'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 2 February 2012

गिरणगावात वाघाचे ठसे

भाग १६ : गिरणगावात वाघाचे ठसे
शिवसेनेचे स्थापना झाली ती मार्मिकच्या कचेरीत. म्हणजे दादरमधल्या बाळासाहेबांच्या घरात.मार्मिकचा वाचकवर्ग होता, दादर, शिवाजी पार्क, गिरगाव इथल्या मध्यमवर्गीय वस्तीतला. सुरुवातीला शिवसेनेला पाठींबाही याच मध्यमवर्गातून मिळू लागला. या भागातून पाठींबा मिळेल पण शिवसेनेसाठी आवश्यक असणारी लढाऊ फळी मात्र गिरणगावातूनच मिळणार, हे बाळासाहेबांनी ओळखलं. कारण कष्ट करत अन्यायाशी झगडणारा चिवट कामगारवर्ग या गिरणगावात होता. 

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ज्यामराठी माणसावरच्या अन्यायाबाबत बोलत होती तोच हा मराठी माणूस होता. सेनेच्या दृष्टीनं अडचण फक्त एवढीच होती, की हा मराठी कामगार कम्युनिस्टांच्या पोलादी तटबंदीत होता. हीच तर तटबंदी शिवसेनेला तोडायची होती. त्यासाठी निमित्त मिळालं, १९६८च्या महापालिका निवडणुकीचं. तोपर्यंत रस्त्यावर राडे करून सेनेनं लढाऊ कम्युनिस्टांचा आत्मविश्वास ढिला केला होता. पण कामगारांच्या मनावर कम्युनिस्टांची पकड कायम होती. ही पकड सेनेला ढिली करायची होती. म्हणून सेनेचा ढाण्या वाघ गिरणगावातून वावरू लागला.

अगदी शिवसेना स्थापनेच्या शिवाजी पार्क मेळाव्याच्या अगोदरच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली ती परळच्या गणेश गल्लीच्या मैदानावर. त्याही आधीपासून ठाकरे गिरणगावातल्या विविध व्यायामशाळा, सांस्कृतिक मंडळांना भेटी देत होते. तिथल्या तरुणांच्या व्यथा समजून घेत होते.
  
गिरणगावात त्यावेळी अनेक व्यायामशाळा होत्या. या व्यायामशाळा म्हणजे सळसळत्या रक्ताच्या तरुणांचे आखाडेच. देवदत्त, गुरुदत्त, हिंदमाता, राममारुती, जयभवानी, जनता सेवा मंडळ आदी व्यायामशाळा त्यावेळी प्रसिद्ध होत्या. १९६८च्या निवडणुकीत यातल्या बहुसंख्य व्यायामशाळांनी सेनेला पाठींबा दिला. बाळासाहेबांनी या व्यायामशाळांमध्येही सभाही घेतल्या होत्या.

मराठी माणूस म्हटलं ती सण, उत्सव आलेच. गिरणगावातही ते मोठ्या उत्साहाने साजरे होत. या उत्सवांबद्दल कम्युनिस्टांना फारशी आत्मीयता नव्हती. हे हेरून शिवसेनेनं गिरणगावातला गणेशोत्सव,शिवजयंती उत्सव, नवरात्रोत्सव ताब्यात घेतला. आणि आपल्या राजकारणासाठी या उत्सवांचा उपयोग करून घेतला.

गणेशमंडळं म्हणजे तरुणांचे अड्डेच. त्यामुळं शिवसेनेनं पहिल्यांदा गिरणगावातली गणेशमंडळं ताब्यात घेतली. समाजवादी मंडळींची गणेशमंडळं तर शिवसैनिकांनी जवळपास हिसकावूनच घेतली. इथं समाजवाद्यांच्या राष्ट्र सेवा दलाची कलापथकं होती. ही पथकं नाटकं वगैरे बसवत. त्यातून तरुणांचं संघटन होई. यापैकी कम्युनिस्टांकडं काहीही नव्हतं. एकही गणेशमंडळ त्यावेळी कम्युनिस्टांच्या ताब्यात नव्हतं. अशा गणेशमंडळांमधून, सांस्कृतिक उपक्रमातून होणा-या तरुणांच्या संघटनाकडं त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. त्यांची हीच उणीव शिवसेनेनं भरून काढली.

गिरणगावात शिवसेनेनं विविध सांस्कृतिक उपक्रम सुरू केले. वृक्षारोपण, रक्तदान, वह्यावाटप आदी उपक्रमांतून शिवसेना घराघरांत पोहोचली.
बाळासाहेबांभोवती कामगारांची तरुण मुलं जमू लागली. बाळासाहेब या बेकार तरुणांच्या नोक-यांबद्दल बोलत होते. त्यांच्या नोक-या दाक्षिणात्यांनी हिरावून घेतल्याचं सांगत होते. 
खरं तर त्या वेळी गिरण्यांमध्ये साधारणपणे अडीच लाख नोक-या होत्या. पण प्रत्येक कामगाराला किमान दोन तरी मुलं होती. त्यामुळं या नोक-या पु-या पडू शकत नव्हत्या. आणि इतर उद्योगव्यवसायातल्या, सरकारी नोक-या यंडुगुंडूंनी ताब्यात घेतलेल्या. यामुळं अस्वस्थ झालेल्या तरुणांना त्याविरुद्ध बोलणारे शिवसेनाप्रमुख आपले वाटू लागले होते. त्यातून वडील कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक असं चित्र सर्रासपणं गिरणगावात दिसू लागलं. त्याबद्दल उद्याच्या भागात.

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/03/37090

No comments:

Post a Comment