'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Saturday, 21 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)

भाग ७ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)
शिवसेना जन्माला आली तीच मुळी मराठी अस्मितेच्या प्रश्नावर. कालांतरानं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत शिवसेनेनं मुस्लिम विरोध सुरू केला. पण सेनेनं यापेक्षाही कट्टर द्वेष केला तो मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाचा. आपल्या राजकीय आयुष्यात शिवसेनेनं बहुतेक पक्षांशी युती केली पण कम्युनिस्टांशी कधीही जवळीक केली नाही.

मुंबईवर अधिराज्य गाजवायचं असेल तर बाळासाहेबांच्या भाषेत या लाल माकडांना पहिल्यांदा हुसकावून द्यायला पाहिजे, असा अजेंडा शिवसेनेनं ठरवला. त्यानुसार शिवसैनिकांमध्ये कट्टर कम्युनिस्टद्वेष भिनवण्यास सुरुवात केली. डेअरिंगबाज कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं अवसानघात करण्यासाठी त्यांच्या म्होरक्यावर प्रहार करणं आवश्यक होतं. म्हणूनच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेचे प्रमुख शत्रू बनले.

खरं तर कॉम्रेड डांगे म्हणजे देशातल्या कम्युनिस्ट पक्षाचे उद्गाते आणि कामगार चळवळीचे पितामह. त्यांच्याच पुढाकारानं १९२५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीस्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यात कामगार आणि शेतकर्‍यांचा सहभाग वाढला तो डांगे यांच्यामुळं. महिला कामगारांमध्येही हक्काची जाणीवनेतृत्वगुण निर्माण करण्यात डांगे यशस्वी ठरले. 

त्यांच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. त्यांनी काही काळ वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचं सदस्यत्वही भूषवलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेत रशियानंही त्यांना सर्वोच्च असं लेनिन पदक देऊन गौरविलं होतं. चीन-युद्धानंतर क्रुश्र्चेव्हटिटो आदी नेत्यांना भेटण्यासाठी आणि भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी  पंडित नेहरूंनी डांगेंना खास परदेश दौर्‍यावर पाठवलं होतं. 

असा हा नेता महाराष्ट्राच्या, मुंबईच्या गळ्यातला ताईत होता. मराठी माणसासाठी डांगेंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. त्यांच्यामुळंच  कामगार वर्ग मोठ्या संख्येनं आणि एकजुटीनं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उतरला आणि हा लढा यशस्वी झाला.

मराठी भाषेवर डांगेंचं मोठं प्रेम होतं. राज्यकारभारात मराठी भाषा स्वीकारली जावी, यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. कामगार चळवळ आणि राजकारणासोबतच साहित्य, संगीत, अर्थकारणाचाही त्यांचा अभ्यास होता. साहित्य क्षेत्रातलं दलित-विद्रोही साहित्य निर्माण होण्यामागची वैचारिक पार्श्र्वभूमी तयार करण्याचं मोठं काम कॉम्रेड डांगेंनीच केलं. संयुक्त महाराष्ट्राचं मुखपत्र अर्थात आचार्य अत्र्यांचामराठा पेपर सुरू करण्यातही डांगेंचा मोठा वाटा होता.

दिल्लीश्वरांनी १ एप्रिल हा महाराष्ट्र दिन करायचं ठरवलं होतं. पण डांगेंच्या आग्रहामुळं १ मे हामहाराष्ट्र दिन झाला. अशा या लोकप्रिय माणसाला अंगावर घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा जनमानसातल्या त्याच्या प्रतिमेला धक्का दिला पाहिजे, हे बाळासाहेबांनी लक्षात घेतलं. त्यानुसार मार्मिकच्या प्रत्येक कार्टूनमध्ये डांगे राष्ट्रद्रोही असल्याचं रंगवलं जावू लागलं. डांगेवर टीका नाही, खिल्ली उडवणारं कार्टून नाही, असा १९६५पासूनचा मार्मिकचा एकही अंक पाहायला मिळत नाही. भाषणातून डांगेंवर जोरदार टीका करणं, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करणं हे तर नेहमीचंच झालं.
  
मुंबईतल्या गिरण्यांसोबतच एलआयसी, जीआयसीवर कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. ते मोडून काढायचं तर शिवसेनेनं समाजकारणापेक्षा राजकारणात जाणं गरजेचं होतं. त्यानुसार कम्युनिस्टांना विरोध करतच शिवसेना १९६७च्या निवडणुकीत उतरली. 

सेनेच्या पहिल्या मेळाव्यात राजकारण म्हणजे गजकरणअशी खिल्ली उडवणारे ठाकरे पुढच्या काळात पक्के राजकारणी बनले. त्यांची शिवसेना कम्युनिस्ट पक्षाची वैरी बनली. या राजकारण ते गजकरण प्रवासावर नजर टाकूयात उद्याच्या भागात.


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/23/34764

No comments:

Post a Comment