'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday, 16 January 2012

१९६८ची निवडणूक

कासराभर उडी मारल्यानंतर सिंह मागे वळून पाहतो. आपण किती लांब उडी मारली ते. मग अदमास घेत पुढची उडी घेतो. आपण त्याला 'सिंहावलोकन' म्हणतो. माणसानंही असंच करावं. इतिहासाचा मागोवा घ्यावा. म्हणजे आजूबाजूच्या घडामोडी उलगडतात. भविष्यात काय होईल याचा अंदाज येतो, असं जुने-जाणते सांगतात. 
ताजा संदर्भ आहे, मुंबई महापालिका निवडणुकीचा. १९६८ सालच्या निवडणुकीनं पुढचा सारा राजकीय पटच बदलून टाकला. या निवडणुकीविषयी, त्यावेळच्या वातावरणाविषयी 'नवशक्ति'त सुरू केलेला हा कॉलम. अर्थात आयडिया आहे, संपादक सचिन परब यांची. मी फक्त भारवाही हमाल...



भाग १ : इलेक्शन दे धक्का !
केवळ एका महापालिकेच्या निवडणुकीमुळं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं राजकारण बदलून गेलं...हे कोणालाही खरं वाटेल काय? पण होय, हे खरं आहे. भारतीय राजकारणात अशी उलथापालथ झाली ती मुंबई महापालिकेच्या १९६८ सालच्या निवडणुकीत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मुंबईतल्या दादा राष्ट्रीय पक्षाचं यात पानिपत झालं. त्यांच्यावर दे धक्का विजय मिळवला तो नव्यानंच उदयाला आलेल्या प्रादेशिक पक्षानं. त्याचं नाव, शिवसेना!

मुंबईतल्या या निवडणुकीपासून कम्युनिस्ट पक्षाला मुंबईत तर ओहोटी लागलीच. पण या पराभवाचा परिणाम देशभर झाला. देशातल्या पुढच्या दोन निवडणुका इंदिरा गांधींच्या वर्चस्वाखाली झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची लोकसभा, विधानसभेतली सदस्यसंख्या कमी झाली. 
डाव्यांच्या पाठीशी असलेला वर्ग काँग्रेसकडे वळला. यात प्रामुख्यानं होते, कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्ग. इंदिराबाईंच्या घोषणा त्यांचं आकर्षण ठरलं. या घोषणा होत्या, बँक राष्ट्रीयीकरण, राजेरजवाड्यांचे तनखे रद्द, बंद पडलेल्या किंवा आजारी गिरण्याचं राष्ट्रीयीकरण आणि गरीबी हटाव इत्यादी. 
७२ला इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं या आणिबाणीचं समर्थन केलं. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षानं सपाटून मार खाल्ला. आणिबाणीनंतर कम्युनिस्टांकडून काँग्रेसकडं गेलेला वर्ग जनता पक्षाकडं गेला.

आणिबाणीवरून कम्युनिस्ट पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यात पक्ष पुन्हा एकदा दुभंगला. कॉम्रेड डांगेंसारख्या उत्तुंग नेत्याला पक्षाबाहेर काढण्यात आलं. आणि मग काँग्रेसविरोध हाच कम्युनिस्ट पक्षाचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. त्याचा एकूण परिणाम म्हणजे पक्ष छोटा छोटा होत गेला. आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दावणीला बांधला गेला.
याच काळात प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रादेशिक अस्मितेला चालना मिळाली ती शिवसेनेमुळे. शिवसेना म्हणजे या पक्षांपुढं एक आदर्श’ ठरला. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन एखादा पक्ष एवढी परिणामकारक मुसंडी मारू शकतो, याचा साक्षात्कार शिवसेनेच्या १९६८मधील विजयातून देशातल्या इतर राज्यांना झाला. 
त्यातूनच मग तामीळनाडूत अण्णा डीएमके, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव, उत्तरप्रदेशात मुलायम सिंग, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, ओरिसात बिजू पटनायकांचा जनता दल, पंजाबमध्ये अकाली दल, ओमप्रकाश चौटालांचा हरियाणा जनतादल हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष उदयाला आले. या सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाले.

१९६६ सालच्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ सालीच काँग्रेसला देशभर प्रादेशिक अस्मितेचा पहिला धक्का बसला. ९ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली. कम्युनिस्टांसारख्या राष्ट्रीय पक्षाला आपण त्यांच्या बालेकिल्ल्यातच, मुंबईत हरवू शकतो हा या निवडणुकीतून शिवसेनेला आला.

१९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकांवर आणि मुंबईतल्या गिरणगावावर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का बसला. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळला. काँग्रेसमध्ये शिवसेनेचा वटवाढला. १९६८चं हे महाभारत नेमकं जिथं घडलं त्या रणभूमीची, गिरणगावाची आणि त्याच्या इतिहास-भूगोलाची चर्चा करूयात उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/16/32692


No comments:

Post a Comment