भाग २० : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस! (भाग २)
शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसांवर मोहिनी घालू शकली याचं एक मुख्य कारण म्हणजे शिवसेनेची ठाकरी भाषा! ही भाषा थेट होती. नेमकी होती. एक घाव दोन तुकडे करणारी होती. शिवसेनेच्या घोषणांमध्ये ही भाषा पुरेपूर उतरली.
कॉम्रेड प्रकाश रेड्डी म्हणतात, ‘गोबेल्स पद्धतीनं प्रचार करून शिवसेनेनं मुंबईकरांना हिप्नॉटाईज केलं.’ ते काहीही असो, ही भाषा लोकांना भिडत होती. याअगोदर अशाच पद्धतीची भाषा वापरून आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्र गाजवून सोडला होता. बाळासाहेब ठाकरेंनी अत्र्यांवरही कडी केली.
६७च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र समिती पुरस्कृत ‘पाच पांडवांना निवडून द्या’, असं आवाहन अत्र्यांनी केलं. त्याला विरोध करताना ‘या पंचमहाभुतांना गाडा’, अशी घोषणा बाळासाहेबांनी दिली. त्याही पुढं जाऊन त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा-अत्र्याला पुरता लोळवावा’! अशीही घोषणा देऊन टाकली. सेनेच्या टार्गेटवर असलेले कृष्ण मेनन यांची निशाणी सायकल होती. त्याचा भाषणात उल्लेख करून बाळासाहेब घोषणा द्यायचे,‘सायकल पंक्चर..’ लोक प्रतिसाद द्यायचे, ‘झालीच पाहिजे!..’
याच निवडणुकीत संयुक्त समाजवादी पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस बोंब ठोकत आहेत, असं व्यंगचित्र बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये काढलं. त्याला घोषणावजा कॅप्शन होती, ‘शिवसेना-प्रसोपा युती, त्याने केली आमची माती...बों बों बों’...
शिवसेनेची प्रजा समाजवादी पक्षासोबतची युती नंतर तुटली. त्यानंतर ७१च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी रातोरात दादर भागात ‘प्रमिला दंडवते,सर्वांना गंडवते’, अशा घोषणा रंगवल्या होत्या.
‘जनता’चे शांती पटेल, काँग्रेसचे रजनी पटेल, मराठी मनाला हे कसे पटेल? अशा अत्रेंच्या स्टाईलची आठवण करून देणा-या मुबलक घोषणा शिवसेनेनं तयार केल्या होत्या.
अर्थात शिवसेनेला उत्तर देणा-या घोषणा विरोधकांनी शोधल्या होत्याच.
‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ या घोषणेला गिरणगावातल्या कम्युनिस्टांनी ‘धोती लुंगी एक है, टाटा बिर्ला दुष्मन है’ या घोषणेनं उत्तर दिलं. तर ७१मध्ये करिअप्पा यांची प्रचार मोहीम खांद्यावर घेतल्यावर, ‘मराठी माणसाच्या मारतात गप्पा, निवडून आणतात करिअप्पा’ या घोषणेनं शिवसेनेला खिजवलं गेलं होतं.
शिवसेनेकडं सुरुवातीला ढाल-तलवार चिन्ह होतं. त्यावेळी ‘जय अंबे जय भवानी, ढाल तलवार आमची निशाणी’ अशी घोषणा होती. धनुष्य-बाणाचं चिन्ह मिळालं तेव्हा ‘आमची निशाणी धनुष्य बाण, विरोधकांची दाणादाण’ ही घोषणा जन्माला आली. सर्वसामान्यांच्या लक्षात राहील, असा ‘पंच’ या घोषणांमध्ये असे. अगदी अजूनही ‘आवाज कुणाsचा..’ म्हटलं की, पुढचं ‘शिवसेनेsचा..’ हे आपोआप ओठांवर येतंच!
खरं तर ‘प्रांतवाद उभी करणारी संघटना’ म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या बाजूनं मीडिया फारसा नव्हता. पण शिवसेनेसाठी प्रभावी मीडियाचं काम या घोषणांनी केलं. त्याला जोड मिळाली ती ‘मार्मिक’ची. बाळासाहेब ‘मार्मिक’मध्ये जी कार्टून्स काढायचे, तीच मोठी करून शिवसैनिक चौकाचौकांत लावायचे. ही कार्टून्स एवढी प्रभावी ठरायची की शिवसेनेला वेगळ्या मीडियाची अशी गरजच भासली नाही.
बाकी काहीही असो शिवसेनेच्या या घोषणांनी तो काळ गाजवला. सुबक अक्षरात लिहिलेल्या घोषणांच्या भिंतींनी कार्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना एक वेगळाच आनंद दिला.
१९६८च्या निवडणुकीत भिंती रंगवणारे, पोस्टर्स चिकटवणारे असे उत्साही कार्यकर्ते शिवसेनेला भरपूर मिळाले. पण मिळत नव्हते, उमेदवार. त्याविषयी पुढच्या भागात.
'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38307
'नवशक्ति'तील लिंक -
No comments:
Post a Comment