परवा धनतेरस न् काल लक्ष्मीपूजन झालं. दिवाळीचा संबंध असा धनाशी, समृद्धीशी. ऐश्वर्याचा उजेड घेऊन आनंदाची दिवाळी तुमच्याही अंगणात येवो, असे एसएमएस येतायत. त्यातला एक होता, ‘चला, शब्दांचं धन गोळा करूया...’
क्षणात तुकोबाराय डोळ्यापुढं उभे राहिले. पांढरी सुती पगडी, बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा...असे कधीही, कुठेही आठवतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, सकाळ, संध्याकाळी, रात्री अपरात्री, प्रवासात, सुखात, दु:खात, जिथं जातो तिथं माझे हे आजोबा सोबत असतात. ‘आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभे’ असतात.
अडचणीत काळंजून बसता, त्यांचे शब्द उजेड होऊन येतात. सोबत इंद्रायणीचा निर्मळ खळखळाट...
आम्हा घरी धन शब्दांची रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दें वाटू धन जनलोकां।। ...
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दें वाटू धन जनलोकां।। ...
जीवाला सुख कशा कशानं वाटलं, वाटतं हे जरा आठवून पाहावं.
जगाच्या कुठल्या भाषेत असलं धन असेल काय हो?