'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 22 December 2011

सेन्सॉर धुडकावणा-या लेखण्या

रस्त्यावर उतरून लढणा-या देशभरातल्या स्त्रियांचं लिखाण मराठीत येतंय. मनोविकास प्रकाशनने हे शिवधनुष्य उचललंय. तब्बल ४० पुस्तकांची भारतीय लेखिका नावाची ही मालिका आहे. पैकी ११ पुस्तकं तयार झालीत. त्यांची लोकप्रभामधून करून दिलेली ही ओळख...


एखादं गाव किती शहाजोग आहे, याचा कानोसा घ्यायचा असेल तर पाणवठ्यावर गावातल्या बायका काय काय बोलतात ते ऐकावं असं म्हणतात. मोठ्या समाजाबद्दलही तसंच म्हणता येईल. कुठलाही समाज किती निकोप आहे किंवा प्रगतीची किती शेखी मिरवतो, हे समजून घ्यायचं असेल तर त्या समाजातील स्त्रियांचं लिखाण वाचावं. अगदी लख्ख प्रतिबिंब उभं राहील. हे लिखाण म्हणजे समाजाचा आरसाच. पण बाई बोलते म्हटल्यावर लगेचच कान टवकारतात. आपल्याविषयीच काही तरी बडबडतेय असं लक्षात आलं तर अगोदर तिचं तोंड बंद केलं जातं. गपगुमान राहण्याची तंबी दिली जाते. खेडेगावातल्या एखाद्या छोट्या कुटुंबापासून तर जगभरातल्या प्रगत, अप्रगत समाजात हेच चित्र दिसतं. 


स्त्रियांनी लिहणं म्हणजे तर केवढं संकट. स्त्रियांना लिहायला, वाचायला शिकवणा-या सावित्रीबाई फुलेंना तर शेणाचिखलाचा मारा झेलावा लागला. काळ बदललाय पण यातलं फारसं काही बदललेलं नाही. उलट धार्मिक वगैरे कट्टरवाद्यांचा दरारा वाढलाय. जवळचंच उदाहरणच घ्या ना, गाझियाबादच्या नूर जहीर या पत्रकार लेखिकेचं. आपल्याकडं देवांमध्येही पुरुष देवांचाच प्रस्थ का? स्त्री देवतांनी काय कुणाचं घोडं मारलंय? असा प्रश्न जहीर यांना पडला. या दुय्यम वागणुकीचंच चित्रण करणारी माझा ईश्वर स्त्री आहे नावाची उर्दू कादंबरी त्यांनी लिहिली. एकही प्रकाशक हे पुस्तक छापायला तयार होईना. वैयक्तिकरित्या प्रकाशित करावं म्हटलं तर ते छापण्यासाठी एकही छापखाना होकार देईना.

अखेर ते इंग्रजीत प्रकाशित करावं लागलं. हेच पुस्तक आता मराठीत प्रकाशित होतंय. मराठीतील मनोविकास प्रकाशनानं हे धनुष्य उचललं आहे. भारतीय भाषांतील अशा धाडसी पुस्तकांची मालिकाच भारतीय लेखिका नावाने मनोविकास प्रकाशित करतंय. यात आहेत, तब्बल ४० पुस्तकं. त्यातील पहिल्या ११ पुस्तकांचं प्रकाशन येत्या १ जानेवारी रोजी होतंय. या पुस्तकांच्या किंमतीवर वाचकांना प्रकाशनपूर्व ४० टक्के सवलतही आहे. या पुस्तकांच्या संपादक आहेत, प्रसिद्ध कादंबरीकार कविता महाजन. 

भारतीय लेखिका या मालिकेसाठी त्यांनी देशभरातील स्त्री लेखिकांचं साहित्य निवडलं आहे. त्यात कथा आहेत, कादंब-या आहेत, कविता आहेत, शोधनिबंध असे वेगवेगळे प्रकार आहेत. नामवंत भाषांतरकारांकडून त्यांनी भाषांतर करवून घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व लेखिका या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. रस्त्यावर उतरून लढणा-या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सर्व प्रकारची कट्टर, सोवळी, ओवळी सेन्सॉरशिप धुडकावून लावलेली आहे. अशा महिलांचे जीवनानुभव कविता महाजनांनी या मालिकेतून एकत्र करायचं ठरवलं आहे. मराठी साहित्यात यानिमित्तानं एक मौल्यवान ऐवज येतो आहे.

तेलुगु लेखिका वोल्गा यांनी लिहिलेली राजनैतिक कथा’, उडीया भाषेतील लेखिका प्रतिभा राय यांनी लिहिलेली पुण्यतोया ही कादंबरी, निर्मला पुतुल यांनी संथाळी या आदिवासी भाषेत लिहिलेला नगा-याप्रमाणे वाजणारा शब्द’, हा कवितासंग्रह, गुजराथी भाषेतील समाहिता हा काव्यसंग्रह, इंग्रजीतील नूर जहीर यांनी लिहिलेले माझा ईश्वर स्त्री आहे, तसेच हिंदीतील चित्रा मुदगल यांनी लिहिलेली आग अजून बाकी आहे, मृदुला गर्ग यांची अनित्य, ही कादंबरी,  कुमारी माता हा डॉ. सुनीता शर्मा आणि अमरेंद्र किशोर यांनी लिहिलेला शोधवृत्तांत, डॉ. चंद्रकांत पाटील यांनी संपादित आणि अनुवादीत केलेला संगिनी हा काव्यसंग्रह, तर उंबरठ्याच्या अल्याडपल्याड हा सुधा अरोरांनी लिहिलेला लेख आणि जिथं स्त्रियांना घडवलं जातं हा मृणाल पांडे यांचा लेख, यांचा या मालिकेत समावेश केलेला आहे.

११ पैकी ही तीन साहित्यकृतींची ही प्रातिनिधिक ओळख -
१) राजनैतिक कथा - वोल्गा यांच्या तेलुगु भाषेतल्या राजनैतिक कथा वंदना करंबेळकरांनी अनुवादीत केल्या आहेत. या कथा म्हणजे बाईच्या शरिराचं राजकारण उलगडून दाखवणारं लिखाण आहे. बाईनं आपल्या शरीराविषयी लिहिणं म्हणजे जणू आपलं शरीरच उघडं करून दाखवणं. असं लिहिणारी बाई म्हणजे विकृतच, असं जगभरच्या कुठल्याही प्रगत, अप्रगत समाजात मानलं जातं. मग एखादी बाई बोल्ड लिहिते अशी वेगळी चर्चा रंगते. 
हल्ली स्त्रीच्या प्रत्येक अवयवाचं राजकारण, व्यापार केला जातोय. सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींमधली बाई, तिचा बाह्य नटवेपणा, खोटेपणा आणि त्याभोवतीचं अर्थकारण, राजकारण वोल्गा यांनी आपल्या लिखाणातून उलगडून दाखवलं आहे. बाई कुणासाठी सजतेधजते? रांधते, जगते? याविषयीचे बारीक बारीक निरिक्षणं वोल्गा यांनी राजनैतिक कथामधील १२ कथांमधून मांडली आहेत.

खरं तर हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. वोल्गा ही डाव्या चळवळीतील कार्यकर्ती. पण इथंही आपलं बाईपण आपल्याला वेगळं पाडत असल्याचा अनुभव त्यांना आला. बौद्धीक चर्चा, निर्णय प्रक्रिया यात बाईचा सहभाग कार्यकर्त्यांना मानवत नव्हता. मग त्या संघटनेतून बाहेर पडल्या. त्यांनी ते लिहायला सुरुवात केली.

आपल्या लिखाणात, अभ्यासात, समाजकारणात लग्न अडथळा बनू लागलं तेव्हा त्यांनी संसारही मोडला. आपल्या लिखाणात रोमँटिकपणा टाळून त्यांनी शारीर अनुभव अगदी वास्तवरित्या शब्दबद्ध केलेत. यात उपहास, विनोदाच्या दुख-या छटा आढळतात. दुस-यावर राग काढताना सरसकट आई-माईवरून शिव्या दिल्या जातात. पण त्या देताना आपण नकळत कोणा बाईवर अन्याय करतो आहोत, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. मग तो रस्त्यावरचा कार्यकर्ता असो की विद्रोही लेखक. याकडं वोल्गा लक्ष वेधतात. कुटुंब, जाती, धर्म, समाज यांची पारंपरिक मानसिकता समजू शकतो. पण समाज परिवर्तनासाठी काम करणा-या संस्था, संघटना कार्यकर्त्यांचीही हीच मानसिकता असावी, हे वोल्गा यांना अस्वस्थ करणारं आहे. तेच त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे.

२) माझा ईश्वर स्त्री आहे - नूर जहीर यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद शुभा प्रभू साटम यांनी केला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणं ज्या धर्मात मूर्तीपूजा नाकारली गेली, ईश्वर निराकार मानला गेला, त्या धर्मातही ईश्वर हा पुरुष मानला गेला. स्त्रीला नव्हे. याचं लेखिकेला आश्चर्य वाटलं. हे आश्चर्यच त्यांनी माझा ईश्वर स्त्री आहेमध्ये चितारलंय. आपल्याकडं मुस्लिम म्हणजे जणू दुसरे मागासवर्गीयच. त्याच पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला जातो. ब्रिटीशांविरुद्ध लढणा-या कम्युनिस्ट चळवळीत किंवा आझाद हिंद सेनेत मुस्लिम मोठ्या संख्येनं होते, हे संदर्भ तर आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात वाचायलाही मिळत नाही. बरं मुस्लिमांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प. जे शिकले ते आपला वैयक्तिक विकासातच गुंग झाले. समाजाला विसरून गेले. हे सारं नूरजहा यांच्या कादंबरीतून येतं.

त्यांच्या कादंबरीची नायिका सफिया आहे, सरकारी अधिकारी. सामाजिक कार्याशी असलेलं नातं तोडून ती स्वत:च्याच विश्वात रमते. वृद्धपणी समाजकार्याची इच्छा होते पण कृती करता येत नाही. म्हणून शहाबानो खटल्याच्या निमित्तानं लेखनाचा ती केवीलवाणा प्रयत्न करते.
या कादंबरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे, या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे, हे त्या कादंबरीतल्या अब्बास या पात्राच्या माध्यमातून सांगतात. लग्न, मेहेर, बहुपत्नीत्व, तलाक, मशिदीत महिलांनी जावे की नाही, याबाबतील धार्मिक वाद, सगळे मुस्लिम सारखेच, असं सरसकट लावलं जाणारं परिमाण, आदी प्रश्नांचा मागोवा यानिमित्तानं नूर जहीर यांनी घेतला आहे. त्याला पार्श्वभूमी आहे ती स्वातंत्र्यपूर्वकाळ ते १९८५मधील शहाबानो खटल्यापर्यंतची. या लेखनात विद्रोह असला तरी आकांडतांडव आढळत नाही. उगाच भावविभोर शब्दांची मांडणी न करता त्या थेट आणि सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहितात.

कारण त्यांच्या लेखणीवर पत्रकारितेचे संस्कार आहेत. अपघातानंतर परपुरुषाचं रक्त घेतलं म्हणून स्त्रीला व्यभिचारी ठरवण्याचं काम दिल्लीतील एका पोलीस अधिका-यानं केलं. अशा घटनांना पत्रकार म्हणून नूर जहीर यांनी वाचा फोडली आहे. प्रागतिक लेखक संघ स्थापन करणा-या सज्जाद जहीर यांची ही कन्या. वडिलांचा वारसा तिनं एका उंचीवर नेला आहे.


३) नगा-याप्रमाणे वाजणारा शब्द निर्मला पुतुल यांनी संथाळी या आदिवासी भाषेत लिहिलेला हा कवितासंग्रह. त्याचा हिंदी अनुवाद केला आहे, निर्मला पुतुल आणि अशोक सिंह यांनी. आपलं लेखन आणि पुतुल यांची कविता यांची जातकुळी एकच असल्याचं महाजन यांना वाटतं. माझ्या ब्र कादंबरीतून मी जे मांडलंय ते या आदिवासी कवयित्रीनं आपल्या संथाळी भाषेतल्या कवितांतून अगदी सहजगत्या मांडलंय. पण आमच्यात एक मोठा फरक आहे, आणि तो म्हणजे आदिवासी म्हणून ती आतली आणि मी बाहेरची आहे, असं महाजन खुल्या दिलानं सांगून टाकतात.
झारखंडचं आदिवासी विश्वच निर्मला पुतुल यांच्या कवितेतून उलगडत जातं.
‘‘बाबा!
इतकं दूर देऊ नको मला लग्न लावून
जिथं मला भेटायला येण्यासाठी
घरातील बक-या विकाव्या लागतील तुला…’’
सगळ्या स्त्रियांची दु:खं एकाच प्रकारची असतात, असं म्हटलं जातं. पण या दु:खातही विविध प्रकार असतात. जात, धर्म, प्रांत, गरीबी, श्रीमंती, शिकलेल्या, अडाणी असे त्यात अनेक पोटप्रकार असतात. स्वत:च्या आणि इतरांच्याही दु:खाची दुडीवर दुडी घेऊन जड पावलांनी पुतुल यांची कविता निघाली आहे. 


झारखंडमधली आदिवासी समाजातली गरीब बाई पुतुल यांच्या प्रत्येक कवितेतून सतत डोकावत राहते. दारू आणि कोंबडीसाठी कोवळ्या मुलीला लांडग्यांच्या हवाली करणारी आई पुतुल यांच्या कवितेचा विषय होतो. मग काय, नातेवाईक, शेजारीपाजारी, गावगुंड, पंच आदींचं त्या टार्गेट होतात. पण त्या कविता लिहितच राहतात. अगदी रोखठोक. पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या नव-याला ती सुनावते,
स्वप्नात येण्यानं काय होतं,
तनामनाची तहान थोडीच भागते!’

आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन्हीकडच्याही माणसांना या कवितेच्या इंगळ्या डसतात. बाईला चेटकीण समजणं, तिनं छत शाकारायचं नाही, नांगर चालवायचा नाही अशा गोष्टींपासून ते बायकांना सहज सोडून दुसरं तिसरं लग्न करणं, मोलकरणी म्हणून मुलींना शहरात विकणं, अशा बदलत्या काळातल्या समस्या त्यांच्या कवितेत येतात. निसर्गाच्या कुशीत राहणा-या आदिवासींमधील व्यसनं, अंधश्रद्धा, भोळसटपणा, अज्ञान, इतरांकडून गंडवलं जाणं, हे दोष दूर व्हावेत, ही पुतुल यांची तळमळ आहे.
झारखंड म्हणजे खनिजसंपत्तीची सोन्याची अंडी देणारी कोंबडी. म्हणून तिच्यावर भल्याभल्यांचा डोळा.

औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली देशी परदेशी धनदांडगे आता इथं वावरू लागलेत. पण इथल्या ३३ आदिवासी जमातींचं कुणाला काय पडलंय? राज्यसभेत नुकतच खासदार डॉ. के. केशवराव यांनी आपलं निरीक्षण मांडलं की, झारखंडमधील एका गावात सात बायकांमिळून एकच साडी आहे. घराबाहेर पडायचं असलं की त्या ती आलटून पालटून नेसतात! असली दु:खं पुतुल यांच्या कवितेतून बोलकी होतात. 
मौखीक साहित्याची समृद्ध परंपरा असणा-या देशातल्या ७५ आदिवासी जाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं सारं सांस्कृतिक संचित, वैचारिकता, अनुभवाचं निराळं विश्व संपणार आहे. म्हणून पुतुलसारख्या आदिवासी कवयित्रींच्या कविता अधिकाधिक भाषांमध्ये जायला हव्यात. त्या सर्वव्यापी व्हायला हव्यात. पण चिकण्याचोपड्या भाषेची अपेक्षा नका ठेवू माझ्याकडून, जीवनाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून चालून माझी भाषा रुक्ष बनली आहे असं पुतुल यांनी स्पष्टपणानं ठणकावलेलं आहे. पण तरीही
मला वाटतंय
नगा-याप्रमाणं वाजावेत
माझे शब्द
आणि बाहेर पडावं लोकांनी
आपापल्या घरांमधून रस्त्यांवर!’ असे क्रांतीचे नगारे पुतुल यांच्या कवितेतून झडताना दिसतात. 


'लोकप्रभा'तील लिंक - १) http://lokprabha.loksatta.com/19825/Lokprabha/30-12-2011#dual/24/3
२) http://www.loksatta.com/lokprabha/20111230/pustakanchya-jagatun.htm

No comments:

Post a Comment