‘नवशक्ति’ने आज महापरिनिर्वाणदिन विशेष पुरवणी काढलीय. ‘भीमराव की बेटी हूँ मै!’ अशी थीम आहे. त्यात माझाही संत सोयराबाई आणि कुटुंबावरचा लेख छापलाय...
भल्या पहाटे सावळ्या विठूरायावर दूध, दही, मधादी पंचामृताचा अभिषेक सुरू आहे. टिपेचा सूर लावून ‘बेणारे’ पुरुषसूक्त म्हणतायत. त्याची गंभीर लय गाभा-यात आवर्तनं घेतेय. ‘परिचारकां’नी गरम पाण्यानं भरलेली चांदीची घागर नुकतीच आणून ठेवलीय. आता ते धुपाटण्यात धूप नीट जुळवून ठेवतायत. ‘बडवे’ देवाच्या भरजरी वस्त्रांच्या घड्या उलगडतायत.
देवाचा मुख न्याहाळण्याचा आरसा ‘डिंगरे’ पुसून लख्ख करतायत.
काकडआरतीला वाजवण्याच्या पखवाजाचं पूड तापवून, ‘हरिदास’ ते वाजवून बघतायत. हातात चांदीची काठी घेऊन देवाचे चोपदार ‘डांगे’ दारात कडक बंदोबस्त ठेवून आहेत. ‘दिवटें’च्या हातातल्या दिवटीच्या हलत्या पिवळसर उजेडात हे सारे नित्योपचार सुरू आहेत.
एवढ्यात विटेवर हालचाल होते. तोंडावरलं पाणी हातानं निपटत त्रासिक चेह-यानं खुद्द विठूरायाच म्हणतोय, ‘बंद करा हो, बेणारे तुमची ती भुणभुण...जरा तो अभंग लावा की, अवघा रंग एक झाला...’ काळ्या कातळातून खण् खण् आवाज यावा तसे किशोरीताईंचे सूर गाभा-यात उमटू लागतात...विठूराया पुन्हा हात कटेवर ठेवतो. समाधानानं डोळे मिटून डोलू लागतो. ‘रंगी रंगला श्रीरंग...’ देवाच्या डोळ्यातून ओघळलेले थेंब बडवे सुती वस्त्रानं अलगद टिपून घेतात. सुरांचा बहर ओसरल्यानंतर हळूवारपणे डोळे उघडून विठूराया विचारतोय, ‘काय रे, ती सोयराबाई आली होती ना, माझ्या दर्शनासाठी..’
‘देवा, लुगड्याला ठिगळं लावल्याली ती चोख्याची महारी तं नव्हं? म्या तर तिला पायरीरूनच माघारी लावली. हात नगं लावू म्हनलं पायरीला…’ चोपदार म्हणतायत.
‘अरे अरे, तुम्हाला नाही कळायचं. नामदेवा... ’ देवाच्या हाकेनं देवळाच्या मागंच राहणारे संत नामदेव गडबडीनं देवापुढं हजर होतात. ‘जा गड्या, असाच्या असा. आत्ताच्या आत्ता. कुठं गेली ती सोयरा, शोध तिला...
नामदेव जाताना पुटपुटतायत, ‘आता कुठं शोधावी हिला..चोखोबा गेल्यापासून सैरभैर झालीय अगदी...’
अर्धवट झोपेत, एखाद्या ब्लॅक एन्ड व्हाईट सिनेमाचा ट्रेलर डोळ्यापुढून स्लो मोशनमध्ये सरकत जावा, तसं हे स्वप्न.
जागेपणीही ही सोयरामाय डोळ्यापुढून हालत नाहीये. चोखोबामागोमाग तीही येते. डोईवरच्या लुगड्याच्या फाटक्या पदरातून कोरडे केस डोकावतायत. उन्हातान्हात राबून चेहरा रापलाय. डोळ्यात मात्र तेज आहे. आत्मा जागृत झाल्याचं. हा चमत्कार कसा झाला असेल, मी विचार करतोय.
सातशे वर्षांपूर्वीचा चोखोबांचा काळ म्हणजे राजकीय धामधुमीचा, उलथापालथीचा, मोगली आक्रमणांकांचा. भरीस भर म्हणून रुढी, परंपरांचा जोर वाढलेला. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात नाथ, महानुभव, लिंगायत, वारकरी, दत्त आदी संप्रदाय उदयाला आले. यातील श्री बसवेश्वरांचा वीर शैव आणि वारकरी संप्रदायात कमालीचं साम्य. बसवेश्वर हे मंगळवाड अर्थात आताच्या पंढरपूरजवळच्या मंगळवेढे गावात बिज्जल राजाच्या सेवेत होते. कुशल प्रशासक म्हणून नावारुपाला आले होते. हातातली सत्ता या महापुरुषानं योग्य कामासाठी वापरली. त्यानं समाजात अस्पृश्य उद्धार, स्त्रीमुक्ती, श्रमप्रतिष्ठा रुजवली.
दुसरीकडं देवगिरीच्या यादव राजवटीतल्या हेमाद्री पंडितांनं ‘चतुर्वर्गचिंतामणि’ लिहून व्रतवैकल्यांचं अगदी स्तोम माजवलं होतं. अशा वेळी ख-या ज्ञानाचा उजेड दाखवणारी ज्ञानदेव-नामदेवरुपी चंद्र-सूर्याची जोडी महाराष्ट्राच्या क्षितीजावर उगवली. त्यांच्यासोबत एकत्र आले, वेगवेगळ्या दैवतांची उपासना करणारे गोरोबा-विसोबा, सावतामाळी-नरहरी सोनार आदी अठरापगड जातीचे संत. संत नामदेव हा या माळेमधले मेरुमणी. दिल्लीपासून देवगिरीपर्यंत आक्रमकांचा गदारोळ सुरू असताना हा पठ्ठ्या खरा मनुष्य धर्म समजावून सांगत देशभर फिरत होता. पंजाबात ज्ञानपीठाची स्थापना करणा-या नामदेवांनी त्रिलोचन, लद्धा, बहोरदास अशा अनेक बहिष्कृतांना उराशी कवटाळलं.
सुंभाचा करदोटा, रकट्याची लंगोटी नेसून वाळवंटात कीर्तन करणा-या नामदेवानं महाराष्ट्रातल्या शूद्रातिशूद्रांचं आत्मभान जागवलं. संस्कृत पंडितांची मक्तेदारी मोडून काढत दासी जनाबाई आणि गावकुसबाहेरच्या चोखोबांना जवळ केलं.
ज्ञानदेव-नामदेवांनी सुरू केलेल्या संतचळवळीला आलेलं यशाचं फळ म्हणजे संत चोखोबा. खरं तर मेलेली गुरं ओढण्यापासून ते मैला डोक्यावरून वाहून नेण्यापर्यंतची गावकीची सर्व कामं करण्याचा त्याचा नित्यनेम. पण वारकरी संतांच्या सहवासात त्यांना आपल्या माणूसपणाची जाणीव झाली. त्याची लागण त्यांच्या अर्धांगिनीला अर्थात पत्नी सोयराबाईलाही झाली. आणि मग चोखोबाचं सारं कुटुंबच संतमंडळींच्या कौतुकाचा विषय बनलं. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या अभंगातून संत जनाबाईनं या कुटुंबाचं मोठं लाघवी वर्णन केलंय.
सोयराबाई या कुटुंबाची पोशिंदी. विटाळ होईल म्हणून पाळीचे चार दिवस घरातल्या भांड्यालाही स्पर्श करायचा नाही, अशा काटेकोर रुढींचा तो काळ. अशा काळात ज्याची सावलीही अंगावर पडणं म्हणजे पाप, अशा अस्पृश्य माणसाच्या बायकोनं, चोख्याच्या महारीनं चक्क ‘विटाळाचे अभंग’ लिहिले.या अभंगांनी जातपातीचा विटाळ मानणा-यांची थोबाडं रंगवली.
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।
देहींचा विटाळ देहींच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।
विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।
कोणा देह निर्माण नाही जगी।।
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखियाची।।
असा माणूसपणा सोयराबाईनं आपल्या अभंगातून शिकवला.
अगदी चोखोबांच्या मृत्यूनंतरही न डगमगता सोयराबाईंनी चोखोबांचे मानवता, समता, न्याय, बंधुतेचे विचार आपल्या अभंगांतून बहुजन समाजापर्यंत पोहचवले. धर्ममार्तंड, जातीयवाद्यांशी विचारांचा लढा दिला. आणि अस्पृश्य मानल्या जाणा-या समाजातील पहिल्या महिला संत होण्याचा मान मिळवला.
त्या धामधुमीच्या मध्ययुगीन काळात देशातल्या इतर कोणत्याही भाषेत कोणत्याही स्त्रीनं लिहिलं नाही, ते लिहिलं सोयराबाईनं. तिच्या जोडीला होती, तिची जीवाभावाची नणंद, निर्मळा. श्री बसवेश्वर आणि वारक-यांनी केलेल्या क्रांतीचं प्रतिबिंब या दोघींच्या अभंगातून अगदी लख्खपणे पडलं.
सोयराबाईने लिहिले ६२ अभंग. तर निर्मळेनं लिहिले २२. अर्थात हे आत्तापर्यंत उपलब्ध झालेले अभंग. यापैकी सोयराबाईचे तर दोनच अभंग आपल्याला माहिती असतात. एक म्हणजे, ‘अवघा रंग एक झाला’. हा अभंग किशोरी आमोणकरांचाच आहे, असं आजही अनेकांना वाटतं! तर पंडित भीमसेन जोशींनी पहाडी आवाजात गायला म्हणून ‘सुखाचे हे नाम आवडीने गावे। वाचे आळवावे विठोबासी।।‘ हा दुसरा अभंग.
केवळ तत्त्वज्ञानच नाही तर, आपलं साधंभोळं जगणं आणि जगण्यातले बारीक सारीक आनंदही त्यांच्या अभंगांचे विषय बनले.
नणंदेच्या घरी राहण्यातलं सुखही सोयराबाई किती आनंदानं सांगते. निर्मळेच्या घरात अंघोळ करणे म्हणजे, कोटी कोटी वेळा प्रयागाला जाण्यासारखं आहे, असं ती म्हणते. त्यापुढं तिला गंगा, इंद्रायणी, न् चंद्रभागेचं स्नानही फिकं वाटतं.
नात्यातला हा गोडवा, आदर निर्मळेचा पती बंकानंही जपला.
नात्यातला हा गोडवा, आदर निर्मळेचा पती बंकानंही जपला.
चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा सुखाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माऊली। चोखा कृपेची साऊली।।
चोखोबा आणि सोयराबाई या उभयतांमधला असणारा सोशीकपणा मात्र निर्मळेच्या अभंगांमध्ये फारसा दिसत नाही. वहिनीला घरी एकटाच सोडून आलास म्हणून भाऊ चोखामेळ्याला ती दटावताना दिसते. तर
‘आजवरी तुम्ही तयासी पाळिले। अपराध साहिले चोखियाचे।।
‘आजवरी तुम्ही तयासी पाळिले। अपराध साहिले चोखियाचे।।
तयाचिया पाठी आमुचा कंटाळा। आला का दयाळा मज सांगा।।‘
असा निर्मळा देवाला थेट सवाल करते.
असा निर्मळा देवाला थेट सवाल करते.
चोखामेळ्याचा मुलगा कर्ममेळा तर या सर्वांच्याही पुढे गेला. काहीही अपराध नसताना बडव्यांचा निमूटपणे मार खाणारा बाप त्यानं पाहिला आहे. त्यामुळं लहानपणापासून डोक्यात भरलेला राग मग थेट विठोबावर निघतो.
आमुच्या बापाचे ठेवणे। का तु न देसी आम्हा कारणे।।
कैसी तुझी नीत बरी। मागता शिणलो मी हरी।।
हे आणि असं सगळं असलं तरी चोखोबांच्या कुटुंबाचा थोरपणा त्याही पुढचा आहे.
पंढरीचे ब्राम्हणे चोख्यासी छळीले । तयालागीं केले नवल देवें ॥१॥
सकळ समुदाव चोखियाचे घरी । रिध्दी सिध्दि द्वारी तिष्ठताती ॥२॥
ब्राम्हणांसकट सर्व जातीधर्माचे संत चोखोबाच्या घरी जेवण्यासाठी जमा होतात. खुद्द देवही या समता आणि एकोप्याच्या पंगतीत हजेरी लावतो. आमच्यासाठी हीच दसरा दिवाळी आहे, असं सांगणारी सोयराबाई यातून केवढा तरी ‘सोशल मेसेज’ देते. तो उघडून तरी बघायला हवा.
चोखोबाच्या कुटुंबाचं हे कालातीत कार्य कर्नाटकातल्या एका कर्मठ ब्राम्हणाच्या मुलाला समजलं होतं. त्याचं नाव अनंतभट्ट. वडिलांच्या विरोधाला न जुमानता तो चोखोबांच्या अभंगाचा लेखक झाला. म्हणून तर मानवतेचं हे धन आज आपल्यापर्यंत पोहचलंय.
सोयराबाईनं एक ‘कृष्णचरित्र’ नामक काव्य लिहिल्याचंही सांगितलं जातं. पण आज ते उपलब्ध नाही.
पंढरपुरातून हकालपट्टी झाल्यानंतर चोखोबा कुटुंबासह चंद्रभागेच्या पलिकडं झोपडी बांधून राहू लागले. तिथं त्यांनी एक दीपमाळ उभारली. ही दीपमाळ म्हणजे स्वत: अंधारात राहून जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवणा-या चोखोबाच्या कुटुंबाचं प्रतिकच. ही दीपमाळ आता जागेवर नाही.
बुलडाण्याजवळच्या मेहुणपु-यात राहणा-या निर्मळा, बंका यांच्या पाऊलखुणाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. देहू इथलं चोखा मेळ्याचं मंदिर आता ओस पडलं आहे. ज्ञानेश्वरमाऊलींच्या पालखी सोहळ्यातील चोखोबांची दिंडी तर नावापुरती राहिली आहे. चोखोबांचं नशिब, त्यांची छोटीशी का होईना समाधी मंगळवेढ्यात आहे.
पु. ल. देशपांडेंचं एक पोस्ट तिकीट आहे. ज्यावर त्यांनी सिनेमात भूमिका केलेल्या संत चोखोबांचा फोटो आहे. पण त्याचाही कधी गाजावाजा झाला नाही.
‘कर्ममेळा हा विद्रोही होता. प्रस्थापित तत्त्वांशी विद्रोह करण्यासाठी तो विठ्ठलाशी भांडला होता. नव्हे, तो आंबेडकरांचा पूर्वज होता’, असं मत श्री. म. माटे यांनी व्यक्त केलं होतं. परंतू तो विचार ना आंबेडरकरवाद्यांना मान्य झाला ना माटेंच्या ज्ञातीबांधवांना. ‘महार माटे’ म्हणून त्यांना हिणवलं गेलं.
पु. लं.च्याच भाषेत सांगायचं तर, चोखोबा-सोयराबाई ‘तुम्हारा चुक्याच’... इथं कोणत्याही काळात जातीपाती सांभाळून राहावं लागतं बाबांनो!
खरं तर १९५६नंतरच्या धर्मांतरामुळं चोखोबा-सोयराबाईच्या वाट्याला ही उपेक्षा अधिक आली.
कारण ‘अस्पृश्यता हे कर्माचे फळ आहे. पुनर्जन्म कर्माने मिळतो’, असा आशय त्यांच्या अभंगांतून व्यक्त होतो. आणि या कल्पना तर आंबेडकर चळवळीनं पूर्णपणानं नाकारल्यात.
त्यामुळं ‘काय केला अपराध?’ असं आपल्याच जातबांधवांना विचारण्याची सोयही चोखोबा-सोयराबाईला राहिली नाही.
खालच्या जातीतले म्हणून नव्या वारक-यांनाही चोखोबा-सोयराबाई नकोच आहे. आणि जातीनंच नाकारल्यानं आता चोखोबांच्या कुटुंबाच्या वाट्याला कायमचाच विटाळ आला आहे.
थोर मानवतावाद सांगणा-या संत चोखोबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं ‘द अनटचेबल्स’ हे पुस्तक अर्पण केलंय. पण आता आघाडी, युतीचं राजकारण करणा-या आंबेडकर अनुयायांना चोखोबा कुटुंब गैरसोयीचे वाटतं, हे त्या कुटुंबाचंच दुर्दैव, दुसरं काय?
म्हणून हे विठूराया,
मंगळवेढ्याची वेस तुटो
मेहुणपु-याचं पांग फिटो
विठूरायाचं सुतक मिटो
No comments:
Post a Comment