भाग ८ : राजकारणाचं गजकरण
शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास ‘मार्मिक’चे संपादक पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडूनच ऐकायला हवा. या वयातही खड्या आवाजात, ओघवत्या भाषेत ते शिवसेनेच्या स्थापनेचं आणि पहिल्या दस-या मेळाव्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात.
‘'मार्मिक'मधले ज्वलंत विचार वाचून अस्वस्थ झालेला मराठी माणूस 'मार्मिक'च्या कचेरीची म्हणजेच ठाकरे परिवाराच्या शिवाजी पार्कवरच्या घराची वाट धरायचा. माणसांचे लोंढेच्या लोंढे इथं येऊन धडकायचे.
बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सगळं पाहात होते. एक दिवस बाळासाहेबांना ते म्हणाले, 'बाळ, या गर्दीला, धुमसणा-या मराठी शक्तीला कधी आकार देणार आहेस की नाही? उत्तरादाखल बाळासाहेबांनी नारळ आणवला. तो छत्रपतींच्या पुतळ्यासमोर फोडायला लावला. आणि एका लढवय्या संघटनेची स्थापना झाली. प्रबोधनकारांनी तिचं बारसं केलं. नाव ठेवलं, शिवसेना!
पहिल्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक ढोलताशे वाजवत, गुलाल उधळत शिवाजी पार्कवर आले. गर्दीबाबत सांगायचं तर, मी पाहिलंय, शिवाजी पार्कच्या भिंतींना माणसं टेकली होती’’. महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे, असं सांगत शिवसेना यापुढं ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करेल, असं बाळासाहेबांनी या मेळाव्यात जाहीर केलं. याच वेळी ‘राजकारण म्हणजे गजकारण’ अशी कोटीही त्यांनी केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढ्यानंतरही सत्तेपेक्षा रोजगार मिळावा, अशी सामान्य मराठी माणसाची अपेक्षा होती. ही अपेक्षाच ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेअगोदर सहा वर्षे ‘मार्मिक’मधून व्यक्त करत होते. स्थापनेनंतरही ही मराठी समाजकारणाची ‘लाईन’ आपण सोडणार नसल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली खरी पण राजकारणाशिवाय समाजकारण होऊ शकत नाही, हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं.
निमित्त झालं, १९६७च्या लोकसभेच्या निवडणुकीचं. माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन या निवडणुकीला उभे राहिले. मराठी माणसासाठी काहीही न करणा-या या ‘उप-या’ माणसाला विरोध म्हणून शिवसेनेनं काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठींबा दिला. मराठी मतांची ही जणू चाचणीच होती. या निवडणुकीत स. गो. बर्वे निवडून आले. आणि मराठी माणूस निवडणुकीच्या मैदानातही आपल्या पाठीशी उभा राहू शकतो हे शिवसेनेच्या ध्यानी आलं.
या निवडणुकीतून राजकारणात अप्रत्यक्षपणे शिरकाव झाला असला तरी ८० टक्के समाजकारण या आपल्या मूळ धोरणापासून शिवसेना हटली नव्हती. त्यानंतर २१ जुलै १९६७ रोजी शिवसेनेनं विधानसभेवर पहिला मोर्चा काढला. मुंबईतल्या ८० टक्के नोक-या आणि महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीतील ८० टक्के जागा मराठी माणसासाठी राखून ठेवाव्यात, अशा २५ मागण्यांचं निवेदन शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना दिलं.
या दरम्यान मुंबईत नाक्या-नाक्यांवर शिवसैनिकांचे अड्डे उभे राहू लागले होते. हे अड्डेच पुढं शिवसेनेच्या शाखा बनल्या. नागरी प्रश्नांपासून ते बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करण्यापर्यंत आणि स्वस्त दरातल्या वस्तू विकण्यापासून ते अगदी घरगुती भांडणं सोडवण्यापर्यंतची सर्व कामं शिवसेनेच्या शाखा-शाखांवर होऊ लागली. शिवसेना शाखांच्या या कार्याविषयी उद्याच्या भागात.
'नवशक्तिती'ल लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/24/34968
'नवशक्तिती'ल लिंक -
No comments:
Post a Comment