'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 17 January 2011

शेंद-या

डोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून कीर्तनकार उभा राहावा तसा. उंच. पंचक्रोशीतून दिसणारा. दिसला तरी आधार वाटणारा, शेंद-या! शनिवारी शेंदरात खुलणा-या हनुमानासारखा हा वैशाखात शेंदरी रंगाच्या आंब्यांनी लगडायचा. म्हणून त्याचं नाव शेंद-या.


शेंद-या पाडाला लागल्याची पहिली खबर लागायची, पोपटांना आणि दुसरी मळ्यातल्या पोरांना. मग शेंद-याखाली उभं राहून एका सुरातपड पड आंब्या, गोडांब्याची आळवणी सुरू व्हायची. या विणवण्याचं कारण याचं आह्यागमनीपण. उंचावरील कै-या भिरकावलेल्या दगडाच्याही टप्प्याबाहेर. पट्टीच्या आंबे उतरणा-यांनाही त्याच्यावर चढायची कधी छाती झाली नाही. पोपटांना मात्र रान मोकळं होतं. त्यांचे हिरवे थवे शेंद-यावर दिवसभर कलकलाट करायचे. त्यांना कोवळ्या कै-या भारी आवडत. त्यांनी खाऊन टाकलेल्या अर्ध्या कै-या पोरं मिटक्या मारीत खात. शिवाय त्यांच्या चोचीतून सुटलेले पाड मटकावण्यासाठी मोठी स्पर्धा लागायची. लाल-शेंदरी पाड कावळ्यांनाही खाद्य वाटायचं. मग कावळेबुवाही एखादा पाड पळवत. विहिरीच्या थारोळ्यावर बसून खायला सुरुवात करत. पण हा आपला जिन्नस नाही, हे लक्षात आल्यावर सोडून देत.

सोसाट्याच्या वा-यालाही दाद न देणा-या कै-यांच्या घोसातील देठ पिकला पाड एखाद्या झुळुकीनंही बेसावध बसलेल्याच्या पुढ्यात अल्लद टपकायचा. म्हणूनच शेंद-या पाडाला लागला की मोठी माणसंही त्याच्याखाली रेंगाळायची. बुंध्याशी असलेल्या रांजणातलं गारेगार पाणी प्यायच्या निमित्तानं घटकाभर उभी राहायची. न् धप्प आवाज झाला की पोरांसारखी धावायची. पाड असा हाताशी लागलेला मनुष्य फारच भाग्यवंत. शेंद-या असा दामाजीसारखं अंगाखांद्यावरचं भांडार लुटत राहायचा. सीझन संपेपर्यंत हा सोहळा सुरू राहायचा.

एरवी शेंद-या आमच्या कुटुंबात रमलेला असायचा. अंघोळीनंतर ओट्यावर चाललेली वडिलांची देवपूजा मन लावून बघत राहायचा. खोडाशेजारच्या तुळशीच्या लग्नात मामाप्रमाणं तिच्या पाठीशी उभा राहायचा. आम्हा पोरांच्या दंग्यात सामील व्हायचा. शनिवारची दुपारची शाळा सुटून घरी आल्यानंतर हा घरावर लक्ष ठेऊन एकटा उभा असलेला दिसायचा. आठवडी बाजारात गेलेल्या आईची वाट पाहत. खोडावर बसलेल्या सुतारपक्षाची ठक् ठक् ऐकत. अशा वेळी भूक अनावर झालेली असे. तोच हा त्याच्यावरच्या बांडगुळांची इवलाली लालचुटुक सोनकेळी टपटपवायचा. त्यातला मध भूक चाळवतच राहायचा.

आजोळाहून आईसाठी काही ना काही घेऊन आलेले दादा म्हणजेच आजोबा शेंद-याखालच्या तुळशीच्या ओट्यावर बसायचे. देवळीतल्या पणतीचा लालसर-पिवळा उजेड त्यांच्या चेह-यावर पडलेला असे. त्यावेळी शेंद-या आणि दादांचं नक्कीच नातं असणार, असं वाटायचं. दादा सांगायचे, इथं मोठी आमराई होती पूर्वी. भल्या मोठ्या खटल्याच्या गराची लांबलचक पडाळहोती. काळाच्या ओघात अमराई तुटली. घरं पांगली. आता हा एकटा तुमच्या सोबतीला राहिलाय. त्यांच्या बोलण्याला हा हुंकार देत असल्याचा भास व्हायचा. रात्री शेणानं सारवलेल्या ओट्यावर अंथरुणं पडायची. शेंद-याच्या पानांतून झरणारं चांदणं पाहत असतानाच डोळा लागायचा. पहाटेच्या गार वा-यानं झोप चाळवली जायची. वस्तीवर सुरू असलेलं खंडोबाचं जागरण ऐकत शेंद-या उभा असायचा.

दूर ओढ्याकाठच्या एकट्या घराला कोणाचाच शेजार नाही. उन्हाळा, पावसाळा याचीच सोबत. पावसाळ्यात ओढा मस्ती करायचा. पुरात मोठमोठी झाडं वाहत यायची. गढूळ लाटा भीती दाखवत ओट्यावर येऊ पाहायच्या. पण शेंद-याच्या बुंध्याला शिवायची त्यांची हिंमत व्हायची नाही. आम्ही निर्धास्त असायचो.

शेंद-या म्हातारपणाकडं झुकत चालला. वर्षाआड मोहरू लाला. वा-याच्या झोताबरोबर कर्रकर्र वाजू लागला. येणा-जाणारे म्हणायचे,तोडा हो हे झाड. पडंल घरावर एक दिवस. तर त्यांचा रागच जास्त यायचा.

त्या साली वळवासोबत आलेल्या चक्रीवादळानं धुमाकूळ घातला. घोंघावणा-या वा-यानं घराचं छप्पर उचललं. भगभगीत उजेड घरात आला. आणि कधी नव्हे शेंद-याची भीती वाटली..! वादळ थांबल्यावर भीत भीत बाहेर येऊन पाहिलं. अंगणात कै-यांचा सडा पडलेला. भल्या थोरल्या झाडांनी लोळण घेतलेली. मळ्यातली घरं, गोठे, उद्धवस्त झालेले. शेंद-या मात्र ताठ उभा. पण जराशी दमलेला वाटला. जवळ जाऊन पाहिलं. बुंध्याजवळचा रांजण उकललेला. भेगा तुळशीच्या ओट्यापर्यंत आलेल्या. घशापर्यंत आलेला जीव रोखून शेंद-या उभा होता...

नवं घर बांधायचं ठरलं. पुन्हा कुणी तरी सल्ला दिला. लाकडं कशाला विकत आणता? एवढं मोठं झाड आहे तुमच्याकडं. एक दिवस वखारीवाले आले. त्यांनी झाडाचा अंदाज घेतला..
त्या दिवशी शाळेतून आलो, तर शेंद-याचा भला मोठा देह ओढ्यात आडवा झालेला. त्याच्या खोडा-फांद्यावरून हात फिरवला. वाटलं शेंद-याचा श्वासोच्छवास सुरू आहे...

शेंद-याच्या लाकडांनी नव घर उभं राहिलं. त्याच्यावर शेंद-याची सावली नव्हती. म्हणूनच की काय घराचं घरपण हरवलं. घरातली भावंडं वेगवेगळ्या दिशा शोधत दूर निघून गेली.
आज शहरातल्या घरात आंबे आणले की शेंद-या आठवतो. त्याचे लालबुंद-शेंदरी पाड डोळ्यासमोर हेलकावू लागतात..!!

No comments:

Post a Comment