भाग ४ : मराठीचा झेंडा
साठच्या दशकात महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राचा वणवा उसळला. म्हणजे प्रकार असा झाला की,भाषिक राज्य संकल्पनेनुसार बहुतेक राज्यं स्वतंत्र झाली. पण महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा द्यायला काही केंद्रसरकार तयार होईना.
साठच्या दशकात महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राचा वणवा उसळला. म्हणजे प्रकार असा झाला की,भाषिक राज्य संकल्पनेनुसार बहुतेक राज्यं स्वतंत्र झाली. पण महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा द्यायला काही केंद्रसरकार तयार होईना.
त्यामागचं कारण म्हणजे मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी अर्थात उद्योग नगरी. ती ताब्यात राहावी. शिवाय मराठी माणसाविषयी केंद्राला आकस असल्याचा आरोप अर्थमंत्री चिंतामण देशमुखांनी तर अगदी जाहीरपणे केला होता.
केंद्राच्या या धोरणाविरोधात मराठी माणूस जागा झाला. झाडून सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन केली. लढाईचं मैदान होतं मुंबई. आणि सैनिक होता, गिरणगावातला मराठी गिरणीकामगार. या वीरांनी आणि सा-या महाराष्ट्रानं रणात बाजी लावली. अखेर दिल्लीला झुकावं लागलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.
त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या निमित्तानं जागृत झालेली मराठी शक्ती कायम जागती राहावी असं अनेकांना वाटत होतं. त्यात आघाडीवर होते आचार्य अत्रे. या लढ्यानंतरही लोंबकळत पडलेला मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न सुटावा, मराठी माणसांची एकी राहावी यासाठी त्यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्र परिषद’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला.
त्यानंतर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ ऑगस्ट १९६५मध्ये लालबाग-परळ भागात ‘महाराष्ट्र हितवर्धिनी’ नावाची संस्था स्थापन केली. नोक-या तसंच सरकारी वसाहतींमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढू नये,अशा या संस्थेच्या मागण्या होत्या.
शिवसेना नेते दत्ताजी नलावडेही त्यावेळी आदिकांसोबत होते. बाळासाहेबांचे तर ते मित्रच होते. त्यांच्या कामाचं कौतुक बाळासाहेब अगदी जाहीरपणे करीत असत.
दुसरीकडं पत्रकार म्हणून 'लोकसत्ता'चे ह. रा. महाजनीही मराठीपणाचा जोरदार पुरस्कार करत होते.
मात्र या सगळ्यांमध्ये उजवे ठरले ते ठाकरे पितापुत्र. त्यांनी मराठी माणसांची लढाऊ संघटना उभारण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. प्रबोधनकारांनी तर ४०च्या दशकातच ‘शुद्ध महाराष्ट्रीय’ पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. प्रबोधनकारांचे सुपुत्र बाळ ठाकरे ‘मावळा’ नावानं व्यंगचित्रं काढून महाराष्ट्रविरोधकांना फटकारे मारत होते.
नाही म्हणता ‘शिवसेना’ या मराठी माणसांच्या संघटनेची कल्पना अत्र्यांनीही मांडली होती. पण त्याला मूर्त दिलं ठाकरेंनी. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिक काढलं. महत्त्वाच्या ठिकाणी मराठी माणसांना डावलून दाक्षिणात्य कसे जागा बळकावून बसले आहेत, हे ‘मार्मिक’मध्ये पुराव्यानिशी छापून येऊ लागलं.
‘मार्मिक’च्या ऑफिसमध्ये बेरोजगार तरुणांची गर्दी वाढू लागली. ‘या गर्दीला एक दिशा दे’ असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचवलं. आणि स्थापन झाली शिवसेना! तारीख होती, १९ जून १९६६.
मराठीचा झेंडा फडकावण्यात शिवसेना यशस्वी झाली. आता शिवसेनेचं ध्येय बनलं, फक्त मराठी आणि मराठी!
मराठी मनांवर अधिराज्य गाजवेल ती फक्त शिवसेना. त्यात इतर कोणाचीही लुडबूड नको, असा निश्चय झाला. मग जानी दोस्त जॉर्ज फर्नांडिस असोत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन लढणारे आचार्य अत्रे असोत वा कॉम्रेड डांगे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला गेला. त्याविषयी उद्याच्या भागात.
I wanted to thank you for this excellent read!! I definitely loved every little bit of it
ReplyDeleteGastric Plication Surgery