'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday, 31 January 2012

पहिली युती

भाग १४ : पहिली युती
बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण कोणी काहीही करोत पण बाळासाहेब पक्के राजकारणीआहेत, हेच खरं. कारण ज्या काळात प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं नव्हतं, ज्या काळात राजकीय युत्यांचा फंडा फेमस झाला नव्हता, त्या काळात त्यांनी पहिली युती एका राष्ट्रीय पक्षाशी केली होती. 

१९६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं युती केली होती, प्रजा समाजवादी पक्षाशी. पदार्पणातच या युतीनं मैदान मारलं. महानगरपालिकेत प्रथमच लढणा-या सेनेला १४०पैकी ४२ जागा मिळाल्या. तर प्रजा समाजवादीला १२ जागा मिळाल्या. 

खरं तर या युतीचा फायदा प्रजा समाजवादीपेक्षा शिवसेनेलाच जास्त झाला. त्यांची एक जागाही कमी झाली. याचं कारण युतीमध्ये शिवसेना सुरुवातीपासूनच डॉमिनेटींग राहिली. म्हणजे युतीत पहिलं नाव यायचं ते शिवसेनेचं.शिवसेना-प्रजासमाजवादी युती असं या युतीला संबोधलं जाई. 
प्रचाराच्या पोस्टर्सवर तर चक्कशिवसेना पुरस्कृत प्रजासमाजवादी उमेदवार असं लिहिलं जात होतं. प्रजासमाजवादीचा उमेदवार म्हणजे शिवसेना पुरस्कृत, किंमत कमी!’ अशा त्या वेळच्या विनोदाची आठवण ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सांगतात.
युतीची सगळी सूत्रंच शिवसेनेच्या हातात होती. सेनेनं दिल्या तेवढ्या जागा प्रजा समाजवादीनं विनाशर्त मान्य केल्या.

या युतीपूर्वी ठाकरेंनी मार्मिकमधून प्रजासमाजवादीच्या नेत्यांचा तसा यथेच्छ समाचार घेतला होता. पण सेनेचं ठाणे, मुंबईतलं वाढतं बळ पाहून प्रा. मधू दंडवते आदी नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला.

पुढच्या काळात शिवसेनेशी अनेकांनी समझोता केला. पण एस. एम. जोशी यांच्या संयुक्त समाजवादी पक्षानं मात्र कधीही शिवसेनेशी युती केली नाही. याच पक्षाच्या नेत्या मृणाल गोरे यांनी तर अगदी स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी शिवसेनेशी जवळीक केली नाही. 
याहीपुढचा कट्टरपणा दाखवला तो कम्युनिस्ट पक्षानं. त्यांनी शिवेसेनेसोबत युती करण्याचा विचारही मनाला शिवू दिला नाही. उलट मुंबईत बलवान असलेल्या या पक्षानं शिवसेनेला विरोध करण्याचं धोरण ठेवलं. कम्युनिस्टांना मोडून काढण्याचा निश्चय करूनच शिवसेना १९६८च्या निवडणुकीत उतरली.
  
दुसरीकडं मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून इतर पक्षही हडबडले होते. हातातली मराठी मतं निसटून नयेत म्हणून मुंबई काँग्रेसनं तर ८० उमेदवारांच्या पहिल्या यादीत तब्बल ३४ मराठी भाषिकांना उमेदवारी दिली होती!

प्रजासमाजवादी पक्षासोबत युती करण्यात बाळासाहेबांचे काही आडाखे होते. भविष्यात देश पातळीवर आपल्यावर टीका होणार, शिवसेनेला विरोध होणार हे ते जाणून होते. त्यावेळी संसदेत आपली बाजू मांडणारा कोणीतरी असावा, या भूमिकेतूनच त्यांनी दूरदृष्टीनं ही युती केल्याचं सांगितलं जातं. 
त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रजा समाजवादी पक्षानंही संसदेत सेनेची वकिली केली. निमित्त होतं, दळवी बिल्डिंग प्रकरणाचं. हे प्रकरण फेब्रुवारी १९६८मध्ये भूपेश गुप्ता, चित्त बसू, ए. पी. चटर्जी यांनी संसदेत उपस्थित केलं. तेव्हा गृहमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांना उत्तर देताना तारेवरची कसरत करावी लागली होती. 

दळवी बिल्डिंगवरचा हल्ला प्रकरण म्हणजे मुंबईतल्या कम्युनिस्टांच्या वर्मावर केलेला आघात होता. या हल्ल्यामुळं कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला. शिवसेनेनं कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात अर्थात गिरणगावात भक्कमपणे पाय रोवले. अशा या ऐतिहासिक दळवी बिल्डिंग प्रकरणाविषयी उद्याच्या भागात.

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/02/01/36671

No comments:

Post a Comment