'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday, 1 December 2011

अत्रे आणि शिवसेना

आठवड्याभरापूर्वी पेपरात एक बातमी वाचली. शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे! मला पीएच.डी.चे दिवस आठवले. पत्रकार अत्रेअसा संशोधनाचा विषय होता. सुरुवातीलाच मी वरील बातमीच्या निष्कर्षावर आलो. पण पुढं वाचत गेलो, तसं लक्षात आलं की, अरे ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. कॉपीची म्हणा हवी तर. (साप्ताहिक लोकप्रभाततशा आशयाचा मी एक लेखही लिहिला होता) महाराष्ट्रप्रेमाच्या भुतानं ज्याला झपाटलं तो अशाच प्रकारच्या गर्जना करणार न् लिहणार. मग ते लोकमान्य टिळक असोत, शि. म. परांजपे असोत, अच्युतराव कोल्हटकर असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत, राम गणेश गडकरी असोत की आचार्य अत्रे..!
परवा भल्या सकाळीच पोराला घेऊन शिवाजी पार्कावरच्या श्रॉफ हाऊसमध्ये गेलो होतो. तिथं अत्रेकन्या शिरिष पै राहतात. आचार्य अत्रे इथंच राहायचे. हॉलमधला अत्र्यांचा अर्धपुतळा पाहून मनात पुन्हा आलं, कदाचित हे शिवसेनाप्रमुखांचं, अत्र्यांचं घर असतं...पण इतिहासात जर, तर, कदाचित नसतात...


शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!, अशी बातमी नुकतीच
वर्तमानपत्रात वाचली. आता सुमारे अर्धशतकानंतरहरपले श्रेय शोधण्याची धडपड काअसा विचार यानिमित्तानं मनात आल्याशिवाय राहिला नाही. खरं तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे ही मराठी माणसाची दोन दैवतं. महाराष्ट्राकडं हे दोन महारथी नसते तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढा जिंकणं अशक्य होतं, हे प्रत्येक मराठी माणूस जाणतो. हा लढा लढवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं जे पंचायतन होतं, त्यात अग्रभागी होते, ठाकरे आणि अत्रे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या लेखण्या आणि वाण्या वीजेप्रमाणं कडाडल्या. जनमानसाला त्यांनी खडबडून जाग आणली. म्हणून तर मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. 

अत्रे आणि ठाकरे ही जोडगोळी या लढ्यापूर्वीही महाराष्ट्रात गाजत होती. समाजप्रबोधनाचा क्रांतीकारी टणत्कार करत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार समाजजीवन घुसळून काढत होते. तर आपले लेखन, पत्रकारिता, नाटक, सिनेमांमधून प्रल्हाद केशव उर्फ आचार्य अत्रे खेडोपाड्यात पोहोचले होते. तसे प्रबोधनकार अत्र्यांना सीनिअर. दोघांमध्ये जवळपास १३ वर्षाचं अंतर. प्रबोधन नियतकालीक चालवण्यासाठी पुण्यात गेलेले प्रबोधनकार सत्यशोधक चळवळीत व्यग्र झाले. त्याच काळात त्यांचं लक्ष एका व्रात्य तरुणाकडं गेलं. परिचय झाला. स्नेह वाढीला लागला. त्याचं नावप्रल्हाद केशव अत्रे.

अत्र्यांसाठी प्रबोधनकार म्हणजे जणू ज्येष्ठ गुरुबंधू. ठाकरेंच्या मार्गावरूनच अत्रे नंतर चालत राहिले. पुण्यात जोतिराव फुल्यांचा पुतळा उभारणी असो, फुल्यांवर अथवा सानेगुरुजींवर सिनेमा काढणे असो. अत्र्यांच्या या कार्यक्रमात प्रबोधनकारही सक्रीय सहभागी झाले. त्यांनी या सिनेमांसाठी संदर्भग्रंथ पुरवले. एवढंच नाही तर प्रबोधनकारांनी अत्र्यांच्या श्यामची आई सिनेमात शास्त्रीबुवांची भूमिका साकारली. तर महात्मा फुले सिनेमात कर्मठ ब्राम्हणाचं पात्र रंगवलं. दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या गुणांची वाहव्वा केली. दोघांचाही वीकपॉईंट एकच, आणि तो म्हणजे, महाराष्ट्र. मराठी माणूस!

या दोघांचीही गाठ पुन्हा पडली ती संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात. दोघांनीही मग आपापली कामे बाजूला ठेवली. आणि मराठी माणसांच्या या संगरात उडी घेतली. प्रबोधनकारांच्या महाराष्ट्रप्रेमाविषयी अत्रे म्हणाले होतेमहाराष्ट्र म्हटला की फिरलेच त्यांचे माथे. फुगल्याच त्यांच्या शिरा. आवळल्याच त्यांच्या मुठी अन् कडाडलीच त्यांची वाणी नि लेखणी. जन्मभर महाराष्ट्रावर एवढे जाज्वल्य प्रेम करणारी ज्वलंत माणसे आज थोडी आढळतील.

तर या लढ्यात लेखणीची तरवार आणि वाणीची गदा करणा-या अत्र्यांविषयी प्रबोधनकारांना कोण कौतुक. ते म्हणतात,अत्र्यांची वाणी नि लेखणी शुद्ध बाळबोध मराठमोळी धाटणीची आहे. मनातली मळमळ नि खळबळ सामान्य लोकांच्या भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. अत्र्यांची व्याख्याने ऐकणार्‍यांच्या काळजाचा ठाव घेतात. अत्र्यांची बाळबोध भाषा लोकभाषाच असल्याने त्यांचा प्रत्येक शब्दप्रत्येक कोटीप्रत्येक इशारा नि प्रत्येक धमकी श्रोत्यांच्या कानात सारखी घुमतगुणगुणत जाते आणि प्रत्येकाच्या जीभेवर त्याचे साद-पडसाद घरीदारी उमटत राहतात.

संयुक्त महाराष्ट्रासाठी लोकवर्गणीतून वृत्तपत्र काढणा-या अत्र्यांच्या पाठीवर शाबासकीचा पहिला हात होता प्रबोधनकारांचाच. मराठाच्या पहिल्या अंकाला पहिला स्फूर्तिदायक संदेश प्रबोधनकारांचाच होता. दैनिक मराठा निघाल्यानंतर १५ दिवसांनी अत्र्यांच्या अभिनंदनासाठी प्रबोधनकारांनी शांतारामाच्या चाळीत सभा भरवली.
शिवाय आपल्या दोन मुलांनाही त्यांनी आचार्यांच्या मदतीला दिलं.
मराठाचं मास्टहेड प्रबोधनकारांचे पुत्र चित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी तयार करून दिलं.

अत्र्यांचा मराठा प्रचंड लोकप्रिय झाला. या लोकप्रियतेत दोन व्यंगचित्रकांचाही वाटा होता. ते चित्रकार म्हणजे प्रबोधनकारांचे पुत्र बाळ आणि श्रीकांत ठाकरे. बी. के ठाकरे’, ‘मावळा अशा टोपणनावांनी बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढली. तर श्रीकांत ठाकरेंच्या चित्रांनी विशेषत: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी विशेष कामगिरी बजावली. मराठाच्याही अगोदर नवयुगमध्येही ठाकरे बंधूनी आपल्या कुंचल्याची करामत दाखवली होती. नवयुगला २० वर्षे झाली त्यावेळी अत्र्यांनी बाळ आणि श्रीकांत ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केलं. या दोघांनीहीनवयुगच्या लोकप्रियतेत जी भर टाकलीतिला तोड नाहीअसे गौरवोद्गार अत्र्यांनी काढले होते. आचार्य अत्रे हे जनता जनार्दनाने बनवलेले संयुक्त महाराष्ट्राचे यंत्र आहे’,  असे प्रबोधनकार म्हणत. तर संयुक्त महाराष्ट्राच्या महाभारतातला झुंजार महारथी आणि जन्मभर महाराष्ट्रावर जाज्वल्य प्रेम करणारा माणूस म्हणजे, केशवराव ठाकरे’ असे आचार्य अत्रे म्हणत.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतरही संयुक्त महाराष्ट्र समितीत फूट पडू नये म्हणून अत्र्यांनी अटोकाट प्रयत्न केले. सीमाभाग महाराष्ट्रात यावा, यासाठी समितीच्या एकजुटीची गरज आहे, असं ते सांगत राहिले. पण शेवटी ही समिती फुटलीच.
तरीही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची शिवशक्ति जागृत झाली आहे. तिला आता शिस्त लावून मराठी माणसांच्या संरक्षणासाठी, भल्यासाठी वापरायला हवी, असं मत आचार्य अत्रे व्यक्त करीत राहिले. मराठाच्या नव्या बिल्डिंगचं नावही त्यांनी शिवशक्तिच ठेवलं. यासाठी मराठी माणसांची एखादी संघटना असावी, असं मत ते व्यक्त करत होते. २५ जुलै १९५९ या दिवशी  त्यांनी मराठा शिवसेनायाच नावाने यासंबंधी अग्रलेख लिहिला होता.

तसंच जानेवारी १९६३ मध्ये दोन लेख लिहून दै. मराठातून शिवसेना या संघटनेबद्दल विचार मांडले होते. २४ जानेवारीला शिवशक्तीत काही निमंत्रित व निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यात संघटनेची ध्येयधोरणेही ठरली होती. त्यात शिवसेना पक्षीय राजकारणापासून दूर राहील, शिवाय भारतीय घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही संघटना शांतता आणि सामोपचाराने महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, असंही यात ठरलं होतं. पण अशा प्रकारचे विचार प्रबोधनकार ठाकरे त्यापूर्वी कित्येक वर्षे करत होते. त्याविषयी खुद्द अत्र्यांनीच ठाकरेंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तमराठात लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, ‘मराठी जनतेच्या हितासाठी 'शुद्ध महाराष्ट्रीय पक्षस्थापन करण्याची आवश्यकता प्रबोधनकारांनी दोन तपापूर्वी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या निमित्ताने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. याचा अर्थ १९६० रोजी प्रबोधनकार ७५ वर्षांचे झाले होते. आणि त्याही अगोदर दोन तपे म्हणजे ४०च्या दशकातच प्रबोधनकारांच्या मनात 'शुद्ध महाराष्ट्रीय पक्षस्थापन करण्याचे घाटत होते.

संयुक्त महाराष्ट्र समिती फुटल्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
त्यानंतर अत्रे डाव्यांकडे झुकले, असं या दुराव्याचं कारण सांगितलं जातं.
पण तिथून पुढं पूर्वी महाराष्ट्राच्या विरोधकांवर आग ओकणा-या या मुलुखमैदान तोफा एकमेकांवर तुफान चिखलफेक करू लागल्या.
ठाकरेंच्या घराशेजारी असलेल्या लालन नावाच्या गुजराथी मारवाड्याच्या रबरी गमबुटाच्या गोडाऊनचं निमित्त झालं. मार्मिकआणि ‘प्रबोधनमधील काही लेखांमुळे अत्र्यांचा प्रबोधनकारांवर रोष होताच. या गोडाऊनविषयी ठाकरेंनी तक्रार करताच अत्र्यांनी या प्रकरणाला मराठातून प्रसिद्धी दिली. आणि दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अत्रे कम्युनिस्ट आहेत’,असा ठाकरेंनी जाहीर आक्षेप घेतला. त्यामुळे अत्रे चवताळले. प्रबोधनकार मार्मिकमधून आणि अत्रे मराठातून गरळ ओकू लागले. दोघांवरही भरभरून प्रेम करणा-या मराठी माणसाच्या मनाला मात्र या वादामुळे प्रचंड क्लेश झाले.

त्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेनेनं अत्र्यांना नामोहरम करण्यासाठी कंबर कसली. १९६७ साली मुंबईतून लढवलेली लोकसभेची निवडणूक अत्रे चार ते पाच हजार मतांनी हरले. त्यात शिवसेनेचा रोल मोठा होता. हा पराभव अत्र्यांच्या जिव्हारी लागला. १३ जून १९६९ रोजी अत्र्याचं निधन झालं. २२ जून रोजी 'असा पुरुष होणे नाही', या नावाने ठाकरेंनीमार्मिकमध्ये अत्र्यांवर संपादकीय लिहिले. आम्ही वैराची दरी बुजवण्याचे खूप आधीपासून प्रयत्न करत होतो, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं. शिवाजी पार्कवरच्या ३० ऑक्टोबर १९६६ रोजी झालेल्या पहिल्या विराट मेळाव्यात अत्र्यांना आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभे राहा’, असं जाहीर आवाहन केलं होतं. शिवसेनेच्या सुरुवातीच्या प्रत्येक मेळाव्यात या आवाहनाचा पुनरुच्चार करण्यात आला’, असंही ठाकरेंनी नमूद केलं.  पण अत्रे गेले नाहीत. गेले असते तर अत्रे कदाचित पहिले शिवसेनाप्रमुख झाले असते...

त्यानंतर अत्र्यांच्या मृत्यूपत्राचा वाद सुरू झाला. अत्र्यांनी आपली सगळी इस्टेट महाराष्ट्राला अर्पण केल्याचं खोटं मृत्यूपत्र बनवलं गेलं. अत्रेकन्या शिरीष पै यांनी ही गोष्ट प्रबोधनकारांच्या कानावर घातली. प्रबोधनकारांनी पुन्हा कंबर कसली. आणि मोठ्या बारकाव्यानेअभ्यासूपणेएकेक दाखला देत या मृत्यूपत्रातील खोटेपणा सिद्ध केला.

खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मराठी माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जीत झाली. पण हे नवं राज्य ‘बेळगाव, कर्नाटक, निपाणीसह झालेलं नव्हतं. त्यासाठी 'संपूर्ण महाराष्ट्र समिती' स्थापन करण्यात आली. अर्थात अत्रे त्यात आघाडीवर होते. पण पुढं या समितीचाही कारभार आटोपला. 

मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ ऑगस्ट १९६५मध्ये लालबाग-परळ भागात महाराष्ट्र हितवर्धिनी नावाची संस्था स्थापन केली होती. नोक-या तसेच सरकारी वसाहतींमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढू नये अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. यावेळी शिवसेना नेते दत्ताजी नलावडेही आदिकांसोबत होते. बाळासाहेब ठाकरेंची तर आदिकांशी दोस्तीच झाली होती. आदिकांच्या कामाचं ते जाहीर कौतुकही करत. पत्रकार म्हणून 'लोकसत्ता'चे ह. रा. महाजनीही त्यादरम्यान मराठीपणाचा जोरदार पुरस्कार करत होते. असं असलं तरी मराठी माणूस आणि सीमाप्रश्नासाठी संघटनात्मक काम करण्यात शिवसेनाच यशस्वी झाली. मराठी माणसांची लढाऊ संघटना या संकल्पनेला बाळासाहेब ठाकरेंनीच मूर्त रुप दिलं. त्यामुळं या संघटनेचे मूळ जनक कोण हे शोधण्याचा प्रयत्नच अप्रस्तुत ठरतो.

अत्रे जाऊन आता ४० वर्षे होऊन गेली. त्यांच्यानंतर मराठी माणसाचा आवाज बनलेला आणि इतिहास घडवलेला मराठा बंद पडला. त्यांनी उभारलेली शिवशक्तिही दुस-याच्या ताब्यात गेली. पण प्रबोधनकारांनी स्थापन केलेली शिवसेना अजून उभी आहे. अर्थात या संघटनेनं मराठी माणसांसाठी काय केलं? हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण आता एवढ्या वर्षांनीशिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक कोण’?, हा विषय पुन्हा चर्चेला येणं म्हणजे मराठी मनाला पुन्हा क्लेष देणं, हे मात्र नक्की. 

No comments:

Post a Comment