'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 27 October 2011

सुख वाटे जीवा


परवा धनतेरस न् काल लक्ष्मीपूजन झालं. दिवाळीचा संबंध असा धनाशी, समृद्धीशी. ऐश्वर्याचा उजेड घेऊन आनंदाची दिवाळी तुमच्याही अंगणात येवो, असे एसएमएस येतायत. त्यातला एक होता,
चला, शब्दांचं धन गोळा करूया...
क्षणात तुकोबाराय डोळ्यापुढं उभे राहिले. पांढरी सुती पगडी, बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा...असे कधीही, कुठेही आठवतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, सकाळ, संध्याकाळी, रात्री अपरात्री, प्रवासात, सुखात, दु:खात, जिथं जातो तिथं माझे हे आजोबा सोबत असतात. आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभेअसतात.
अडचणीत काळंजून बसता, त्यांचे शब्द उजेड होऊन येतात. सोबत इंद्रायणीचा निर्मळ खळखळाट...
आम्हा घरी धन शब्दांची रत्ने।
 शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
 शब्दें वाटू धन जनलोकां।। ...
जीवाला सुख कशा कशानं वाटलं, वाटतं हे जरा आठवून पाहावं.
जगाच्या कुठल्या भाषेत असलं धन असेल काय हो?

२००३च्या दिवाळीत देशात दिवाळी कशी कशी साजरी होते, हे लोकमतसाठी लिहिलं होतं. त्यात काटछाट वगैरे होऊन का होईना एका पुरवणीत छापून आलं. दिवाळीच्या दिवसांत गुळगुळीत रंगीत पानावर छापून आलेलं ते आर्टीकल पाहून जे सुख वाटलं, जो फिल आला होता, तो न सांगता येणारा.
काल तो फिल पुन्हा आला. ते कात्रण पुन्हा पाहिलं. त्यावरून हात फिरवला. हे शब्दचिपल्या जीवाचे जीवन असल्याची जाणीव दाटून आली.
दिवाळी हा सण मांगल्याचा. चैतन्याचा अन् आनंदाचा. विविधतेनं नटलेल्या भारतात हा सण सर्वत्र साजरा होतो.
महाराष्ट्रातली घरं पै पाहुण्यांनी भरून जातात. भल्या पहाटे अभ्यंग स्नानापासून सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत चैतन्य जागवत असतो. अनेक ठिकाणी नरकचतुर्दशीला नरकासुराच्या शेणाच्या प्रतिकृतीवर कचरा ओततात आणि वर एक पैसा ठेवतात. तो उचलण्याचा मान गावातल्या विशिष्ट माणसाला. अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणीची पूजा करतात. केरकचरारुपी अलक्ष्मीला ती दूर करते म्हणून ती लक्ष्मी! नगर जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी गुरांना कांढळाच्या सुंदर  दिवट्यांनी गुरांना ओवळतात. ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदळाच्या पीठाचा बळीराजा काढून त्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी त्या आकृतीजवळ कडू जिरे किंवा आंबाडीचे झाड लावतात. खेडोपाड्यात महिला इडापीडा जावो बळीचे राज्य येवो, असं म्हणत सुख-समृद्धीची मागणी करतात.

काही ठिकाणी बळीराजाची अश्वारुढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती  एकवीस दिवे मांडण्याची पद्धत आहे. हा बळीराजा प्रजाहितदक्ष आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होता.
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयपूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तामीळनाडूत नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात.
आंध्रातील लोक घरासमर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात. स्त्रिया त्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी म्हणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा करतात. त्या दिवशी बळीराजाची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात आणि पूजा करतात. गाई बैलांना रंग लावून माळा घालून सजवतात. गावातून मिरवणूक काढतात. काही ठिकाणी. मशाली घेऊन नाच करतात.
केरळमध्ये दिवाळी साजरी होत नाही. आश्विन महिन्यात तिथं धूमधडाका असतो ओणम सणाचा.

गोव्यातले लोक सामुदायिक आतिथ्य करून दिवाळी साजरी करतात. शेजारीपाजारी एकत्र जमून एकमेकांकडे जातात आणि दूध, गूळ पोह्यांचा फराळ करतात.
बंगालमध्ये दिवाळीत कालीपूजनाचे मोठे महत्त्व आहे. अश्विनी अमावस्येच्या रात्री बंगाली लोक कालीमातेची स्तोत्रे गात जागरण करतात. त्या रात्रीला ते महानिशा म्हणतात.
काली हीच लक्ष्मी, सरस्वती आणि शक्ती, असे मानतात.
सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. तलावाच्या काठची माती आणून एक चबुतरा तयार करतात. त्यावर काटेरी वृक्षाची फांदी लावतात. दुस-या दिवशी त्या मातीचे सोने होते, अशी समजूत आहे.
उत्तर प्रदेशातल्या डोंगराळ प्रदेशातले लोक दिवाळीच्या दिवशी गायीची पूजा करतात. रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालीच्या उजेडात नाचतात. त्यावेळी दुस-या गावचा माणूस तिथं आल्यास त्याला शिव्या देणं पुण्यदायक समजतात. यानिमित्तानं कुबेराची पूजा केली जाते. तूपसाखर, दहीभात खाल्ला जातो.
पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मरणार्थ दिपोत्सव साजरा करतात. अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
राम या दिवशी वनवासातून परतला म्हणून राजस्थानात लंकादहनाचा देखावा उभा करून दारूकाम करतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कोडकौतुक करतात. दिवाळीतील चतुर्दशीला रुपचौदस म्हणतात. त्या दिवशी मुली घुडल्या (सच्छिद्र घडा. यात दिवा ठेवतात.) घेऊन घरोघर फिरतात. घुडलेखा नावाच्या अत्याचारी सरदाराला मारवाडी वीरांनी ठार मारून मुलींची सुटका केली होती. त्याची ही आठवण. घुडल्याला प्रत्येक घरी मिठाई आणि दिव्यासाठी ते मिळते. अमावस्येला लक्ष्मीपूजनाबरोबरच बैलांचीही पूजा करतात. त्यांच्या टकरीही लावतात. याच दिवशी नाथद्वारा इथे मिष्टान्नाचा मोठा कूट करून तो गरीब लोकांकडून लुटवण्याची प्रथा आहे.

गुजरातमध्ये अश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला वाघवारान असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया भल्या सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळी काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. त्या रात्रीला भुते सर्वत्र संचार करत असतात, अशी समजूत असल्याने लोक घराबाहेर पडत नाहीत. रात्री शेंदूर लावून हनुमानाची पूजा करतात. अमावस्या हा महत्त्वाचा दिवस. या दिवशी महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केली जाते. दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात. नवीन जमाखर्चाच्या वहीच्या तिस-या पानावर श्रीहे अक्षर लिहून त्यावर एक विड्याचे पान आणि रुपया ठेवतात. वहीची पंचोपचारे पूजा करतात. रात्रभर वही तशीच उघडी ठेवून एक दिवा तेवत ठेवतात. सर्वजण जागरण करतात. सकाळी वहीला नमस्कार करून लक्षलाभ हा शब्द तीनदा उच्चारतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. सकाळी लहान मुल पीठाची पुरचुंडी घेऊन गावत फिरतात. वर्षारंभाचा शुभशकून म्हणून लोक त्यांच्याकडून मीठ विकत घेतात.
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूत खेळले जाते. लक्ष्मीपूजनाबरोबरच नेपाळी लोक गाय, बैल, कुत्रे यांची पूजा करतात.
परदेशात राहणारे भारतीय तर दिवाळी साजरी करतातच. पण केनिया, थायलंड, त्रिनिदाद, मलाया, सियाम, श्रीलंका या देशांमध्येही तिथल्या रिवाजांनुसार दिवाळी धुमधडाक्यात साजरी होते.

No comments:

Post a Comment