पैसा म्हणजे परमेश्वर. पैसा हसवतो. पैसा रडवतो. पैसा घडवतो. पैसा बिघडवतो. पैसा अगदी ’माणसाचं’ माकड करून टाकतो. तरी सारं जग पैशाभोवतीच फिरतं. या पैशानं माणसांची दुनिया अगदी उलटी-पालटी करून टाकलीय. ही दुनिया पाहायची असेल तर पुण्याजवळचा चाकण, खेड परिसर एकदा फिरून यावा...
आले.. आले.. आले... मुंबईतले सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी अभयशेठ गावडे आले. दरसाल ते यात्रेसाठी घसघशीत देणगी देतात बरं का. यंदाही ते आपला नावलौकीक राखणार आहेत. लाऊडस्पीकरवरून गावचे कारभारी माऊलीअप्पा यात्रेला गावी आलेल्या मुंबैकराला असं हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. मग कांजी केलाला खादीचा शर्ट न् डोक्यावर कडक धारेची भगवान टोपी घातलेला मुंबईकर वाजत्र्यांच्या कडकडाटात, गुलालाच्या उधळणीत तरंगतच मांडवात येतो. दोनऐवजी चार हजारांची रोख देणगी देतो. या सोहळ्याची मुंबईकर आणि त्याचं गाव वर्षभर वाट बघत असतं.
दुसरीकडं मुंबैकर घरी आला म्हणजे मुंबईचा हलवा, पोराटोरांना नवे कपडे, वाणसामान, शेजारच्यांना काहीबाही, असं काय काय...
खेड, आंबेगाव, जुन्नर. उत्तर पुणे जिल्ह्यातले तरकारी अर्थात हिरवा भाजीपाला पिकवणारे तालुके. या परिसरातलं हे चित्र. भाजीपाला विकण्याच्या निमित्तानं इथला घरटी एक तरी माणूस मुंबईत आहेच. भाखळा आणि नवी मुंबईचं भाजीपाला मार्केट, गोदी, हमाल, डबेवाले यात सगळेच खेड मंचरवाले. या परिसराचं आणि मुंबईचं असं ’अर्थ’पूर्ण नातं आहे.
मीही नोकरीच्या निमित्तानं मुंबईकर झालो. यात्रेबित्रेच्या सोहळ्यात मिरवत नाही. पण पोराच्या न् माझ्या मनात आलं की उठून गावी चालू पडतो. गेल्या काही फे-यांमध्ये सारखं जाणवतंय की, वातावरण बदलतंय. माणसं पूर्वीसारखी वागत नाहीत. आपुलकी, जिव्हाळ्यानं बोलत नाहीत. हळू हळू उलगडा झाला. गाववाल्यांकडं पैसा आलाय. दाम बडी चीज. नसतो तोवर माणूस जमिनीवरून चालतो न् खिशात असला की जमिनीच्या दोन बोटं वरून.
झालं तसंच. कधी तरी होणारच होतं. कारण हा परिसर मुंबई-पुण्याजवळचा. दोन-चार तासांच्या प्रवास अंतरावरचा. त्यामुळं इथं एमआयडीसी आली. सेझ आला. बारा पिढ्या ज्या जमिनींना पाणी पाहायला मिळालं नाही त्या मुरमाड माळरानांना सोन्याचा भाव मिळाला. एकरकमी पैसा हातात आल्यावर काय, चढाओढ लावून गावांनी चारचाकी गाड्या आणल्या. पोराटोरांच्या बुडाखाली धूमस्टाईल बाईक आल्या. पेंटच्या जाहिरातीतल्यासारखी घरांची रुपं पालटली.
रुंद झालेल्या रस्त्याच्या कडेला टोलेजंग मंगल कार्यालयं उभी राहिली. त्यात लाखालाखांचे लग्नसोहळे साजरे होऊ लागले. शेजारच्याच ढाब्यांवर मनमुराद खाऊन-पिऊन वर्हाडी मंडळी डीजेच्या तालावर धुंद होऊ लागली. सोनसाखळ्यांचे गोफ, अंगठ्या, महागडे गॉगल न् मोबाईल मिरवणारे तरुण पुढारी गावोगाव दिसू लागले.
मी म्हणतो, ’बिघडलं काय? बरै की राव. गावाकडच्या मंळींनापण चैन करुद्या ना. की सगळ्यावरच शहरी लोकांचा मक्ता? तर दोस्त कुरकुरला, ’अरे नाय कोण म्हणतंय. पण बुडाखाली काय जळतंय हे कुठं या लोकांना कळतंय?’
’मी विचारतो, म्हणजे? त्यावर शून्यात नजर लावत तो म्हणतो, ’अरे, या पैशानंच होत्याचं नव्हतं केलं. नाती मोडली, माणसं तोडली. भावाला भाऊ वैरी झाला न् बहिणींना माहेर बंद झालं. रक्षाबंधन, भाऊबीज थांबली. जमीन विक्रीतून मिळालेले पैसे चैनबाजीवर उधळले आणि आता मारतायत कोर्टाचे खेटे.’
डोक्याला गिरमीट लागलं. एका वकील स्नेह्यांकडं गेलो. मस्त प्रशस्त बंगला. मुंबई-पुण्यात बघायला मिळणार नाही, असं इंटेरिअर. ‘बंगला छान आहे’, म्हटल्यावर खुलले. एका गावातले भावाबहिणींचे तीसेक खटले आहेत म्हणाले. भावांना जमिनींचे रग्गड पैसे मिळाले. बहिणींनी का मागं राहायचं? प्रकरणं कोर्टात गेली. मग, ‘तुला ना मला, घाल कुत्र्याला’. तारखेचे खेटे सुरू. अशाच एका वादात माझ्या एका पक्षकाराचे १ कोटी ८२ लाख रुपये पडून आहेत. निकाल लागल्यावर मिळतील. पण त्याला किती वर्षे लागतील त्याता नेम नाही.
एका बँकअधिका-याकडं जाऊन बसलो. म्हणाला, ‘आमच्या शाखेनं १०० कोटींच्या ठेवी जमवल्यात. पैसे वाटपाच्या दिवशी आम्ही स्टॉल लावला होता. बसल्या जागेवर खाती खोलली. दुस-याही १० बँका होत्या. विमावाले, वन टाईम इन्व्हेस्टमेंटवाले, खाजगी गुंतवणुकीवाले यांचेही स्टॉल होते. सुमो, स्कॉर्पिआवाल्यांनीही डेमो कार्स आणल्या होत्या. एकेका शेतक-याच्या हातात किमान एकेक कोटी तरी पडले.
ब-याजणांनी एफडी केल्या. एफडी करणारे ९० टक्के लोक अंगठेबहाद्दर होते.
सेझसाठी एकूण ४ हजार ८०० एकर जमीन म्हणजेच १७ लाख हेक्टर जमीन संपादित केली गेली. एकरी ६ लाख ८० हजार रुपयांचा भाव दिला गेला. असे एकूण ३ अब्ज २६ कोटी ४० लाख रुपयांचे वाटप झाले.
एफडीव्यतिरिक्तच्या पैशांचं काय काय झालं?
शेतात बंगले उभे राहिले. दारात झोकदार गाडी आली. मनाला येईल ती वस्तू घेतली. कोणत्या वस्तूला किती पैसे लागतात, हे कोणाला ठाऊकै. म्हणजे उदाहणार्थ लोखंडाच्या कोणत्याही कपाटाला ’गोदरेज’चं कपाट म्हणतात. त्याची किंमत असते साडेतीन हजार वगैरे. दुकानदारानं एका गिर्हाईकाला आकडा लिहून दिला ३,६००. त्यानं बँकेतून काढले ३६,०००!
बँकेतले पैसे काढण्यासाठीही मदतीची गरज. मग दलाल सरसावले. पाच हजारांवर सही घेऊन ५० हजार हडप करू लागले. कुणीही धोत-या गडी पैसे काढायच्या स्लीपवर अंगठा देऊन १७-१७ लाख रुपये काढतो.
बँकेत एक कोटींची ठेव असलेला माणूस येतो. एका कोप-यात बसतो. त्याला काढायचे असतात, दोन हजार रुपये. व्हीआयपी ट्रिटमेंटची गरज ना त्याला वाटते ना बँकेला.
अहो, दलालांची एवढी चलती झाली, की वकिलांनी वकिली सोडून दलाली सुरू केली. फसवणूक, खून, मारामा-यांची प्रकरणं वाढली. दोन दलालांनी एका ऊसतोड मजूर महिलेला राजी केली. फुकट एसटीपास, पाच हजार रुपये आणि साडीची लालूच दाखवली. तिच्या अंगठ्यावर जमिनीचा मोठा खोटा व्यवहार झाला. प्रकरण पोलिसात गेलं. बाई गेली जेलमध्ये आणि दोन्ही दलालांच्या हातात एकेक कोटींची दलाली पडली.’’
एका कारभा-यानं खंत व्यक्त केली. ’ब्राम्हण मारवाड्यासारखा शेतकरी समाज सुशिक्षित नाही. पैसे मिळाल्यावर त्यानं ’फणाशी फण आणि खणाशी खण’ वाढवला नाही. पैसे आले आणि कापरावानी उडून गेले.’ अशा एक ना अनेक गोष्टी.
एका गोष्टीनं मात्र चुटपुट लावली.
अगदी ’जैत रे जैत’ सारखी ’डोंगर काठाडी ठाकरवाडी’. तिचं नाव कव्हाळा ठाकरवाडी. पण ‘दावडीची ठाकरवाडी’ म्हणून पंचक्रोशीत ओळख. दीडशे उंबरा. रानची पाखरं. रानावनात फिरून दोन वेळचं खायचं न् चांदण्या मोजत उघड्या रानात झोपायचं. त्यांना कुठून लागायला आधुनिकता वगैरेचा वारा. पण सेझ आलं न् दूर डोंगरावर वसलेल्या ठाकरवाडीचं भाग्य पालटलं. एरवी फार तर झाडपाल्याच्या औषधासाठीच ’ढवळ्या’ कापडातली माणसं डोंगरावरच्या ठाकरवाडीत जायची. आता वाडीच्या दारातच विकासगंगा अवतरली. सेझमधली ’खेड सीटी’ वाडीशेजारीच उभी राहिली.
दुपारचं बाराचं उन्ह झेलंत, दगडगोट्यांची चढण चढत वाडीत पोहोचलो. पहिलंच घर लागलं संदीपचं. गोरागोमटा विशीतला तरुण. सुवासिक साबणानं तोंड धुवत होता. फरशीच्या उंच ओट्यावर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसलो. भोवतालच्या परिसरावर नजर फिरवली तर विश्वरुप दर्शनच घडलं. नजर जाईल तिथर्पंत पसरलेलं माळरान. डोंगर द-या. दूरवर चीनच्या भिंतीसारखं बांधकाम सुरु असलेलं वॉलकंपाऊंड. जरा मागं जाऊन डोकावलो तर दचकलोच. चक्क दोन मोठ्या द-या आणि डोंगर जोडले जात होते. बुलडोझरनं. रोडरोलर फिरत होता. प्रशस्त रस्ता तयार होत होता.
संदीपचं तोंड धुणं आटोपलं. त्यानं सिक्स पॉकेट जीन्स, शर्ट चढवलं. टचस्क्रीन मोबाईलशी खेळत म्हणाला, बोला.. खेड सीटीत आमच्या वाडीची दीडेकशे एकर जमीन गेली आसंल... बोलता बोलता त्याच्या शेतावर गेलो. त्याच्याकडं पल्सर बाईक होती. स्पेशल नंबरची. म्हणाला, त्यासाठी वेगळे पैसे मोजलेत.
संदीपच्या शेताला पाईपलाईन वगैरे. हिरवा भाजीपाला. शेतात वेगळं घर. त्यापुढं कोंबड्या. ‘हे झुंजीचे स्पेशल कोंबडे आहेत..’संदीपची माहिती. पूर्वी पोटापाण्याचं साधन काय होतं, तर म्हणाला मोलमजुरी. आणि सीताफळं. म्हणजे ’निमगाव-धामणटेक’ नावाची प्रसिद्ध सीताफळं. दिवाळीच्या दरम्यान रानभर लगडतात. डोळे उघडून लालबुंद होतात. डोंगरातल्या दगडाधोंड्यात उगवलेल्या या फळांना अवीट गोडी. ती पाण्यावरच्या सीताफळांत सापडायची नाय. दीड महिना रानोमाळ फिरून ही सीतामायची फळं गोळा करायची. खेडला, पुण्याला न्यायची. रोख पैसे. पण सेझसाठी रानातली ६० ते ७० हजार सीताफळाची झाडं तुटली. त्यामुळं हा पैशांचा झरा आटला. काही लोकांना अजूनही जमिनीचे पैसे मिळालेले नाहीत. ज्यांना मिळाले त्यांनी संपवले. आता पुन्हा दुस-याच्या शेतात मजुरीला जातात.’
बोलताना संदीपचा मोबाईल सारखा वाजत होता. ’आ रहा हूँ. गेस्ट आये है.. ’ असं पलिकडच्यांना सांगत तो निघालाच. मग आम्हीही परतीचा रस्ता पकडला. निघताना ठाकरवाडी न्याहाळली. सगळी आरसीसीची घरं. घरात महागड्या टाईल्स, इंटिरिअर, फ्रीज, टीव्ही वगैरे सगळं.
सोबतीला आलेले खेडमधले स्नेही सुतार सांगू लागले,
’’अहो, पूर्वी या वाडीची भारुड मंडळं प्रसिद्ध होती. आता पैसे आले ना, वाडीतल्या कारभा-यानी भारूडं बंद करून तमाशा पार्टी काढली. सर्जेराव जाधवांचा तमाशा आता प्रसिद्ध झालाय. त्यांच्या फडात शंभरेक माणसं काम करतात. सहा ट्रक आहेत. एका रात्रीला किमान ५० हजारांचा खर्च. त्यामुळं आता तमाशामालक झालेत कर्जबाजारी. तेवढ्यानं भागलं नाही म्हणून निवडणुकीला उभे राहिले. पडले. नुकत्याच झालेल्या पंचायतसमितीच्या निवडणुकांमध्ये एकेका उमेदवारानं ४० ते ५० लाख रुपये उधळले.
या सगळ्यात गरीब ठाकर माणूस संपला. पैशांचा धूर झाला. वाडीतल्या प्रत्येक पोराकडं बाईक आली. पोलिसानं अडवलं तर त्याच्या अंगावर पैशांचं बंडल फेकायचं. अपघात झालेली बाईक तर घरी आणायचीच नाही. अहो, बाईक चालवता येत नाही म्हणून अनेकांनी बाईकसाठी ड्रायव्हर ठेवले. नव-या मुलींना सोन्याची पैंजणं केली. डीजे लावून धुमधडाक्यात लग्नं लावली.
इतकी अंदाईधुंदाई झाली.
त्यांचे सर्वाधिक पैसे गेले दारुमध्ये. पूर्वी देशी दारु प्यायचे आता इंग्लीश पितात. त्यांच्याच पैशांवर ढाबे उभे राहिले. हे ढाबेवाले सुरुवातीला ठाकरांना दारू घरपोच करायचे. आता त्यांच्याकडचे पैसे संपले. त्यामुळं ढाबेवाले दारातही उभं करत नाहीत. या पैशांनी ठाकरांमधला कष्टाळू, काटकपणा घालवला. तरुणाईचा तर विषयच संपला. पूर्वी सीताफळ, मध गोळा करणे हे पोट भरण्याचे उद्योग होते. आता तेलही गेले. तूपही गेले. हाती धुपाटणेही राहिले नाही.
आता तर मजुरीसाठीही कोणी घेत नाही. या सगळ्या निराशेतून पिणं वाढलं. त्यातून आजारपण सुरू झालं. आता होतेय डॉक्टरची धन!’’
पुढं काही विचारायची इच्छाच होईना. मुका होऊन मुंबईला परतलो...
fine. baryach gosti aahet shillak
ReplyDelete