'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 16 July 2012

महानामा

आज संत नामदेवमहाराजांची पुण्यतिथी. नांदेडमध्ये 'रिंगण'च्या (http://www.ringan.in/) वेबसाईटचं प्रकाशन झालंय. त्यानिमित्तानं 'रिंगण'साठी लिहिलेला हा लेख...

पहिली आठवण आहे. गाभा-यातल्या समईच्या उजेडात विठुरायाचा सावळा चेहरा उजळून निघालाय. डोळे मिटून मोठ्या प्रसन्न चित्तानं तो ऐकतोय, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा.., उठा जागे व्हा रे आता... स्पष्ट, खणखणीत आवाज, सुंदर वारकरी चाल. पांढराशुभ्र फेटा बांधलेले वडील नामदेवरायांचा काकडा म्हणतायत. पहाटेच्या शांततेत आवर्तन घेत येणारे ते सूर हृदयात जिरतायत. मुरतायत. मी बहुदा आईच्या पोटात आहे



हे नामदेवराय पुढं कुठं कुठं भेटतच राहिले. ज्ञानेश्वरी पारायणाच्यावेळी मधल्या ब्रेकमध्ये वडील पुढं म्हणायचे. आम्ही मागे म्हणायचो. 
ज्ञानाबाई माझी योग्यांची माऊली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।।
गीताअलंकार नाम ज्ञानेश्वरी...’ 
नामदेवरायांनी गायलेला ज्ञानदेवांचा महिमा. अतिव करुणेचे ते शब्द मायेचं पांघरुन घालायचे. आळंदीत माऊलींच्या मंदिरात गेलं की पाठीमागच्या भिंतीवर माऊलींच्या समाधीप्रसंगाचं चित्र. निवृत्तीनाथादी भावंडांसोबत नामदेवराया उभे आहेत. ठळकपणे. शेजारी त्यांनीच केलेलं सोहळ्याचं वर्णन,
नदीचिया माशा घातले माजवण तैसे जनवन कालवले।
दाही दिशा धुंद उदयास्ताविण। तैसेचि गगन कालवले।।
त्या चित्राह हा अभंग मनावर कोरला गेलेला.  
भाद्रपदात गणपतीचा जल्लोष. सामूहिक घोषात सुरू असलेल्या आरतीच्या शेवटी नामदेवांचं घालीन लोटांगण...डोळे मिटायचे. नकळत स्वत:भोवती गिरकी घ्यायची. पहाटे काकड्यात ऐकलेले नादेवराय पुन्हा डोळ्यापुढं उभे राहायचे. रिंगणच्या निमित्तानं हे नामदेवराय पुन्हा भेटले.

कसला आलाय सुवर्णकाळ!
नामदेव. जगणं सोपं करणा-या नामाचा गजर करणारा हा महानामा. महामानव. महाद्रष्टा. जगाला प्रकाश देणारी आपली सहिष्णु परंपरा नामदेवांनी उजळली. नामदेवांचं बालपण गेलं विठुरायाच्या पंढरीत. तसे ते मूळचे संतभूमीतले. मराठवाड्यातले. विठुरायाच्या ओढीनं अन् कामधंद्याच्या शोधात त्यांचे वडील दामाशेटी आले पंढरपुरात. देवळाच्या मागंच घर केलं. तिथलेच होऊन राहिले. या कुटुंबाला आपसूकच देवाचा अखंड शेजार मिळाला. बालनामदेवाची तर विठुरायाशी गट्टीच झाली. त्याच्या या सावळ्या दोस्ताला भेटायला आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं लाखो वारकरी यायचे. एरवीही सारखी माणसं येत राहायची. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून. ही नाना प्रकारची माणसं नामदेवांना लहानपणापासून पाहायला मिळाली. काही नाही. अनवाणी पावलं. खांद्यावर पडशी. अंगावर जाडीभरडी कापडं. चेह-यावर मात्र विश्वरुपदर्शन. नाना प्रकारचे व्याप-ताप, काळज्या-चिंता, दु:ख-दारिद्र्य, हे सारं त्य़ा रापलेल्या पण निग्रही चेहऱ्यांवर उमटलेलं असायचं. विठोबाचं मुखदर्शन होताच हे चेहरे उजळून निघायचे. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद... नामदेवाला मोठं आश्चर्य वाटायचं. कसले लोक आहेत? कुठून कुठून उन्हा-पावसात धडपडत, चालत येतात? बरं दिसतात तर एकदम गरीबडे, परिस्थितीनं गांजलेले. मग देवाकडं काही मागावं बिगावं तरी. पैसाअडका मिळू दे, घरीदारी आबादीआबाद होऊ दे. मुलाबाळांना सोन्याचे दिवस येऊ देत...यापैकी काहीही नाही. कमरेवर हात ठेवलेल्या या विठुरायाचा दर्शन झालं की विरघळले. त्याच्या पायावर डोकं ठेवलं की ब्रम्हानंद. आता काही इच्छा नाही. तुझे पायी सुख सर्व आहे... नामदेवांच्या ओसरीवर ही मंडळी मुक्कामाला थांबायची. दामाजीपंतांना गावाकडची सुख दु:खं सांगायची. बापाजवळ बसलेले बालनामदेव या माणसांना बारकाईनं न्याहाळायचे. 

खरं तर तो काळ काही बरा नव्हता. म्हणायला मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. म्हणजे देवगिरीच्या यादव राजवटीचा वैभवशाली काळ. पण सर्वसामान्यांचा या वैभवाशी काहीही संबंध नव्हता. घरात दोन वेळचं खायला नाही न् व्रतवैकल्य, अनुष्ठानं, ब्राम्हणभोजन घालण्याची सक्ती. हो सक्तीच. कारण ते नाही केलं तर लेकराबाळांना सुख लाभणार नाही, असं धर्ममार्तंडांनी मनावर बिंबवलेलं. मुख्य म्हणजे राजाचीही या कर्मकांडांना मान्यता. ही कर्मकांडं सांगणारे शास्त्रकार त्यानंच पदरी बाळगलेले. हे यादव राजे सनातन वैदिक धर्माचे पुरस्कर्ते. वैदिक ब्राम्हण आणि शास्त्रीपंडितांना त्यांनी उदार श्रय दिला. शारंगदेव, हरिपालदेव, लक्ष्मीधर, हेमाद्री आणि बोपदेव आदींना तर राजा रामदेवरायानं मंत्रीपद, सेनापतीपदासारखी पदं दिली होती. यादवांचे अनेक मंत्री आणि थोर अधिकारी ब्राम्हण होते. यात खोलेश्वर आणि हेमाद्री हे प्रसिद्ध. सेनापती हेमाद्री हा थोर शास्त्रकार होता. त्याने आणि इतर पंडितांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा व्रतं वैकल्यं सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात तब्बल दोन हजार व्रतं सांगितली होती. म्हणजे दिवसाला पा-दहा व्रतं करायची. गरीब असो नाही तर श्रीमंत. शिवाय या व्रतवैकल्यांचं, धर्मनियमांचं जनतेनं पालन करावं, अशी राजाज्ञा. रामदेवाच्याच पुरुषोत्तमनायक नावाच्या मंत्र्यानं स्मृतीवचनांना अनुसरून वर्णाश्रम धर्माची स्थापना केली. परिणामी या काळात जातीभेद फारच कडकपणे पाळले जाऊ लागले. जाती बंदिस्त झाल्या. अठरापगजाती घट्ट झाल्या. आपसातले रोटी-बेटी व्यवहार बंद झाले. गुन्ह्यांबद्दल जातीबाहेर काढण्य़ाची शिक्षा होऊ लागली. शिवाशिव, सोवळेओवळे यांचा जोर वाढला. धर्मबाह्य वर्तन करणा-या अस्पृश्यांना देहांताची शिक्षा दिली जाऊ लागली. विषमतेची बीजं पेरली गेली. 
समाजातला सलोखा कमी झाला.
कर्मकांडात अग्निहोत्र आणि पंचमहायज्ञ आदींचं महत्त्व वाढलं. ज्या घरात अग्निहोत्र होत नाही, तिथं पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करू नये, असे संकेत रुढ केले गेले. तीर्थक्षेत्रांचं महत्व अतोनात वाढलं. हे कमी म्हणून की काय, नाना प्रकारची शेंदरी-हेंदरी दैवतं तयार झाली. त्यांना प्रसन्न करणारे, भूतबाधा वगैरे उतरवणारे देवऋषी तयार झाले. भोळ्या-भाबड्या जनतेला लुटू लागले. यासोबतच जुगार, वेश्याव्यवसायादी धंद्यांना बहर आला. ही सारी परिस्थिती परकीय आक्रमकांना फारच सोयीची वाटली.
अशा वेळी राजसत्तेला परखडपणानं सुनावणारं कोणी नव्हतं काय? होय होतं ना. महानुभव होते. लिंगायत होते. नाथपंथी होते. जैन होते. बौद्ध होते. पण तेच स्वत: क्षीण होत चालले होते. त्यांना राजाश्रय नव्हता. आता तो का दिला गेला नव्हता हेही जाणून घ्यायला हवं.

जातीभेद गाडणारे लिंगायत
यादवराजेपुरस्कृत शास्त्रीपंडितांच्या कर्मठ वैदिक धर्माला त्या काळात थेट विरोध करणारा प्रमुख पंथ म्हणजे लिंगायत पंथ. या पंथाचा उदय झाला कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या कल्याणी या लहान गावात. बसवेश्वरांनी या पंथाचं पुनरुज्जीवन केलं. जातीभेदाला विरोध हे या पंथाचं प्रमुख तत्व. विशेष म्हणजे बसवेश्वर स्वत: ब्राम्हण होते. लिंगायतांच्या धर्मसभेत बसवेश्वरांनी अस्पृशांना, स्त्रियांना मानाचं स्थान दिलं. त्या काळात दक्षिण भारतात शिव आणि वि्ष्णू या देवतांच्या भक्तांचा मोठा जोर होता. यात केरळमधले जे शिवभक्त होते त्यांना नायनार म्हणत. तर तमीळनाडूतील विष्णूभक्त होते, त्यांना अळवार म्हणत. यापैकी नायनारांच्या विचारांचा प्रभाव लिंगायतांवर पडला. अळवारांचा प्रभाव वारकरी, महानुभवांवर पडला. लिंगायतांनी जातीभेद अमान्य करत समता बंधुभाव स्थापनेचा प्रयत्न केला. बसवेश्वरांचं हे तत्त्वज्ञान कल्याणीचा कलचुरी राजा याला मान्य झालं नाही. विशेष म्हणजे बसवेश्वरच या राजाचे मुख्य प्रधान होते. यातून राजकीय बंड झाले. बसवेश्वरांनी महासमाधी घेतली! त्यांच्या अनुयायांनी हा पंथ पुढं निष्ठेनं चालवला. कल्याणी हे महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. त्यामुळं महाराष्ट्रावर लिंगायतांचा, बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव पडला. गळ्यात लिंग धारण करणारे लिंगायत महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पसरले. वाणसामानाचं दुकान टाकून गावक-यांच्या गळ्यातले ताईत बनले.

लोकभाषेचे पुरस्कर्ते नाथपंथीय
आपल्याकडं नाथ पंथाची मोठी परंपरा आहे. अल्लख निरंजनअसा खणखणीत आवाज देत दारी येणारे नाथपंथी साधू देशभरातल्या खेडोपाड्यांमध्ये परिचित होते. आहेत. दहाव्या शतकापासून हा नाथ पंथ भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात पसरायला सुरुवात झाली होती. या पंथाच मूळ संस्थापक मस्येंद्रनाथ अर्थात मच्छिंद्रना. पण पंथप्रसाराचं प्रभावी कार्य केलं त्यांच्या शिष्यानं, गोरखनाथांनी.
ज्या काळात संस्कृत भाषेचं प्रचंड अवडंबर माजवलं गेलं होतं, त्या काळात गोरखनाथांनी लोकांच्या भाषेत प्रचार करायला, लिहायला सुरुवात केली. गोरखबानी म्हणून गोरखनाथांची पदं प्रसिद्ध आहेत.
मच्छिंद्रनाथ आणि गोरखनात या गुरुशिष्याच्या जोडीनं आख्खा देश उभा आडवा पिंजून काढला. आंध्र-केरळापासून उत्तरेत पश्चिम आणि पूर्व भागात नाथपंथाची केंद्रं उभी राहिली. गावोगावी गोरखनाथांचे पाईक निर्माण झाले. या गोरखनाथांचा नामदेवांवर मोठा प्रभाव आढळतो. उत्तरेत नामदेव गेले तेव्हा त्यांना आधार या गोरखनाथ परंपरेचाच होता. नामदेवांच्या हिंदी पदांची रचना थेट गोरखबानीप्रमाणेच आहे. हा पंथ महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या वृद्धेश्वराच्या डोंगरावर स्थापन झाला, असंही सांगितलं जातं. पंचमढीची यात्रा तर प्रसिद्धच आहे. आंबेजोगाईत नाथपंथाचे एक केंद्र होतं. या नाथपंथाचा अजूनही जनमानसावर प्रभाव किती, तर आजही गावोगावी श्रावण महिन्यात नवनाथ कथासार ग्रंथ वाचला जातो. गावातल्या धर्मनाथ, मुक्ताबाईच्या मंदिरात नित्यनेमाने पूजा होते. श्रावणाच्या मंगळवारी शेतीच्या सर्व कामांना विश्रांती देवून मुक्ताबाईचा मोढा पाळला जातो. आंबील, घुग-या, फुर्मोल करून धर्मरायाचा बीजोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जातो. नाथपंथीयांनी भरपूर वाड्.मय लिहिलं. अर्थात बोलीभाषांतून. त्यामुळं संस्कृत भाषेचा पुरस्कार करणा-या राजवटीला ते मान्य झालं नाही.
या काळात बौद्ध धर्मही क्षीण होत चालला होता. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचा राजाश्रय कमी होत चालला होता. दक्षिणेतले सातवाहन-वाकाटकादी राजेही वैदिक धर्माचेच अनुयायी होते. गुजरात आणि कर्नाटकात जै धर्माला राजाश्रय होता. पण महाराष्ट्रात या धर्माचा फारसा प्रचार नव्हता. खान्देश, विदर्भ, सांगली, कोल्हापूरसारख्या भागात त्यांचा प्रचार सुरू होता. पण तेवढ्यापुरताच.

राजसत्तेला तडाखा देणारे महानुभव
सामान्य जनतेमध्ये रुजणा-या या पंथांपैकी राजसत्तेला थेट जाब विचारण्याचं, तडाखा देण्याचं काम केलं ते महानुभव पंथीयांनी.
या पंथाची स्थापना श्रीचक्रधर स्वामींनी पैठण इथं केली. हेही मूळचे सामवेदी ब्राम्हण. त्यांचं मूळ नाव हरिपाळदेव. विदर्भातल्या रिद्धीपूर इथल्या गोविंदप्रभू अथवा गुंडमराऊळ यांची भेट झाल्यानंतर चक्रधरांची ज्ञानशक्ती उजळली. गोविंदप्रभूंनीच त्यांचं नाव चक्रधर ठेवलं. चक्रधरस्वामी म्हणजे यादवकाळाचे उत्तम निरिक्षक आणि कठोर टीकाकार. हे सारं निरिक्षण त्यांनी लिहून ठेवलं. त्यांनी आपल्या मताचा प्रचार, प्रसार बहुजन समाजात केला. तोही अगदी जाणीवपूर्वक देशी भाषेत अर्थात मराठीत. त्यांनी महिलांनाही आपल्या पंथात प्रवेश दिला. या पंथाला मूर्तीपूजा मान्य नव्हती. व्रतवैकल्य, तीर्थ यांना त्यांचा विरोध होता. वैदीक कर्मकांडही त्यांना मान्य नव्हतं. 

कर्मकांडाला विरोध करणारं महानुभवांचं तत्वज्ञान हेमाद्री -बोपदेवासारख्या ध्रममार्तंडांना मान्य होणं शक्य़च नव्हतं. शिवाय त्यांचं संस्कृत भाषा नाकारणं म्हणजे तर राजसत्तेला थेटच विरोध होता. त्यामुळं त्यांना सत्ताधा-यांचा जाच होणं अत्यंत साहजिक होतं. 
रामदेवाच्या राजवटीवर चक्रमधरांनी अतिशय परखडपणे कोरडे ओढले. रामदेव संतमहंतांच्या बाबतीत ओखट्या प्रवर्तला असे असे ते म्हणतात. चक्रधरांनी कृष्ण, महादेव, रामदेव अशा यादवांच्या चार पिढ्या पाहिल्या होत्या. रामदेवाविषयी तर ते म्हणतात, 'काळेंकरोनी या राष्ट्राची समूळचि विनश्यन्ति होइल गा :' कारण रयतेवर कर्मकांडाची जबरदस्ती करणा-या या राजसत्तेत जोरदार गृहकलहही सुरू होता.
महादेवराया मरण पावल्यानंतर मुलगा आमणदेव गादीवर बसला. पण महादेवाचा पुतण्या असलेल्या रामदेवाला हे सहन झालं नाही. त्यानं कपटानं आमणाचा पराभव करून त्याचे डोळे काढले आणि गादी बळकावली.

चक्रधरांची भविष्यवाणी लवकरच खरी झाली. राज्यावर सुलतानी आक्रमण आलं.
अल्लाउद्दीन खिल्जीने रामदेवाचा पराभव करून यादव साम्राज्याचा अंत केला.
राजसत्तेविषयी सामान्यांच्या मनातली खदखदच जणू चक्रधरांनी व्यक्त केली होती. सामान्यांना कळणा-या संस्कृतमध्ये विद्वान लिहित होते. त्यामुळं समाज त्यांच्यापासून दूर गेला. त्यांना आपल्या भाषेत लिहिणारे, बोलणारे चक्रधर जवळचे वाटू लागले. पण चक्रधरादी मराठीच्या पुरस्कर्त्यांना राजाश्रय तर मिळाला नाहीच. उलट त्यांच्या वाट्याला छळच आला. मुकुंदराज-ज्ञानेश्वरांसारखे नाथसांप्रदायी थोर कवी, भास्कर-नरेंद्रासारखे अभिजात महानुभव ग्रंथकार यांना, त्यांच्या पंथाना यादव राजवटीने काडीचीही सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळं जनमत या राजवटीच्या विरोधात गेलं. अर्थात नंतर सारं चित्रच पालटलं. महानुभवासारख्या पंथांनंही सर्वसामान्यांचा हात सोडला. हा पंथ नंतर विद्वानांचा बनला. महानुभवांचं साहित्य कूट लिपीच्या कड्याकुलुपांत बंद झालं.
अशा या ढासळत्या धार्मिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळं परकीयांचं फावलं. दक्षिणेवर आक्रमणं सुरू झाली. इथली सुबत्ता लुटली गेली. त्यातच दुष्काळानं थैमान घातलं. त्यातून आधीच गांजलेला समाज ढेपाळला. हातपाय गाळून बसला. अशा त्यांना देवाधर्माचं भय दाखवून आपली तुंबडी भरणा-या प्रवृत्तींचं फावलं.

नव्हे एकल्याचा खेळ
हे सारं नामदेवांच्या समोर घडत होतं. नामदेव ते सारं पाहत होते. ऐकत होते. समजून घेत होते. त्यांनी या परिस्थितीवर सखोल चिंतन केलं. अशा स्थितीत लोकांना धीर दिला पाहिजे. जगण्याचं बळ दिलं पाहिजे. ते कुठून येईल? असा विचार ते करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढं कटेवर कर ठेवून शांत मुद्रेनं उभ्या ठाकलेल्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. तिला पाहून समाधान पावणारी फाटकी माणसं दिसू लागली. नामदेवांना साक्षात्कारच झाला. हाच देव, हाच निर्मळ भक्तिभाव, त्यांचं शहाणपण जगाला समजावून सांगूया. नाना संहारक आयुधं धारण केलेल्या दैवतांऐवजी निशस्त्र, अहिंसेचा, सहिष्णुतेचा संदेश देणारा विठोबा आणि एकमेकांच्या पायावर डोई ठेवणारे त्याचे भक्त. जगात प्रेमाचा संदेश पोचवतील, याची नामदेवांना खात्री पटली. परिस्थिती पालटण्याचं सामर्थ्य समता, बंधुभाव सांगणा-या वारकरीविचारांमध्ये असल्याची त्यांची ठाम भावना झाली. नामदेवांनी प्रतिज्ञाच केली, शतकोटी अभंग रचण्याची!

नामदेवांच्या या प्रतिज्ञेतच सारं काही आलं आहे. ते समजून घेतलं पाहिजे. ही प्रतिज्ञा त्यांनी का केली हे वरच्या विवेचनात सारांशानं आलंच आहे. पण ती पूर्ण कशी केली हे पाहणंही मोठं रोमांचकारी आहे. नामदेव अनेक गोष्टींचे आद्यप्रवर्तक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला अभंग हा काव्यप्रकार. त्या काळात ज्ञानावर, साहित्यावर संस्कृतभाषेचा, विद्वानांचा पगडा होता. सामान्यांना ज्ञान द्यायला ही मंडळी तयारच नव्हती. अशा काळात या सामान्य लोकांच्या भाषेत, त्यांच्या जगण्याला बळ देणारं शहाणपण कोण सांगणार होतं? नामदेवांनी तो मक्ता घेतला. त्यांनी अभंग या छंदाची रचना केली. साधे शब्द, सोपी, लयबद्ध, लक्षात राहणारी वाक्ये. नामदेव अभंग लिहित राहिले. या अभंगांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्यांनी कीर्तन नावाचा साग्रसंगीत प्रकार सुरू केला. रोजच्या जगण्यातली उदाहरणं देत शेवटी तात्पर्य सांगणारा या कीर्तनानं अभंग प्रचंड लोकप्रिय केले. अगदी निरक्षर माणसांच्याही ते लक्षात राहू लागले. तोंडपाठ झाले. आजही खेडोपाड्यातली हजारो माणसं साधं बोलताना प्रमाण म्हणून अभंगाच्या ओळी म्हणून दाखवतात. नैतिक-अनैतिक, ख-या-खोट्याची तुलना हे अभंग प्रमाण मानून करतात. एवढ्यावरच नामदेव थांबले नाहीत तर त्यांनी घरातल्या सर्व सदस्यांना लिहायला शिकवले. अभंग रचायला शिकवले. त्यांना त्यांच्या भावना अभंगांतून व्यक्त करायला शिकवल्या. मग त्या नामदेवाला आणि त्याच्या देवाला शिव्या देणा-या का असेनात. यात पुढं नामदेवांनी चमत्कारच केला. अक्षरओळख तर दूरच पण ज्यांची सावलीसुद्धा अंगावर पडणं म्हणजे लोक पाप समजत असत, अशा अस्पृश्य, शूद्र लोकांनाही नामदेवांनी लिहितं केलं. चोखामेळ्याचं कुटुंब त्याचं उत्तम उदाहरण. आपल्या स्थितीबद्दल हे कुटुंब देवाला पर्यायानं समाजाला जाब विचारू लागलं. या कुटुंबाचे अभंग वाचून नामदेव किती भरून पावले असतील! केवळ चोखा मेळाच नाही तर त्याची ठिगळाचं लुगडं नेसणारी, काबाडकष्ट उपसणारी पत्नी सोयराबाई लिहू लागली.
अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग।
मी तू पण गेले वाया। पाहता पंढरीच्या राया।।
सोयराबाईचे हे अभंग म्हणजे मानवता सांगणारं जागतिक दर्जाचं साहित्य आहे. दुसरी ती दासी जनी. ती आठवली तरी मन भरुन येतं. कोण कुठली, बेवारशी बाई. तिला नामदेवाच्या कुटुंबानं सांभाळलं. झाडलोट, धुणभांडी, दळणकांडण, शेण, गोव-या अशी नामदेवाच्या कुटुंबाची सारी काम ही दासी जनी करायची. देव ख-या अर्थानं या कष्टकरी, अनाथ जनीला पावला. नामदेवांच्या भक्तीचा, प्रतिभेचा सारा वसा, वारसा या जनीकडं आला. जनाबाईचे अभंग किती सोपे, गोड आहेत माहितीये? खेडोपाड्यात अशी एकही निरक्षर बाई सापडायची नाही जिला जनाबाईची एक तरी ओवी येत नाही. पंढरपुरात राहिलेल्या जनाबाईला नामदेवाप्रमाणंच वारक-यांच्या रुपातला सारा समाज पाहायला मिळाला. समाजाविषयी तिचं स्वत:चं सखोल अनुभव चिंतन होतं. नामदेव-ज्ञानदेवांची जनाबाईच खरीखुरी प्रेरणा होती. जनाबाई नामदेवांपेक्षा वयानं मोठी होती. तर ज्ञानदेवांचं वय नामदेवांपेक्षा कमी. नामदेवाला जनाबाईनं लहानपणी कडेखांद्यावर सांभाळलेलं. त्याला चिऊकाऊचा घास भरवलेला. बोबडेबोल बोलायला शिकवलेले. कडेवर घेऊन विठोबा दाखवलेला. हे नामदेव जनाबाईला कसे विसरतील? जनाबाई सावलीसारखी आयुष्यभर नामदेवाच्या पाठीशी उभी राहिली.
जगाचा अनुभव घ्यायला तीर्थयात्रेला जा, असं नामदेव-ज्ञानदेवांना सांगणारी जनाबाईच होती. नामदेवांनी जोडलेल्या सर्व जातीतल्या संतांचा, त्यांच्या कार्याचा यथायोग्य परिचय करून देणारी जनाबाईच होती. तिथं खरं मूल्यमापन संत कबीरांनी केलंय. ते आपल्या दोह्यांमध्ये म्हणतात, जनी सब संतोंकी काशी. म्हणजे हिंदु धर्मात जसं काशी क्षेत्राचं महत्व, तेच संतमेळ्यात जनाबाईचं!
जनाबाईला सर्व पद्धतीचं मोठेपण देणारे, कुटुंबातल्या स्त्रियांना लिहितं करणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य जनकच.
तर मुद्दा होता नामदेवांच्या प्रतिज्ञेचा. व्यावहारीक अर्थानं एका जन्मात एकट्या नामदेवांनी शतकोटी अभंगरचना करणं अशक्यच होतं. पण या संकल्पनेचा व्यापक अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. नामदेवांनी कुटुंबातल्या सर्वांना लिहायला लावलं. प्रत्येक जातीतून संत निर्माण केलं. त्यांना लिहायला लावलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना लिहितं केलं. त्यांनी शेजारपाजा-यांना लिहायला लावलं. नामदेव हे केवळ महाराष्ट्रातच करून थांबले नाहीत. तर ते दक्षिण भारतात गेले. उत्तर भारतात गेले. तिथं अनेक संत निर्माण केले. त्यांना लिहितं केलं. ज्ञात अज्ञात कितीतरी लोक नामदेवांच्या प्रेरणेनं लिहिते झाले. सुमारे तीनशे वर्षांनी प्रतिकूल दुष्काळी परिस्थितीत मावळातल्या देहू गावच्या एका वाण्याला नामदेवांनी प्रेरणा दिली. त्यांचं नाव संत तुकाराम. ते म्हणतात,
नामदेवे केले स्वप्नामाजी जागेसवे पांडुरंगे येऊनिया॥
सांगितले काम करावे कवित्व। वाउगे निमित्त बोलू नको॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले। थापटोनि केले सावधान॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी। उरले शेवटी लावी तुका॥

आज शेकडो वर्षांनीही तुकारामांचे अभंग गोरगरीबांच्या झोपड्यांमधून गायले जातात. तुकारामांच्या हयातीतच त्यांचे अभंग बुडवण्याचा प्रकार घडला. मला वाटतं तुकोबा त्या प्रकारावर छदमीपणे हसले असणार. आवलीला म्हटले असणार, येडे लोक कुठले. यांना काय कळतंय़, ते नामदेवरायांचे अभंग आहेत. त्यांना भंग नाही. ते बुडणार नाहीत, भिजणार नाहीत. त्यांना वाळवी, कसर लागणार नाही. पाऊस पडल्यावर माळरानावर कोवळं गवत जसं तरारून येतं, तसे हे अभंग जनताजनार्दनात आपोआप उगवून येतील. ज्यांना बुडवायचेत त्यांना बुडवू दे... ही सगळी जादू नामदेवारायांनी शोधलेल्या अभंग छंदाची. त्यांची शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा तर केव्हाच पूर्ण झालीय. अजूनही घरोघरी, गावोगावी, चौकाचौकात सप्ताह होतात, भजनं होतात. विविध देवदेवतांच्या आरत्या होतात, त्यात नामदेवांचं स्मरण हमखास होतं. केशवासी नामदेव भावे ओवाळती म्हणताना शेकडो हजारोंचा समूह नामदेवच झालेला असतो. घालीन लोटांगण म्हणताना नामदेवाशी एकरुप होऊन स्वत:भोवती गिरकी घेतो.

नव्हे एकल्याचा खेळ  
तर त्या प्रसिद्ध शतकोटीच्या प्रतिज्ञेनंतर नामदेवांनी वारकरी पंथाच्या प्रसारासाठी कंबर कसली. पण तो काही एकल्याचा खेळ नव्हता. आपली कामं धामं सांभाळून पंढरपूरला येणारे अठरापगड जातीतले वारकरी नामदेवांनी जोडले. एकेक वारकरी म्हणजे त्या त्या गावाचा, त्या त्या समाजाचा प्रतिनिधीच. वरती उल्लेख केलेल्या सर्व धर्म, पंथातल्या चांगल्या म्हणून जेवढ्या गोष्टी होत्या, त्या नामदेवांनी वारकरी पंथात आणल्या. रुजवल्या. मग तो जातीभेद निर्मूलनाचा विचार असो की स्त्रीस्वातंत्र्याचा.
आता नामदेवांना गरज वाटत होती एका समविचारी, उमद्या, उत्साही दोस्ताची. तो त्यांना सापडला. आळंदीला. इंद्रायणीच्या काठी बसून लोकांना त्यांच्याच भाषेत, मराठीत भगवदगीता सोपी करून सांगत होता. देवाचं नुसतं नाव घेतलं तरी देव पावतो, असं सांगणा-या नामदेवांना आपला सखाच सापडला. संत ज्ञानदेव! संतमेळ्याला घेऊन ते आळंदीला पोहोचले. उराउरी भेट झाली. चर्चा, विचारविनिमय झाला. एक लाँगलाईफ प्लॅन ठरला. विविध पंथांनी रुजवलेला समतेच्या विचारांचा झरा स्वच्छ करायचा. नवविचारांची जोड देऊन त्याला पुन्हा खळाळू द्यायचा. नामदेवांकडं माणसं जोडण्याचं कौशल्य होतं. सतत लोकांमध्ये राहिल्यानं लेखणीतही लोकवाणी उतरलेली. वाणी रसाळ. आवाज गोड. अभंग आणि कीर्तनातून त्यांनी हे सारं कौशल्य चपखलपणानं वापरलं. नामदेवांचं कीर्तन म्हणजे आनंदसोहळाच. मोठी गर्दी गोळा व्हायची. शिवाय हे कीर्तन थेट चंद्रभागेच्या खुल्या वाळवंटात. कुणीही यावं. सहभागी व्हावं. हातानं टाळ्या वाजवाव्यात. मुखानं देवाचं नाव घ्यावं. एवढं सोपं. त्या काळातला प्रभावी मीडियाच तो. (वारकरी संगीत तर नामदेवांनी केवढं समृद्ध करून ठेवलं. देशभरातल्या भ्रमंतीतून वेगवेगळ्या प्रदेशातलं संगीत आत्मसात करून ते महाराष्ट्रात आणलं. दक्षिणेतून टाळ, वीणा, मृदुंग, आणले. राजस्थानातून चिपळ्या आणल्या. पंजाबातून ताल धरायला लावणारा ठायी धुमाळी ताल आणला.)
चर्चेतून ठरलं. नामदेवानं आपलं हे स्कील पुरेपूर वापरून घ्यावं. मरगळलेल्या सर्व पंथांचं सहकार्य घ्यावं. देशभर फिरावं. नामदेवांची भेट सफल झाली. यासाठीच तर ते आळंदीत आले होते. ज्ञानदेवादी भावंडांना जोडून घेणं हेच नामदेवांच्या दृष्टीनं फार फार महत्त्वाचं होतं. कारण ही भावंडं होती नाथपंथी परंपरेतली. नाथपंथ पूर्ण देशभर पसरलेला पंथ. जनतेवर त्यांचा मोठा प्रभाव. गोरक्षनाथ त्यांचे प्रेरणास्थान. देशाटनाला गेल्यावर याच नाथपंथीयांची मदत होणार होती.
या भेटीत असं ठरलं की, नामदेवांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजे नरसीला जावं. तिथून जवळ असलेल्या त्यांच्या कुलदैवताला म्हणजे औंढ्या नागनाथाला जावं. औंढ्या नागनाथ हे शैवसंप्रदायाचं मोठं ठाणं. समतेचं एवढं मोठं कार्य करायला निघालोत तर सर्वात मोठ्या पंथाला, शैवांना सोबत घ्यायला हवं. त्यांच्याशी अकारण स्पर्धा, वितुष्ट नको. कारण त्यावेळी शैव-वैष्णवांचा वाद प्रसिद्ध होता. एकमेकांचं तोंडही पाहायचे नाहीत. तिथं होता, विसोबा खेचर नावाचा विक्षिप्त, खडूस म्हातारा. पण मोठा ज्ञानी. शैवसंप्रदायाचे लोक त्याला फार मानायचे. नामदेवांनी मिठास वाणीनं त्याला आपलंसं करून घ्यावं. या भेटीची होईल तेवढी चर्चा होऊ द्यावी. त्यामुळं शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये ऐक्याचा संदेश जाईल. विसोबा हे सोपानदेव, मुक्ताईचे शिष्य. त्यामुळं नाथपंथीयही सुखावले जातील. आणि विसोबांचे अनुभवाचे चार बोल येतीलच की कामाला. ठरलं तसंच झालं. विसोबांशी नामदेवाचं सख्य झालं. चमत्कारांचा मीठमसाला लावून या घटनेची प्रसिद्धी झाली. परिणामी नरहरी सोनारासारखे कट्टर शिवभक्त नामदेवांना येऊन मिळाले.
त्यानंतर अठरापगड जातीच्या संतांच्या माध्यमातून नामदेवांनी आपला समतेचा विचार महाराष्ट्रभर पसरवला. महानुभव पंथीयांशीही त्यांनी जुळवून घेतलं. ब्राम्हणांपासून शूद्रांपर्यंत सर्वांनाच आपल्या पंथात सामावून घेतलं. अगदी मुस्लिम समाजातूनही संत तयार केले. त्यांना आपल्या सोबत घेतलं. समन्वयाची संस्कृती खोलवर रुजवली.

गरज देश सावरण्याची
घर तर सावरलं होतं. आता गरज होती ती देश सावरायची. महाराष्ट्रातला यशस्वी अनुभव पाठीशी  होताच. नामदेव, ज्ञानदेव अठरापगड जातीतल्या संताना टीमला घेऊन तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा हे निमित्त. देश फिरायचा होता. संस्कृतीची शिलाई कुठं कुठं उसवलीय त्याचं निरीक्षण करायचं होतं. समाजमनाच्या दुख-या नसा तपासायच्या होत्या. यानिमित्तानं या दोघाही महापुरुषांनी समाजाची दुखं जाणली. त्यावर काय औषध करायचं हे नक्की झालं. महाराष्ट्राप्रमाणं केवळ विठ्ठल मूर्तीची पूजा नाही, तर चराचरात सामावलेल्या निर्गुणभक्तीचा पुरस्कार करायचं ठरलं. तीर्थयात्रेवरून आल्यावर नामदेव पुन्हा आपल्या कुळदैवताचं, औंढ्या नागनाथाचं दर्शन घ्यायला आले. एव्हाना ते महाराष्ट्रमान्य नव्हे देशमान्य संत झाले होते. सोपी नामभक्ती सांगत सामान्य लोकांच्या गळ्यातला ताईत झाले होते. त्यांचं कीर्तन गर्दीचा उच्चांक गाठत होती.
   
खरा आत्मसाक्षात्कार
दिवस शिवरात्रीचा होता. नागानाथाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. पूजाअर्चा, होमहवन, अभिषेक, अनुष्ठानं सुरू होती. नामदेवांनीही सोबत्यांसह नागनाथांचं दर्शन घेतलं. त्या जनसमुदायासमोर, देवळासमोर कीर्तन करायचं नामदेवांनी ठरवलं. देशभर फिरून पाहिलेली परिस्थिती नामदेवांना श्रोत्यांना सांगायची होती. आपला नाममहिमाच कसा श्रेष्ठ आहे, हा अनुभव श्रोत्यांना सांगायचा होता. पण एवढे दिवस चाललेलं नामदेवाचं हे काम देवाच्या दलालांच्या पोटावरच पाय देणारं होतं. त्यांच्या कर्मकाडांची दुकानं बंद करणारं होतं. बरेच दिवस ते वाट पाहत होते ती संधी त्यांना मिळाली. नामदेव त्यांना आयतेच सापडले. नामदेवांच्या कीर्तनाला लोटलेली गर्दी त्यांच्या अगदी डोक्यात गेली. ही बहुजन, शूद्रांची गर्दी टाळून त्यांना सोवळ्यानं आत जाता येईना. साहजिकच नामदेवांना कीर्तन बंद करायला भाग पाडण्यात आलं. वर नामदेवा, तू शूद्र आहेस. वेद आणि ब्राम्हणविद्या तुला काय ठाऊक. ही आम्हा महाजनांची जागा आहे. तुझा आम्हाला, आमच्या देवाला विटाळ होतो. इथून चालता हो…’’ नामदेवही वाद न घालता सरळ देवळाच्या मागे गेले. तिथं कीर्तन करू लागले. त्यांच्यासोबत आख्खा समुदाय देवळामागं गेला. नामदेवांच्या अपमानाची ही कथा सर्वत्र पसरली. कर्मठ पुजा-यांच्या विरोधात आख्खं समाजमनच फिरलं. नामदेवासाठी नागनाथाचं देऊळ फिरलं, अशी चमत्कार कथा मग तयार झाली. खरं तर हा प्रसंग म्हणजे नामदेव चरित्रातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा. नामदेवांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. नामदेवांना आत्मसाक्षात्कार देणारा. पुढच्या मानवी कार्याची प्रेरणा देणारा. या प्रसंगानं नामदेव दुखी-कष्टी झाले. अंतर्मुख झाले.
नागनाथे विन्मुख होऊनी पाठ दिधली हरिकीर्तनी।
काय अपराध झाला घडोनी। मजकडोनी कळेना।।
असा विचार करणारे नामदेव शेवटी आपण कितीही ज्ञानी झालो, मोठे झालो तरी शेवटी आपली जात काढली गेलीच, या विचारानं ते अस्वस्थ झाले. हा प्रसंग ते पुढच्या आयुष्यात कधीही विसरू शकले नाहीत. अगदी वीस वर्षाच्या पंजाबच्या वास्तव्यातही त्यांना या प्रसंगाचे कढ येत होते.
आलम दुनी आवत मै देषी साइर पांडे कोपिला हो।
सुद्र सुद्र करि मारि उठायो, कहा करौ रे बाबुला हो।।
किंवा
उठि रे नामदेव बाहरि जाइ। जहां लोग महाजन बैठे आइ।।
बांभण बणीया उत्तिम लोग। नहीं रे नामदेव तेरा जोग।।
किंवा
हीन-दीन जात मोरी पंढरीके राया। ऐसा तुने दरजी कायके बनाया।।
टाल बिना लेकर नामा राऊल मे गया। पूजा करते बहमन उनैन बाहेर ढकाया।।
अर्थात या अभंगांचा उपयोग त्यांनी उत्तर भारतातील बहुजनांच्या जागृतीसाठी केला. मानहानीचं जीणं जगणा-या शूद्र समाजाला नामदेवांच्या या अनुभवकथानामुळं आत्मभान मिळालं. त्यांचा न्यूनगंड नाहिसा झाला.

संतमांदियाळीचा प्रेरक
नामदेवांनी महाराष्ट्रात सर्वजातीच्या संताचं मंडळच उभं कलं होतं. संत चोखामेळा, जनाबाई या शूद्रातीशूद्र समाजातल्या संतांना मोठं केलं होतं. त्यांना अभंग लिहायला प्रवृत्त केलं होतं. तेच कार्य त्यांनी पंजाबात केलं. आधार नसलेल्या एका विधवा स्त्रीचा मुलगा बोहरदास त्यांचा पहिला पट्टशिष्य झाला. सुतारकाम करणारा जल्लो, खत्री जातीचा लद्धा, महारोग झालेला खत्री समाजाचाच केशो, ज्याची त्यांनी सेवा करून त्याला बरा केला.
रामानंद, कबीर, सैन, रोहिदास, त्रिलोचन, जयदेव, सधना, धन्ना जाट, पीपा, परमानंद, नानक, सूरदास, मीराबाई, नरसी मेहता या समाज घडवणा-या उत्तर भारतातल्या संतांना नामदेवांपासूनच प्रेरणा मिळाली. महत्वाचं म्हणजे या संतांना येणा-या स्थानिक भाषेतूनच बिनदिक्कतपणे लिहिण्याची प्रेरणाही नामदेवांनीच दिली. शिवाय स्वत: हिंदीतून रचना लिहून तिथल्या भाषेशी नाळ जोडली.
नामदेवांच्या या कर्तृत्वाचं त्यांच्या मायभूमीनं, महाराष्ट्रानं योग्य मूल्यमापन केलं नाही. लाखालाखांचे दहीहंडी उत्सव करणा-यांना हा गोपाळकाल्याचा उत्सव नामदेवरायांनी सुरू केला याचाही तपास नाही. कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांच्या रुपानं नामदेवांनी मराठीत पहिल्यांदाच किती सुंदर बालसाहित्य लिहिलंय त्याचीही दखल अजून कुणी घेतलेली नाही.

महाराष्ट्रधर्माचा उदगाता
महाराष्ट्रधर्म संत रामदासांनी सांगितला असं सांगितलं जातं. ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र नेमाडे, कॉम्रेड शरद पाटील महाराष्ट्रधर्माचा पाया परदेशातून आलेल्या मलिकांबर या निजामी सरदारानं घातला असं सांगतात. पण समतेचा, ऐक्याचा पाया महाराष्ट्रात भक्कम करून उत्तर भारतातही हा अस्मितेचा, बंधुभावाचा झेंडा नेणारे नामदेवच महाराष्ट्र धर्माचे खरे उदगाते आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. नामदेव केवळ महाराष्ट्रपुरुष नव्हेत तर राष्ट्रपुरुष आहेत. परकीय आक्रमण थोपवण्यासाठी उत्तर भारतात जाऊन हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणणारे ऐतिहासिक पुरुष आहेत.

राजधानी दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणारे सर्व आक्रमक पहिल्यांदा सुपिक, सधन पंजाबवर आक्रमण करत. त्यामुळं पंजाबी माणूस हतबल झाला होता. जग जिंकणा-या सिकंदरालाही पंजाबचं पाणी दाखवणा-या पंजाबी माणसाला नामदेवांनी पुन्हा उभं केलं. लढायला शिकवलं. लढवय्या शीख धर्माचा पायाच त्यांनी घातला. म्हणूनच तर आजही देशाच्या कानाकोप-यातून नामदेवरायांच्या टाळमृदुंगाचा गजर ऐकू येतोय. तो मनोभावे ऐकावा. नामदेव आठवावा. मनात रुजवावा. आत्मसाक्षात्काराचा पिंपळ नव्या पालवीनं सळसळून यावा.
बोला पुंडलिक वर दे...

1 comment:

  1. गायकवाड साहेब खालील अभंग तुकोबांचा आहे का ? आणि असल्यास संदर्भ मिळू शकेल का ?

    पंचांगाचे थोतांड….....!!

    पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,
    पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥

    मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज,
    दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥

    कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,
    सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥

    मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,
    आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥

    चांगल्या कामाला। लागावे कधीही,
    गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥

    दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
    माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥

    वेळ, हवा पाणी। आकाश बाधेना,
    भटांच्या कल्पना। शुभाशुभ ॥७॥

    विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
    अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥८॥

    सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
    चाला, नाही मागे। आला कोण ॥९॥

    - जगतगुरू तुकोबाराय

    ReplyDelete