'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 9 February 2012

एक व्हावे बहुजनांनी!

भाग २२ : एक व्हावे बहुजनांनी!
१९६८च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला पदार्पणातच मोठं यश मिळालं. या यशाचा हिशोब करता लक्षात येतं की यामागं एक मोठं कारण आहे. ते म्हणजे, शिवसेनेनं जुळवलेलं जातीय गणित! 

या निवडणुकीत बहुजन समाजातल्या छोट्या छोट्या जातींनी शिवसेनेला पाठिंबा दिला. हा समाज होता, कोकण आणि देशावरून नोकरीसाठी मुंबईत आलेला. त्यांच्यातल्या अनेक तरुणांना शिवसेनेनं नगरसेवक बनवलं. निवडून आलेल्या शिवसेनेच्या ४२ उमेदवारांपैकी जवळपास ३० उमेदवार बहुजनच होते.

सुरुवातीच्या काळात मराठ्यांपासून वैश्यवाण्यांपर्यंत आणि भंडा-यांपासून कुणबी, माळ्यांपर्यंत अनेक जाति-जमातीचे कार्यकर्ते शिवसेनेला मिळाले.
खरं तर कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली अगोदरच झालेलं होतं. यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्ष मराठ्यांचं राजकारण करत होता. जनसंघामध्ये शेटजी-भटजी होते. तर रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये दलित समाज विभागलेला होता.

अशा वेळी आपल्याही पाठीशी कोणीतरी राजकीय पक्ष असावा, असं छोट्या छोट्या जातींना वाटत होतं. शिवसेनेनं त्यांची अपेक्षा पूर्ण केली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे तर म्हणतात, मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपल्या जातीसमूहाविरुद्ध केलेलं बंड म्हणजे शिवसेना!’

सुरुवातीच्या काळातली बाळासाहेबांची भूमिका पाहिल्यावर ते आणखी पटतं. नाटककार आणि विचारवंत संजय पवार यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, साळी माळी शहाण्णव कुळी, एक व्हावे बहुजनांनी, असा आशय असलेली शुभेच्छापत्रे बाळासाहेब स्वत:च्या सहीनं पाठवत. 

अर्थात बाळासाहेबांच्या या भूमिकेवर ठसा होता, तो वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा. प्रबोधनकार ठाकरे जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या मुशीत घडलेले. जातीपाती प्रथांच्या विरोधात आयुष्यभर झगडलेले. त्यामुळं मुलावर त्यांच्या विचारांचा प्रभाव असणं साहजिकच होतं. 
त्यातूनच मुंबईत मराठी माणसांच्या हक्काचा लढा देताना आम्ही जात-पात मानत नाही, असं म्हणणारे बाळासाहेब तमाम बहुजन समाजातल्या तरुणांना आपले वाटू लागले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची घोषणाही याच सामाजिक जाणीवेतून आली होती.

याच जाणीवेतून १९६८च्या निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी शिवाजी पार्क आणि गिरणगावात असणारी अदृश्य भिंत जमीनदोस्त केली. म्हणजे शिवाजी पार्कात राहात होते, मुंबईतले उच्चवर्णीय,सुशिक्षित, सधन नेते. तर गिरणगावात होते, कोकणातून किंवा देशावरून मुंबईत आलेला चाकरमानी. या दोघांनाही शिवसेनेनं एकत्र आणलं.

पुढं बाळासाहेबांनी भूमिका बदलली. शिवसेना आणि दलितांमध्ये संघर्ष उभा राहिला. वरळी दंगल, नामांतर, रिडल्स प्रकरण, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण अशा अनेक घटनांमधून तेढ वाढत राहिली. 

पण दलित तसंच अठरापगड जातीचं कडबोळं सोबत घेतलं तरच यश मिळतं, हे शिवसेनेला अनुभवानं लक्षात आलं. त्यामुळंच पूर्वपदावर येत शिवसेनेनं शिवशक्ती-भीमशक्ती युती घडवून आणली. उच्चवर्णीयांपासून ते मागासवर्गीयांपर्यंत सर्व जातींच्या पाठिंब्यामुळं शिवसेनेला यश मिळत गेलं. 

या यशानं सर्वोच्च टोक गाठलं, १९९५च्या निवडणुकीत. यात शिवसेनेचे तब्बल ७३ आमदार निवडून आले. आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. अर्थात या यशाची मुळं सापडतात ती १९६८च्या निवडणुकीत. या निवडणुकीपासून बाळासाहेबांनी जुळवलेल्या छोट्या-मोठ्या जातींच्या समिकरणात. 

युतीचं राजकारणही सेनेचं याच हिशोबानं केलं. शिवसेनेची पहिली युती झाली होती, प्रजा समाजवादी या राष्ट्रीय पक्षाशी. यानिमित्तानं या पक्षाविषयी बोलूयात पुढच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - http://46.137.240.209/navshakti.co.in/?p=38829 

No comments:

Post a Comment