वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.
चैत्र-वैशाखी उन्हाच्या रणरणत्या लाह्या रानभर फुटत असतात. आभाळाकडं तोंड करून तापत पडलेल्या
रानाची तगमग-तगमग होत असते. एका दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गोल गोल फिरत आभाळात जातो. कुठल्याशा कोपऱ्यातून एकेक ढग जमा
होतो. त्यांचं क्षणात पांढऱ्यातून काळ्यात रुपांतर होत राहातं. चकीत होऊन पाहणाऱ्या रानाच्या
अंगाखांद्यावर टप् टप् करत वळवाचे टप्पोरे थेंब पडतात. त्या थंड स्पर्शानं रान शहारतं. धारा नेम धरून बरसू लागतात. बघता बघता ढेकळांचं लोणी होतं. शेता-बांधातून लाल-तांबडं पाणी खळाळू लागतं. झाडं झडझडून अंगावरचं पाणी झटकतात. अन् सृष्टी ताजीतवानी होऊन जाते...
हळू-हळू कड्या-कपारीच्या आडून पोपटी कोंब डोकावू लागतात. ज्येष्ठ-आषाढाची हिरवाई रानावर दिसू लागते. अशा वेळी या हिरव्या रानात दूरवर एक पांढरा ठिपका दिसतो. एका ठिपक्याचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे दहा ठिपके होत होत
ठिपक्यांची लांबच लांब रांग हळू हळू जवळ येते. टाळ-मृदुंगाचा आवाज मोठा होत जातो. कपारीआडून बाहेर डोकावू लागलेली कोवळी पानं टाळ्यांचा
ताल धरतात. मृदुंगाच्या धुमाळीवर रस्त्याकडेची झुडपं अंग घुसळू लागतात. ''वारी आली..माऊली आली..पालखी आली...'' वाटेवरच्या गावात चैतन्य जागतं. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला झुंबड उडते...