'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 16 January 2011

फौजी रगडा

२६ जानेवारी. दिल्लीत राजपथावर लष्कराचं शानदार संचलन सुरू आहे. टीव्हीवर पाहूनच अंगावर रोमांच उठतायत. आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. ९५च्या जानेवारीत मीही राजपथावर होतो.  त्याचा अनुभव लोकमतच्या 9 डिसेंबर 2003च्यामैत्र पुरवणीत लिहिला होता.     


दरवर्षी हिवाळा आला की लष्करी शिस्त आठवते. दिल्लीच्या हुडहुडी भरवणा-या थंडीत लष्करासोबतच्या कवायती. प्रजासत्ताक दिन संचलन अर्थात आरडी परेडचा सळसळता उत्साह. राजधानीतला तो लष्करी रुबाब अनुभवण्यासाठी एनसीसी कॅडेट जीवाचं रान करतात.
रिपब्लिकन डे परेड कॅम्प नवी दिल्लीत सुरू होतो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. गॅरिसन परेड ग्राऊंड परिसरात. आरडी परेडमध्ये सहभागी होणा-या भारताच्या निवडक सैन्यदलानंही इथंच डेरा टाकलेला असतो.
कॉलेजातले निवडकजण एनसीसीत सिलेक्ट होतात. रविवारच्या परेडला खाकी ड्रेसमध्ये लाल तु-याची कॅप घालून ऐटीत जायचं. पण खरा फौजी रगडा अनुभवायचा तो दहा दिवसांच्या वार्षिक शिबिरात. एरवी कॉलेजात टगेगिरी करणा-या दादांना कॅम्पातलं लष्करी जीवन सोसवेनासं होतं. एनसीसी कॅडेट अशा शिबिरांचा कळस मानतात, ते आरडी कॅम्पला. २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशातील १६ एनसीसी निदेशनालयात असतात, हजारो कॅडेटस्. त्यातून आरडी परेडसाठी सिलेक्ट होतात, बाराशे! हे कॅडेट असतात, पायदळ, नौसेना आणि वायुसेनेचं प्रतिनिधित्व करणारे. हे कॅडेट कॉलेज आणि हायस्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतात. यातून २६ जानेवारीच्या मिलिटरीसोबतच्या राजपथ परेडसाठी निवडकांनाच संधी मिळते. हा त्यांच्यासाठी सुवर्णक्षणच. आयुष्यभर जपून ठेवावेत असे.

धुके आणि थंडीच्या दुलईत लपेटलेला राष्ट्रपती भवनाचा परिसर. उगवतीची सूर्यकिरणं राजधानीला स्पर्श करीत असतानाच वायुदलाची हेलिकॉप्टर्स वैभवी राजपथावर फुलांची उधळण करीत येतात. राजपथाच्या दोन्ही बाजूंना तिरंगे फडकत असतात. देशविदेशातील नागरिक भारताचं लष्करी वैभव नजरेत साठविण्यासाठी दुतर्फा थांबलेले असतात. वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे राजपथावरील जोश आणि होश टिपण्यासाठी ताटकळलेले असतात. बँडच्या तालावर लयबद्धरित्या चाललेले जवानांचे चौकोन टीव्हीवर पाहताना डोळ्यांची पारणं फेडतात. पण परेडमध्ये असलेल्या जवानांसाठी ती असतो अग्निपरीक्षा. चकाचक पॉलीश, ब्रासो, कडक इस्त्रीचा गणवेष आणि लष्करी आभूषणांनी सजवलेला टर्नाऊट सांभाळत गनसह करायच्या परेडसाठी कित्येक महिने अक्षरश: घासलेले असतात. विजय चौकापासून दोनेक किलोमीटरपर्यंत जाईपर्यंत दमणुकीची सीमा होते. टाचेवर चालताना गुडघे टेकीस येतात. सलामी मंचापर्यंत येईपर्यंत फक्त शरीर यंत्रवत चालत असतं. सलामी मंचाच्या दहा फूट अलिकडे पाठीमागच्या बँडची धून बदलते. परेड कमांडरची ऑर्डर वातावरण भेदीत जाते. आणि डोकं खाडकन् भानावर येतं. सारे जहाँसे अच्छाच्या सुरावटी अंतरंगात जावून भिडतात. सर्वांगावर रोमांच उभे राहतात. निवेदकाचे स्फूर्तीदायी शब्द रक्ताचा थेंब न् थेंब जागा करतात. सॅल्यूटची सहा पावलं..डोळ्यासमोर लहरणारा तिरंगा..मानवंदना स्वीकारणारे व्हीआयपी..  याजसाठी केला होता अट्टाहास अशी अवस्था.इंडिया गेटवर अव्याहत तेवणा-या अमर जवान ज्योतीसमोर आग ओकणारे रणगाडे आणि बंदुका नतमस्तक होतात. शहीद जवानांची स्मृती जपणारे इंडिया गेटचे दगडी चिरेही धीरगंभीरपणे सलामी स्वीकारतात. यानंतर जल्लोष..कृतार्थतेचा. यातील अभिमानाची बाब अशी की, दरवर्षी राजपथ मार्चसाठी महाराष्ट्राचेच कॅडेट सर्वाधिक सिलेक्ट होतात. महाराष्ट्र टीममधील जवळपास सगळ्याच मुली राजपथावर असतात. आरडी परेड सुरू झाल्यापासून सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्याच टीमनं बाजी मारली आहे. सर्वाधिक वेळा पंतप्रधानांच्या हस्ते बॅनर स्वीकारला आहे. वर्षभर यासाठी तयारी सुरू असते. शिबीरापाठोपाठ शिबीरं होतात. प्रत्येक शिबीरात डोक्यावर सिलेक्शनची तलवार टांगलेली असते.


ड्रील, क्रॉसकंट्री, गार्ड ऑफ ऑनर, टर्नआऊट, लाईन ले आऊट, बेस्ट कॅडेट, फ्लॅग एरिया, कल्चरल इव्हेंटस् अशा विविध स्पर्धा मिलीटरी शिस्तीत पार पडतात. दिवसभराच्या दमणुकीनंतर रात्री कल्चरल प्रॅक्टीस असते. त्याला लेट आले म्हणून अंधारात डोक्यावर ट्रंका घेऊन मैदानाला फे-याही माराव्या लागतात. या सा-या स्पर्धा ग्रुपनं एकजीव होऊन लढवायच्या असतात. त्यात एखाद्यानंही मखरा अर्थात चुकारपणा केला तर स्पर्धा हातची जाते. मग त्याची रात्री जोरदार कंबल परेड होते. म्हणजे तो झोपायला टेंटमध्ये आला की त्याच्यावर कंबल टाकून त्याची सगळेजण यथेच्छ धुलाई करतात. मग पुन्हा चुकारपणा करण्याची त्याची काय बिशाद?

प्री आरडी कॅम्प डिसेंबरमध्ये मुंबईत. कुलाब्यातील गोरखा रेजिमेंटमध्ये. ड्रील प्रॅक्टीस सागरकिना-यावरील कुंजाली नौसेना तळावर. दणकेबाज ड्रीलनं डांबरी ग्राऊंड हादरायचं. घामानं चिंब झालेले कपडे पिळूनच कोरडे करायला लागायचे. रात्रभर पंखे लावूनही लष्करी बराकीतला उकाडा असह्य व्हायचा. पहाटेच टॉयलेटला रांगा लावायच्या.

दिल्लीला जाताना रात्री ट्रेनमध्येच थंडीनं चुणूक दाखवली. दिल्लीत पोहोचल्यावर तंबू ठोकण्याचीही उसंत न देता स्पर्धांची धावपळ सुरू झाली.
हिरवी स्वेटरं आणि जाड लष्करी कोटानंही थंडी थांबायची नाही. दुस-या दिवशी लाईन ले आऊटची स्पर्धा असल्यावर रात्रभर तंबू आणि भोवतालची जमीन ताटं वाट्यांनी घोटून घोटून मऊ करायची. ही जमीन खराब होऊ नये म्हणून चार अंश सेल्सियस तापमानात तंबूच्या कनाती वर करून झोपायचं. दिवसभराचा थकवा, सांसकृतिक कार्यक्रमांच्या जागरणानं झोप कुठंही यायची. अगदी ड्रील करतानाही. एवढंच नाही तर अगदी बाथरूममध्येही झोप काढणारे बहाद्दर होते.एअरविंग आणि नेव्हलचे कॅडेट (ड्रेसच्या कलरमुळं त्यांना कावळे आणि बगळेअशी नावं ठेवलेली.) हवेत छोटी विमानं उडवायचे आणि पाण्यात लढाऊ जहाजाची मॉडेल्स चालवायचे. ती त्यांच्या एअर शिप मॉडलिंग स्पर्धेची तयारी असायची. पहाटे साडेचार वाजताच अनुप जलोटांची रसाळ भजनं झोपेचं खोबरं करायची. त्या पहाट शांततेत गॅरीसन परेड ग्राऊंडवरून ऐकू येणारा ध्वजारोहणाचा बिगुल अंगात चैतन्य निर्माण करायचा. अंघोळीनं दिवस सुरू करायचा म्हटलं तर नळाच्या पाण्याचा डोक्यावर जवळपास बर्फच व्हायचा. अंग बधीर होऊन जायचं. ड्रेस चढवून धावपळ करत प्रॅक्टीससाठी पहाटेच राजपथ गाठायचा. प्रॅक्टीस सुरू होण्यापूर्वी तिथं जवान बँडवर सिनेमाची गाणी वाजवायचे आणि नाचायचे. थंडी पळवून लावायचे.

स्टोअर टेंटचा इन्चार्ज मराठा रेजिमेंटचा एक अगडबंब सुभेदार मेजर होता. रायफल आणायला पहाटेच गेल्यावर हा रांगडा गडी तसल्या थंडीतही उघड्याबंब अंगाला सरसूचं तेल लावत बसलेला असायचा. वर म्हणायचा, जवान माणसाला कसली आलीय थंडी बेट्यांनो.. दिवसभर थंडी आणि धुकं वातावरणही बधीर करून टाकायचं. शेजारच्या इंदिरा गांधी विमानतळावर उतरणारी महाकाय विमानंही अगदी आवाज न करता उतरायची. मुंबईत आमच्या परेडचा आवाज एका किलोमीटरवरूनही ऐकायला यायचा. इथल्या धुक्यानं जणू तो आवाज शोषून घेतला होता. जेवण मात्र दणकून व्हायचं. काही दुखणं घेऊन लष्करी डॉक्टरकडं गेल्यावर दो दिन खाना मत खाना असा सल्ला मिळायचा. अप्रूप असायचं ते सुटाबुटात जाऊन व्हीआयपींना भेटण्याचं. तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या घरचा पाहुणचार, पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या भेटी तर विसरता न येण्यासारख्या. दिल्लीतील महाराष्ट्रीयन नेते आपुलकीनं येऊन चौकशी करायचे.
मुंबईत परतल्यावर जंगी स्वागत. राजभवनावर स्वागताचा खास कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. हे क्षण असेच राहावेत असं वाटायचं. काळाबरोबर वाहून गेलेल्या त्या क्षणांनी दिलेला आनंद मात्र न संपणारा आहे.No comments:

Post a Comment