'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 6 February 2012

प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)


भाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)
जमाना आहे कोट्यवधी लोकांना एकमेकांशी जोडणा-या सोशल नेटवर्कींगचा. तरुणाई तर ट्विटर,फेसबुकच्या वॉलवर अक्षरश: पडीक असते. या तरुणाईला जर एखाद्या वयस्कर गृहस्थांनी सांगितलं, की १९६८ साली मुंबईतल्या तमाम वॉल्सनी अर्थात ख-या खु-या भिंतींनी शिवसेनेला एक निवडणूक जिंकून दिली..., तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. कारण तो इतिहास आहे.

ज्ञानदेवमाऊलींनी आळंदीत जशी निर्जीव भिंत चालवली, तशा ७०च्या दशकात मुंबईतल्या भिंती जणू बोलत होत्या. म्हणजे, या भिंतींवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. त्यांना जागवत होत्या. साद घालत होत्या. आपलं म्हणणं लोकांपर्यंत थोडक्यात आणि नेमकंपणानं पोचवण्यासाठी त्यावेळी या भिंतींशिवाय हुकमी पर्याय नव्हता. साहजिकच निवडणूक प्रचारात या भिंतींना फार फार महत्त्व आलं. 

मुंबईत त्या काळात विळा हातोड्यावाल्या कामगार संघटनांची या भिंतींवर मक्तेदारी होती. १९६६नंतर शिवसेनेचा वाघोबा या मक्तेदारीला गुरकावू लागला. पहिला घास होता, यंडुगुंडूंचा. त्यांच्या विरोधातल्या बजाव पुंगी, हटाव लुंगी घोषणेनं मुंबईत धुमाकूळ घातला. त्यानंतर नंबर होता, कम्युनिस्टांचा. जला दो जला दो, लाल बावटा जला दो, या घोषणेनं डाव्यांना धडकी भरवली.

निवडणुकीत तर हे घोषणायुद्ध अगदी भरात आलं. यात शिवसेनेनं एकदमच आघाडी घेतली. कारण शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मूळचे चित्रकार. त्यांच्या व्यंगचित्रांना जनतेनं यापूर्वीही दाद दिली होतीच. शिवाय वडील प्रबोधनकार ठाकरेंकडून वारसापरंपरेनं आलेली एक घाव दोन तुकडेकरणारी भाषाही जोडीला होतीच. त्याचा पुरेपूर वापर शिवसेनेच्या घोषणांमध्ये करण्यात आला.

१९६८च्या निवडणुकीत केवळ भिंतीच नव्हेत तर पूल, पाईप, पाण्याच्या टाक्या शिवसैनिकांनी ताब्यातघेतल्या. कम्युनिस्ट कार्यकर्ते चुना लावून भिंती बुक करून ठेवत. शिवसैनिक मग या भिंतीच धुवून टाकत. दोघांमधल्या भांडणाची खरी सुरुवात या भिंतींवरूनच झाली. कम्युनिस्ट भिंतींवर आपल्या पक्षाचा शॉर्टफॉर्म सीपीआय असा लिहायचे. म्हणून शिवसैनिक एसएस असं लिहू लागले.

शिवसेनेच्या घोषणा भावनिक आवाहन करणा-या असायच्या. त्यातल्या त्यात शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ ही शिवसेनेची आवडती घोषणा होती. तर असशील जर खरा मराठी,राहशील उभा शिवसेनेच्या पाठी असं मराठी मनांना भिडणारी घोषणा ठिकठिकाणी दिसू लागली.

लोकप्रिय सिनेमांची नावं लोकांच्या पक्की लक्षात राहतात, हेही शिवसेनेनं लक्षात घेतलं. त्यातूनच मग थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’, ‘बूँद जो बन गये मोती, शिवसेना हमारा साथी’, या घोषणा रंगवल्या जाऊ लागल्या.

म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, काव्य यांचा मुक्त वापर या घोषणांमध्ये केला जाऊ लागला.
बाळासाहेब व्यंगचित्रांमधून जी टोपी उडवायचे, तो प्रकार या घोषणांमध्येही दिसू लागला. 
काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत’ या घोषणेच्या पुढं शिवसैनिकांनी लिहिलं हा हा हा हा...’ 

केवळ पक्षाच्या भिंती रंगवता रंगवता पेंटर झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात, बाकी काहीही असो या भिंती अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेल्या असत. या सुबकतेचं श्रेय शिवसेनेलाच द्यायला हवं. त्यातून एकप्रकारे भिंतीवाचनाचा आनंद मिळे. अर्थात शिवसेनेला खिजवणा-या घोषणाही विरोधकांनी शोधल्या होत्याच. त्याविषयी पुढच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38055

No comments:

Post a Comment