'शाळा' सिनेमा पाहिला. शाळेची खूप खूप आठवण झाली. किती किती गोष्टी आठवल्या. वाटलं, लिहून ठेवल्या पाहिजेत सगळ्या. पण म्हटलं नको. आपली अब्रू जाईल. पण मागून विचार केला, जाईना का. आपण कोण थोर आहोत असे? एक आठवण लिहून ठेवली. योगायोगानं आमच्या शाळेचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आलं. माझा बालमित्र तिथंच शिक्षक झालाय. त्यानं त्यानिमित्तानं प्रकाशित होणा-या स्मरणिकेबद्दल सांगितलं. म्हटलं, 'मी एक छोटा लेख लिहिलाय. पण तुमच्या चौकटीत बसणार नाही. उगीच दोघांचीही लाज कशाला वेशीवर टांगा'.. तर म्हणाला, 'दे तर खरं'. दिला. त्यानं छापला.
सिनेमाच्या शेवटी जोश्या म्हणतो, 'नववी संपली आता दहावीचं भयाण वर्ष..' याच वर्षाची ही गोष्ट...
ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. किमान दहावीतल्या विद्यार्थ्यांना. ज्यांना गणित म्हणताच पोटात गोळा येतो त्यांना. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना.तर ऐका..
विद्या विकास मंदिर, मु. पो. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे. ही शाळा जिल्ह्यात प्रसिद्ध. नावाजलेली. उत्कृष्ट निकालाची परंपरा राखणारी म्हणून. अगदी बाहेरच्या तालुक्यांतले पालकही या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपडतात.
तर, अशी ही शाळा एकदा चिंतेत पडली. १९९० साली. एका, फक्त एका विद्यार्थ्यामुळं. त्याच्यामुळं मॅट्रिक परीक्षेचा निकाल खाली येणार होता. ‘माठ’, ‘ढ’, ‘दगड’ काहीही म्हणा. पण याचं डोकंच चालायचं नाही. गणितात! ओफ्.. केवढा लाडका विषय. मुलांचा, शिक्षकांचा, शाळेचा. मुलांना तर वाटायचं फक्त एवढ्याच विषयाचा तास असावा. या तासाला किती जल्लोष. सर फळ्यावर गणितं लिहायचे. ते खडू उचलतायत तोपर्यंत सगळ्यांचे हात वर. उत्तर मी सांगतो, मी सांगतो.. म्हणत. फक्त हा ‘ढ’ कावरा बावरा होऊन इकडं तिकडं, सगळ्यांकडं बघत असायचा. सर नेमके त्यालाच उभे करायचे. हं तू सांग..काय सांगणार डोंबलं..अशा वेळी धरणीमाय पोटात घेईल तर बरं...
होय तो हिरा मीच होतो.
खरं तर आमची ती परंपराच. माझ्या एका मोठ्या भावानं याच पद्धतीनं शाळा गाजवली होती. मॅट्रीक सुटण्यासाठी त्यानं डझनभर वेळा ‘ट्राय’ केला होता. मुख्याध्यापक गवळीसरांना ही कीर्ती माहीत होती. त्यामुळं पहिल्याच दिवशी वर्गात त्यांनी माझी ओळख जाहीर करून टाकली. पण माझ्यापुढं एक पेचही टाकला. ‘बघ, तुला हेमाचा भाऊ व्हायचंय की मधूचा.’ म्हणजे अथक प्रयत्न करणा-या माझ्या भावानंतर हेमा नावाची बहीण मॅट्रीकला पहिली आली होती. तिनं शाळेचं नाव उज्ज्वल वगैरे केलं होतं. पण पुढच्या काळात गवळी सरही पेचात पडले. कारण ते शिकवत असलेल्या मराठी विषयात मला भरघोस मार्क पडायचे. एवढंच नाही तर इतर विषयांतही उत्तम मार्क. त्यामुळंच तर मला हुश्शार अशा ‘अ’ तुकडीत टाकलं होतं. पण गणितात मार्क शून्य..! होय, होय शून्य!! अगदी वार्षिक परीक्षेच्या अगोदरच्या चाचणी परीक्षेपर्यंत.
गणिताची चाचणी परीक्षा आणि त्याचा निकाल हाही एक सोहळाच. सुट्टीच्या दिवशी शाळेच्या व्हरांड्यात प्रत्येकाला दूर दूर बसवून पेपर सोडवायला द्यायचे. आणि गणिताच्या तासाला मार्कांची घोषणा करायची. नंबर पुकारला की एकेकजण भरलेल्या वर्गातून मिरवत मिरवत जायचा. ७५पैकी ७५ किंवा किमान ७०च्या आसपास मार्क घेऊन, छाती फुगवत जागेवर येऊन बसायचा. माझा नंबर आला की, वर्ग टवकारायचा. घोषणा व्हायची. मार्क शून्य! मी लाज पाठीवर टाकून पेपर घेऊन यायचा.
एकदा हा सोहळा सुरू असताना अचानक पर्यवेक्षक कसाबसर वर्गात आले. ते दुरून जरी दिसले तरी पोटात गोळा यायचा. आताही तो आलाच. मनात ‘राम राम’ म्हणत बसलो. रामाच्या कृपेने माझा नंबर पुकारण्यापूर्वी ते वर्गातून निघालेही. अचानक माझा नंबर पुकारला गेला. कसाबसर गर्रकन् मागे वळले. ‘सर किती मार्क पडलेत हो त्या हि-याला?’ उत्तर मिळालं, ’शून्य!’
मग ज्वालामुखीचा प्रचंड स्फोट, आग, आणि धूर असा गदारोळ. मी बेंचवरच लाजेनं कोळसा झालो. पुन्हा त्या धुरातून कडक आदेश आला. ‘त्याच्यासाठी आता स्वतंत्र ‘क’ तुकडी करा सर’…
कसाबसर या निर्णयापर्यत आले, त्याचाही एक इतिहास होता. माझी ‘प्रगती’ पाहून गणिताचे शेवाळेसर आणि भूमितीचे सुपेकरसर यांना धडकी भरली होती. हे गि-हाईक आपल्या डोक्याबाहेरचं आहे, हे त्यांनी कसाबसरांच्या कानावर घातलं असावं. मग कसाबसरांनी त्यांच्या केबीनमध्ये मला स्वतंत्र शिकवणी सुरु केली. त्यानंतर आठवड्याभरानं झालेल्या चाचणीच्या निकालाच्या वेळी वर्गात हे ‘बार’ झाला होता.
शेवटी आदेशाची अमलबजावणी झाली. शाळेच्या दुस-या टोकाला असणा-या प्रयोगशाळेत माझ्यासाठी ‘क’ तुकडी तयार झाली. शेवाळेसर आणि सुपेकरसरांनी पुन्हा कंबर कसली. मेरीटच्या विद्यार्थ्यांकडं एकवेळ कमी लक्ष दिलं तर चालेल पण ह्याच्याकडं आता बघायचंच या जिद्दीनं दोघेही पेटले. सुरुवातीला दोघांमध्ये बारीक चकचमकही उडाली. सर, ‘याला गणिताचं ‘डोकं’च नाही,’ असं सुपेकरसरांचं म्हणणं. तर ‘आहे, आहे. याला डोकं आहे. पण तो ते वापरत नाही. मेहनत करत नाही,’ असं शेवाळेसरांचं म्हणणं. असं असलं तरी याला सुधरायचाच, अशा हट्टानं दोघेही पेटले.
शाळा भरण्यापूर्वी भल्या सकाळी माझ्यासाठी स्पेशल वर्ग सुरू झाला. प्रयोगशाळेत, एखाद्या रिकाम्या वर्गात, किंवा अगदी शाळेच्या बागेतही. दोघेही शिक्षक आळीपाळीने मला शिकवायला यायचे. गणित आणि भूमिती. ‘प्रयत्नाने वाळूचे कण रगडल्यास तेलही मिळते’, अशी एक म्हण आहे ना, ती जणू प्रत्यक्षात आली. मला या विषयांमध्ये गोडी निर्माण झाली. तोपर्यंत वार्षिक परीक्षा आली. अगदी परीक्षेला जाण्यापूर्वी सरांनी हमखास येणारे प्रश्न चार चार वेळा घोकून घेतले. परीक्षा झाली. आणि एक दिवस ऑफिसात रिझल्ट आला. आमच्या बॅचमध्ये हमखास मेरीटमध्ये येणारे दोन विद्यार्थी होते. शिवाय उत्तम गुणांचा १०० टक्के रिझल्ट देणारे गुणवान विद्यार्थी होते. पण सरांनी थरथरत्या हातांनी पहिल्यांदा माझा रिझल्ट पाहिला. आणि उडीच मारली. मी चांगल्या मार्कांनी पास झालो होतो. त्या दिवशी भेटेल त्याला सर माझा रिझल्ट सांगत फिरले.
शाळेनं माझ्यापासून धडा घेतला. ‘ढ’ विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केलं. शाळेचं नाव अधिकच उंचावलं.
आमच्या बॅचचे गुणी विद्यार्थी पुढं सगळ्या क्षेत्रांमध्ये झळकले. डॉक्टर झाले. इंजीनिअर झाले. शिक्षक झाले.
मीही प्राध्यापक झालो. एक दिवस शाळेनं मला बोलावलं. श्रीफळ, फुलं देऊन सत्कार केला. मला बोलायला लावलं. मी ही ‘शून्याची गोष्ट’ सांगितली. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी ती स्तब्ध होऊन ऐकली. त्यात सुपेकरसर, शेवाळेसरही होते. त्यांच्या डोळ्यात समाधान भरून आल्याचं मी पाहिलं...
कसलं भारी... माझ्याकडं पण आहेत अशा ब-याच गोष्टी.... किस्से...प्रत्येकाकडेच असतात म्हणा.....
ReplyDeleteपण हे छान जमून आलंय...
बोला, पुंडलिक वरदे...:)
Deletekiti sundar mast lihile aahes shrirang.. manapasun aawadle
Deleteमनापासून धन्यवाद, पराग!
Deleteलई भारी.! तुम्हाला गणिताने दहावीतअसताना घाम फोडला होता. आणि मला बारावीत. निकालाच्या दिवशी माझ्यापेक्षा गणिताच्या मास्तरांना आणि आमच्या (मुख्याध्यापक) पिताश्रींनाच जबरदस्त टेन्शन आले होते. पण सुदैवाने आम्हीही (गणितात) काठावर पास होऊन तो टप्पा पार केला.
ReplyDelete