'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday, 24 January 2012

अड्डे ते शाखा

भाग ९ : अड्डे ते शाखा
मार्मिकमधले विचार वाचून बेरोजगार मराठी तरुण अस्वस्थ झाले. नाक्या-नाक्यांवर जमून चर्चा करू लागले. हे सारं बदललं पाहिजे, असं म्हणू लागले. सुरुवात म्हणून त्यांनी परिसरातल्या नागरी समस्यांना हात घातला. कचरा, सांडपाणी, नळाचं पाणी आदी तक्रारी घेऊन ते वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ लागले. नंतर तर केवळ नागरी समस्याच नाही तर अगदी गल्लीतली, घरांमधली भांडणंही हे तरुण सोडवू लागले. त्यामुळं गांजलेल्या मराठी माणसांना या अड्ड्यावरच्या तरुणांचा मोठाच आधार वाटू लागला.

सुरुवातीला हे अड्डे अगदी घराच्या ओट्यांवर, चाळींच्या जिन्याखाली, दुकानांच्या बाकड्यांवर असे जागा मिळतील तिथं सुरू झाले. भाऊ पाध्येंनी राडा या आपल्या कादंबरीत या अड्ड्यांचं नेमकं वर्णन केलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या अड्ड्यांना बळ मिळालं. त्यांचं हळू हळू शाखांमध्ये रुपांतर होऊ लागलं. गोरेगावचे विलास अवचट किंवा गिरणगावातल्या बाळकृष्ण नर यांच्याकडं सुरुवातीच्या या शाखांच्या मोठ्या मनोरंजक आठवणी आहेत. गिरणगावातले शिक्षक असलेले रमेश लब्दे यांनी तर पहिली शाखा काढली मॉडर्न मिलच्या कोप-यात मुतारीच्या जागेवर, गटारावर. ती पंधरा वेळा पाडली आणि बांधली. त्यावर केवळ छप्पर टाकलं जायचं.

अशा शाखांमधून कामाला सुरुवात करूनच शिवसेनेचे नेते पुढं आले. गिरगावातले प्रमोद नवलकर प्रजासमाजवादी पक्षाच्या जिन्याखालच्या जागेत लोकांच्या तक्रारी ऐकत बसत. ही जागा अपुरी पडू लागल्यानं ते रस्त्यावरच्या सुपारीच्या दुकानात खुर्ची टाकून बसू लागले. तीही जागा अपुरी पडू लागल्यानं गिरगावातल्याच एका मोकळ्या जागेवर शिवसैनिकांनी शाखा बांधून टाकली. मुंबईतल्या शिवसेनेच्या बहुतेक शाखा अशाच रातोरात उभारल्या गेल्या.

सुधीर जोशींनीही न. चि. केळकर रस्त्यावरच्या आपल्या यशवंत भोजनालयाच्या गच्चीवर एक शाखा बरेच दिवस चालवली.
परळचे वामनराव महाडिक शाखेचं बांधकाम होईपर्यंत आपल्या घरासमोरच टेबल टाकून बसायचे.
शिवशाहीतील गडांच्या बुरुजांच्या आकारातल्या या शाखा ठिकठिकाणी दिसू लागल्या. खरं तर शाखा ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या जवळ जाणारी. पण या शाखांमधले सैनिक मात्र रस्त्यावर उतरून लढत. लोकांच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस धावपळ करत.

त्यामुळं या शाखा म्हणजे नागरिकांना आपल्या व्यथा, गा-हाणी मांडण्याचं हक्काचं ठिकाण बनलं. अडचणीत सापडलेल्या मराठी माणसाला मदत करणं, हे या शाखांचं आद्य कर्तव्य बनलं. याशिवाय या शाखांवर रोजगार मार्गदर्शन, व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, विविध स्पर्धा व्यायामशाळा उभारणी अशा गोष्टीही होऊ लागल्या. रक्तदानासाठी तर शिवसैनिक कधीही धावून जात.

महागाईतही शाखांवरचे शिवसैनिक सामान्य माणसाच्या मदतीला धावत.
सणासुदीच्या काळात शिवसेना शाखांसमोर रास्त दरात नारळ, उदबत्या विकायला ठेवल्या जात. साठेबाजी करणा-यांच्या विरोधात धडक कारवाई केली जाई. गोडाऊन उघडून त्यातला माल लोकांना रास्त दरात विकून टाकला जाई. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी हा तर त्या काळी परवलीचा शब्द बनला होता.

पण नंतर पक्षासाठी निधी गोळा करण्याचं कामही याच शाखांमधून सुरू झालं. मात्र ते काहीही असो. शिवसेनेचं ८० टक्के समाजकारणाचं धोरण या शाखांनी मनापासून राबवलं. अर्थात हे सारं करत होते, सच्चे, कडवे, मराठीप्रेमानं झपाटलेले शिवसैनिक. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/25/35071

No comments:

Post a Comment