'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday, 6 October 2011

नाद खुळा!

लोकप्रभासाठी हा लेख लिहायचा होता, त्यापूर्वी पराग पाटलांशी बोलणं झालं. ते बैलाविषयी लिहिणार होते. पण त्यांच्याशी बोलताना मला बैलाबाबत काहीही आठवेना. त्यानंतर आज सकाळीच त्यांचा बैलोबा’ नावाचा लेख वाचला. (http://www.loksatta.com/lokprabha/20111014/desktop.htm) बैल माणसाच्या सोबत कधीपासून आहे, त्याचा धांडोळा घेतलाय त्यांनी त्यात.
लेख वाचत वाचत निम्म्यावर आलो. बिरबलाच्या गोष्टीजवळ. पुढच्या ओळी वाचता वाचता अचानक मन थरथरलं. अंगावर नकळत काटा फुलारला.
‘‘ आजच्या पिढीला बैलाच्या चमकदार त्वचेची थरथर, शेपटीने ढाळलेल्या चवऱ्या, वाशिंडाचा लयबद्ध बाक आणि गळ्याच्या त्वचेच्या मखमली लाटांचा अनुभव कसा मिळावा...’’ अशा त्या ओळी.
आपण बैलाच्या मानेजवळ बसलोत. त्याची गळ्याची पोळी खाजवून देतोय. तो हळू हळू अंगाला डोकं घासतोय. असं क्षणभर वाटलं. आणि त्यादिवशी बोलण्यात न आठवलेलं काय काय आठवलं.
बैल. गाण्याच्या चालीवर मोट ओढणारे. सरळ रेषेत नांगरट करणारे. खळ्यातल्या कणसांच्या ढिगातून गोल गोल फिरणारे. गळ्यातल्या घुंगुरमाळा वाजवत बैलगाडी पळवणारे. मांडवाच्या दारात न् दिवाळीत पणतीच्या उजेडात ओवाळून घेणारे. यात्रेत न् बैलपोळ्याच्या मिरवणुकीत भंडार उधळून घेणारे. मालकाची शीळ ऐकत ओहळाचं निव्वळशंख पाणी पिणारे. एकमेकांच्या शेजारी उभे राहून कुडुम कुडुम कडबा खाणारे. पुरणाची पोळी खाताना खरखरीत जीभेनं हात चाटणारे. आणि पुस्तक वाचण्यात दंग असताना कानाला मागून नाकाचा ओलसर स्पर्श करत उच्छवास सोडणारे. बैल.

यानिमित्तानं दोन गोष्टी आठवल्या. एक तुकोबारायांची. ते व्यवसायाने वाणी. मीठ नेण्यासाठी घाट ओलांडून येत. बैलांच्या पाठीवर मीठाच्या गोणी लादून देहूला घेऊन जात. घाटमाथ्यावर एक तुकाराम वृक्ष आहे. बहुदा तिथं ते विसावा घेत असणार. त्यामुळंच झाडाला त्यांचं नाव मिळालंय. माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. दमलेले बैल झाडाच्या सावलीत बसून रवंथ करतायत. शेजारी वीणा घेऊन बसलेले तुकोबाराय विठ्ठलच्या नामस्मरणात दंग झालेत...
दुसरी गोष्ट चंदूभाऊंनी सांगितलेली. म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे. रवींद्र नाट्यमंदिरात त्यांच्या आपुलाचि वाद आपणासि पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्यावेळी भाषणात त्यांनी सांगितलेली सांगितलेली सत्यकथा. शेतक-यासाठी वर्षभर राबणा-या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, बैलपोळा. विदर्भात त्याला विशेष महत्व आहे. 
काहीही करून शेतकरी हा सण साजरा करणारच. आपल्या बैलांना पुरणपोळी खाऊ घालणार. औत ओढून दुखावलेल्या त्यांच्या खांद्याला गरम हळद आणि लोणी लावणार. पण अलिकडच्या काही वर्षांत त्याला बैल सांभाळणंही कठीण होऊन बसणार. मग बैलपोळा कसा साजरा करणार? आपल्या लाडक्या बैलांसाठी तेवढंही करू शकत नाही. ही काय जिंदगी झाली? काय करायचं असं जगून?..म्हणून बैलपोळ्याच्या आधी काही दिवस शेतक-यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतं...
आपल्याकडं डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेटसारखे चॅनल्स किंवा तशीच मासिकं वगैरे कधी सुरू होतील कोणास ठाऊक? पण माणूस आणि प्राण्यांमधलं आपलं हे नातं जगाला वेडं लावेल हे नक्की...
असो.
बैलगाडा शर्यतीचा नाद खुळाया नावानं मी लिहिलेल्या लेखाची ही यावेळच्या लोकप्रभाचीकव्हरस्टोरी...

नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. गल्ल्या गल्ल्यांमध्ये गरबा घुमला. लाईटिंगच्या झगमगत्या माळांखाली डीजेच्या तालावर पोरंपोरी झुलली. नऊ रंगांच्या नऊ रात्री अशा झिंगत गेल्या. दहावा दिवस दस-याचा. झेंडूच्या केशर पिवळ्या रंगांचा. भल्या सकाळपासून निघालेलेल्या भगव्या शोभायात्रांमध्ये शहर रंगून गेलं. आता वेध दिवाळीचे. नव्या डिझाईनच्या, नव्या आकारांच्या रंगबिरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठा उजळून गेल्यात.

सेलिब्रेशनचे फुलबाजे असे वर्षभर उडत राहतात. सण समारंभ असोत की फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे. रोजच्या धावपळीतून, धबाडग्यातून विरंगुळ्याचे काही क्षण नकोत का? असा सवाल करत विकेन्डला फॅमिली घेऊन एखादा रिसॉर्ट गाठायचा. नाही तर मग सुट्टया पडल्यावर आहेच, आपला गाव. तिथल्या यात्रा खेत्रा. बैलगाड्याच्या शर्यती. त्याही गावरान सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायचं. एन्जॉय!

शर्यतींवरून आठवलं, चॅनेल्सवर परवा एक बातमी झळकली. राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी! या बातमीवर कोणतंही चॅनेल्स खेळलं वगैरे नाही. कारण त्यांच्या दृष्टीनं त्यात ब्रेकिंगअसं काही नव्हतं.


बंदीचा बडगा
बातमी अशी आहे की, बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं अध्यादेश काढलाय. आणि त्याची अमलबजावणी केलीय राज्यसरकारनं. यानुसार अस्वल, माकड, वाघ, चित्ता, सिंह आणि बैल या प्राण्यांचं प्रशिक्षण, प्रदर्शन करता येणार नाही. मुंबई हायकोर्टाच्या आदेशामुळं सरकारला या हालचाली कराव्या लागल्या. महाराष्ट्र सरकारनंही बैलांच्या शर्यती, त्यांचं प्रदर्शन तसंच खेळांवर बंदी घातलीय. खरं तर वरच्या जंगली प्राण्यांच्या यादीत बैल या पाळीव प्राण्याचा समावेश या ११ जुलैला करण्यात आलाय. या आदेशाला आधार आहे तो, १९६०चा प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याचा. त्यासाठी पुढाकार घेतला अहमदनगरच्या सोसायटी फॉर दी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल या संस्थेनं.
यापूर्वी १४ ऑगस्ट ९८ रोजी मनेका गांधींनी सर्कसमधल्या पाच प्राण्यांच्या प्रदर्शनावर बंदी घातली. तेव्हापासून हे प्राणी सर्कशीतून गायब झाले. या प्राण्यांमध्ये शर्यतीत पळणा-या बैलांचा समावेश व्हावा म्हणून नगरच्या सोसायटी फॉर दी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमलचे संस्थापक डॉ. कटारियांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यांची संस्था भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाशी जोडलेली आहे. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी याबाबत राष्ट्रपतींना पत्र पाठवलं. पर्यावरण मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला.
शर्यतीत बैलांवर होणा-या जबरदस्तीचे व्हिडिओ शूटिंग, फोटो पाठवले. पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी त्याची दखल घेतली. भारताच्या राजपत्रात ११ जुलैला याबाबत नोटीफिकेशन जारी झालं. महाराष्ट्र सरकारनं २४ ऑगस्टला आदेश काढला. आणि बैलांचं प्रदर्शन, प्रशिक्षण, खेळ, मनोरंजन, कार्यकौशल्य, शर्यती आणि झुंजी यांवर बंदी लागू झाली.
डॉ. कटारिया यांच्याप्रमाणे साता-याच्या ब्युटी विदाऊट क्रुएल्टी या संस्थेच्या सुनेत्रा भद्रे, सांगलीचे जितेंद्र कोळेकर, कोल्हापूरच्या दीपा शिपूरकर यांनी याबाबत गेले काही वर्षे लावून धरलंय. डॉ. कटारियांनी २००४ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. घोडा आणि बैल यांना एकत्रितपणे शर्यतीत पळवू नये, अशी त्यांची विनंती होती. कारण पळण्याबाबत घोडा आणि बैलाची बरोबरी होत नाही. घोड्यामागं बैलाला फरपटत जावं लागतं.
१६ ऑक्टोबर २००७ रोजी कोर्टानं या दोन प्राण्यांना शर्यतीत एकत्र आणू नये, असे आदेश दिले. पोलीस काही या निकालाच्या किचकटपणात पडले नाहीत. त्यांनी बैलगाड्यांच्या शर्यती सरसकट बंद केल्या. त्यावर वर्ध्याचे आमदार राजू तिमांडे यांनी गृहमंत्र्यानी साकडं घातलं. बैलांचा छळ होणार नाही, अशा पद्धतीने शर्यती घेण्यास परवानगी मिळवली. मग पुन्हा शर्यतींचा जल्लोष सुरू झाला. 
बैलगाडा संघटनांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी चालवलीय. पण त्यांचे ते दरवाजेही आता बंद झाल्याचं सांगितलं जातंय. कारण राजपत्रात नमूद झाल्यापासून त्यावर जर ६० दिवसांत आक्षेप घेतला, तरच सुप्रीम कोर्ट केस दाखल करून घेतं. पण आता या नोटीफिकेशनचं काय़द्यात रुपांतर झालंय. त्यामुळं आता पुढारी, मंत्री तसंच हायकोर्टालाही यात हस्तक्षेप करता येणार नाही, असं चित्र आहे.


दसरा दिवाळीनंतर लगेच गावोगावच्या यात्रा सुरू होतील. बैलगाडा शर्यतींचा सीझन सुरू होईल. बंदीची बातमी तर गावोगाव पोहचलीय. पण आम्हाला अजून आदेशच मिळाले नाहीत, असं पोलीस म्हणतायत. म्हणून डॉ. कटारिया आणि त्यांचे सहकारी सर्व पोलीस स्टेशनला आदेशाची माहिती फॅक्स करतायत. एसएमएस करतायत. सांगली, सातारा, कोल्हापूरकडं जवळपास शर्यतबंदी लागू झालीय. विदर्भ, मराठवाड्यातही सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पण प्रॉब्लेम पुणे जिल्ह्यात आहे. बैलगाडा मालक जुमानतच नाहीत. कारण त्यांना राजकीय पाठींबा आहे, असा आरोप डॉ. कटारिया करतायत.
ही झाली प्राणीप्रेमींची बाजू. दुसरीकडं शर्यत बंदीच्या विरोधात बैलगाडा संघटना मुंबई हायकोर्टात निघाल्यात. बंदीची सविस्तर कारणं द्या, अशी याचिका त्यांनी दाखल केलीय. तसंच त्यासंबंधीची नोटीस पर्यावरण व वन मंत्रालयालाही देण्यात आलीय. घरचे बैल म्हणजे आमच्या जीवातला जीव. त्यांच्या शर्यती म्हणजे आमचा घटका दोन घटकांचा विरंगुळा. त्यात कशाला खोडा घालता? अशी शेतक-यांची भावना कोर्टासमोर व्यक्त केली जाणार आहे.
त्यामुळं गावाकडं सध्या चर्चा रंगलीय, ती या बैलगाडा शर्यत बंदीची.

चारबैली बैलगाडा शर्यत
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये बैलगाडी नव्हे, तर बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. प्रत्येक गावच्या यात्रेत आकर्षण असतं ते या शर्यतींचं. 
गावाच्या बाहेर एक उंचवटा पाहून घाट बांधलेला असतो. हा घाट म्हणजे सुमारे १०० मीटर लांबीची १० मीटर रुंदीची चढण. त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी बांधकाम केलेलं. त्यावर शर्यत शौकीन बसतात. घाटाच्या सुरुवातीच्या टोकाला एक उंच गोल चौथरा बांधलेला असतो. त्यावर सगळे गावचे कारभारी, मानकरी दाटीवाटीनं उभे असतात.
लाऊडस्पीकर गर्जत असतो. वाजंत्र्यांचा कडकडाट सुरू असतो. कारभारी, बैलगाड्यावाले शेतकरी, बैल, गाडा सगळेच भंडार, गुलालानं माखलेलं. एका वेगळ्याच उन्मादानं परिसर बेधुंद झालेला. फुरफुरणा-या, तरण्याबांड खिल्लारांना कसंबसं आकळत घाटात आणलं जातं. तरणे गडी मोठी झटापट करत खिल्लारांच्या माना जाडीत अडकवतात. ही उमदी जनावरं पाहण्यासाठी गर्दीची रेटारेटी सुरू असते. शुभ्र पांढ-या रंगांची, टोकदार शिंगांची, काळ्याभोर डोळ्यांची, देखणी मुसमुसणारी खिल्लारं. शिंगांना सोनेरी रंग, शेंब्या, गुलाबी रिबिनी, आणि दृष्ट लागू नये म्हणून काजळाचं बोट. कुणाची जोडी हाय रं?’ म्हणत गर्दीतला जो तो टाचा वर करून करून बघत असतो.
तेवढ्यात अनाऊन्समेंट होते, ऐका मंडळी... प्रसिद्ध गाडामालक शिवराम सखाराम हिंगेपाटील, राहणार अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मोठी नामांकीत बारी हाये बरं का. गेल्या साली १२ घाटांमधी बाजी मारणारा सगुण्या गो-हा त्यांच्या गाड्याला जुपलाय...गडी सावध...भिर्रर्रर्रर्र...म्हणताच कान टवकारलेली ढवळ्या पवळ्याची जोडी बंदुकीची गोळी होते. वा-याला मागं टाकत १.. २.. ३.. ४.. असे सेकंद मोजेपर्यंत घाटाचं टोक गाठते. भंडार, धुळीच्या ढगांतून टोकावरचा निशाणाचा झेंडा हलतो. तो दिसला की अनाऊन्सर घोषणा करतो, सेकंद १२..! वाजंत्री वाद्यांचा कडकडाट करतात. सगळा घाट धुंद होतो. वाजत नाचत बैलांची मिरवणूक निघते. खिल्लारांवरून नोटा ओवाळून वाजंत्र्यांना बक्षिसी दिले जाते. बैलगाडा मालकाची कॉलर टाईट होते. कडक टोपी अजूनच तिरपी होते. मग बैलजोडी भैरोबाच्या देवळासमोर येते. तिथं बैलांवर भंडारा खोब-याची उधळण होते. भैरुबाच्या नावानं चांगभलं होतं. 

उत्तर पुणे जिल्ह्यातल्या या असतात, बैलगाडा शर्यती. म्हणजे शर्यतीत मोठ्या चाकाच्या बैलगाडीची छोटी प्रतिकृती वापरतात. बैलगाडीच्या शोधापूर्वी या गाड्याचा शोध लागला होता. या गाड्याला लाकडाची भरीव चाके असतात. शेतकरी त्यावरून धान्याच्या पोत्यांसारख्या जड शेतीमालाची वाहतूक करतात. अगदी मोहेंजदाडो येथील सिंधू संस्कृतीच्या उत्खननात या बैलगाड्याची लाकडी खेळणी सापडली आहेत. हडप्पा इथंही बैलगाडीचा चाकोरी रस्ता सापडला आहे. याचा अर्थ बैलगाडा हा सिंधू संस्कृतीइतका जुना आहे.
सध्या शर्यतीत वापरली जाते ती या बैलगाड्याचीही छोटी प्रतिकृती. वजनाने अगदी हलका असलेला हा गाडा शेतकरी अगदी सायकलवरूनही घेऊन जातात. बैल तर अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणं हा गाडा पळवतात. हा गाडा छान रंगवतात. मोराच्या पिसांनी सजवतात. शर्यतीच्या वेळी बैल गाडा मोकळाच ओढत नेतात. त्यावर जॅकी अर्थात बैल हाकणारा माणूस बसलेला नसतो.

जणू लढाईची मोहीम
गाड्याला एकामागे एक असे दोन दोन बैल जोडतात. पुढच्या बैलजोडीला म्हणतात, चौ-हे आणि मागच्या जोडीलाधुरे. त्यांच्या जोडीला असते एक घोडी. तिची किंमतही दीड दोन लाखापेक्षा जास्तच. यांना शर्यतीला न्यायचं म्हणजे जणू लढाईची मोठी मोहीमच. या जनावरांना सांभाळायला २० ते २५ गडीमाणसं लागतात. त्यांना टेम्पोत चढवणं, उतरवणं, गाड्याला जुंपणं, जिंकल्यावर त्यांच्यासमोर डफड्याच्या तालावर नाचणं, यासाठी! शर्यतीचा दिवस उजाडला की पहिलं काम लागतं ते घरातल्या बायामाणसांना. 
गाड्यासोबत जाणा-या या सगळ्या गड्यांना मासवड्यांचं जेवण करणं. किंवा बाजरीच्या भाकरी आणि कालवण रांधणं, यासाठी बायकांची पहाटेपासून जुपी होते. टेम्पोला दोन ते पाच हजारांपर्यंत भाडं द्यायचं. रस्त्यात अडवलंच एखाद्या हवालदारानं तर त्याचा आत्मा शांत करायचा. आणि खंडेरायाचा य़ेळकोट’, भैरवनाथाचा चांगभले करत घाटातल्या गर्दीत मिसळून जायचं.

सीझनमध्ये एक शेतकरी बैलांना असे १० ते १२ घाट दाखवतोच. पण ते दाखवताना कफल्लक झालेल्या शेतक-यानंच कात्रजचा घाट बघितलेला असतो. नाही म्हणायला बाजी मारली तर शर्यतीत इनाम असतं. किमान एक लाखांपासून दहा लाखांपर्यंत. शिवाय टीव्ही, बाईक, पंखे, फ्रिज, सोनं, चांदी, ट्रॅक्टर असं काहीही. पण एका नंबर मध्ये अनेक गाडे येतात. मग त्यांना ही बक्षिसाची रक्कम वाटून देतात. त्यातून शेतक-याचा एका शर्यतीचाही खर्च सुटत नाही.
एकदा गाड्याचा हा नाद लागला की लागलाच. खुळावलेला शेतकरी मग खिशात असतील नसतील तेवढे पैसे संपवील. हातउसने घेईल. झालंच तर कर्जही काढील. आपली बारी नंबरात लागावीम्हणून जीवाचा आटापीटा करील.

ब-याच ठिकाणच्या शर्यतीतर इनामाच्या आमिषाशिवाय होतात. आंबेगाव तालुक्यातल्या थापलिंग खंडोबाच्या यात्रेनं या भागातल्या यात्रांना सुरुवात होते. इथं शर्यतींना इनाम नसतो. ही शर्यत नवसाची असते. या घाटात बैलगाडा पळवला तर थापलिंगाची आपल्यावर कृपा राहते, अशी शेतक-यांची श्रद्धा आहे. घाटातून बैल पळविल्यानंतर टेकडीवर असलेल्या थापलिंग देवाच्या दारात नेऊन बैलांसह शेतकरी दर्शन घेतात. लेकराबाळांना साल सुखाचं जाऊ दे, असं गा-हाणं घालतात.
या सगळं आता बंद होईल. कारण याच शर्यतीदरम्यान कत्तलखाने परवडले, असे अत्याचार बैलांवर होतात, असं प्राणीमित्रांचं म्हणणं आहे. शर्यत सुरू होण्यापूर्वी बैल सावध व्हावेत, म्हणून बैलांचे मालक त्यांना काठीने बदम मारतात, काठ्यांच्या टोकांना खिळे लावून टोचतात. इलेक्ट्रिक शॉक देतात. चामडी पट्टे, चाबकाने बैलांना मारतात, त्यांना दारूसारखी उत्तेजक द्रव्य पाजतात, हे आरोप बैलमालकांना शंभर टक्के खोडून काढता आलेले नाहीत.
पण आम्ही या बैलांना पोटच्या पोरावाणी जीव लावतो असा शेतक-यांचा अर्थात बैलमालकांचा दावा. त्यासाठी आपण बैलाची किती काळजी घेतो, हे ते सांगत राहतात. शर्यतीच्या बैलांवर तर विशेष मेहनत घेतली जाते. घरच्या गायीचा
गो-हा मोठ्या कोडकौतुकानं वाढवला जातो. शर्यतीसाठी तयार केला जातो. स्पेशल खुराक खाऊन हे खिल्लार धष्टपुष्ट होतं. या खुराकात भुईमुगाच्या शेंगा, शेंगदाण्याची पेंड, सरकी, मटकी, कडबा, ज्वारी, हिरवा चारा अशी त्याची चंगळ असते. हो, पण त्याला हिरवा चारा कमी द्यायचा. नाही तर तो स्थूल होतो. मग तो पळण्यात मागे पडतो. शर्यतीचा बैल कसा अगदी शिडशिडीत, चपळ पाहिजे. अशक्त बैलाला गव्हाचं पीठ आणि तेलाचा खुराक देऊन पुष्ट करता. या बैलाला शेतीच्या कामासाठी वापरायचा नाही. वेळच आली तर फक्त पेरणीपुरता औताला जुंपायचा.
सुगीनंतर उन्हाळ्यात शेतीची काम नसतात. मग गावोगावच्या यात्रांचे आणि बैलगाडा शर्यतींचे वेध लागतात. घरच्या खिल्लाराला शर्यतीचा घाट दाखवायचा. इनाम पटकावायचं. त्याची वाजत गाजत मिरवणूक काढायची. कौतुकाच्या नजरा झेलायच्या, असा हा हौसेमौजेचा मामला.
उलाढाल कोट्यवधींची
आता हा शर्यतीच्या बैलांचा व्यापार प्रचंड वाढलाय. त्यात कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होतात. शर्यतीला बैल हवेत ते खिल्लार जातीचे. ते मिळतात, सोलापूर, कोल्हापूर परिसरात. पंढरपूर, माढा, सोलापूर, चाकण, बेल्हा या बाजारपेठा खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध आहेत. कर्नाटकातली विजापूर ही खिल्लार बैलांची मोठी बाजारपेठ. खिल्लारांच्या एका बाजारातली सीझनची उलाढाल सुमारे १० कोटींवर जाते. तर वर्षभरात तब्बल ४० ते ५० कोटींवर.
शर्यतीच्या एका बैलाची किंमत असते दोन ते पाच लाख रुपये! बैलानं जेवढ्या जास्त शर्यती जिंकल्या, तेवढी त्याची किंमत जास्त.
बैलाची किंमत ठरण्याची आणखी एक पद्धत आहे. एखादा नवा गो-हा नेहमीच्या बैलांच्या बरोबरीनं धावला किंवा त्यांच्यापेक्षा सरस ठरला तर त्याची किंमत ठरल्यापेक्षा दुप्पट होणार.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात सहा लाख 94 हजार रुपये देऊन शर्यतीचं एक खिल्लार आणलं गेलं. नाग्या नावाच्या या गो-ह्यानं परिसरातल्या जवळपास सर्व शर्यती जिंकल्यात.
सकाळ संध्याकाळी पाच लीटर गायीचं दूध, कडधान्याचा भरडा व जोंधळ्याचा कडबा, घमेलेभरून गाजरे असा त्याचा खुराक. शर्यतीच्या सरावासाठी शेतातलं काम, रोज पळण्याचा उपक्रम. शर्यतीच्या आदल्या दिवशी गरम पाण्यानं शेक, मसाज, अशी ऐश. शर्यतीच्या माळावर फुललेली गर्दी पाहिली की नाग्या फुरफुरू लागतो. आणि इशारा मिळताच वा-यावर स्वार होतो. त्याचे मालक सर्जेराव पाटलांची दोन इंच जास्त फुगते.
शंकरपाटाची धम्माल
पुणे जिल्ह्यापेक्षा उर्वरीत महाराष्ट्रात दोन बैलांच्या बैलगाडी शर्यती होतात. त्यांना शंकरपाट म्हणतात. विदर्भातल्या शर्यती यात्रांसोबतच नोव्हेंबरमध्येच सुरू होतात.
दोन बैलांची गाडी पळवणा-या गाडीवरच्या स्वाराला धुरकरी म्हणतात. तर बैलगाडीला म्हणतात रिंगी. भिंगरीसारखी पळणा-या रिंगीच्या धुरकरी मोठ्या प्रमाणात महिला असतात. ही लाकडाची रिंगी फक्त शर्यतीसाठीच वापरतात. शेतकामासाठी नाही. धावपटू एका रांगेत उभे असतात, तशा या गाड्या उभ्या केल्या जातात. निशाण दाखवताच सुसाट धावत सुटतात. धुरकरी धु-यांवर उभा राहून रिंगी हाकतो. सेकंद मोजून या बैलगाड्यांचे नंबर जाहीर केले जातात.

मराठवाड्यातला खंडेराया
मराठवाड्यालाही बैलगाडी शर्यतीचं मोठं वेड आहे. नांदेडजवळच्या माळेगावात महाराष्ट्राचं ग्राम दैवत खंडोबाची भव्य यात्रा भरते. दक्षिण भारतातली ही सर्वात मोठी यात्रा. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेशातून इथं भक्त येतात. यात्रेनिमित्त इथं पशू, अश्व, कुक्कुट प्रदर्शन भरतं. कुस्त्यांची दंगल, तसंच लोककला महोत्सवाचं आयोजन होतं. पण खरं आकर्षण असतं, प्राण्यांच्या धावण्याच्या स्पर्धांचं. बैलांसोबतच इथं घोडे, गाढवे, उंटांच्या धावण्याची शर्यत होते. पण आता त्यावरच बंदी आल्यानं खंडोबाच्या यात्रेचा खेळखंडोबा झाल्याची गावक-यांची भावना आहे.


समुद्रकिना-यावरचा थरार
कोकणातल्या रायगडमध्ये समुद्रकिना-यावरच्या वाळूत बैलगाडी शर्यतींचा थरार रंगतो. लाईनमध्ये उभ्या राहिलेल्या गाड्या निशाण पडताच धावत सुटतात. अडीच किलोमीटरवरच्या निशाणाला फेरी मारून पुन्हा जागेवर येतात. दोन बैलांच्या बैलगाडीत दोघेजण बसलेले असतात. एकजण कासरा हातात धरून गाडीला दिशा देणारा बीड. आणि दुसरा बैलांना पळवणारा. तो बांबूच्या काठीनं बैलांच्या पाठीवर सपासप फटके लगावतो. काठीच्या टोकाला लावलेल्या तीक्ष्ण पराणीनं टोचून बैलांना धूम पळवतात.
पण आता बंदीमुळं आता वाळूतली ही धम्मालही बंद होईल.

शर्यतीचं राजकारण
ज्यांच्या पाठपुराव्यामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी आलीय, ते डॉ. कटारिया पुणे जिल्ह्यावर नाराज आहेत. इथल्या राजकीय नेत्यांच्या पाठींब्यामुळं बैलगाडामालक बंदीला जुमानत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. त्यात तथ्यही आहे. विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील आंबेगाव तालुक्याचे आमदार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत, शिवसेनेचे खेडचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. हे दोघे पूर्वीचे जीवाभावाचे दोस्त. पण मैत्रीत राजकारणाचं मांजर आडवं आलं न् आढळरावांनी राष्ट्रवादी सोडली. बाहेर पडताना त्यांनी हेरली ती, वर्षानुवर्षे चालणारी बैलगाडा शर्यत आणि ती पाहण्यासाठी होणारी गर्दी. वळसेपाटलांनी घेतला होता, तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास. कफल्लक करणा-या या नादखुळ्या बैलगाडा शर्यतीतून शेतक-यांनी बाहेर पडावं, असा त्यांचा आग्रह. पण आढळराव या शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी शर्यतींना प्रोत्साहन दिलं.

घाटात हमखास अपघात होतात. बैल माणसं जखमी होता. त्यासाठी आढळरावांनी पहिल्यांदा बैलगाडा विमा योजना सुरू केली. बैलगाडावाल्यांची मनं त्यांनी जिंकली. आणि त्यांनी आढळरावांना खासदारकीची निवडणूक जिंकून दिली. बैलगाडा शर्यत रद्द झाल्यानंतर मंचर गावात बैलगाडा मालकांनी आंदोलन केलं. त्याला हिंसक वळण लागून दगडफेकीची घटनाही घडली. बैलगाडामालकांवर लाठीमार झाला. हे राजकारण अजूनही धुमसतंय.

वळसेपाटलांनाही आपल्या विचारांत बदल करावा लागलाय. आज दोन्हीही बाजूंना बैलगाडा संघटना आहेत. त्यात जवळपास अडीच हजार बैलगाडे आहेत. दोन्हीही पक्षांच्या विमा कंपन्या आहेत. गावागावांत शर्यतीसाठी एकाचढ एक घाट बांधले गेले आहेत. शर्यतीवर लाखो रुपयांचा इनाम उधळला जात आहे. बैलगाडा मालकांना पक्षात मानाची पदं मिळत आहेत. दोघाही नेत्यांना मतांची गरज आहे. राज्यभरातलं हे प्रातिनिधिक चित्र आहे.
शेतक-यांची बाजू
शर्यतीसाठी बैलांचा छळ होतो, या आरोपाला आणि बंदीला शेतकरी ठाम विरोध करतात.
शर्यतीच्या बैलांसाठी आम्ही अगदी घासातला घास बाजूला काढून ठेवतो. शर्यतीच्या बैलाला ऊनसुद्धा लागू देत नाही. त्याला शेतीच्या कामालाही जुंपत नाही. मग आम्ही त्याचा छळ करतो कसं म्हणता?
शर्यतीतून, बैलांच्या खरेदीविक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळं गावाच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळते. शिवाय, गावोगावच्या शर्यतींतून अनेकांना रोजगार मिळतो. गावातील व्यवसाय वाढीस लागतो, असं आर्थिक गणित ते मांडतात.

शर्यती बंद केल्या मग बैलपोळ्याच्या मिरवणुकाही बंद करणार का? बैलांचे शेतीची औतकाठी ओढणे, तसेच टायरगाडीतून बैलाद्वारे होणारी वाहतूक बंद करणार का?  कुस्तीमध्ये एखादा पैलवान जखमी होतो मग कुस्ती बंद का नाही करत? मुक्या जनावरांचा ज्यांना फार कळवळा आहे, ते त्यांच्या कत्तली का नाही थांबवत? यात्रेतल्या शर्यतीच्या निमित्तानं सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात, हे वावगे आहे काय? हे बंदीवाले शेतक-यांच्या इतर प्रश्नांवर आवाज का उठवत नाहीत? शहरातली घोड्यांची रेस तुम्हाला चालते मग आमच्या कष्टाच्या आयुष्यातला हा आनंद हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेतकरी करतात.
भान हवं बदलत्या काळाचं 
जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या शर्यती जगभर होतात. अगदी आदीमानवाच्या काळापासून. ग्रीस, रोममधले खेळ तर पुढे सर्वत्र पसरले. त्यातून ऑलिम्पिकचं वर्तुळ जगभर विस्तारलं. कालांतरानं रक्तरंजित शर्यती, झुंजी बंद झाल्या. अगदी स्पेनचा राष्ट्रीय खेळ बनलेला बुलफाईट हा खेळही आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. यात तर बैलाला ठारच मारलं जायचं. गेल्या आठवड्यातच बर्सिलोनामधली बुलफाईट बंद झाली. तिथं एका वर्षात दोन हजार शो होत. २५ सप्टेंबरला शेवटचा शो झाला.
शर्यतीत हरवणारं माणूसपण जागवायचे प्रयत्न आता सगळीकडे सुरू आहेत. त्याला आपणही प्रतिसाद नको का द्यायला?

त्यांचं काय झालं?
प्राणीमित्रांनी सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी घातली. एके काळी भारताची ओळख आणि वैशिष्टय असणा-या सर्कशी आज पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या बंदीमुळं किती सर्कस कामगार बेकार झाले, त्याची मात्र कोणी नोंद घेतलेली नाही. तीच परिस्थिती माकडवाले मदारी, सापवाले गारुडी, अस्वलवाले दरवेशी, नंदीबैलवाले इत्यादींची. समाजातल्या अतिशय तळातली, भटक्या जमातीतली ही मंडळी. त्यांच्या जगण्याचा आधारच हिरावून घेण्यात आलाय. यातल्या बहुतेकांवर भीक मागण्याची वेळ आलीय. त्यांची दखल कोण घेणार? बंदीचा वरवंटा पहिल्यांदा यांच्यावरच फिरतो. 
याऊलट श्रीमंतांच्या खेळाकडं दुर्लक्ष होतं. रेसच्या घोड्यांवर लाखो रुपये उधळले जातात. त्यांना का नाही अडवलं जात? अशा विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा मग आपणही विचार करायला हवा. नाही म्हणता मनेका गांधींच्या प्रयत्नांमुळं रेसच्या घोड्यांचं धावणं जरासं सुसह्य झालं. रेसच्या घोड्यांना कुशनचा चाबूक वापरावा, तसंच एका शर्यतीत केवळ तीनच वेळा चाबूक मारावा..! असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले.
जनजागरण आणि प्रबोधन कोण करणार?
सगळेच प्रश्न कायद्याने सुटत नाहीत. त्यासाठी लोकांची मनं वळवावी लागतात. समाजमन घडवावं लागतं. ते तर सध्या कुणाच्या डोक्यातही येत नाही. प्राणीप्रेमी वारंवार कोर्टात जातील, पण शेतक-यांना समजून घेण्याचा, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न कधी करणार नाहीत. सरकार कोर्टाच्या आदेशानंतर तेवढं जागं होऊन कायद्याचा बडगा दाखवणार.
बैलगाडा शर्यतींवर राजकीय नेते लाखो रुपये उधळतील. अगदी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी हजारो रुपयांची होर्डिंग्ज उभारतील. पण समाजाचं प्रबोधन होईल, असं काही करावंसं त्यांना वाटतच नाही. मीडियाच्या टीआरपीच्या गणितात तर शेतकरी आणि त्यांचे प्रश्न बसतच नाहीत. त्यांना ग्रामीण मन उमगतच नाही.
जगद्गुरू संत तुकाराममहाराज पुणे जिल्ह्यातले. त्यांना इथला समाज जवळून पाहिला, अनुभवला होता. असा कसा तुमचा देव । घेतो दुस-याचा जीव ।। असा रोकडा सवाल त्यांनी इथल्या लोकांना केला होता. त्यांचा हाच प्रश्न गावोगावी विचारत संत गाडगेबाबा फिरत होते. चुकीच्या रुढी परंपरांतून समाजाला बाहेर काढत होते. सरकारनं त्यांना फिरण्यासाठी गाडी दिली होती. असे गाडगेबाबा आता आसपास दिसत नाहीत. असले तरी ते सरकारला आणि संबंधितांना दिसत नाहीत.
जीवाशिवाची बैलजोड
शेतक-याचं आणि बैलाचं नातं काय असतं? हे कदाचित शहरातल्या माणसाला उमगणार नाही. त्यासाठी त्यांनी टिंग्या सिनेमा बघावा. त्यातल्या चितंग्या नावाच्या घरच्या बैलासाठी जीव टाकणारा शाळकरी टिंग्या पाहावा. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला’, अशी एकमेकांच्या आभाळाची अदलाबदल करून पाहावी. मंगेश हाडवळे नावाच्या जुन्नरच्याच एका शेतक-याच्या मुलानं हा सिनेमा तयार केलाय.
तसं पाहिलं तर यांत्रिकीकरणामुळं आता बैलांची गरज संपलीय. त्यांची शेतातली कामं ट्रॅक्टर करू लागलाय. त्यामुळं पुढच्या काळात तर बैलपोळ्यालाही पुजायला बैल मिळायचा नाही. मातीच्या बैलाची पूजा करावी लागेल. महादेवाच्या देवळातल्या दगडी नंदीच्या दर्शनावर समाधान मानावं लागेल. म्हणूनच आपल्या लाडक्या बैलांना शर्यतीच्या पराण्या न टोचता बळीराजानं त्याला सांभाळायला हवं. बैल, बैलगाडी आणि त्याभोवतीचं आपलं भावविश्व जपायला हवं. जीवघेण्या शर्यतीतून मनोरंजन हे शेतक-याचं विश्व कधीच नव्हतं. कवी ग. ह. पाटील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर गावचे. त्यांनी शेतक-यांचं खरं भावविश्व काय होतं आणि आहे हे आपल्यामामाची गाडीया कवितेतून लिहून ठेवलंय.

‘‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो 
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो
             कशी दौडत दौडत येई हो
             मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट, सारी सपाट वाट

            मऊ गालीचे ठायी ठायी हो
           शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो 
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
           गाई किलबील विहंग मेळा हो
           बाजरीच्या शेतात, करी सळसळ वात

कशी घुमली अंबेराई हो
कोण कानोसा घेऊन पाही हो 
           कोण लगबग धावून येई हो
           गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
           लेक एकुलती

           नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो...’’
शेतकरीदादा, यापुढं कुठलं मनोरंजन आणि कुठला विरंगुळा मोठा आहे?

'लोकप्रभा'तील लेखाची लिंक -
http://www.loksatta.com/lokprabha/20111014/khhilaar.htm
http://lokprabha.loksatta.com/13543/Lokprabha/14-10-2011#p=page:n=20:z=1
http://lokprabha.loksatta.com/13543/Lokprabha/14-10-2011#p=page:n=1:z=1

1 comment:

  1. Dear sir can you please give me the photo (6th photo from top) of bullock cart racing I like it very much and wants to put it in my office. I like it from heart. please give me your mail id or write me at khanderao_rs@yahoo.co.in

    ReplyDelete