'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday, 17 January 2012

तळपती तलवार


भाग ३ :  तळपती तलवार
कामगार आहे मीतळपती तलवार आहे..’, नारायण सुर्वेंनी केलेलं हे गिरणगावातल्या कामगाराचं वर्णन. इतिहास घडवणा-या कामगारांच्या वर्णनासाठी यापेक्षा समर्पक शब्द असूच शकत नाहीत.
आयुष्याशी झगडताना या कामगारांच्या जगण्याला लखलखीत धार आली होती. कामगार म्हटलं की संघर्ष आलाच. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगारांनी संप करायचा आणि मालकांनी तो मोडण्याचा प्रयत्न करायचा. हे अगदी १८४४मध्ये मुंबईत पहिली गिरणी सुरू झाल्यापासून चालू आहे.

सत्यशोधक नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणगावात पहिली कामगार संघटना उभी केली. ते महात्मा जोतिराव फुल्यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांनीच इथल्या कामगारांना लढायला शिकवलं. प्रसंगी लोकमान्य टिळकांशीही पंगा घ्यायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही.

अर्थात १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा होताच गिरणगावातल्या कामगारांनी अभूतपूर्व सार्वत्रिक बंद पाळला. तोही रोजंदारी बुडवून. अगदी कम्युनिस्ट नेता लेनिननंही याची दखल घेतली. अर्थात संपांची सुरुवात १८९०पासूनच झाली होती. १९२०मध्ये या संपांनी कळस गाठला आणि त्याचवेळी कामगार संघटना पूर्णपणे कम्युनिस्टांच्या ताब्यात गेल्या. 
केवळ स्वत:च्या मागण्यांसाठीच नव्हे, तर समाजाचंही आपण देणं लागतो या भूमिकेतून कामगार अनेक सामाजिक लढ्यांमध्येस्वातंत्र्यलढ्यांमध्ये सहभागी झाले. आघाडीवर राहून लढले.
  
१९४२चं चलेजाव असो, १९४६चं नावीक बंड असोसंयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की गोवा मुक्ती आंदोलन. गिरणगावानं तो अटीतटीनं लढवला. ४२च्या आंदोलनाचा भडका देशभर उडालेला असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मात्र लोकविरोधी भूमिका घेतली. अशावेळी गिरणीकामगारांनी आपला विवेक शाबूत ठेवून या लढ्यात उडी घेतली.

स्वातंत्र्यसंग्रामातही गिरणगावानं झोकून दिलं होतं. १९३०मध्ये पुणे जिल्ह्यातल्या महाळुंगे पडवळ गावच्या तरुण गिरणी कामगारानं परदेशी माल घेऊन जाणा-या ट्रकखाली स्वत:ला झोकून दिलं.

नाविक बंडात परळच्या एलफिन्स्टन पुलावर इंग्रज सैनिकांच्या गोळीबारात अनेक कामगार कार्यकर्ते ठार झाले. या लढ्यामुळं कम्युनिस्ट पक्षाला पुन्हा एकदा बळ मिळालं.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेलाही याच गिरणगावानं मदत केली. भाजीच्या पिशवीत बॉम्ब नेण्यापासून ते रेल्वेरुळांमध्ये स्फोटकं ठेवण्याचं काम इथल्या धाडसी तरुणांनी केलं.
  
संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर ख-या अर्थानं गिरणगावानंच लढवला, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या १०५ हुतात्म्यांपैकी तब्बल २२जण गिरणगावातले कामगार होते. शाहीर अमरशेख किंवा अण्णाभाऊ साठेंचा एखादा पोवाडा ऐकला, वाचला तरी गिरणी कामगारांच्या लढ्याची प्रखरता आपल्याला दिपवून टाकते. जागा मराठा आम, जमाना बदलेगा या अमरशेखांच्या ललकारीनं महाराष्ट्राला विरोध करणा-या दिल्लीतल्या काँग्रेस सरकारला घाम फुटला होता. तर गावोगाव फिरत, लोकनाट्यातून, पोवाड्यातून
‘‘एकजुटीच्या या रथावरती । आरुढ होवून चल बा पुढती ।
नवमहाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रकट निज धाव ।’’… अशा ललकारीनं अण्णाभाऊ महाराष्ट्राचं मन चेतवत होते. 

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. उरलेला सीमाभाग महाराष्ट्रात यावा म्हणून मग संपूर्ण महाराष्ट्र समिती अस्तित्वात आली, पण नंतर तीही नामशेष झाली. मराठी अस्मितेची धग मात्र कायम राहिली. गिरणगावातल्या कामगारांच्या रुपानं तळपत असलेली मराठी स्वाभीमानाची ही तलवार हस्तगत करण्यासाठी मग शिवसेनेनं कंबर कसली. आणि टार्गेट ठरलं, गिरणगावातले कम्युनिस्ट ! 

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/18/33366 

No comments:

Post a Comment