'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday, 13 February 2012

अवघा हलकल्लोळ करावा

भाग २५ : अवघा हलकल्लोळ करावा 
१९६८च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना बोलेल, तसंच बाकीचे पक्ष बोलू लागले. शिवसेना म्हणेल तसे वागू लागले. कारण सेनेच्या तालावर मुंबईतला तमाम मराठी माणूस झुलू लागला होता. 

महापालिकेची ही निवडणूक १२ मार्च १९६८ रोजी घ्यायचं ठरलं. पण बाळासाहेबांनी स्टंट केला. होळीचा सण तोंडावर होता. सणासाठी हजारो कामगार गावी जातात. त्यामुळं निवडणूक २६ मार्चला घ्या, अशी मागणी बाळासाहेबांनी केली. त्याला काँग्रेस, संपूर्ण महाराष्ट्र समिती, प्रजा समाजवादी पक्ष आदींनी पाठिंबा दिला. त्यामुळं निवडणुकांची तारीख ठरली २६ मार्च १९०६८!

मग आपल्या लेखणी अन् वाणीमधून बाळासाहेबांनी विरोधकांना चेचायला आणि मराठी मतदारांच्या भावनांना हात घालायला सुरुवात केली.
२४ मार्च १९६८ रोजी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये अवघा हलकल्लोळ करावा नावाचा अग्रलेख लिहिला. बाळासाहेबांचा हा लेख प्रचंड गाजला.

यात सामान्य मतदारांच्या मनाला हात घालताना बाळासाहेबांनी कमालीची भावूक भाषा वापरली. ‘‘२६ मार्चला तुम्ही शिवसेनेला कौल दिलात की चार दिवसांनी म्हणजे वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर, महाराष्ट्राच्या या राजधानीत शिवरायांचा पवित्र भगवा डौलाने फडकलेला आपणाला दिसेल. 
हा भगवा म्हणजे त्यागाचा ध्वज आहे. पावित्र्याचा ध्वज आहे. शुद्धतेचा ध्वज आहे. तो एकदा महापालिकेवर फडकला की, या शहराच्या कारभारात काँग्रेसने गेल्या तीस वर्षात करून ठेवलेली घाण चुटकीसरशी नष्ट होईल. 
महाराष्ट्राच्या या राजधानीत पाणी तर मुबलक व शुद्ध होईलच पण, वारे वाहतील तेदेखील या पाण्यासारखेच दुर्गंधी नसतील तर निर्मळ व सुगंधी वारे वाहू लागतील.
२६ मार्च या दिवसात एवढी जादू भरलेली आहे. एवढी शक्ती भरलेली आहे.
२६ मार्च हा एक मंगल सण आहे, असे आपण मानूया. 
दिवाळीसारखे त्या दिवशी सुप्रभाती उठा, स्नान करा नि घरातल्या, आपल्या इमारतीतल्या, वाडीतल्या नि गल्लीतल्या सर्व स्त्रीपुरुष मतदारांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने चला.

मोगलांचे परचक्र आले तेव्हा देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा संदेश समर्थ रामदासस्वामींनी दिला होता. २६ मार्चला मुंबईच्या जनतेने असाच हलकल्लोळ करावा’, असं आवाहन बाळासाहेबांनी या लेखातून केलं.

त्याचवेळी सत्ताधा-यांच्या कामावरही त्यांनी ठाकरी भाषेत कोरडे ओढले. गलिच्छ मुंबई, बेकायदा झोपडपट्ट्या, पाणीचोरी, अतिक्रमण झालेले फूटपाथ, फेरीवाले, संप, तोट्यातील बेस्ट, यावर तसंच सत्ता उपभोगलेल्या संपूर्ण महाराष्ट्र समितीवर जोरदार टीका केली. कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना दूर ठेवण्याचं आवाहन केलं.

मधल्या काळात शिवसेना उत्तर भारतीयांचं लांगूलचालन करते, अशी सेनेवर जोरदार टीका झाली होती. पण या अग्रलेखातच बाळासाहेबांनी भविष्यातली शिवसेनेची भूमिका स्पष्ट करून टाकली होती.‘‘मराठी लोक आपले आहेतच. पण गुजराथी, सिंधी, पंजाबी, बंगाली, बिहारी, उत्तर प्रदेशीय हे सारे आपलेच आहेत. जे लोक या नगरीला आपली मानतात, तिच्या वैभवासाठी झटतात, त्यागाला सिद्ध राहतात, तिच्या उत्कर्षात आनंद मानतात नि तिच्या अपकर्षाने ज्यांना दु:ख होते, ते मग कोणत्याही प्रांताचे असोत, कोणत्याही जातीधर्माचे असोत. ते आपलेच आहेत. मुंबईकरच आहेत.’’

त्यानंतर शिवसेनेच्या सभांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. प्रचंड उत्साहात
मतदान झालं. आणि अखेर शिवसेनेला ऐतिहासिक कौल मिळाला. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://navshakti.co.in/?p=39899

No comments:

Post a Comment