गेल्या साली अभिजीत घोरपडेनं 'भवताल'च्या दिवाळी अंकासाठी पावसावरचा ललित लेख मागितला होता. काय लिहावं बरं, असा विचार करत असताना मला गावाकडचं ओढ्याकाठचं घर आठवलं. पावसाच्या बहुतेक आठवणी याच घराशी निगडीत. मग लिहून काढला लेख, पावसाच्या आणि घराच्या आठवणींचा...
सादाळलेल्या भुईच्या ओलाव्यानं अपरात्री जाग येते. माथ्या-पायथ्याच्या भांड्यामध्ये अखंड टप-टप सुरू झालेली असते. मी गुडघे पोटाशी घेऊन ऊब मिळवू पाहतो. चूळबूळ करत कूस बदलतो, पण त्या शेणभुईचा गारवा काही कमी होत नाही. बाहेर पावसाचा जोर वाढत राहतो. सोबत वारा आणि विजा. छातीत धडधडू लागतं. मी अंथरुणात घुरमटून घेतो. गळक्या जागांवर ठेवलेल्या भांड्यांमधलं पाणी आई आणि भावंडं बाहेर टाकत असतात. त्यांच्या हालचाली तेवढ्या जाणवत राहतात. पाणी फेकण्यासाठी त्यांनी दार उघडल्यानंतर फुसांडत वाहणार्या पुराची रों रों ऐकू येते. घरासमोरच्या ओढ्याला पूर आल्याचा तो आवाज. मला काळजी वाटू लागते ती, सपरातल्या म्हशींची. डोळ्यातपाऊस घेऊन त्या खूरभर पाणी-चिखलात उभ्या असणार. वाटतं, आज रात्री बहुदा आख्खं जग ओढ्याच्या पुरात वाहून जाणार!
माझं घर दूरवरच्या रानातल्या शेतात. ओढ्याच्या कडेला. तिथून माणसांची वस्तीही लांबच्या हाकेच्या अंतरावर. सोबतीला फक्त मळा, ओढा, झाडं आणि पाखरं. नाही म्हणायला माणसांचा रानात राबता असायचा, पण तो दिवसा. कडुसं पडेपर्यंत. पाणी प्यायला, अवजारं न्यायला कुणी ना कुणी दिवसभर घरी येत राहायचं. अंगावर पोत्याचं घोंगतं घेतलेली ही माणसं पावसापासून आडोसा शोधायला हमखास यायची. गळणार्या पन्हाळ्यांच्या आत टेकायची. पाऊस ओसरताच 'कसं काय राहाता बुवा तुम्ही एकांटी...' असं म्हणत काढता पाय घ्यायची.पाऊस रानात दाखल व्हायचा तोच मुळात दांडगाई करत. उन्हाळ्याची सुट्टी सरत आली असायची. जत्राखेत्राही संपलेल्या असायच्या. वावरातली ढेकळं आभाळाकडं तोंड करून पडलेली असायची. आंब्याच्या दाट सावलीतही उन्हाच्या झळा सहन न होऊन टॉमी ल्याह्या ल्याह्या करत शेजारी बसलेला असायचा. ही तापती दुपार उतरणीला लागताच अचानक डोंगरमळ्याकडून पांढरे ढग सरसर आभाळात वर येतात. झटपट काळेजांभळे होतात. पालापाचोळ्याला घेऊन वावटळी गिरक्या घेऊ लागतात. मी आंब्याखालचं अंथरून, उशी आणि पुस्तक घेऊन घराकडं धूम ठोकतो. आई म्हशींना घरालगतच्या सपरात बांधायची लगबग करत असते. मला ती वैरणीच्या वळईवर प्लॅस्टिकचा कागद अंथरून वर दगड, लाकडं ठेवायला सांगते. तोपर्यंत धुळीनं पंचक्रोशी भरून जाते. मग आम्ही धावतच घरात जाऊन दार लावून घेतो.
वावधान सुरू झालेलं असतं. दारावर बाहेरून जणू कुणी जोरजोरानं धडका मारू लागतं. वारं आत घुसू नये म्हणून दाराच्या कोयंड्यात लोखंड अडकवून मी दाराला पाठ लावून उभा राहतो. दार एवढं गदागदा हालतं की, चौकटीसकट उखडेल. आईही दाराशी येऊन मदतीला उभी राहते. घुमणारं वावधान मग कौलारू छप्पराला उचलू पाहतं. त्या धुमशानापुढं दम टाकत आढ्यावरचं एक कौल उचकटतं. तशा कौलांच्या ओळीमागून ओळी भर्रकन उचकटत जातात. मोकळ्या होत जाणार्या छतातून भक्कन् उजेड आत येतो. आम्हा दोघांच्याही पोटात खड्डा पडतो. फार फार असुरक्षित, एकाकी वाटू लागतं. मागोमाग वादळ आणि पाऊस घरात घुसतो. दोघं मिळून बराच वेळ दंगा घालतात. आम्ही दाराला चिकटलेलोच. जीव मुठीत धरून.
त्याच वेळी आणखी एक गोष्ट आठवून काळीज लक्कन हालतं. ओट्यावरचा जुनंपुरानं महाकाय आंब्याचं झाड घरावर पडलं तर..? अखेर पुरेसं घुमून झाल्यावर वादळ हळू हळू शांत होत जातं. आम्ही बाहेर येऊन पाहतो तर अंगणात फुटलेल्या कौलांचा, कैर्यांचा खच. आणि वादळाशी झुंजून दमलेला तो बुजूर्ग आम्रवृक्ष. इतका आवाढव्य आणि उंच की, त्याचे शेंदराच्या रंगाचे आंबे फक्त पोपटच तोडू शकायचे. वर चढून आंबा उतरवण्याची भल्याभल्यांची छाती व्हायची नाही. केवळ वार्याच्या झुळुकीनं पडणारे आंबे झेलण्यासाठी पोराटोरांसह जाणतेही गर्दी करायचे. आंबा खाता खाता वर बघत म्हणायचे, 'तोडून टाका बुवा झाड, घर बसवील एखाद्या वावधानात...' वडील फक्त ऐकून घ्यायचे. झाडं तोडायला, गुरं विकायला त्यांचा ठाम विरोध. आंब्यानं मात्र कोणत्याही पावसाळ्यात दगा दिला नाही.
वादळानं घरा दारात घातलेला इस्कोट पाहात असतानाच भदभदीवरुन धो धो आवाज येऊ लागला. आता पूर येणार, असं म्हणेपर्यंत विलक्षण वेगाने गढूळ पाण्याची जीभ ओढ्यातून झेपावत येते. या जीभेला शिवलं की, लुळापांगळाही बरा होतो, असं लोक म्हणायचे. त्या जिभेचा क्षणार्धात जणू सरसरणारा अजगर झाला. ओढयाचं हे रूप एकदम परकं आणि भीतीदायक वाटतं. पुराचं पाणी चढतच राहातं. हळू हळू ओट्यावरच्या आंब्याच्या बुंध्यापर्यंत पोहोचतं. घराच्या उंबर्यात आम्ही 'पांडुरंगा, ज्ञानोबामावली' असं म्हणत पूर ओसरायची, वडील आणि भावंडं येण्याची वाट पाहत राहतो.
दर पावसाळ्याला लहानपणचा हा पावसानुभव डोळ्यापुढं उभा राहतो. वेगानं वाहणार्या पुराच्या पाण्याची भीती तर अजूनही मनातून गेलेली नाही. मी पहिली-दुसरीत असेन. एकदा खूप पाऊस सुरु असताना शाळेत गेलो होतो. दिवसभर पाऊस पडतच होता. शाळा सुटायच्या वेळी थोडासा उघडल्यासारखा झाला, म्हणून घरी निघालो तर, पुन्हा धो धो. आम्ही मुलं रस्त्यावरच्या बापूनानाच्या कुडाच्या घरात घुसलो. पावसोबा थांबायचं नावच घेत नव्हता. बाहेर एकदम पाणजंजाळ. दारासमोरची झुरी फू फू करीत वाहत होती. संध्याकाळ होत आली तशी भीती दाटून येऊ लागली. आईच्या आठवणीसोबत रडू येऊ लागलं. अचानक ओट्यावर नाना म्हणजे वडील दिसले. डोक्यावर पोत्याचं घोंगतं. धोतराचा ओचा खोचलेले. एकदम जीवात जीव आला. म्हणत होते, चला रे पोराहो... पावसानं जरासाक दम खाल्ला होता, पण झुरीला मोठा जोर आला होता. आम्ही सगळे नानांना चिकटलो. जमेल तेवढ्यांनी त्यांचे हात घट्ट पकडले. कुणी त्यांच्या बंडीच्या लांब बाह्या पकडल्या तर कुणी धोतराचे ओचे. आमचं लटांबर घेऊन ते झुरीच्या त्या वेगवान धारेत उतरले. मी सर्वात लहान. पाण्याला वेग प्रचंड. अचानक पायाखालची वाळू सरकली आणि पाय अधांतरी झाले. ते वेगवान पाणी मला सोबत ओढू लागलं. त्या ओढीनं नानांचा हात सुटला. त्यांच्या तर ते लक्षातही आलं नाही. तेवढ्यात त्यांच्या बंडीचा लांब खिसा माझ्या हातात आला. त्याला धरून जीवाच्या आकांतानं मी लोंबकळत राहिलो आणि वाचलो. तेव्हापासून पुराच्या गढूळ पाण्याची धास्तीच बसली.
या गढूळ पाण्याचा आणखी एक संदर्भ आहे. लहानपणी कुत्र्यांचं न् माझं मोठं 'प्रेम' होतं. घरचा टॉमी कधी प्रेमानं हातापायाला दात लावायचा, तर शाळेत जाताना रस्त्यावरच्या कुत्र्यांना मी आणि माझी सायकल जणू वैरी वाटायची. ते माझ्या पोटर्यांना लक्ष्य करायचे. त्यावेळी कुत्रा चावला म्हणजे सरकारी दवाखान्यात जाऊन पोटात १४ अँटीरेबीज इंजेक्शन्स घ्यायची शिक्षा असायची. त्यामुळं बर्याचदा कुत्रा चावल्याचं घरी सांगायचो नाही, पण आईला ते बरोब्बर कळायचं. ती भीती घालायची, 'पिसाळलेलं कुत्रं ज्या माणसाला चावतं, तो माणूसही पिसाळतो. इतरांना चावत सुटतो. शिवाय पावसाळ्यातलं पुराचं गढूळ पाणी पाहिल्यावर चांगलं कुत्रंही पिसाळतं. तसंच कुत्रं चावलेला माणूसही गढूळ पाणी पाहून पिसाळतो...' मग मला इंजेक्शन घ्यायला जावंच लागायचं. आताही पूर पाहिला की, आई म्हणायची ती 'गढूळ पाण्याला कुत्रं दचकतं' ही म्हण आठवते.पावसाळ्यात सर्वात मोठ्ठा प्रश्न म्हणजे वाटेचा! एरवीची पायाखालची ती बांधावरची वाट पावसाळ्यात एकदम रुसते. हटून बसते. तिच्या काळ्या मातीचा चिखल एव्हढा चिवट की, त्यातून पाय काढता काढता जीव रंजीस व्हायचा. एका बाजूला खोल ओढा आणि दुसऱ्या बाजूला एका आग्यावेताळाचं शेत. कुठल्याही बाजूला पाय घसरला तरी हरी विठ्ठल! हटवादी शेतकरीदादा वाट नांगरुन तरी ठेवायचा किंवा पेरुन तरी. मग त्यावरून वादावादी. सायकल किंवा मोटरसायकलचं तर पावसाळ्यात कामच नाही. चिखलात अडकलेल्या त्या दोनचाकी वाहनांना खांदा द्यावा लागायचा. नंतर ओढ्यात नेऊन, चिखल काढून सचैल स्नान घालावं लागायचं. ही सगळी यातायात अनुभवून पावसाळ्यात आमच्याकडं यायला लोक टाळायचे.
एका पावसाळ्यात घरी आजी म्हणजे मामाची आई आली. तसा तिला आमचा पाऊस काही नवा नव्हता. आईला इथं दिल्यापासूनचा इथला पाऊस तिच्या ओळखीचा. पण त्या वर्षी पावसानं आजीला आजारी पाडलं. डॉक्टरकडं नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पावसात तिला घेऊन निघालो तर वाट आडवी आली. त्या दिवशी त्या चिखलवाटेनं अंत पाहिला. आजीला उचलत-ठेवत, चिखलातून पाय सोडवत आम्ही कसं बसं दवाखान्यापर्यंत पोहोचलो. डॉक्टरनं तिला पुण्यात हलवायला सांगितलं. तिथं ती गेलीच. आजही पावसाळ्यात त्या वाटेवरुन जाताना आजी आठवते.अर्थात पावसाळ्यात मळ्यातल्या सगळ्याच वाटा उंचच उंच गवतात लपायच्या. दिवाळीच्या आसपास शेतकरी ते गवत जनावरांसाठी कापून नेईपर्यंत त्या दडूनच असायच्या. दोन्ही बाजूंचं गवत कापल्यावर त्या वाटा केस कापलेल्या शाळकरी मुलासारख्या दिसायच्या.
मला आत्ता आठवतंय, पावसाळ्यात गवत माजलेल्या या वाटांवरून अनवाणी जाताना कधीच भीतीबीती वाटली नाही. नाही म्हणजे या वाटेनं वाटलेली एक भीती आठवतेय. पाचवी-सहावीच्या वयात मळ्यात एक मज्जा आली होती. ती म्हणजे कृष्णधवल टीव्ही. हाकेवरच्या सुंदरनानाच्या घरी ती मौजेची वस्तू होती. त्यावरील रामायण, महाभारत, छायागीत, चित्रहार आणि शनिवारचा मराठी सिनेमा यांनी वेड लावलं होतं. रामायण, महाभारत सकाळी वगैरे असायचं. पण छायागीत, चित्रहार, सिनेमा संध्याकाळी लागायचा. त्यावेळेला सुंदरनानाचं घर माणसांनी तुडुंब भरलेलं असायचं. आम्ही पोरं तर पहिल्या रांगेत नंबर लावून बसलेलो असायचो. दोन तीन तास तो स्वर्गीय आनंद लुटल्यानंतर कुणीतरी भानावर आणायचं. तोपर्यंत बाहेर अंधार पडलेला असायचा. बाकीच्या संवंगड्यांची घरं जवळ असायची. माझं घर मात्र दूर ओढ्याकाठी. आसमंतात अंधार भरून राहिलेला, पावसाची रिपरिप, गवतात लपलेली बांधावरची चिखलवाट आणि मनात दाटू लागलेली भीती. अर्थात ही भीतीपाऊस, पूर, चिखलाची किंवा गवतातल्या विंचु-काट्याची नसायची. तर ती आता नाना रागावतील याची असायची.आजकालची पोरं टीव्हीमुळंच बिघडलीत, असं त्यांचं ठाम मत बनलं होतं. त्यांनी कधी तरी छायागीत, चित्रहार वगैरे पाहिलं असावं. पुढं मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणं खरोखरच बिघडलो आणि टीव्हीमध्ये काम करायला लागलो. असो. तर, श्रावणात वगैरे टीव्ही पाहून मी घरी पोहोचे, तेव्हा नाना पोथी वाचत बसलेले असायचे. मी गुपचूप जाऊन साळसूदपणानं ऐकणार्यांमध्ये जाऊन बसायचो. अर्थात त्यापूर्वी आईकडं माझी चौकशी झालेली असायची, पण आईनं काही तरी पानावर पान टाकलेलं असायचं. ते नीट पडलं नसेल तर दुसर्या दिवशी का होईना भरपूर खरपूस मार बसायचा. ती श्रावणझड, ते टीव्ही पाहून परतणं, नानांचं पोथीवाचन आणि त्यांच्या बोलण्या-मारण्याची धास्ती हे सारं पावसाळ्याच्या आठवणींमध्ये गुंफलेलं आहे.
याच काळात कधी करी गोयंद्या अर्थात गोविंद मित्र झाला होता. भोळाभाबडा. कामसू. घरातली, शेती, गुरांची सगळी कामं उरकून रात्री अभ्यासाला यायचा. आम्ही दहावीच्या अभ्यासासाठी एक गोठा साफसूफ केला होता. बाहेर कोसळणार्या पावसाच्या लयीत, कंदीलाच्या उजेडात आमचा अभ्यास चाले. अर्थात अभ्यास गोयंद्याच करत असे. मला थोड्या वेळानं उठव, म्हणून मी ताणून देत असे. तो पहाटेच मला उठवायचा. त्याला गाईंच्या धारा काढायला घरी जायचं असे. जाग आल्यावर मला बाहेरचा पावसाचा आवाज, कंदिलाची धुरकट काळी झालेली काच आणि जागरणाने डोळे तारवटलेला गोयंद्या दिसे. मला त्याची ओढ्याच्या पाण्यानं स्वच्छ झालेली लांबोळकी लालसर अनवाणी पावलं आठवतात. तो तसाच अनवाणी बांधावरच्या गवता-चिखलातून, ओढ्याच्या पाण्यातून, अंधारातून पळत पळत जायचा-यायचा. मी त्याला म्हणायचो, अरे पायात वहाणा-बिहाणा घालत जा. त्यानं एकदा चांभारी वहाणाही घेतल्या, पण त्या तो फक्त शाळेतच वापरायचा. पुढं मुंबईत एका लोकल अपघातात तो गेला. मनातल्या पावसाळ्याला त्याचीही आठवण चिकटलेली आहे. तसा पावसाळा आमच्या सवयीचा. ओढयातलं गढूळ पाणी हळू हळू निवळत जायचं. अखंड नितळ वाहणारी पाण्याची ती धार आमचं जीवन बनायची. ओढाही पावसाळ्यात जणू कात टाकायचा. काठाची झाडं टवटवीत व्ह्यायची. पानांवर थबकलेले पावसाचे थेंब झटकत वार्यासोबत खिदळायची. ओढयाचं ते निव्वळशंख पाणी म्हणजे अखंड मौज. दिवसभर खेळायला दुसरा दोस्त लागायचा नाही. पाण्यात उड्या मारायच्या, डुंबायचं. सायकलीला, म्हशीला, कुत्र्याला अंघोळ घालायची. पाण्यावर गोल गोल फिरणार्या चपळ चमकदार पाननिवळ्या पकडायच्या. पुन्हा पाण्यात सोडायच्या. भांड्यानं पाणी झपाझप उपसून काठाच्या वरंगळतीला फेकायचं. पाण्यासोबत फेकल्या गेलेल्या छोट्या छोट्या माशांची चमचणारी पोट पाहायची. पाण्यात शांत उभं राहून लुचणार्या माशांच्या पिल्लांकडून तळव्यांना गुदगुल्या करून घ्यायच्या.
ओढयाच्या वरच्या अंगाला एक मज्जेचं ठिकाण होतं. भदभदी! म्हणजे छोटा धबधबा. तिथल्या स्वच्छ खडकांवरून वाहणारं ओढ्याचं नितळ पाणी आणि लख्ख ऊन. गोधडया धुवायला यापेक्षा उत्तम जागा नाही. आईला गोधडया धुवू लागायचं केवळ निमित्त. खरी मजा अंघोळीची. आईच्या 'बास रं आता' म्हणण्याकडं दुर्लक्ष करत पाण्यात डुंबायचं. वर येऊन सुकायचं. पुन्हा डुंबायचं-पुन्हा सुकायचं. या खडकावर वाळवलेल्या गोधड्यांना, शाळेच्या कपड्यांना ओढ्याच्या पाण्याचा ओळखीचा गंध येत राहायचा.
पावसानं तुडुंब भरलेल्या रानातल्या विहिरींमध्ये हातपाय भरून येईपर्यंत डुंबणं म्हणजे स्वर्गीय आनंद. मोठी मुलं, माणसं पाण्यात धबाधब टाकत असलेल्या उड्या, मुटके, सूर पाहून पोहायची सुरसुरी यायची. पाण्याचा तो वास, स्पर्श हवाहवासा वाटायचा. एक दिवस मोठा भाऊ आणि त्याचे दोस्त विहिरीत पोहत होते. मी काठावर बसून मज्जा पाहत होते. 'मला पोहायला शिकवा' या माझ्या धोशाकडं दुर्लक्ष करून ते पाण्यात मस्ती करत होते. माझ्या अंगावर पाणी उडत होतं. शेवटी न राहवून मी पाण्यात उडी ठोकली. ते कोणाच्याही लक्षात आलं नाही. विहीरीत पडल्यावर मी खोल खोल गेलो. श्वास घेता येईना. हातपाय हलवायचंही सुचेना. पट्टीचा पोहणारा असलेल्या काळूरामच्या लक्षात आलं न् त्यानं तातडीनं मानगूट पकडून मला बाहेर काढलं. बाहेर आल्यावर मी फारच घाबरलो होतो. तोपर्यंत घरी खबर कळली होती. एरवी माझ्याकडं दुर्लक्ष करणार्या आईनं गेल्या गेल्या खस्सकन जवळ ओढलं आणि मला पोटाशी घेऊन खूप खूप रडली.त्यानंतर मात्र मी पोहायला शिकलोच. अगदी पट्टीचा पोहणारा झालो. मग पावसाळ्यात भरलेली एकही विहीर सोडली नाही. सूर मारून तळाचा दगड वर आणला नाही, अशी विहीर आसपासच्या मळ्यात उरली नाही.
पावसाळ्यात भरलेल्या विहिरींशी संबंधीत एक प्रसंग आठवतो. गणपती विसर्जनाचा दिवस होता. शिवेवरच्या मळ्यातल्या नव्या मोठ्या विहिरीत आम्ही गणपती विसर्जन केलं. पाऊस पडत होता. पावसातच आम्ही विहिरीत पोहू लागलो. काठावर लाउडस्पीकर दणदणत होता. विहिरीला वेढे मारण्याची स्पर्धा सुरू झाली. वरची पोरं मस्तीत आली होती. त्यांनी आमचा वर चढायचा दोर ओढून घेतला आणि ते घरी निघून गेले. आम्ही भानावर आलो तेव्हा वर कसं चढायचं हे समजेनाच. पोहून पोहून हातपाय भरून आले होते. नंतर लक्षात आलं की, पोहण्यात कच्चा असणारा अशोकही आमच्या सोबत होता. त्याची एकदम भिजलेली शेळी झाली होती. काकडल्याने त्याचे दातावर दात आपटत होते. तो थरथरत कसाबसा कपारीला चिकटला होता. पुन्हा पुन्हा पाण्यात घसरत होता. आम्हाला आमच्यापेक्षाही त्याची चिंता वाटू लागली. प्रसंग बाका होता. पाऊस पडतच होता. त्या प्रसंगातून आमची सुटका कुणी केली हे आठवत नाही. पण त्यानंतर विहिरीत पोहणं सुटलंच. बहुदा पुढं शिकण्यासाठी शहरात गेल्यामुळं असेल. नंतर पुढं अशोकच्याही डोक्यावर परिणाम झाल्याचं आणि काही दिवसांपूर्वीच तो गेल्याचंही ऐकलं. अर्थात अशा काही गोष्टी सोडल्या तर, पावसाळ्यात भरलेल्या त्या विहिरींनी दिलेला पोहण्याचा आनंद पुण्या-मुंबईच्या कुठल्याही स्वीमिंग पूलनं दिला नाही.
पावसाळ्यातल्या रानात आनंदाचे आणखी कंद होते. त्यापैकी एक म्हणजे भुईमुगाच्या शेंगा! शेतातून भूईमुग उपटून आणायचा. शेंगा ओढ्यात स्वच्छ धुवायच्या. मग तुळशीच्या ओट्यावर बसून निवांत रवंथ करायचा. पोट आणि मन तुडुंब भरेपर्यंत शेंगा खायच्या. तीच गोष्ट नंतर हरभर्याच्या हिरव्या डहाळयांची. पावसाळ्यातल्या खाण्याच्या अनेक गोष्टी आहे. संततधारेमुळं पीठ-मीठ-तिखट-भाजीचे वांदे व्हायचे. गावात जाता यायचं नाही. अशा वेळी आई जे द्यायची, त्यापुढं पक्वान्न फिकं. तिनं शेतात जाऊन आणलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेच्यासोबत बाजरीची गर्रम गर्रम भाकरी, तांदुळजाची भाजी, उकडलेले कोथिंबीरीचे मुटके, गव्हाचा घाटा, गूळभाकरीचा काला असं काय काय. शाळेतून आल्या आल्या दप्तर घरात फेकायचं. आईच्या नावानं भूक भूक करत शेतात जायचं. तिथं मूग आणि चवळी तरारलेली असायची. त्यांच्या शेंगांचे घोसच्या घोस तोडून तोबरे आणि खिसे भरायचे. त्या शेंगा घरी आणून मीठ टाकून उकडायच्या नि पुन्हा हादडायच्या. होता होता श्रावण यायचा. हिरवी टवटवी, पाखरं, फुलं यांच्या जोडीनं सण यायचे. बांधावरल्या देवाला नैवद्य ठेवायचं काम माझ्याकडं असायचं. पावसानं स्वच्छ अंघोळ घातलेला, हिरव्या गवतात, रानफुलांत बसलेला देव नैवद्य पुढं ठेवला की मोठा प्रसन्न दिसू लागायचा.
श्रावणातली न विसरणारी आठवण म्हणजे पोथी. नागपंचमीला ती घरात सुरू व्हायची. लाल भगव्या कापडात गुंडाळलेला रामविजय ग्रंथ. पोथी ऐकावी ती आमच्या ओढ्याकाठच्या घरातलीच. वडील नाना, भाऊ अण्णा आणि बहिणी वाचायच्या. अत्यंत स्पष्ट, सुस्वर वाचन. वाचन नव्हे गायनच. मल्हार, मालकंस, भैरवीच्या सुरात रामाचा जन्म व्हायचा, तो वनवासाला निघायचा. दशरथाचा मृत्यू व्हायचा. त्या पोथीगायनातील करुणरसानं कालवाकालव व्हायची. रावण, कुंभकर्णाच्या मृत्यूच्या वेळी मनोभावे नारळ फोडायचा. श्रावणात नानांचं पोथीवाचन चाललंय आणि बाहेर पाऊस पडतोय, हे दृश्य माझ्या मनावर कोरलं गेलंय. अजूनही पाऊस पडू लागला की मला त्यात हे पोथीगान ऐकू येतं.
ओढयाकाठच्या या पावसाच्या किती किती आठवणी आहेत. आषाढी वारीवरून चिंब भिजून परतलेले वडील. आम्ही पोरं झोपेतच उठून त्यांच्या पाया पडतोय. भर पावसात म्हैस व्यालीय. तिचं पारडु थंडीनं काकडतंय. त्याला म्हशीसमोर ठेवताच म्हैस तिच्या खरखरीत जीभेनं आपला हात चाटतेय. शाळेच्या वाटेवर पावसानं भिजलेली झाडं वेली हलवून मित्रांच्या अंगावर उडवतोय. रानात गुरं जिकडं जातील तिकडं त्यांच्या मागं फिरतोय. बालभारतीच्या पुस्तकातला भा. रा. तांबेंच्या कवितेतला पिवळ्या उन्हाचं सोनं वाहून नेणारा ओढा तासनतास् न्याहाळतोय त्याच्या खळाळाच्या तालावर म्हटलेल्या कविता रानभर घुमतायत.
आम्हा सहा भावंडांचं बालपण या ओढ्याकडेच्या रानातल्या घरी गेलं. या घरानं पावसाच्या, झाडं पाखरांच्या सोबत राहायची सवय लावली. त्यामुळं शिक्षण-नोकरीच्या निमित्तानं शहरात गेल्यावर जुळवून घेणं अवघड गेलं. नंतर सरावलो. आता आम्ही भावंडं मुंबई-पुण्याकडं राहतो. घरी असलेला भाऊ पावसाळ्याची ती रस्त्या-बिस्त्याची भानगडच नको म्हणून गावात घर बांधून राहतो. काही दिवसांपर्यंत आईवडील मळ्यातल्या घरात राहायचे. दोघेच. पण पावसाळ्यात गैरसोय नको म्हणून तेही गावातल्या घरी राहायला गेले. अजूनही मळ्यात घर आहे. ओढा आहे. शेत आहे. झाडं आहेत. पाऊस तसाच पडतो. ओढा वाहतो. झाडं आणि पिकं हिरवाईनं नटतात. पण ओढ्यात कुणाचं बालपण मस्ती करत नाही. गोठ्यात म्हैस आणि तिचं पारडू नाही. कुत्र्या मांजरांनी आपापले आसरे शोधलेत. शेतात भुईमूग, मूग, चवळी डवरून येते, पण त्यांच्या शेंगा कुणी तोडत नाही. त्या ओढ्याच्या पाण्यात धुवून तुळशीच्या ओट्यावर बसून कुणी रवंथ करत नाही.खूप आठवण झाली म्हणून एक दिवस एकटाच गेलो. ओढ्याकडंच्या घरी. पाऊस पडून गेला होता. पक्षी किलबिलत होते. घर मात्र एकटं उभं होतं. शांत. भोवताली गवत माजलं होतं. अंगणात पानं, पाचोळा साचला होता. मी शेतात गेलो. भुईमुगाचा पाला उपटून आणला. त्याच्या शेंगा ओढ्यात धुतल्या. वर आलो. तुळशीच्या ओट्यावर बसलो. मनसोक्त शेंगा खाल्ल्या. मग मला फार फार भरून आलं. ओढ्याकाठी पुन्हा खूप पाऊस पडला.