सध्या मुंबई 'जनशक्ती'चे कार्यकारी संपादक असणारे आमचे मित्र पुरुषोत्त्तम आवारे पाटील गेल्या काही वर्षांपासून रोखठोक नावाचा दिवाळी अंक ठोकून चालवितात. २०१३चा अंक नक्षलवादावर होता. त्यात मी माओ त्से-तुंगवर लिहिलं होतं...
भर मे महिन्यात निसर्गरम्य दार्जिलिंगमधल्या सिलीगुडी परिसरातली जवळपास ६० खेडी पेटून उठली होती. एरवी डोंगरखोर्यांत जगाच्या नजरेआड जगणारे संथाळ, ओराओं, मुंडा, राजवंशी आदी आदिवासी हातात बंदुका नाचवत घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा होत्या, ‘माओ त्से-तुंग झिंदाबाद’.. ‘सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’... ‘बंदुकीच्या नळीतूनच क्रांती जन्माला येते’... आदिवासींच्या या उठावामागे होती मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाची नक्षलबारी शाखा. विशेष म्हणजे या शाखेने या आंदोलनात मध्यवर्ती पक्षाला डावलले होते. ही सगळी खेडी चीनच्या सरहद्दीजवळ असल्याने सगळ्या देशाचे लक्ष तिकडे लागले होते. साल होते १९६७!
पोलिसांनी या बंडाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला खरा पण, तेव्हा देशाच्या एका कोपर्यात पडलेल्या त्या आगीच्या ठिणगीने आज देशातील १० राज्ये आणि ८२ तालुके पेटवलेत. त्या वणव्याला म्हणतात, 'नक्षलवाद!' या शब्दाचा इतिहास काहिही असो पण, भारतात त्याला समानअर्थी शब्द आहे, 'माओवाद!' माओ त्से-तुंगचे भक्त म्हणजे 'नक्षलवादी!' हा माओ म्हणजे आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी आणि लेनिन-मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता. श्रमिक, कष्टकरी समाजाचे राज्य आणण्याच्या घोषणा देत चीनवर एकछत्री अंमल बसवणारा कम्युनिस्ट नेता. पुढे जगभरातील हुकुमशहांमध्ये ज्याची गणना अग्रभागी होऊ लागली त्या माओची जडणघडण मात्र लोकशाहीवादी विचारांत झाली.
२६ डिसेंबर १८९३ रोजी माओ हुनान प्रांतातील शाव-शान या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मला. वडिलांसोबत तो शेतीत राबला. आजोळी माध्यमिक शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथे त्याची कथा, कादंबरी आदी साहित्य आणि वृत्तपत्र लेखनाशी परिचय झाला. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरीत होऊन १९११ च्या क्रांतियुद्धात तो स्वयंसेवक म्हणून लढला. शिक्षण घेत असताना त्याने हक्सली, मिल, डार्विन, एडम स्मिथ आदी विचारवंतांचे साहित्य वाचले. त्यामुळे त्याला आधुनिक पाश्चात्त्य विचारप्रवाहांचा चांगला परिचय झाला. यानंतर काही काळ त्याने पीकिंग विद्यापीठाच्या ग्रंथालयात कारकून म्हणून काम केले. अध्यापन विद्यालयात शिकत असताना त्याने विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामाचे पहिले धडे गिरवले. माओने १९१९ मध्ये स्यांग-ज्यांग-फींग-ल्वुन- हे मासिक काढले. त्यात त्याने छांगशाचा लष्करी गव्हर्नर जांग ज्यींग-याव याच्या अन्याय्य कारभारावर कडक टीका करणे सुरू केले. अर्थात त्याला त्यामुळे तेथून पळ काढावा लागला. याच काळात विद्यापीठाचे ग्रंथपाल ली दा-जाव यांच्याशी माओचा घनिष्ट संबंध आला. त्यांच्यामुळेच त्याचा मार्क्स-लेनिन वगैरेंच्या लिखणाशी आणि ओघानेच कम्युनिस्ट चळवळीशी संबंध आला. त्यानंतर तो या चळवळीत सक्रीय सहभागी झाला.
शांघाय येथील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १९२१मधील पहिल्या अधिवेशनाला माओ हुनान प्रांताचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता. हुनान शाखेचा चिटणीस म्हणून त्याने पक्ष प्रचाराचे काम केले. एका खाणीत संप घडवून आणल्यामुळे त्याच्यावर पकड वॉरंट निघाले. त्यामुळे तो शांघायला सटकला.
या काळात जगभरातील कम्युनिस्ट चळवळ रशियातील पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालत असे. अविकसित देशांतील कम्युनिस्टांनी तेथील राष्ट्रवादी पक्षांशी सहकार्याचे धोरण ठेवावे, ह्या लेनीनच्या तत्त्वानुसार माओने काही काळ क्वोमिंतांग या पक्षाचे काम केले. त्या माध्यमातून त्याने शेतमजुरांच्या संघटना उभारण्यास प्राधान्य दिले. जमीन वाटपाचा प्रश्न सुटल्याशिवाय उद्योग आणि व्यापार यांचा विकास होणार नाही, असे या काळात त्याचे ठाम मत बनले. त्यावर ‘हुनानमधील शेतकरी चळवळीचा अहवाल’ हा लेखही त्याने प्रसिद्ध केला. शहरांमधील कारखान्यांतील संघटित कामगार कोणत्याही देशात कम्युनिस्ट क्रांती घडवून आणू शकतील, असा रशियामान्य सिद्धांत होता. नेमका त्याविरुद्ध ‘संघटित शेतमजूरच चीनमध्ये क्रांती घडवून आणतील’, असे माओने त्याच्या अहवालात म्हटले. त्यावरून चिनी कम्युनिस्ट पक्षात १९२७ मध्ये वादंग माजला. माओचे मत फेटाळण्यात आले. यानंतर क्वोमिंतांग शासनाने कम्युनिस्टांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाची दाणादाण उडाली. तरीही कम्युनिस्ट पुढारी मॉस्कोच्या सूचनांनुसार शहरी कामगार संघटनांच्या माध्यमातून क्रांती घडवण्याची भाषा बोलत होते. माओने मात्र गनिमी काव्याचा आधार घेतला. हुनान किआंगसी प्रांताच्या सरहद्दीवरील दऱ्या-खोऱ्यात त्याने आपले कम्युनिस्ट सैन्य गोळा केले. तेथून तो चळवळीची सूत्रे हलवू लागला. माओच्या संघटना कौशल्यामुळे चीनच्या या भागात जणू लहान लहान स्वायत्त कम्युनिस्ट राज्येच निर्माण झाली.
माओने जनयुद्धाचे तंत्र अवलंबले. शस्त्रास्त्रे आणि त्यांचे संपादन यापेक्षा क्रांतीच्या राजकीय विचार-प्रणालीने प्रभावित झालेल्या मनुष्यबळाला त्याने अधिक महत्त्व दिले. सरंजामशाहीविरूद्ध चळवळ उभी करणे हेच माओचे मुख्य ध्येय बनले.
सत्ताधारी चँग कै-शेकने मात्र कम्युनिस्टांना संपवण्याचा विडाच उचलला. सुमारे तीन लाख सैन्याने घेरले असता ३६८ दिवसांत सुमारे साडेनऊ हजार किलोमीटरचे अंतर कापून, अनेक हाल अपेष्टांना तोंड देऊन कम्युनिस्टांनी शन्सी प्रांतातील दर्याखोर्यांत आणि गुहांत आपली ठाणी प्रस्थापित केली.
माओ-त्से-तुंगला युद्धाद्वारे केवळ प्रस्थापित राजकीय सत्ता नष्ट करायची नव्हती तर, व्यापक सामाजिक क्रांती घडवून आणावयाची होती. माओच्या मताप्रमाणे चिनी क्रांती ही मुख्यत: शेतकर्यांची क्रांती आहे. शेतकरी हाच माओचा गनिमी सैनिक आहे. शेतकरी आणि सैनिक यांच्यात त्याने फरक केला नाही.
गनिमी युद्ध लढतानाही माओने काही सूत्रे मांडली होती. निश्वित राजकीय ध्येय, या ध्येयात जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित व्हाव्यात, सैनिकांची शिस्त स्वयंस्फूर्त असावी, सैनिक आणि जनता यांच्यात एकजूट असावी म्हणजे जनता ही सागरासारखी असून गनिमी सैनिक हे त्यातील माशांप्रमाणे असावेत.
गनिमी सैनिकांची भरती करताना माओने जनतेमधून गनिमी दल उभे करणे, शेतकऱ्यांनाच सैनिक बनवणे, शत्रुसैन्यातून फुटून आलेल्यांना सामावून घेणे, लुटारू-दरोडेखोरांनाही सामावून घेणे, स्त्रियांची लढाऊ दले तयार करणे अशा बाबींवर भर दिला.
अखेर कम्युनिस्टांच्या चिवट आणि गनिमी काव्यापुढे शैकचा पराभव झाला. हा २२ वर्षांचा चीनचा इतिहास म्हणजे माओच्या ध्येयधोरणांची कथाच आहे. यांपैकी १० वर्षे माओ कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष आणि राष्ट्रप्रमुख होता. साहजिकच चिनी प्रजासत्ताकाची उभारणी करण्याचे बरेच श्रेय त्याच्याकडेच जाते.
माओने अमेरिकेशी जुळते घेण्याच्या ख्रुश्चेव्ह नीतीला कसून विरोध केला. त्याने ‘लाल सैनिक’ आणि चिनी ‘जन मुक्तिसेना’ यांच्या मदतीने ‘सांस्कृतिक क्रांती’ घडवून आणली आणि चिनी कम्युनिस्ट पक्षातील विरोधी गटांचा बीमोड केला. चीनमध्ये माओवादाचा विजय झाला. त्यामुळे जवळजवळ अर्धशतक चीनवर माओचाच एकछत्री अंमल राहिला. या काळात त्याने अनेक अभिनव प्रयोग जनतेच्या गळी उतरवले. प्रभावी प्रचारतंत्र, दडपशाही, परिश्रम इत्यादींच्या बळावर त्यांनी चीनची नवनिर्मिती सुरू केली.
जमीनदारी, अज्ञान, गरिबी, उपासमार, रोगराई हे शतकानुशतके चीनचे प्रमुख प्रश्न होते. त्यामुळे शिक्षणप्रसार, रोगनिर्मूलन, कृषिविकास आणि औद्योगिकीकरणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या. सामाजिक सुधारणा व सांस्कृतिक विकासाकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. प्रजेला पोटभर अन्न पुरविण्यासाठी सरंजामदारी नष्ट करून जमिनीच्या फेरवाटणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जमिनीचे सामाजिकरण करण्यात येऊन कम्यूनमार्फत कृषिउत्पादन होऊ लागले. नागरिकांचे आरोग्य सुधारण्याकडेही लक्ष पुरविण्यात आले. पाश्चात्त्यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी प्रार्थना मंदिरांमध्ये चिनी धर्मगुरूच नेमले गेले, त्यामुळे परदेशी मिशनऱ्यांना चीन सोडावा लागला.
रशियाच्या सहाय्याने अनेक प्रकल्प राबवण्यात आले. शिक्षणक्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यात आला. पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला. शतकानुशतके कन्फ्यूशसच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला आणि पाश्चात्त्यांच्या संपर्काने भांबावलेला परंपरावादी चिनी समाज संपूर्णपणे बदलून माओप्रणीत समाजवादी तत्त्वज्ञान अंगी मुरलेला नवा समाज निर्माण करण्यासाठी चीनमधील कुटुंबपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे कम्युनिस्टांनी ठरविले. त्यासाठी स्त्रीदास्यविमोचनाचा कार्यक्रम त्यांनी आखला. स्त्रियांवरील परंपरागत बंधने नष्ट करून त्यांना पुरूषांच्या बरोबरीने सर्व हक्क बहाल करण्यात आले.
नवसमाजनिर्मितीच्या कार्यास साहित्यादी कलांचीही मदत व्हावी, म्हणून कलावंतांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. मात्र ती कलाकृती कम्युनिस्टांच्या निकषावर तपासून घेण्याची दक्षता घेण्यात आली.
ऑगस्ट १९५८ मध्ये हाती घेण्यात आलेली कम्यूनच्या स्थापनेची चळवळ म्हणजे माओवादी समाजाचे आदर्श ग्रामीण स्वरूप होय. अनेक खेडी व सामूहिक शेती संघ, उद्योग व शासन यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे कम्यून. प्रत्येक कम्यून एक छोटे लोकशाही संस्थानच. यात शेती, धान्यवाटप, पगार वगैरे जनमताने चालावेत अशी सोय केली गेली. टीकाकारांनी कम्यून म्हणजे मोठे तुरूंग आहेत, अशी टीका केली.
माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकर्यांना वाटण्यास सुरूवात केली. अर्थात हे करताना चीनमध्ये प्रचंड रक्तपात झाला.
भारतातील माओवाद्यांना चीनमधील हीच क्रांती इथेही आणायची आहे. त्यासाठी त्यांनी योजना तयार केली आहे. त्यामधील काही मुद्दे असे आहेत -
- सध्याची राजकीय, आर्थिक आणि संपूर्ण सांस्कृतिक व्यवस्था नष्ट करून त्या जागी नवीन माओवादी व्यवस्था स्थापन करणे.
- शस्त्रबळावर राजकीय सत्ता कब्जात घेणे. बंदुकीतूनच सत्ता प्राप्त करणे. त्यासाठी माओवादी लष्कर उभारणे. त्यामाध्यमातून प्रदीर्घ लढा उभारणे.
- जिथे सरकार कमजोर आहे, अशा दुर्गम भागात प्रथम आपले सुरक्षित तळ उभारणे. नंतर शहरांना वेढा घालून, शहरे तसेच ग्रामीण भाग ताब्यात घेणे.
- समाजाला प्रेरित, एकत्रित करून, लढाईत सहभागी करून घेणे. हेच प्रदीर्घ युद्धाचे स्वरूप असेल.
- माओवादी पक्ष, लष्कर आणि अनेक माओवादी फ्रंट संघटनांची संयुक्त आघाडी ही तीन हत्यारे. माओवादी पक्ष हाच लष्कर आणि संयुक्त आघाडीचे सूत्रसंचालन करेल.
- कामगार, शेतमजूर आणि शहरी मध्यमवर्ग यांना संघटित करून माओवादी संघटना स्थापन करणे. विविध माओवादी फ्रंट संघटनांना एकत्र करून माओवादी संघटनांची संयुक्त आघाडी स्थापन करणे.
- माओवादी क्रांतीसाठी समाजाला संघटित करणे हाच माओवादी संयुक्त आघाडीचा प्रमुख उद्देश.
- युद्ध हेच संघर्षाचे मुख्य स्वरूप आणि माओवादी लष्कर हीच मुख्य संघटना. फ्रंट संघटना आणि जनआंदोलनाने युद्धाला मदत करणे अभिप्रेत आहे.
- युद्धात नवीन सैनिकांची भरती आणि इतर सर्व प्रकारची मदत करणे हा माओवादी फ्रंट संघटनांचा उद्देश.
- माओवादी पक्षात आणि लष्करात सतत नवीन भरती होत राहावी म्हणून समाजातील विशिष्ट घटकावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी स्त्रिया, दलित, आदिवासी आणि मुसलमान या सामाजिक घटकांकडे लक्ष देणे.
- विविध संघटनांच्या माध्यमातून वरील घटकांची अनेक जनआंदोलने सुरू करणे. विशेषत: दलितांवर लक्ष केंद्रीत करणे. त्यांच्या नेत्यांचा संधिसाधूपणा उघड करणे.
- काश्मीर आणि ईशान्य भारतातील फुटीरवादी संघटनांना खंबीर समर्थन देणे. या संघटनांच्या स्वयंनिर्णयाच्या आणि भारतापासून स्वतंत्र होण्याच्या अधिकाराला मान्यता देणे. त्यांना एकत्र करून एक लढाऊ संयुक्त आघाडी उभी करणे.
आता, हे विचार ज्या माओकडून घेतले गेले तो माओ प्रत्यक्षात जे जगला ते जगातील कुठल्याही क्रूर हुकुमशहापेक्षा कमी नव्हते. उलट काकणभर अधिकच होते.
सैन्यात भरती होण्यासाठी शेतकर्यांना शेतजमीन देण्याची लालूच दाखवणार्या माओने नंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतमालकांना आणि श्रीमंतांना झोडपून काढण्यासाठी शोषित वर्गाला चिथावणी दिली. त्यात लाखो हत्या झाल्या. नवीन राज्यघटनेत कागदोपत्री सर्व नागरिकांना समान हक्क, विचार, विहार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले गेले. प्रत्यक्षात मात्र माओने लोकशाहीचा खूनच केला. टीका करणार्यांचा बिमोड केला. पत्रकारितेवर कुर्हाड चालवली. राष्ट्रासाठी जनतेला त्याग करायला सांगणार्या माओने स्वतः मात्र अमर्याद राजेशाही सुखे उपभोगली. स्वतःसाठी तब्बल ५४ प्रासाद बांधले. घटस्फोट घेणे हे पाप असल्याचे सांगणार्या माओने स्वत: कमालीचा स्वैराचार केला.
पीपल्स लिबरेशन आर्मी या जगातील सर्वात मोठ्या लष्कराच्या बळावर आपली सत्ता अबाधित ठेवली. अमानुष छळ करणार्या कैद्यांच्या छळछावण्या उभारल्या.
माओने १९५१मध्ये कोरियन युद्धात साम्यवादी किम जाँगला पाठिंबा दिला. त्यातून उत्तर कोरियाला झुकवले. लोह उत्पादन वाढवून चीनला महासत्ता बनवणे आणि सामुदायिक शेती हे त्याचे दोन्ही प्रयोग फसले. यात लाखो लोकांना जीव गमवावा लागला. समाजातील बुद्धीजीवी वर्गाला दडपशाहीच्या वरवंट्याखाली आणले.
चीनमधील प्रत्येक गोष्ट भव्य दिव्य करण्याचा त्याने प्रयत्न केला. तिआनमेन हा हा जगातला सर्वात मोठा चौक करण्यासाठी त्याने हजारो घरे बळजबरीने जमीनदोस्त केली. तिथे १०० एकर मैदान तयार केले. मैदानाच्या पश्चिमेला १० हजार आसनक्षमतेचे जनता दालन बांधले. १९६६मधील सांस्कृतिक क्रांतीमध्ये शांघायमधील बुद्ध पॅगोडावरही टाच आली.
भारत आणि त्याच्या संबंधाबद्दल बोलायचे म्हटले तर, १९३५मध्ये माओचे लाल सैन्य जपानी आक्रमकांशी झुंज देत असताना त्यांची सेवा करण्यासाठी भारतीय डॉक्टर्स तिकडे गेले. नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डॉ. द्वारकानाथ कोटणीस तिथे गेले. त्यांच्या कामाबद्दल माओने त्यांचे आभारही मानले. अर्थात याच चीनने १९६२मध्ये भारतावर एकतर्फी आक्रमण करून भारताचा १५ हजार चौरस मैलांचा मुलुख ताब्यात घेतला.
१९७६ साली ८२ वर्षीय माओचे निधन झाले. त्याच्या इच्छेनुसार लेनिनप्रमाणेच त्याचे शव रासायनिक संस्कार करून तियानमेन चौकात काचेच्या पेटीत ठेवण्यात आले.
सध्या चीन जगातील दुसर्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहे. त्याचे श्रेय जाते डेंगने खुल्या केलेल्या अर्थव्यवस्थेला. त्याने पहिल्यांदा माओच्या विचारांना, त्याच्या ‘सर्व सरकारी मालकीचे’ या तत्त्वाला तिलांजली दिली. त्यामुळेच चीन महासत्ता बनला.
भारतात माओच्या विचारांतून क्रांती आणू पाहणार्यांनी माओवादाच्या या प्रवासाकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment