'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 16 July 2012

महानामा

आज संत नामदेवमहाराजांची पुण्यतिथी. नांदेडमध्ये 'रिंगण'च्या (http://www.ringan.in/) वेबसाईटचं प्रकाशन झालंय. त्यानिमित्तानं 'रिंगण'साठी लिहिलेला हा लेख...

पहिली आठवण आहे. गाभा-यातल्या समईच्या उजेडात विठुरायाचा सावळा चेहरा उजळून निघालाय. डोळे मिटून मोठ्या प्रसन्न चित्तानं तो ऐकतोय, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा.., उठा जागे व्हा रे आता... स्पष्ट, खणखणीत आवाज, सुंदर वारकरी चाल. पांढराशुभ्र फेटा बांधलेले वडील नामदेवरायांचा काकडा म्हणतायत. पहाटेच्या शांततेत आवर्तन घेत येणारे ते सूर हृदयात जिरतायत. मुरतायत. मी बहुदा आईच्या पोटात आहे


Friday 6 April 2012

दावडीची ठाकरवाडी

पैसा म्हणजे परमेश्‍वर. पैसा हसवतो. पैसा रडवतो. पैसा घडवतो. पैसा बिघडवतो. पैसा अगदी माणसाचं माकड करून टाकतो. तरी सारं जग पैशाभोवतीच फिरतं. या पैशानं माणसांची दुनिया अगदी उलटी-पालटी करून टाकलीय. ही दुनिया पाहायची असेल तर पुण्याजवळचा चाकण, खेड परिसर एकदा फिरून यावा...


आले.. आले.. आले... मुंबईतले सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी अभयशेठ गावडे आले. दरसाल ते यात्रेसाठी घसघशीत देणगी देतात बरं का. यंदाही ते आपला नावलौकीक राखणार आहेत. लाऊडस्पीकरवरून गावचे कारभारी माऊलीअप्पा यात्रेला गावी आलेल्या मुंबैकराला असं हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. मग कांजी केलाला खादीचा शर्ट न् डोक्यावर कडक धारेची भगवान टोपी घातलेला मुंबईकर वाजत्र्यांच्या कडकडाटात, गुलालाच्या उधळणीत तरंगतच मांडवात येतो. दोनऐवजी चार हजारांची रोख देणगी देतो. या सोहळ्याची मुंबईकर आणि त्याचं गाव वर्षभर वाट बघत असतं.
दुसरीकडं मुंबैकर घरी आला म्हणजे मुंबईचा हलवा, पोराटोरांना नवे कपडे, वाणसामान, शेजारच्यांना काहीबाही, असं काय काय... 

Tuesday 20 March 2012

शून्याची गोष्ट

'शाळा' सिनेमा पाहिला. शाळेची खूप खूप आठवण झाली. किती किती गोष्टी आठवल्या. वाटलं, लिहून ठेवल्या पाहिजेत सगळ्या. पण म्हटलं नको. आपली अब्रू जाईल. पण मागून विचार केला, जाईना का. आपण कोण थोर आहोत असे? एक आठवण लिहून ठेवली. योगायोगानं आमच्या शाळेचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आलं. माझा बालमित्र तिथंच शिक्षक झालाय. त्यानं त्यानिमित्तानं प्रकाशित होणा-या स्मरणिकेबद्दल सांगितलं. म्हटलं, 'मी एक छोटा लेख लिहिलाय. पण तुमच्या चौकटीत बसणार नाही. उगीच दोघांचीही लाज कशाला वेशीवर टांगा'.. तर म्हणाला, 'दे तर खरं'. दिला. त्यानं छापला.
सिनेमाच्या शेवटी जोश्या म्हणतो, 'नववी संपली आता दहावीचं भयाण वर्ष..' याच वर्षाची ही गोष्ट...

ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. किमान दहावीतल्या विद्यार्थ्यांना. ज्यांना गणित म्हणताच पोटात गोळा येतो त्यांना. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना.
तर ऐका..

Saturday 18 February 2012

मी काळा विठोबा झालो !


सध्या मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत एका जगप्रसिद्ध चित्रकाराचं प्रदर्शन सुरू आहे. तुम्ही गॅलरीत गेलात तर भिंतींवरच्या पेंटिंग्जच्या अगोदर तुमचं लक्ष वेधून घेईलजमिनीवरची एक मोठीशी लाकडी चौकट. त्यावरचा भोपळ्याएवढ्या आकाराचा लाकडी गोळा. त्याशेजारी दुसरी लाकडी चौकट. जरा उलटी करून ठेवलीय. त्यावरही एक मानवी डोक्याच्या आकाराचा लाकडी गोळा. 
बारकाईनं पाहिलं तर जणू एखादा योगीच पदमासन घालून बसलाय. आणि हॉलच्या मध्यभागी आहेएका कोनावर उभी केलेली लक्षवेधक काळी लाकडी चौकट. तिच्या डोक्यावर आहेत, तीन लहान गोळ्यांची उतरंड. ती पाहिल्यावर मात्र आपल्याला लगेचच कमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलमूर्तीची आठवण होते.

Tuesday 14 February 2012

शिवसेना झिंदाबाद!

भाग २६ : शिवसेना झिंदाबाद!
अखेर मुंबई महापालिकेच्या १९६८च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेनं सगळ्याच पक्षांना जोरदार धक्का दिला. पदार्पणातच सेनेनं १४०पैकी ४२ जागा जिंकल्या. त्यांच्याशी युती केलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला ११ जागा मिळाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीतील घटक पक्षांना भगदाड पाडत शिवसेनेनं भगवा फडकावला.

Monday 13 February 2012

अवघा हलकल्लोळ करावा

भाग २५ : अवघा हलकल्लोळ करावा 
१९६८च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना बोलेल, तसंच बाकीचे पक्ष बोलू लागले. शिवसेना म्हणेल तसे वागू लागले. कारण सेनेच्या तालावर मुंबईतला तमाम मराठी माणूस झुलू लागला होता. 

महापालिकेची ही निवडणूक १२ मार्च १९६८ रोजी घ्यायचं ठरलं. पण बाळासाहेबांनी स्टंट केला. होळीचा सण तोंडावर होता. सणासाठी हजारो कामगार गावी जातात. त्यामुळं निवडणूक २६ मार्चला घ्या, अशी मागणी बाळासाहेबांनी केली. त्याला काँग्रेस, संपूर्ण महाराष्ट्र समिती, प्रजा समाजवादी पक्ष आदींनी पाठिंबा दिला. त्यामुळं निवडणुकांची तारीख ठरली २६ मार्च १९०६८!

मग आपल्या लेखणी अन् वाणीमधून बाळासाहेबांनी विरोधकांना चेचायला आणि मराठी मतदारांच्या भावनांना हात घालायला सुरुवात केली.
२४ मार्च १९६८ रोजी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये अवघा हलकल्लोळ करावा नावाचा अग्रलेख लिहिला. बाळासाहेबांचा हा लेख प्रचंड गाजला.

यात सामान्य मतदारांच्या मनाला हात घालताना बाळासाहेबांनी कमालीची भावूक भाषा वापरली. ‘‘२६ मार्चला तुम्ही शिवसेनेला कौल दिलात की चार दिवसांनी म्हणजे वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर, महाराष्ट्राच्या या राजधानीत शिवरायांचा पवित्र भगवा डौलाने फडकलेला आपणाला दिसेल. 
हा भगवा म्हणजे त्यागाचा ध्वज आहे. पावित्र्याचा ध्वज आहे. शुद्धतेचा ध्वज आहे. तो एकदा महापालिकेवर फडकला की, या शहराच्या कारभारात काँग्रेसने गेल्या तीस वर्षात करून ठेवलेली घाण चुटकीसरशी नष्ट होईल. 
महाराष्ट्राच्या या राजधानीत पाणी तर मुबलक व शुद्ध होईलच पण, वारे वाहतील तेदेखील या पाण्यासारखेच दुर्गंधी नसतील तर निर्मळ व सुगंधी वारे वाहू लागतील.
२६ मार्च या दिवसात एवढी जादू भरलेली आहे. एवढी शक्ती भरलेली आहे.
२६ मार्च हा एक मंगल सण आहे, असे आपण मानूया. 
दिवाळीसारखे त्या दिवशी सुप्रभाती उठा, स्नान करा नि घरातल्या, आपल्या इमारतीतल्या, वाडीतल्या नि गल्लीतल्या सर्व स्त्रीपुरुष मतदारांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने चला.

मोगलांचे परचक्र आले तेव्हा देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा संदेश समर्थ रामदासस्वामींनी दिला होता. २६ मार्चला मुंबईच्या जनतेने असाच हलकल्लोळ करावा’, असं आवाहन बाळासाहेबांनी या लेखातून केलं.

त्याचवेळी सत्ताधा-यांच्या कामावरही त्यांनी ठाकरी भाषेत कोरडे ओढले. गलिच्छ मुंबई, बेकायदा झोपडपट्ट्या, पाणीचोरी, अतिक्रमण झालेले फूटपाथ, फेरीवाले, संप, तोट्यातील बेस्ट, यावर तसंच सत्ता उपभोगलेल्या संपूर्ण महाराष्ट्र समितीवर जोरदार टीका केली. कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना दूर ठेवण्याचं आवाहन केलं.

मधल्या काळात शिवसेना उत्तर भारतीयांचं लांगूलचालन करते, अशी सेनेवर जोरदार टीका झाली होती. पण या अग्रलेखातच बाळासाहेबांनी भविष्यातली शिवसेनेची भूमिका स्पष्ट करून टाकली होती.‘‘मराठी लोक आपले आहेतच. पण गुजराथी, सिंधी, पंजाबी, बंगाली, बिहारी, उत्तर प्रदेशीय हे सारे आपलेच आहेत. जे लोक या नगरीला आपली मानतात, तिच्या वैभवासाठी झटतात, त्यागाला सिद्ध राहतात, तिच्या उत्कर्षात आनंद मानतात नि तिच्या अपकर्षाने ज्यांना दु:ख होते, ते मग कोणत्याही प्रांताचे असोत, कोणत्याही जातीधर्माचे असोत. ते आपलेच आहेत. मुंबईकरच आहेत.’’

त्यानंतर शिवसेनेच्या सभांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. प्रचंड उत्साहात
मतदान झालं. आणि अखेर शिवसेनेला ऐतिहासिक कौल मिळाला. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://navshakti.co.in/?p=39899

Sunday 12 February 2012

मराठीची ‘लागण’

भाग २४ : मराठीची लागण
शिवसेनेनं जसा मराठी माणसाचा कैवार घेतला, तसं मुंबईतलं वातावरण बदलू लागलं. मराठी माणूस शिवसेनेच्या झेंडयाखाली मोठ्या संख्येनं जमू लागला. ते पाहून इतर पक्षांना धडकी भरली. अशी धडकी भरणा-यांमध्ये प्रमुख पक्ष होता काँग्रेस. 
कारण संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उसळलेल्या मराठीच्या आगडोंबात काँग्रेस चांगलीच होरपळली होती. मरता मरता वाचली होती. त्यामुळं या पक्षानं सरळ शिवसेनेशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. आणि दुसरीकडं मराठी मतांना चुचकारायला सुरुवात केली.

या सगळ्याला निमित्त होतं, १९६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीचं. त्यामुळं काँग्रेसप्रमाणं इतर पक्षही पाघळू लागले. मराठी मराठी करू लागले. पण यातही आघाडी घेतली ती काँग्रेसनंच.

मार्मिकच्या सातव्या वर्धापन सोहळ्याला मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी हजेरी लावली. त्यावेळी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून ते म्हणाले, ‘‘परप्रांतीयांचा संसार आम्ही चालू देतो आणि आपल्याच प्रांतीयाला पुढे जाऊ देत नाही. हे मराठी माणसाचं मोठं वैगुण्य आहे. ते दूर केल्याशिवाय मराठी माणसाची प्रगती होणं अशक्य आहे’’. यावरून निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असणार हे स्पष्टच झालं.

त्याच वेळी स्थानिक लोकांना नव्या उद्योगांमध्ये किमान ९० टक्के नोक-या मिळाव्यात, अशी भाषा काँग्रेस पक्षाचे नेते, मजूरमंत्री नरेंद्र तिडके आणि उद्योगमंत्री राजारामबापू पाटील बोलू लागले. हा योगायोग नक्कीच नव्हता.

पण या निवडणुकीत शिवसेनाच आपला खरा प्रतिस्पर्धी असल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं. त्यामुळं मराठी माणसांना तिकीटं देण्याचा प्रचंड आग्रह झाला. गुजराथ्यांचं लांगूलचालन करतात म्हणनू स. का. पाटलांवर पक्षातल्याच लोकांनी टीकेची झोड उठवली. 
मराठी उमेदवारांच्या समावेशावरून काँग्रेसची यादी अडकून पडली. अखेर मुंबई काँग्रेसनं ८० उमेदवारांच्या पहिल्या यादीत चक्क ३४ मराठी उमेदवारांचा समावेश केला. 

इकडं कम्युनिस्टांनाही मराठीची हवा लागलीच होती. शेतकरी कामगार पक्षाचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे तर शिवसेनेच्या जाहीरनाम्याची कॉपीच होती. बेकारांच्या जिल्हावार संघटना उभाराव्यात,नोक-यांमध्ये महाराष्ट्रीय स्थानिकांना अग्रहक्क आणि प्राधान्य मिळालं पाहिजे, राज्यसरकार तसंच अन्य महामंडळं यांचा कारभार मराठीतूनच चालला पाहिजे, अशा मागण्या शेकापचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब लाड यांनी केल्या. शेकापचा हा कार्यक्रम मराठी युवकांसाठी होता!

शिवसेनेला नाक मुरडणा-या समाजवाद्यांनाही निवडणुकांच्या मुहूर्तावर मराठीची लागण झाली. केंद्रीय नेतृत्वाची नाराजी पत्करून प्रजा समाजवादी पक्षानं शिवसेनेशी युती केली. मुंबईत टिकून राहण्यासाठी प्रा. मधू दंडवतेंनी दूरदृष्टीनं हा निर्णय घेतला होता.
प्रजा समाजवादीच्या भांवंडानं अर्थात संयुक्त समाजवादी पक्षानं शिवसेनेला विरोध कायम ठेवला. पण प्रत्यक्षात सेनेचीच भूमिका मांडायला सुरुवात केली. 
मुंबईत उभ्या राहणा-या नवीन कारखान्यांमध्ये परप्रांतीय मजूर आणण्यास बंदी घालावी. कारण हे मजूर जथ्थे करून राहतात आणि त्यामुळे शहरात झोपड्या वाढतात, असा स्पष्ट इशारा संयुक्त समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आला होता.

या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र समिती आणि शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होईल. त्यात मराठी मतं फुटून काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज नवा काळनं व्यक्त केला होता. तो खराही झाला. पण या निवडणुकीत शिवसेनेनं मराठीच्या नावानं अक्षरश: हलकल्लोळ उडवून दिला. त्यात इतर पक्ष पार झाकोळून गेले. त्याविषयी पुढच्या भागात. 

'नवशक्ती'तील लिंक - http://navshakti.co.in/?p=39546

Friday 10 February 2012

भाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष

भाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष
शिवसेनीची पहिली युती झाली ती प्रजा समाजवादी पक्षाशी. या पक्षाबाबत फारसं लिहिलं, बोललं गेलेलं नाही. आता स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या या पक्षाचा त्यावेळी मुंबईत चांगलाच प्रभाव होता. पीएसपी किंवा प्रसोपा नावानं हा राष्ट्रीय पक्ष प्रसिद्ध होता.


मुंबईत वरळीच्या रेडीमनी मेन्शन’ बिल्डिंगमध्ये १९३४मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी नावानं या पक्षाचं बारसं झालं. त्याची बीजं रोवली गेली होती, नाशिक जेलमध्ये. स्वातंत्र्य चळवळीतले जयप्रकाश नारायणअशोक मेहता, सुसुफ मेहेर अली, आदी काँग्रेस नेत्यांनी जेलमध्येच स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा विचार केला. स्वातंत्र्यानंतरचा समाज कसा असेल, हे ठरवण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्येच दबावगट तयार केला होता. पण या गटाला वल्लभभाई पटेलादी नेत्यांनी विरोध केला. त्यातूनच मग स्वतंत्र काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचा जन्म झाला. 

१९४८मध्ये या पार्टीचे मुंबई महापालिकेत ३६ सदस्यही निवडून आले. मुंबईतल्या तरुणांमध्ये तेव्हा या पार्टीचं वारं होतं. म्हणजे आईवडील काँग्रेसमध्ये आणि पोरं काँग्रेस सोशलिस्ट पार्टीत, असा प्रकार होता.

१९४२ची चळवळ पक्षाच्या जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, अरुणा असफ अली यांनी गाजवली. स्वातंत्र्य मिळाल्यावर अखेर या नेत्यांनी १९४८मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली.

काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून आचार्य कृपलानी यांनी केएमपीपी अर्थात किसान मजदूर पार्टी स्थापन केली. नंतर त्यांनी १९५३मध्ये मुंबईतच केएमपीपी आणि समाजवादी पार्टीचं विलिनीकरण केलं. आणि जन्माला आली, प्रजा समाजवादी पक्ष.
हा पक्षही १९७७मध्ये प्रजा समाजवादी पक्ष जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीत विलीन झाला.
  
खरं तर समाजवाद्यांचं कम्युनिस्टांशी वैर १९३४ पासूनचं. काँग्रेस पक्ष भांडवलदारांचा आहे, असं कम्युनिस्टांचं मत. तर काँग्रेस स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचं एक हत्यार असल्याचं समाजवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं. 
मुंबईतले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जी. जी. पारिख सांगतात, ‘‘१९४२च्या चळवळीतही कम्युनिस्ट ब्रिटीशांच्या बाजूने होते. भूमिगत समाजवाद्यांना पकडून देत होते. त्यामुळंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही कम्युनिस्टांसोबत राहणं पक्षश्रेष्ठींना मान्य नव्हतं.’’

अर्थात पुढं १९६८च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करून प्रसोपानं कम्युनिस्टाचं उट्टं काढलंच. पुढं शिवसेना मुस्लिम विरोधी आणि हिंदुत्ववादी झाल्यानंतर ही युतीही तुटली.
त्यापूर्वी प्रजा समाजवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन संयुक्त समाजवादी पक्ष तयार झाला होता. डॉ. लोहिया, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिंस हे या पक्षाचे प्रमुख नेते होते.

प्रजा समाजवादी पक्षाने मुंबईत पहिल्यांदा गृहनिर्माण सहकारी चळवळ सुरू केली. त्यातून जुन्या चाळींचा पुनर्विकास सुरू झाला. झोपडपट्टीत राहणा-या गरिबांचे जीवनमान सुधारावे, फेरीवाल्यांना परवाने मिळावेत यासाठी हा पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला.

त्यांनी सुरू केलेल्या ग्राहक चळवळीतून अपना बाजार, अपना बँक, न्यू इंडिया को. ऑप. बँक, अंबुजा को. ऑप. बँक स्थापन झाल्या.

पारिख म्हणतात, ‘‘सध्या आम्ही पाठपुरावा केलेल्या सुनियोजित शहर संकल्पनेकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. चाळी, झोपडपट्ट्या मुंबईत टॉवर उभे राहतायत. गरीब, मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय. मराठी माणसांचा कैवार घेणा-या शिवसेना, मनसेसारख्या पक्षांचंही त्याकडं दुर्लक्ष आहे.’’

असं मराठीप्रेम केवळ समाजवाद्यांनाच होतं, असं नाही. १९६८च्या निवडणुकीत तर सर्वच पक्षांना मराठी प्रेमाचं भरतं आलं होतं. त्याविषयी पुढच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=39063

Thursday 9 February 2012

एक व्हावे बहुजनांनी!

भाग २२ : एक व्हावे बहुजनांनी!
१९६८च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला पदार्पणातच मोठं यश मिळालं. या यशाचा हिशोब करता लक्षात येतं की यामागं एक मोठं कारण आहे. ते म्हणजे, शिवसेनेनं जुळवलेलं जातीय गणित! 

या निवडणुकीत बहुजन समाजातल्या छोट्या छोट्या जातींनी शिवसेनेला पाठिंबा दिला. हा समाज होता, कोकण आणि देशावरून नोकरीसाठी मुंबईत आलेला. त्यांच्यातल्या अनेक तरुणांना शिवसेनेनं नगरसेवक बनवलं. निवडून आलेल्या शिवसेनेच्या ४२ उमेदवारांपैकी जवळपास ३० उमेदवार बहुजनच होते.

सुरुवातीच्या काळात मराठ्यांपासून वैश्यवाण्यांपर्यंत आणि भंडा-यांपासून कुणबी, माळ्यांपर्यंत अनेक जाति-जमातीचे कार्यकर्ते शिवसेनेला मिळाले.
खरं तर कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली अगोदरच झालेलं होतं. यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्ष मराठ्यांचं राजकारण करत होता. जनसंघामध्ये शेटजी-भटजी होते. तर रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये दलित समाज विभागलेला होता.

अशा वेळी आपल्याही पाठीशी कोणीतरी राजकीय पक्ष असावा, असं छोट्या छोट्या जातींना वाटत होतं. शिवसेनेनं त्यांची अपेक्षा पूर्ण केली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे तर म्हणतात, मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपल्या जातीसमूहाविरुद्ध केलेलं बंड म्हणजे शिवसेना!’

सुरुवातीच्या काळातली बाळासाहेबांची भूमिका पाहिल्यावर ते आणखी पटतं. नाटककार आणि विचारवंत संजय पवार यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, साळी माळी शहाण्णव कुळी, एक व्हावे बहुजनांनी, असा आशय असलेली शुभेच्छापत्रे बाळासाहेब स्वत:च्या सहीनं पाठवत. 

अर्थात बाळासाहेबांच्या या भूमिकेवर ठसा होता, तो वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा. प्रबोधनकार ठाकरे जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या मुशीत घडलेले. जातीपाती प्रथांच्या विरोधात आयुष्यभर झगडलेले. त्यामुळं मुलावर त्यांच्या विचारांचा प्रभाव असणं साहजिकच होतं. 
त्यातूनच मुंबईत मराठी माणसांच्या हक्काचा लढा देताना आम्ही जात-पात मानत नाही, असं म्हणणारे बाळासाहेब तमाम बहुजन समाजातल्या तरुणांना आपले वाटू लागले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची घोषणाही याच सामाजिक जाणीवेतून आली होती.

याच जाणीवेतून १९६८च्या निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी शिवाजी पार्क आणि गिरणगावात असणारी अदृश्य भिंत जमीनदोस्त केली. म्हणजे शिवाजी पार्कात राहात होते, मुंबईतले उच्चवर्णीय,सुशिक्षित, सधन नेते. तर गिरणगावात होते, कोकणातून किंवा देशावरून मुंबईत आलेला चाकरमानी. या दोघांनाही शिवसेनेनं एकत्र आणलं.

पुढं बाळासाहेबांनी भूमिका बदलली. शिवसेना आणि दलितांमध्ये संघर्ष उभा राहिला. वरळी दंगल, नामांतर, रिडल्स प्रकरण, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण अशा अनेक घटनांमधून तेढ वाढत राहिली. 

पण दलित तसंच अठरापगड जातीचं कडबोळं सोबत घेतलं तरच यश मिळतं, हे शिवसेनेला अनुभवानं लक्षात आलं. त्यामुळंच पूर्वपदावर येत शिवसेनेनं शिवशक्ती-भीमशक्ती युती घडवून आणली. उच्चवर्णीयांपासून ते मागासवर्गीयांपर्यंत सर्व जातींच्या पाठिंब्यामुळं शिवसेनेला यश मिळत गेलं. 

या यशानं सर्वोच्च टोक गाठलं, १९९५च्या निवडणुकीत. यात शिवसेनेचे तब्बल ७३ आमदार निवडून आले. आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. अर्थात या यशाची मुळं सापडतात ती १९६८च्या निवडणुकीत. या निवडणुकीपासून बाळासाहेबांनी जुळवलेल्या छोट्या-मोठ्या जातींच्या समिकरणात. 

युतीचं राजकारणही सेनेचं याच हिशोबानं केलं. शिवसेनेची पहिली युती झाली होती, प्रजा समाजवादी या राष्ट्रीय पक्षाशी. यानिमित्तानं या पक्षाविषयी बोलूयात पुढच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38829 

Wednesday 8 February 2012

उमेदवारी घ्या उमेदवारी...

भाग २१ : उमेदवारी घ्या उमेदवारी...
निवडणुकीचा सीझन आला की बंडगार्डनला मोठा बहर येतो. यंदाचा मोहोर जरा जास्तच होता. काही केल्या बंडोबा थंड होत नव्हते. कसं तरी बाबापुताकरून, गोडीगुलाबीनं, वेगवेगळी गाजरं दाखवून, प्रसंगी हात दाखवून त्यांना गार केलं गेलं. पण धुसफूस राहिलीच. ही समस्या आता सर्वपक्षी आणि सर्वव्यापी झालीय. शिवसेनेला तर अगदी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. तर मनसेचे नाराज कार्यकर्ते तर थेट कृष्णकुंजवर धडकले.

१९६८मध्ये हे चित्र एकदम उलटं होतं. मराठी माणसाचं भलं करायचंय असं सांगत शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरली. पण आपल्याकडं पुरेसे उमेदवारच नाहीत, हे सेनेच्या लक्षात आलं. होतंही साहजिकच. स्थापनेनंतर लगेच दोन वर्षात निवडणूक लागली होती. मग अगदी मिळेल त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणं सुरू झालं. 

त्याचं उदाहरण देताना मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत सांगतात, ‘‘त्या वेळी काळा चौकीतून सेनेच्या पठडीत न बसणा-या साटमगुरुजी नावाच्या अत्यंत मवाळ माणसाला उमेदवारी देण्यात आली. हे गुरुजी म्हणजे एक पात्रच होतं. संयुक्त महाराष्ट्राची रस्त्यावरची रणधुमाळी पाहत ते गॅलरीत उभे होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात यांच्या खांद्याला गोळी लागली. हेच त्यांचं उमेदवारीसाठी क्वालिफिकेशन. 
माथाडी कामगारांवरचे जे गुमास्ते अर्थात मुकादम असतात तसे हे गुरुजी दिसायचे. धोतर नेसायचे. त्यांचा पिंड ना कोणाशी शत्रुत्व घेण्याचा ना अंगात सेनेचा आक्रमकपणा. पण दोनदा निवडून आले. त्यांना निवडणुकीला उभं राहायला मीच भरीस घातलं होतं.

दुसरे गणेश गल्लीत क्लासेस चालवणारे प्रि. हळदणकरही असेच. त्यांनाही शिवसेनेनं निवडून आणलं. एखादा कार्यकर्ता अमूक भागात राहतो म्हणून द्या त्याला उमेदवारीअसंही झालं. काळाचौकीतून मलासुद्धा उमेदवारी देण्यात आली. माझ्या नावाने गेरुनं भिंतीही रंगवल्या गेल्या. पण इथल्याच हरिश्चंद्र पडवळांनी हट्ट केला. मग मी बाळासाहेबांना त्यांना उमेदवारी द्यायला सांगितली.’’

बरं अनुभवी कार्यकर्ते तरी आणणार कुठूनशिवसेनेची पहिली बॅच तर कम्युनिस्ट विचारसरणीचीच होती. कारण बहुतेक लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आले होते. दत्ताजी साळवी, प्रजा समाजवादी पक्षाचे प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे. हे सर्व कामगार भागातले होते. त्यामुळं ते डाव्या विचारसरणीशी निगडीत होते. पण त्यांचा फायदाच झाला. काँग्रेसविरोधी जे डावपेच त्यांनी पूर्वी वापरले तेच शिवसेनेत आल्यावर कम्युनिस्टांच्या विरोधात वापरायला सुरुवात केली.

साटमगुरुजींच्या उमेदवारीसाठी तर पंढरीनाथ सावंतांनी टी. व्ही. सावंत या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याची मदत घेतली होती. नंतर ज्यांच्या खुनाचा शिवसेनेवर आरोप झाला त्या आमदार कृष्णा देसाईंचे हे सावंत खास कार्यकर्ते होते. त्यांचा काळा चौकी परिसरात मोठा दबदबा होता.

शिवसेनेच्या यादीत डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर,मनोहर जोशी, सुधीर जोशी, शरद आचार्य, अमरनाथ पाटील, दत्ताजी नलावडे या पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा प्राधान्यानं समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये हिंदू महासभेच्या पंडित बखले आणि पदमाकर ढमढेरे यांचाही समावेश करण्यात आला होता.

असं असलं तरी या पहिल्या निवडणुकीतही शिवसेनेनं एका गोष्टीकडं कटाक्षानं लक्ष दिलं होतं. ते म्हणजे जातीपातीची गणितं. त्याविषयी पुढच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38612