयराबाईचे ६२, कर्ममेळाचे २७, बंका यांचे ४१, तर निर्मळाचे २४ अभंग उपलब्ध आहेत. चोखोबांच्या काळात त्यांचे संतसांगाती होते, निवृत्तीनाथ, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी, नरहरी सोनार. या संतांच्या संगतीतच चोखोबांची प्रतिभा बहरली.
चोखोबांच्या मृत्यूची तारीख मात्र सर्वमान्य असल्याचे दिसते. मंगळवेढे येथे गावकुसू कोसळून त्याखाली काम करणार्‍या चोखोबांचा मृत्यू गुरुवारी वैशाख वद्य पंचमी, शके १२६० रोजी झाला.

चोखोबा कुटुंबाचं मुक्कामाचं कायमस्वरुपीचं ठिकाण, पोटापाण्याचा उद्योग नातेवाईक, याबद्दल ठोस माहिती मिळत नाही. विशेष म्हणजे त्याविषयी फारसं संशोधनही होताना दिसत नाही. चोखोबाचं बुलडाण्यातील कथित जन्मस्थळ मेहुणपुरा, मुक्कामस्थळ मंगळवेढा आणि कर्मस्थळ पंढरपूर या तीन ठिकाणी हे थोर संत कुटुंब आपलं ऐतिहासिक आयुष्य जगलं. या तीनही ठिकाणांशी त्यांचं जीवाभावाचं नातं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते चोखोबा वर्‍हाडातील आहेत. चोखोबांचे चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या मते चोखोबा पंढरपूरचे आहेत.
मेहुणपुरामध्ये चोखोबा कटुंबाच्या स्मृतीखुणा पाहायला मिळतात. चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका याच गावात राहत. मेहुणपुराशी असलेलं नातं सोयराबाईच्या अभंगांतून उलगडतं.
झाली निर्मळेची भेटी। सोयरा पायी घाली मिठी।।
धन्य बाई मेहुणपुरी। म्हणे चोख्याची महारी।।
या नणंद भावजया एकमेकीच्या तेला-मीठा-पीठाला, सुख-दु:खाला आधार असणार हे दोघींच्याही अभंगांमधून जाणवत राहतं. बाकी त्यांच्या नात्याविषयी लोकप्रिय आख्यायिकाही प्रचलित आहेत. कर्ममेळ्याच्या वेळी सोयराबाईच्या पोटात दुखत असताना चोखोबा मदतीसाठी निर्मळेकडेच गेल्याचा उल्लेख आहे. चोखोबा निर्मळेला घेऊन लवकर येत नाही म्हणून देवच निर्मळेचं रुप घेऊन सोयराबाईचं बाळंतपण करतो, अशीही कथा प्रचलित आहे.


मेहुणपुर्‍यात चोखोबांचं जन्मस्थळ, बंका आणि निर्मळेची समाधी पाहायला मिळते. या गावात दरवर्षी १४ जानेवारी रोजी चोखोबांचा जन्मोत्सवही साजरा केला जातो.
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा गावाचा उल्लेख आला की, पाठोपाठ संत चोखामेळा यांचं नाव येतं. एवढं त्यांचं मंगळवेढ्याशी नातं घट्ट आहे. मेहुणपुर्‍याहून चोखोबा कुटुंब मंगळवेढ्याला कधी आणि का आलं, याविषयी काही संदर्भ सापडत नाही. एक मात्र नक्की तत्कालीन समृद्धी, रोजगाराची सोय आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य जपणार्‍या या गावात राहणं चोखोबांना अधिक सोयीचं वाटलं असणार. मंगळवेढ्याला संतांच्या सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. वैदिक, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, लिंगायत, महानुभव, सूफी असे सर्व धर्म, पंथ मंगळवेढ्यात बहरले, नांदले. परिसरावर या संतविचारांचा मोठा प्रभाव पडला. स्त्री-शूद्रांना अधिकार देणार्‍या बसवेश्वरांच्या लिंगायच पंथांचं तर मंगळवेढा ठाणंच होतं. बसवेश्वरांच्या शिकवणुकीचीच उर्जा चोखामेळा कुटुंबाला मुख्यत: सोयराबाई आणि निर्मळेला मिळाली. मंगळवेढ्यातील विविध पंथांच्या विचारसरणीचं प्रतिबिंब चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अभंगात पडलेलं दिसतं. या काळात सूफी संतांचा मोठा वावर या परिसरात होता. जवळच्या विजापुरात सूफी संतपीठ स्थापन झालं होतं. चोखोबा आणि सोयराबाईच्या अभंगात अरबी आणि फारसी शब्द विपुल प्रमाणात आढण्याचं कारण हेच असावं. 
आणिक नका पडू गबाळाचे भरी। म्हणतसे महारी चोखियाची।। या सुरुवातीला उल्लेख केलेल्या अभंगातील गबाळ (घैब या फारशी शब्दापासून- घैब-गाईब-गायब-गबाळ) या शब्दाचा अर्थ निरुपयोगी किंवा अव्यवस्थित असा आहे. चोखोबांच्या अभंगाlत तर फार्सी शब्द खूपदा येतात. उदा.
मी विठोबारायाचा महार। हिशोब देतो तारोतार।।
लंबे बाकीचा कारभार। मज नफराचे शिरी।।
अशी सर्व धर्म, पंथांना सुखानं सामावून घेणारी मंगळवेढ्याची भूमी. ज्ञानोबामाऊली म्हणतात, 'कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव'...मंगळवेढ्यात रुजलेल्या चोखामेळा कुटुंबाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. अर्थात तत्कालीन रुढींप्रमाणे या कुटुंबाला इथं अस्पृश्यतेचे तीव्र चटके बसले, हेही खरं.
   
चोखोबांच्या मंगळवेढ्याहून पंढरपूर अवघ्या १४ मैलांवर. अनेक दिंड्या मंगळवेढ्याहूनच पंढरपूरला जातात. वेगवेगळ्या उपासना पद्धती पाहिलेल्या चोखोबांना नाचत गात पंढरीला निघालेल्या वारकर्‍यांविषयी विशेष आपलेपण वाटलं असावं. त्यांच्यासोबतच कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटातील आषाढी-कार्तिकीचा समतेचा सोहळा त्यांनी अनिमिष नेत्रांनी पाहिला. इथंच त्यांची वारकर्‍यांची चळवळ उभारणार्‍या संत नामदेवांशी भेट झाली. अधिकारहीन जातींना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा चंग बांधलेल्या संत नामदेवांनी महार चोखोबाच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं तयार झालं. अर्थात हे नातं कसं होतं, त्याबद्दल चोखोबा म्हणतात,
चोखा म्हणे माझा नामदेव प्राण।
घालीन लोटांगण जीवें भावे।।
नामदेवही काही चोखोबाशी गुरुच्या तोर्‍यात वागले नाहीत. उलट
चोखा माझा जीव। चोखा माझा भाव।।
कूळ, धर्म देव। चोखा माझा।।
एवढं उच्चतम स्थान त्यांनी चोखोबाला दिलं. त्यातून तत्कालीन समाजाला त्यांनी योग्य तो संदेश दिला. नामदेवांसोबतच्या ज्ञानदेवादी अनेक संतांचा चोखोबांना सहवास लाभला. त्यामुळं चोखोबाचं आयुष्यच बदलून गेलं. पंढरपुरात दाखल झालेल्या चोखोबा आणि सोयराबाईला सर्वाधिक जीव लावला तो नामदेवांच्या घरच्या दासी जनीने. संतमंडळीत जनाबाईचा अधिकार खूप मोठा होता.  
चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला।।
अशा शब्दांत तिने चोखोबाच्या भक्तीची ताकद जगाला सांगितली. चोखोबा आणि इतर संतांमध्ये संवाद घडवून दिला. त्यांच्यातील अनुभव, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून प्रयत्न केला. संतांना कडेखांद्यावर घेतलेल्या विठोबाचं जे चित्र जनाबाईनं रंगवलं आहे, त्यात देवाने चोखामेळ्याला आवर्जून बरोबर घेतल्याचं वर्णन जनाबाई करते. या अस्पृश्य संताच्या घरी देव काम करत असल्याचं, म्हणजे अगदी चोखामेळ्याला मेलेली ढोरेसुद्धा देव ओढू लागल्याचं जनाबाईनं लिहून ठेवलंय.
इतर समकालीन संतांनीही चोखोबाबद्दल लिहून ठेवलंय.


समाजातील भेदाभेद मिटवण्याच्या नामदेवांच्या खटाटोपाला बर्‍यापैकीच यश येत होतं. नामदेवांनी शैव आणि वैष्णवांमध्ये दिलजमाई घडवून आणल्याचं ठळक उदाहरण म्हणजे संत नरहरी सोनार. त्यानं थोर थोर संतांच्या मेळ्यात चोखोबा उभा असल्याचं वर्णन केलंय. तसंच चोखोबा महाद्वाराशी तिष्ठत उभा असे, याची साक्षही दिली आहे.
याशिवाय सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा यांच्या अभंगातून चोखामेळ्याचं दर्शन होतं. समकालीन संतांनंतर संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज तसेच मोरोपंत यांनी चोखोबांची थोरवी गायली आहे.
चोखोबाला मार्गदर्शक मानणारे मेहुणे बंका आपल्या अभंगातून चोखोबांचं मोठं सुंदर, निर्मळ वर्णन करतात.
चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा सुखाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साउली।।
यासोबतच चोखामेळ्याची आरती लिहून बंकामहाराजांनी चोखोबांना चिरंजीव करून ठेवलं आहे. नंतरच्या काळात
चोखोबाची भक्ती कैसी। प्रेमे आवडी देवासी।।
ढोरे ओढी त्याचे घरी। नीच काम सर्व करी।।
असे एकनाथ महाराज चोखोबांचे वर्णन करतात.
तर
चोखोबा माझा गणपती।
राधाई महारीण सरस्वती।
 असं तुकाराममहाराज पहिलं नमन चोखोबा आणि सोयराबाईला करतात.
समकालीन पंतकवी मोरोपंत म्हणतात,
गावा न मानावा चोखामेळा महार सामान्य।
ज्याच्या करि साधूचा चोखामेळा महार असामान्य।।
संत संताजी जगनाडे, महिपतीबुवा यांनीही चोखोबाची महती गायली आहे.

संतांच्या संगतीचे सुख लुटणार्‍या चोखोबाला मात्र त्यानं वर्णन केलेल्या भूवैकुंठात, पंढरपुरात अस्पृश्यतेचे जबर चटके, फटके सहन करावे लागले. नामदेवादी संतांनी समतेचा धर्म सांगणार्‍या ज्या विठोबाला शरण जा, असं चोखोबाला सांगितलं, त्या विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन सनातन्यांनी त्याला घेऊ दिलं नाही. विठुरायाच्या मुखदर्शनासाठी सदैव महाद्वाराशी तिष्ठत उभ्या असणार्‍या चोखोबाला सतत हाकलून देण्यात आलं. त्यानं पुन्हा येऊ नये म्हणून त्याच्यावर नाना आळ घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली. कधी विठोबाचा हार चोरला म्हणून, तर कधी स्पर्श करून देव बाटवला म्हणून त्याला अगदी बैलांना बांधून ओढण्याची शिक्षा देण्यात आली. या छळाचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन चोखोबांनी आपल्या अभंगातून केलंय.
धाव घाली विठू आता चालू नको मंद।
बडवे मज मारिती काय केला अपराध।।
विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला।
शिव्या देती मजला म्हणती देव बाटविला।।
शेवटी त्या दांडग्यांनी देवळापाशी घुटमळणार्‍या ओढाळ चोखाबाची उचलबांगडी करून त्याला नदीच्या पल्याड नेऊन सोडला. इथून हालायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली.
भरल्या डोळ्यांनी चोखोबांनी तिथूनच देवाला हात जोडले,
नेत्री अश्रूधारा उभा भीमातीरी।
लक्ष चरणावरी ठेवोनिया।।
का गा मोकलीले न येसी देवा।
काय मी केशवा चुकलोसे।।
असं स्वत:च्या अवस्थेचं वर्णन केलंय. मग चोखोबांनी इथं एक थोर गोष्ट केली. तिथल्या शेतातच झोपडी बांधून तिथं दगडी दीपमाळ उभारली. ही दीपमाळ म्हणजे, विरहाचं, बंडाचं, ज्ञानाचं, जागृतीचं, आत्मभानाचं प्रतिकच जणू. आषाढीला पंढरपूरला येणारी सर्व संतमंडळी मग चोखोबाला भेटायला त्याच्या या दीपमाळेच्या झोपडीत जाऊ लागली. खुद्द देवही त्या झोपडीत जाऊन जेवल्याची अख्यायिका आहे. या सर्व गोष्टींचा या जागेवर आता मागमूसही उरलेला नाही.
याच जागेवरून मंगळवेढ्याचं गावकूस बांधण्यासाठी त्याला जबरदस्तीनं नेण्यात आलं. काम सुरू असताना ते कूस कोसळून इतर मजुरांसोबत आपल्या या थोर संतकवीचंही निधन झालं. आयुष्यभर देवाजवळ स्थान मिळण्याची त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा त्याच्या मत्यूनंतर त्याच्या गुरूने, संत नामदेवांनी पूर्ण केली. मंगळवेढ्याहून चोखोबांची हाडं आणली. पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारात चोखोबा जिथं गहिवरून, हात जोडून उभा राहत असे, त्या ठिकाणी पुरली. तिथंच त्याची समाधीही बांधली.
   
आयुष्यभराच्या प्रतिकूल परिस्थितीत चोखोबांनी एक नित्यनेम मात्र सोडला नाही, तो म्हणजे अभंग लिहिणं. मग ते मंगळवेढ्यात गावकीचं काम करताना, ढोरं ओढताना असो, संतांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात असो की मंगळवेढ्याच्या गावकुसाचं काम करताना असो, चोखोबा आणि सोयराबाईची लेखणी थांबली नाही. म्हणून तर आज सर्व पाउलखुणा पुसल्या जाऊनही केवळ शब्दांच्या संजीवनीवर हे दांपत्य जिवंत आहे.
चोखोबांनी सध्या उपलब्ध असलेल्या अभंगांपेक्षाही अधिक अभंग लिहिले असावेत. कारण संशोधकांना अजूनही त्यांच्या अभंगांची हस्तलिखितं सापडत आहेत. चोखोबांनी विवेकदीप नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा उल्लेख आहे, मात्र तो अजून उपलब्ध झालेला नाही. तसंच सोयराबाईनेही कृष्णचरित्र नावाचं काव्य लिहिल्याचा उल्लेख येतो, पण तोही संशोधकांना सापडलेला नाही.

चोखामेळा कुटुंबाचा हा सारा प्रवास जिच्या जीवावर झाला किंबहुना चोखाबा संत म्हणून जिच्यामुळं नावारुपाला आले ती व्यक्ती म्हणजे चोखोबांची पत्नी संत सोयराबाई. कष्टप्रद आयुष्यात चोखोबाला पंढरीच्या विठुरायानं जगण्याचं बळ किती दिलं ते माहीत नाही; पण एक नक्की, सोयराबाईची भक्कम साथ असल्यामुळंच चोखोबा नाना प्रकारच्या छळवणुकीला तोंड देत उभे राहिले. लिहिते राहिले. दरिद्री संसाराचा गाडा ओढता ओढता सोयराबाई चोखोबांकडून लिहायला-वाचायला शिकली. चोखोबासोबत मजुरी करता करता अभंग लिहित राहिली. वारकरी पंथाची समतेची शिकवण सांगत राहिली. देवानं चोखोबा कुटुंबाला अडीअडचणीत मदत केल्याच्या अख्यायिकांमध्ये सोयराबाई प्रामुख्यानं आहे. देव सोयराबाईच्या हातचा दहीभात खातो. चोखोबाच्या झोपडीत सोयराबाईच्या हातचा स्वयंपाक जेवायला सर्व संतमेळा जमा होतो. त्या पंगतीत देवही जेवायला येतो. या कथा चोखोबासोबतच सोयराबाईचाही संतांमधील अधिकार सांगणार्‍या आहेत.

सर्व संतांच्या अभंगांत गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग आणि त्याहूनही गोड आहेत ते सोयराबाईनं लिहिलेले अभंग. आपल्याला सोयराबाईचे बहुदा दोनच अभंग परिचित असतात. एक म्हणजे, किशोरी अमोणकरांनी गायलेला ‘अवघा रंग एक झाला...’ आणि दुसरा पंडित भीमसेन जोशींनी पहाडी आवाजात गायलेला सुखाचे हे नाम आवडीने गावे। वाचे आळवावे विठोबासी।। हा अभंग. केवळ तत्त्वज्ञानात्मकच नाही तर, आपलं साधंभोळं जगणं आणि जगण्यातले बारीक-सारीक आनंदही सोयराबाईच्या अभंगांचे विषय बनले. अगदी नणंदेच्या प्रेमाचे, तिच्या घरी राहण्याचं सुखही सोयराबाई आपल्या अभंगात आनंदानं सांगते. नणंद निर्मळेच्या घरात अंघोळ करणे म्हणजे, कोटी कोटी वेळा प्रयागाला जाण्यासारखं आहे, असं ती म्हणते. त्यापुढं तिला गंगा, इंद्रायणी, न् चंद्रभागेचं स्नानही फिकं वाटतं. आनंददायी अभंग लिहिणार्‍या सोयराबाईनं रणरागिणीचा अवतार धारण केल्याचं खुद्द संत नामदेवांनी पाहिलं. त्यांनी ते अभंगात लिहून ठेवलंय. पंढरपुरात चोखोबाला मारहाण होताना शांत बसणार्‍या विठोबाला ती झणझणीत शब्दांत सुनावते.
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार।
दुबळीचा भ्रतार मारुं पाहसी।।
काढी हात आतां जाय परता उसण्या।
जाय पोटपोसण्या येथोनियां।।
देवाला अशा कडक शब्दांत सुनावणारी आपली आईच पुढं कर्ममेळ्याची प्रेरणा ठरली. चोखोबा अन्याय निमूटपणे सहन करत असताना सोयराबाईनं खमकी भूमिका घेतली. कर्ममेळ्यावर तसे संस्कार केले. म्हणून तर कर्ममेळ्यानं पुढं जाऊन   
आमुची केली हीन याती।
तुज कां न कळे श्रीपती।।
असा थेट सवाल देवालाच केला.

चोखा मेळ्यानं प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड केलं नाही. पूर्वजन्माचं पाप म्हणून आपण हीन जातीत जन्मालो,  आपण अत्यंत क्षुद्र, तुमच्या दारीचा कुतरा, असं म्हणत चोखोबानं वारंवार स्वत:कडे कमीपणा घेतला. इतरांना क्षणोक्षणी जोहार घातला. त्यांनी दुष्ट वागणूक दिली तरी नम्रतेनं त्यांना मायबाप म्हटलं. त्याविरोधात कधी विद्रोह केला नाही, म्हणून चोखोबा आणि त्याची पत्नी सोयराबाई हे प्रतिकच आम्हाला नको, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीनं घेतली. पण या विनम्रतेच्या राखेखाली विद्रोहाचे चटके देणारे निखारे दडले होते, याकडं विचारवंतांचंही दुर्लक्ष झालं. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ते ओळखलेलं होतं. म्हणून तर आपलं The Untouchables हे पुस्तक त्यांनी संत चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास या संतांना अर्पण केलं. 
आयुष्यभर विठोबाच्या दर्शनासाठी तळमळ करणार्‍या चोखोबाला मंदिरात जाऊ न देणार्‍या तत्कालीन मानसिकतेला आंबेडकरी भीमटोला बसणेच गरजेचंच होतं. तसा तो बसलाही. पण सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता चोखोबांचा व्यवस्थेविरोधातला एल्गार हा यत्किंचितही कमी नव्हता. देवाधर्मावर टीका करणे, त्यांची परखड चिकित्सा करणं यासाठी डॉ. आंबेडकरांनाही विरोध झाला. अजूनही त्याबाबत टोकाच्या भावना असतात. या पार्श्वभूमीवर चोखोबांनी त्या काळात लिहिलेले अभंग पाहावेत.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ।
पुराणे अमंगळ विटाळाची।।
जीवासी विटाळ शिवासी विटाळ।
काया अमंगळ विटाळाची।।
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ।
शंकरा विटाळ अमंगळ।।
जन्मतां विटाळ मरतां विटाळ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।
ब्रम्हा, विष्णू, महेशदेखील विटाळापासून वेगळे नाहीत, असं सोवळंओवळं पाळणार्‍या धर्ममार्तंडांना त्यांनी त्या काळात ठणकावलं.
सोयराबाई तर त्याही पुढे गेल्या,
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।
असे विटाळाचे अभंग लिहिले.
तत्कालीन धर्मठकांची या उभयतांनी चांगलीच उत्तरपूजा करून ठेवली. चोखोबा एका अभंगात म्हणतात,
धिक् तो आचार धिक् तो विचार।
धिक् तो संसार धिक् जन्म।।
धिक् ते पठण धिक् ते पुराण।
धिक् यज्ञ हवन केले तेणे।।
असा कर्मकांडाचा सरळ सरळ धिक्कार करणार्‍या चोखोबाचा तो मंदिराजवळ गेला नसता तरी छळ होणार होताच, हे उघड आहे. त्याने विठ्ठलमंदिरात जाण्याचा प्रयत्न करणं हे केवळ त्या छाळासाठी निमित्त ठरलं. अर्थात सध्याचा बडवेमुक्त विठुराया म्हणजे पहिल्यांदा चोखोबांनीच बडव्यांविरोधात पुकारलेल्या बंडाचं फळ आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. 
मारहाणीनंतरही चोखोबा त्या सनातन्यांच्या 'बा'लाही धूप घालत नाही. उलट
माकडाचे परि हालविती मान।
दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले।
बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग।
डोलविती अंग रंग नाही।।
असे त्यांच्या ढोंगाचे बुरखे टराटरा फाडतात. चोखोबा केवळ धर्ममार्तंडांbjवरच प्रहार करून थांबत नाहीत तर तत्कालीन यादव राजसत्तेचीही परखड चिकित्सा करतात.
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न।
एका न मिळे कोरान्न मागताचि।।
एकासी वैभव राज्याची पदवी।
एक गावोगावी भीक मागे।।
अशी सामाजिक विषमता निदर्शनास आणून देतात.


चोखोबा-सोयराबाईचा मुलगा कर्ममेळा या रोखठोकपणात या दोघांपेक्षाही सवाई निघाला.
जन्म गेला उष्टे खातां।
लाज न ये तमच्या चित्ता।।
हा कर्ममेळ्यानं देवाला केलेला हा सवाल लाखो दलितांच्या दबलेल्या भावनांना मिळालेला उदगार होता. आईबापाच्या काव्याच्या विनम्र राखेखालचे विद्रोहाचे लालबुंद निखारे कर्ममेळ्याच्या अभंगात धगधगू लागलेले दिसतात.
मुळात हे कुटुंब म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेतील एक चमत्कारच होता. अजूनही प्रतिकूल परिस्थितीत वैश्विक दर्जाचे काव्य लिहिणार्‍या या कुटुंबाकडं आपण पुरेसं लक्ष दिलेलं नाही. रात्रंदिवस गावकीचं पडेल ते काम करणारा हा महार संत स्वत: तर जिद्दीनं साक्षर झालाच पण त्यानं पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका यांनाही लिहायला वाचायला शिकवलं. अभंगांतून व्यक्त व्हायला शिकवलं. चोखोबाची ही कृती कालातीत होती.

तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात चोखोबांचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरुप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. त्यांच्या या कार्याला केवळ धार्मिक लेबल लावून बाद करणं हा मोठा कृतघ्नपणा ठरेल. चोखोबा म्हणजे संत नामदेवांनी लावलेल्या समतेच्या वृक्षाला आलेलं पहिलं फळ होतं, असं ठामपणानं म्हणता येतं. नामदेवांनी त्या काळी चंद्रभागेच्या वाळवंटात राबवलेला सोशल इंजीनिअरिंगच्या प्रयोगाला सर्वजातीय संतांच्या रुपानं यश मिळालं होतं. म्हणून तर ज्ञानदेवादी ब्राम्हण संत वाळवंटात चोखा मेळ्याची उराउरी भेट घेऊ शकत होते. चोखा मेळ्यानं आपल्या अभंगातून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची महती गायली, तर आपल्या कर्मठ ब्राम्हण वडिलांच्या विरोधाला न जुमानता कर्नाटकातल्या अनंतभट्ट नावाचा युवक चोखामेळ्याच्या अभंगांचा लेखक बनला. या अनंतभट्टामुळं तर चोखोबांचे हे अभंग आज आपल्याला वाचायला मिळतात.

परदेशाची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. पण हेच साहित्यिक कुटुंब युरोपातील एखाद्या प्रगत राष्ट्रात होऊन गेलं असतं तर, त्यांच्या स्मृती भव्यदिव्य स्वरुपात जतन करून ठेवल्या गेल्या असत्या. मेहुणपुरा, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी त्यांची यथोचित स्मारकं उभी राहिली असती. त्यांच्या नावाच्या संशोधन संस्था निघाल्या असत्या. महाराष्ट्राची खरी ओळख बनलेल्या, वारकरी कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करणाJdर्‍या या कुटुंबाचं एखाद भव्य शिल्प चंद्रभागातिरी उभं राहिलं असतं.
इथल्या सर्वच संतांचं दुर्दैव हे की ते ज्या जातीत जन्मले त्याच जातीत बांधले गेले. चोखोबाचं दुर्दैवं तर त्याहूनही अधिक. दलितमुक्तीच्या चळवळीत सामील झालेल्या त्याच्या जातीबांधवांना तर त्याचा उल्लेखही नकोसा वाटतो. दुसरीकडं आपली परंपरा समृद्ध करणार्‍या या संताच्या महाद्वारातील समाधीवरचं छप्पर तरी नीट करू, असं त्याच्या वारकरी संप्रदायाला अजूनही वाटलेलं नाही.