डोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून कीर्तनकार उभा राहावा तसा. उंच. पंचक्रोशीतून दिसणारा. दिसला तरी आधार वाटणारा, शेंद-या! शनिवारी शेंदरात खुलणा-या हनुमानासारखा हा वैशाखात शेंदरी रंगाच्या आंब्यांनी लगडायचा. म्हणून त्याचं नाव शेंद-या.
शेंद-या पाडाला लागल्याची पहिली खबर लागायची, पोपटांना आणि दुसरी मळ्यातल्या पोरांना. मग शेंद-याखाली उभं राहून एका सुरात ‘पड पड आंब्या, गोडांब्या’ची आळवणी सुरू व्हायची. या विणवण्याचं कारण याचं ‘आह्यागमनी’पण. उंचावरील कै-या भिरकावलेल्या दगडाच्याही टप्प्याबाहेर. पट्टीच्या आंबे उतरणा-यांनाही त्याच्यावर चढायची कधी छाती झाली नाही. पोपटांना मात्र रान मोकळं होतं. त्यांचे हिरवे थवे शेंद-यावर दिवसभर कलकलाट करायचे. त्यांना कोवळ्या कै-या भारी आवडत. त्यांनी खाऊन टाकलेल्या अर्ध्या कै-या पोरं मिटक्या मारीत खात. शिवाय त्यांच्या चोचीतून सुटलेले पाड मटकावण्यासाठी मोठी स्पर्धा लागायची. लाल-शेंदरी पाड कावळ्यांनाही ‘खाद्य’ वाटायचं. मग कावळेबुवाही एखादा पाड पळवत. विहिरीच्या थारोळ्यावर बसून खायला सुरुवात करत. पण हा आपला ‘जिन्नस’ नाही, हे लक्षात आल्यावर सोडून देत.