सोशल मीडियात काम करणार्या आमच्या काही सहकार्यांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित मांडणारी 'आपला महाराष्ट्र' नावाची वेबसाईट सुरू केली. जुलै २०१४च्या आषाढी वारीला त्यांच्यासाठी मी हा लेख लिहिला...
गंमत वाटेल
पण, सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या सोशल मीडियाचा पूर्वावतार शेकडो वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात नांदतो आहे. शिवाय तो एवढा प्रभावी आणि लोकप्रिय आहे की, आताचं फेसबुक, व्हाटस्अप, ट्विटर इ. त्यापुढं फिकं पडेल. या नेटवर्कमध्ये सामील
होण्यासाठी कुणी कोणाला आवर्जून रिक्वेस्ट पाठवत नाही, की मेसेज.
एका ठराविक तारखेला आपोआप माणसांचे ग्रुप एकत्र येतात. उराउरी भेटतात, गातात, नाचतात, खेळतात, चालतात, पळतात...
या ग्रुप्सच्या अॅक्टिव्हिटीज् किमान
गेली साडेसातशे वर्षे सुरू आहेत. एक पिढी गेली की, दुसरी पिढी अॅटोममॅटिक त्यात सामील होते.
यात इंटरनेट, मोबाईलची रेंज नसणार्या दूरवरच्या खेडोपाड्यातील, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील
गोरगरीब, निरक्षर माणसं
तसेच मेट्रोसीटीतील उच्चशिक्षित आणि परदेशी स्कॉलरही सहभागी होतात. तुमच्या लक्षात आलं असेल मी महाराष्ट्रातील वारकरी परंपरेविषयी बोलतोय...
पंढरपुरातील संत नामदेव आणि आळंदीतील संत ज्ञानदेव या दोस्तांनी हे भलंमोठं नेटवर्क उभं केलं.
समाज कल्याणाच्या एका उदार जाणीवेतून त्यांनी हे व्यापक 'सोशल इंजीनिअरिंग' उभं केलं. त्याला कारणही तसंच होतं.
तेराव्या शतकात सर्वसामान्यांना न परवडणारी हजारो व्रतवैकल्ये करावी लागत होती.
देवाची भक्ती करणं
म्हणजे महाकठीण काम झालं होतं. मध्यस्थ वा दलालांशिवाय देव भेटूच शकत नाही,
असा समज करून
दिला गेला होता.
शिवाय त्याला जात-पात, सोवळं-ओवळं
याचं झेंगटही चिकटलं होतंच. त्यातून गोरगरीबांची सुटका करण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून नामदेवांनी वारकरी पंथाची स्थापना केली.
त्यासाठी तत्कालीन शैव, वैष्णव, बौद्ध, जैन,
मुस्लिम, महानुभव, सूफी,
लिगायत अशा विविध
धर्म, पंथातील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या. वारकरी पंथात सामील होण्यासाठी अगदी साध्यासुध्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे दररोज अंघोळ, स्वच्छ कपडे, कपाळी टिळा,
गळ्यात तुळशीमाळ आणि मुखात देवाचं नाम.
बस्स्.
जपतप, यज्ञ,
संन्यास, मोक्ष, मुक्ती अशी काहीही भानगड
नाही. महागड्या काशीगंगा यात्रेऐवजी पंढरपूरचंद्रभागेची पायी यात्रा, अशा वारकरी पंथातील सोप्या, स्वस्त गोष्टी लोकांनी चटकन् स्वीकारल्या. बरं, त्यांचा देवही
असा की, काळा
दगड. हातात कुठलीही शस्त्रास्त्रं नाहीत. केवळ
कमरेवर हात ठेवून
आपला शांत चित्तानं उभा. त्याला फक्त
पानफूल वाहायचं, की झालं. असा हा सगळा परवडेबल मामला.
संत नामदेवांनी अतिशय दूरदृष्टीनं वारीच्या माध्यमातून हा पंथ विस्तारला. त्यात लाखो लोकांना जोडून घेतलं. इथं सर्व धर्मांचे, जातींचे, गोरगरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष
राहतात. त्यांच्या भाषा, खाणंपिणं, इतिहास, भूगोल,
संस्कृती भिन्न आहेत.
त्यांनी एकमेकांत भांडणतंटा, भेदभाव न करता गुण्यागोविंदान राहावं म्हणून नामदेव-ज्ञानोबांनी प्रयत्न केले. कोणाही जातीच्या, वर्गाच्या मनात कमीपणाची भावना राहू
नये, त्यांनाही आपल्या आत्मशक्तीचा प्रत्यय यावा
म्हणून प्रत्येक जातीतून संत घडवले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे
तर कन्याकुमारीपासून आताच्या अफगाणिस्तानपर्यंत होऊन
गेलेल्या सर्वच संतावर या वारकरी पंथाचा प्रभाव आहे.
या संतांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी त्यांचे मानवकल्याणाचे विचार
लिहून ठेवले. हे विचार वर्षानुवर्षे टिकावेत, त्यांचा सहज प्रसार व्हावा म्हणून संत नामदेवांनी अभंग नावाचा एक काव्यछंद शोधून काढला.
या अभंगछंदाची रचना अशी की, कोणीही सोपी चाल लावून,
टाळी, टाळ, पखवाज
यांच्या ठेक्यावर हे अभंग म्हणू शकतो.
अभंगातील सोपे शब्द,
चाल आणि ठेका
याचा एकत्रित परिणाम असा झाला की, संतांचे हजारो अभंग
अगदी निरक्षर माणसांचेही तोंडपाठ झाले. मानवी
सुख-दु:ख अटळ आहे. त्यावर मात करत, परस्परांवर प्रेम करत जीवन
जगावे असा या अभंगांतील संदेश घेत-देत, गात, नाचत
वारकरी पंढरपूरला जातात. भजन, कीर्तन, गवळण,
भारूड, ओव्या, आरत्या आदी वारक-यांच्या अविष्काराचे अनेक लोकप्रिय उपप्रकार आहेत.
यामधील सोशल
मेसेज एवढा स्ट्राँग की त्यातूनच रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी
यांच्यासारखे द्रष्टे समाजपुरुष घडले.
महाराष्ट्रात हा वारकरी पंथ एवढा
रुजला आहे की, समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे
म्हणतात, 'महाराष्ट्राची व्याख्याच करायची झाली तर जो वारी करतो तो महाराष्ट्र' अशीच करावी
लागेल.
हा सोशल
मीडिया दिवसेंदिवस विस्तारतो आहे,
लोकप्रिय होतो आहे.
कारण तो लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेला मीडिया आहे.
No comments:
Post a Comment