'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 20 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- २)


 भाग ६ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- २)
कॉमर्ड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आणि जॉर्ज फर्नांडिस या तिघांनाही शिंगावर घेण्याचं ठाकरेंनी कसं ठरवलं होतं, याचं एक उदाहरण  मार्मिकच्या २९ ऑगस्ट १९६५च्या कव्हरवर एक कार्टून प्रसिद्ध झालं. त्यात या तिघांनी असहाय भारतमातेचा लीलाव आरंभलाय, असं दाखवण्यात आलं होतं. 

मार्मिकचा हा अंक पाहून अत्रे, डांगे, फर्नांडिस प्रचंड संतापले. त्याच दिवशीच्या रात्री शिवाजी पार्क परिसरातील ठाकरे यांच्या निवासस्थानावर संतप्त जमाव चाल करून गेला. ठाकरे बंधू घरी नव्हते. प्रबोधनकार आणि त्यांचे आणखी एक चिरंजीव रमेश घरात होते.
घराबाहेर शंभरेक माणसांचा जमाव ‘बाळ ठाकरे काँग्रेसचा हस्तक’, ‘बाळ ठाकरे, बाळासाहेब देसाईंचा बुटपुशा’ अशा घोषणा देत होता. त्यांनी पिशव्या भरून दगड आणि जोडेही सोबत आणले होते. ठाकरेंच्या घरावर लटकवलेली ‘मार्मिकची पाटी उचकटून काढण्यात आली. अत्रे-डांगे-फर्नांडिस झिंदाबाद, असे नारे देत मोर्चेक-यांनी ‘मार्मिकच्या अंकाची होळीही केली.
यावेळी वयोवृद्ध प्रबोधनकार घराबाहेर आले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वतीनं संतप्त निदर्शकांची माफी मागितली.

या घटनेनंतर मात्र बाळासाहेब या तिघांच्या कच्छपीच लागले. अत्रेंचं त्यांनी काय केलं, हे मागच्या भागात आपण पाहिलं. डांगे आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष हे मुख्य टार्गेट होतं. पण त्याआधी नामोहरम करायचं होतं, जॉर्ज फर्नांडिस यांना. मुंबईवर राज्य करण्यासाठी ते आवश्यकच होतं. कारण जॉर्ज त्या वेळी बंदसम्राट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या एका इशा-यावर अवाढव्य मुंबईची हालचाल बंद व्हायची. 

महापालिका, बेस्टमहापालिकेची हॉस्पिटल्स, थिएटर कामगार, हॉटेल कामगार, कॉलेज कर्मचारी, फेरीवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले या सर्व ठिकाणी जॉर्ज यांनी उभ्या केलेल्या संघटना होत्या. ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतात, जॉर्ज, बाळासाहेब आणि शेट्ये फ्री प्रेसमध्ये एकत्र काम करत होते. जॉर्ज युनियनचे अध्यक्ष तर शेट्ये सेक्रेटरी होते. पुढं जॉर्ज मोठे कामगार नेते बनले. त्यामुळं ते बाळासाहेबांच्या निशाण्यावर आले. 

जॉर्ज यांच्या मुंबईला वेठीस धरण्यावर बाळासाहेबांनी मार्मिक आणि सभांमधून प्रचंड टीका केली. १९६७च्या निवडणुकीत पंचमहाभूतांना गाडा असं आवाहन शिवसेनेनं केलं. त्या यादीतही जॉर्ज होतेच. समाजवादी जॉर्ज यांनीही शिवसेनेला वेळोवेळी विरोध केला. पण दोघांमधली मैत्री कायम राहिली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट काँग्रेसचे स. का. पाटील यांचा पराभव करून जॉर्ज मुंबईचे सम्राट बनले. पुढं ते राष्ट्रीय राजकारणात गेले. नंतर शिवसेनेनं स्थापन केलेली कामगार संघटना सगळीकडं घुसली. पण त्यांना जॉर्ज यांच्या संघटनेचा प्रभाव फारसा मोडून काढता आला नाही. शरद राव यांच्या माध्यमातून त्यांची संघटना अजूनही पाय रोवून आहे.

शिवसेनेचं मुख्य टार्गेट होतं ते कम्युनिस्ट आणि त्यांचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. कारणशिवसेनेचं विषारी रोपटं मुळातूनच उपटून काढा असं आवाहन ते करत होते. तर उलट डांगे हे विष आहे, असा प्रचार शिवसेना करत होती. कारण शिवसेनेच्या लेखी कम्युनिस्ट राष्ट्रद्रोही होते. त्यामुळं त्यांना संपवणं गरजेचं होतं. म्हणूनच १९६७ पासून शिवसेनेनं नेम धरला होता तो  कम्युनिस्ट पक्षावर आणि अर्थात त्यांचे नेते कॉम्रेड डांगे यांच्यावर. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/21/34149

No comments:

Post a Comment