भाग २६ : शिवसेना झिंदाबाद!
अखेर मुंबई महापालिकेच्या १९६८च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेनं सगळ्याच पक्षांना जोरदार धक्का दिला. पदार्पणातच सेनेनं १४०पैकी ४२ जागा जिंकल्या. त्यांच्याशी युती केलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला ११ जागा मिळाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीतील घटक पक्षांना भगदाड पाडत शिवसेनेनं भगवा फडकावला.
१९६१च्या निवडणुकीत कम्युनिस्टांना १८ जागा मिळाल्या होत्या. १९६८मध्ये त्यांचे फक्त ३ उमेदवार विजयी झाले. तर १९६१मध्ये ८ जागा जिंकणा-या शेकापला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. संपूर्ण महाराष्ट्र समिती आणि शिवसेना यांच्यातच प्रमुख लढत झाली. दोघांच्या लढाईत मराठी मतं फुटली. आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
शिवसेनेला घवघवीत यश मिळालं असलं तरी १४० सदस्यांच्या सभागृहात ६५ जागा जिंकणारी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरली.
मराठी मतं विभागली गेल्याची खंत शिवसेनेनंही व्यक्त केली. ‘मार्मिक’मधल्या बातमीत ‘एकेका वॉर्डात मराठी विरुद्ध मराठी उमेदवार उभा केल्याने मराठी मते विभागली गेली’ असं नमूद करण्यात आलं होतं.
शिवसेनेचे जे उमेदवार अयशस्वी झाले ते फक्त १२ ते १५० मतांच्या फरकाने, असंही बातमीत म्हटलं होतं.
पण शिवसेनेच्या ४२ आणि प्रजा समाजवादीच्या ज्या ११ तोफा महापालिकेत पाठविल्यात त्या आपले काम चोख बजावतील’, असा विश्वासही ‘मार्मिक’नं व्यक्त केला होता.
इतर वृत्तपत्रांनीही विजयाबद्दल शिवसेनेचं अभिनंदन केलं होतं.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने २८ मार्च रोजी ‘समाजकार्याची अमूल्य संधी’ नावाचा अग्रलेख लिहिला होता. त्यात म्हटलं होतं, ‘अगदी नवीन आणि बांधेसूद संघटना नसलेल्या या पक्षाला लोकांनी विश्वासाने मोठया अपेक्षा बाळगून उजवा कौल दिला आहे. येत्या तीन वर्षांच्या कामगिरीवरच तिचे भवितव्य अवलंबून आहे. समितीची धूळधाण करून एक वस्तूपाठच लोकांनी तिच्यासमोर ठेवला आहे.’
‘मार्मिक’मधून बाळासाहेबांनी मतदारांचे जाहीर आभार मानून निकालाचं विश्लेषण केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘महाराष्ट्राच्या या राजधानीची शान तुम्ही राखलीत. तिची मान आपण ताठ ठेवलीत. श्री शिवरायांचा पवित्र भगवा ध्वज आपण फडफडत ठेवलात. आपण धन्य झालात आणि आम्हालाही धन्य केलेत.
लालभाईंचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच धुव्वा उडाला. संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या आशीर्वादाने मुंबईत वाढू पाहणा-या मुस्लिम लीगलाही राष्ट्रप्रेमी मतदारांनी चांगलीच धूळ चारली. आता शिवसेनेची विजयी घोडदौड महापालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय थांबणार नाही, हे आमचे मराठी बांधवांना आश्वासन आहे.’
वाचकांची अभिनंदनाची पत्रंही या ७ एप्रिलच्या अंकात छापली होती. ही पत्रं जणू शिवसेनेचं भविष्यच सांगणारी होती.
वरळीतले एक वाचक नारायणराव बंगेरांनी लिहिलं, ‘आता शिवसेनेने ध्येय केवळ महापालिकाच नव्हे तर विधानसभा ठेवावे’.
तर ‘पुढचा काळ तुमचाच आहे, पण लक्षात ठेवा आता तुमच्यावर जबाबदारीही येऊन पडली आहे’, असं एस. विद्यानंद भारती या वाचकानं म्हटलं होतं.
आणि एका वाचकानं निनावी पत्र पाठवून म्हटलं होतं, ‘मुंबईत ४० टक्के मराठी माणसं आहेत. शिवसेनेसारख्या मीलिटंट पार्टीला ४२ टक्के मतं पुरेशी आहेत. हिटलरला तर बर्लिनमध्ये एवढीही मतं मिळाली नव्हती. तरी त्याने जर्मनीवर वर्चस्व गाजवलं. अखेर सत्तासुंदरी तलवारीच्या धारेलाच वश होते, हे लक्षात घेता वर्षभरातच मुंबई शहर शिवसेनेच्या पंजात येईल, यात शंका नाही.
शिवसेना झिंदाबाद!
(समाप्त)
नवशक्तितील लिंक - http://navshakti.co.in/?p=40009
No comments:
Post a Comment