'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday, 1 February 2012

दळवी बिल्डिंग



भाग  : दळवी बिल्डिंग
१९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे शिवसेना आणि कम्युनिस्टांमधल्या संघर्षाचा इतिहास. कामगार जगतावर अधिराज्य गाजवणा-या कम्युनिस्ट पक्षाच्या हासाचा इतिहास. आणि या इतिहासाची साक्षीदार आहे, परळची दळवी बिल्डिंग! 

ही बिल्डिंग म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं मुंबईतलं ऑफिस. गिरणीकामगारांच्या असंख्य आंदोलनाचा केंद्रबिंदू. नाविक बंडापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची साक्षीदार. ही बिल्डिंग म्हणजे देशाच्या कामगार चळवळीचं फुफ्फुसच. देवळात जावं तेवढ्या भक्तीभावानं कामगार या बिल्डिंगमध्ये नित्यनेमानं यायचे.
शाहीर अमरशेख, अण्णाभाऊंचा आवाज याच बिल्डिंगमध्ये घुमायचा. कॉम्रेड डांगे, कृष्णा देसाई, गुलाबराव गणाचार्य आदी दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांचा इथं राबता असायचा. दळवी बिल्डिंग १८२, डॉ. आंबेडकर रोड, परळ, मुंबई १४’, हा पत्ता देशाच्या राजकीय नकाशात ठळकपणे नोंदला गेला होता. 
इथल्या गर्दीचा रहिवाशांना कधीही त्रास वाटला नाही. उलट रात्री उशिरापर्यंत चालणा-या चर्चा, बैठकांना आसपासच्या बि-हाडांमधून चहा पाठवला जायचा.

अशा या कम्युनिस्टांच्या मर्मस्थळावर २८ डिसेंबर १९६७ रोजी शिवसैनिकांनी तुफान हल्ला चढवला.
निमित्त झालं एका बैठकीवरच्या दगडफेकीचं. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवे यांची सभा शिवडीच्या गोलंजी हिलजवळच्या गाडी अड्ड्यावर सुरू होती. त्याचवेळी कराची हॉटेलवरच्या गच्चीवर मिटींगसाठी शिवसेनेची पाचशेक पोरं जमली होती. जोशी, साळवे इथं येण्यापूर्वी या मिटींगवर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. 
ही बातमी पसरताच उट्टं काढायचं म्हणून शिवसैनिकांनी दळवी बिल्डिंगमधल्या कम्युनिस्टांच्या ऑफिसवर जोरदार हल्ला चढवला. पाच ते सहा हजारांचा जमाव या बिल्डिंगमध्ये घुसला. ऑफिसमधले सर्व पेपर जाळले, फाडले गेले. सगळी कागदपत्रं रस्त्यावर आणली गेली. मोठा राडा झाला.

या घटनेचं शिवसेनाप्रमुखांनी समर्थनच केलं. दळवी बिल्डिंगवर चाल करून जाणारा शिवसैनिक आणि त्याची आक्रमकता मला प्यारी होती. हे मी वसंतराव नाईकांकडे ते मुख्यमंत्री असतानाच बोललो होतो. म्हटलं, आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायचीच होती. पण इतर भाडेकरू आमचे मतदार असल्यानं पोरांना रोखावं लागलं. पण त्यांनी नासधूस केली. टाईपरायटर फेकला हे सगळं खरं आहे. या घटनेनंतर काही वर्षांनी बाळासाहेबांनी हा खुलासा केला होता.

पण हल्ल्याचे पडसाद लगेचच उमटले. या हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी कम्युनिस्टांनी गोखले सोसायटीजवळ सभा भरवली. ही सभाही शिवसैनिकांनी उधळली. यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली. दगडविटा, लाठ्याकाठ्या, एसिड बल्ब यांचा दोन्ही बाजूंनी सर्रास मारा झाला. पोलिसांना यावेळी लाठीमार करून अश्रूधूर सोडावा लागला.

विधानसभा आणि संसदेतही दळवी बिल्डिंग प्रकरण गाजलं. यात सत्ताधारी काँग्रेसनं शिवसेनेला पाठीशी घातलं. संसदेत गृहमंत्री म्हणून उत्तर देताना यशवंतरावांनी या घटनेपूर्वी शिवसेनेच्या मिरवणुकीवर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं निदर्शनास आणून दिलं. प्रजासमाजवादी पक्षाचे सद्स्य बंकी बिहारी दास यांनी दिल्लीत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं.

दळवी बिल्डिंगवरचा हा हल्ला कम्युनिस्टांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होता. त्यात शिवसेनेला यश आलं. या घटनेनंतर कम्युनिस्ट चळवळीला उतरती कळा लागली. कम्युनिस्टांचं असं नाक कापल्यावर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी गिरणगावात प्रवेश केला. गणपती मंडळं, व्यायामशाळा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते गिरणगावकरांच्या हृदयात शिरले. हळूहळू गिरणगाव शिवसेनेच्या पंज्यात येऊ लागलं. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/02/36843

No comments:

Post a Comment