आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची पहिली आठवण लिहून ठेवायची असं मध्यंतरी ठरवलं होतं. पण ठरवलेलं काही होत नाही. मुंबईच्या पहिल्या दर्शनाची आठवण लिहून ठेवली होती. परवा सामान उचकताना ते कागद सापडले. खूप विस्कळीत वाटलं. पण म्हटलं चला, आठवण तर आहे, लिहून ठेललेली. टाकूयात ब्लॉगवर...
आई
‘गाडी घोड्याला जप रं बाबा...’ लोकलमधल्या ‘दाबजोर’ गर्दीतून स्वत:ला सोडवून घेताना आई आठवली. मी पुण्याला निघालो की, ती काळजी करत बसायची. पाठ फिरवून निघालो की, म्हणायची, ‘गाडी घोड्याला जप रं बाबा..!’ ट्रॅफिकमधून वाट काढताना आईचे शब्द पुन्हा ऐकू यायचे. आयुष्य रानातल्या वस्तीवर काढलेल्या आईची एकदा पुण्याच्या ट्रॅफिकनं मोठी तारांबळ उडवली होती. गजबजलेल्या चौकांमधली गाड्यांची थप्पी,..हॉर्न..कर्कश ब्रेक..आणि आपल्याच नादात धावणारी गर्दी...आईला हे आवडत नाही. घरी, शेतात, गुराढोरांमध्ये कधी जाईन असं तिला होतं.
कॉलेजसाठी का होईना, शहराची वाट धरावीच लागली. निरोप देताना आईचं पुन्हा ‘गाडी-घोडा’ पालुपद सुरू झालं. म्हणालो, ‘गाडी-घोड्याचा जमाना गेला आई..’ त्यावर ‘कुत्रं मागं लागल्यासारखं जो तो पळत असतो तिथं. माणसाला माणूस वळखीत नाय. जपून राहा...’ असं ती पुटपुटली. आईला अनोळखी असणारी ही गर्दी पहिल्यांदा दिसली सिग्नलला. एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पलटणीच जणू. महाभारताच्या रणांगणाप्रमाणं फक्त ‘आक्रमण..’असं म्हणायचंच तेवढं बाकी.
मित्राची सायकल घेऊन या सैन्यात सामील झालो. हळू हळू लाल, हिरवे सिग्नल आणि ट्रफिक पोलिसांचे इशारे समजू लागले. बसमध्ये मागच्या दारानं चढून पुढच्या दारानं उतरायची सवय झाली. बसच्या दारांचीही एक भीती होती. म्हणजे एसटीचा कंडक्टर रागावतो खरा, पण सगळी माणसं चढून दार पक्कं लागलंय ना, याची खात्री करूनच डबल बेल मारतो. सीटीबसमध्ये तसला प्रकारच नाही. दोन्हीही दारांना दरवाजे नाहीत. कुणी पडला-बिडला म्हणजे..? दाराशी फारच गडबड झाली, तर कंडक्टर सिंगल बेल मारतो. वैतागून मागं बघत का होईना ड्रायव्हर बस थांबवतो. लोकल ट्रेनमध्ये तर ही भानगडच नाही. ती आपली तिच्या मनाप्रमाणं काही वेळ थांबणार आणि लगोलग निघणार. यायचं तर या, नाही तर राहा स्टेशनावरच...शिवाय ट्रेनच्या अपघातांच्या कथा, दंतकथा होत्याच कानावर. पुणं सोडून मुंबईला निघालो तेव्हा तर आईनं फारच काळजी केली. तिची काळजीला माझ्या दोन मित्रांचे संदर्भ होते. एक गोयंद्या आणि दुसरा ज्ञानू!
गोयंद्याची आठवण अशी आहे - त्या शांत रात्री कुत्री रडू लागली. अंगावर शहारा आणणा-या अॅम्ब्युलन्सच्या सायरननं त्यांच्या आवाजात आवाज मिसळला. गोयंद्याचं प्रेत आणलं होतं. जमलेल्या तुरळक लोकांमध्ये भीती एवढी साकाळलेली की तिरडीला खांदा द्यायला कुणी तयार होईना. गोयंद्या मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून पडून वारला होता...
गोयंद्या म्हणजेच गोविंद, माझा शाळकरी मित्र. सर्दीनं कायम फुरफुरणारं नाक आणि चेह-यांवर जन्मजात भोळे-भाबडे भाव! शाळेत पोरं त्याला हॅसफॅस करायची. मग मी त्या पोरांशी दोन हात करायला उभा राहायचा. म्हणून की काय, गोयंद्या सतत माझ्या मागं मागं, सोबत राहायचा. कोणतंही काम फार मन लावून करायचा. मग ते घरचं असो की बाहेरचं. मी त्याला घरी अभ्यासाला बोलवायचो. पुस्तक समोर आलो की मला झोप यायची. गोयंद्या मात्र चिमणीच्या उजेडात अभ्यास करत पहाटेपर्यंत बसलेला असायचा. जाग आल्यावर मी त्याच्यावर डाफरायचो, मला अभ्यासाला का उठवलं नाही म्हणून. आणि पुन्हा पेंगाळून झोपायचो. हा पहाटेच गाईच्या धारा काढायला घरी जायचा. बांधावर कमरेएवढ्या वाढलेल्या गवतातून, चिखलातून, अनवाणीच. अभ्यास न करता मला मार्क्स पडायचे. आनंद व्हायचा, गोयंद्याला! तसं माझ्या सगळ्याच गोष्टींचं त्याला मोठं कौतुक. माझ्या सायकलचं, मोटरसायकलचं, एनसीसीचं, शहरात राहण्याचं...
माझ्या पहिल्या पुस्तकाची अर्पण पत्रिका गोयंद्या खूप दिवसांनी भेटला. नोकरीसाठी मुंबईत गेला होता. विहिरीच्या थारोळ्यात बसून भरपूर गप्पा मारल्या. कंटाळलोय म्हणाला मुंबईला. मी म्हणालो, सो़ड मग मुंबई. मीपण कॉलेज संपल्यावर घरी येतो. जर्सी गायी पाळू. आणि शेती करू झकास. तसा त्याचा चेहरा उजळला...
माझी परीक्षा सुरू होती म्हणून गोयंद्या गेल्याची बातमी मला कळवली नाही. त्याच्या आईला भेटायचं धाडस झालं नाही. तिच्या डोक्यावर नंतर परिणाम झाला. माळावरच्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला. गोयंद्याची लाडकी धाकटी बहीण भ्रमिष्टासारखी वागू लागली. मग तिला नव-यानं सोडलं. आता गोयंद्याचा बाप घरी एकटाच राहतो. दिवसभर मळ्यात जाऊन जीव रमवतो.
दुसरी आठवण ज्ञानूची. म्हणजे शाळेतलं नाव ज्ञानेश्वर. शाळेत सर्व पोरांमध्ये ठळक दिसायचा. टेरीकॉटचा स्वच्छ गणवेश आणि इस्त्रीची धार असलेली टोपी. त्याचा बाप मुंबईच्या गोदीत कामाला होता. उंच धडंग, पांढरेशुभ्र कपडे घातलेला त्याचा बाप गावी आला की, हमखास शाळेत यायचा. मास्तरांशी गप्पा मारत बसायचा. आम्ही एकेक करून ज्ञानूच्या त्या रुबाबदार बापाला गुपचूप पाहून यायचो. त्यानं एकदा मुंबईहून ज्ञानूला एक सोनेरी घड्याळ आणलं होतं. तसंच घड्याळ मलाही पाहिजे म्हणून मी घरी केवढा तरी गोंधळ घातला होता. ज्ञानू गुरुजींचाही लाडका होता. आम्ही आठवीला मोठ्या शाळेत गेलो. पहिल्याच दिवशी टापटीप ज्ञानू सर्वात अगोदर शाळेत पोहोचला. शाळा तोपर्यंत भरली नव्हती. त्याला व्हरांड्यात बंडू शिपाई भेटला. त्यानं ज्ञानूला पाणी दिलं. विचारपूस केली. शाळा दाखवली. निबंधाच्या वहीत ज्ञानूनं पहिला निबंध या बंडू शिपायावर लिहिला. हेडमास्तरांनी तो वर्गात वाचून दाखवला.
ज्ञानूची न् माझी मैत्री दिवसेंदिवस जुळत गेली. श्रावण महिन्यात घरी रामविजय ग्रंथ वाचला जायचा. पोथी समाप्तीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असायची. पूजेला बेलाची पानं लागायची. मग ज्ञानूची आठवण व्हायची. शाळा सुटल्यावर त्याच्या पिंपळमळ्यातल्या घरी जायचं. तो मला डोंगराजवळच्या ओढ्याकाठी न्यायचा. तिथं बेलाची हिरवीगर्द उंचच उंच झाडं असायची. बेलाची पानं आणि गोल गरगरीत बेल तोडायला ज्ञानू मदत करायचा. सत्यनारायणाच्या पूजेला ज्ञानू हक्काचा पाहुणा असायचा.
ज्ञानू गावच्या यात्रेत भेटला. एकदम मुंबैकर झालेला. इस्त्रीच्या कडक कपड्यांना सेंटचा मंद सुवास वगैरे. मजेत चाललंय म्हटला...
त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा रस्त्यात भेटला. मलूल चेहरा, विस्कटलेले कपडे, हातात गंडेदोरे बांधलेले. पोटदुखीनं खूप हैराण केलंय म्हणाला. डॉक्टर झाले, अंगारे धुपारे झाले. आता काही दिवस गावची मोकळी हवा खायला थांबणार आहे, म्हणाला. मध्यंतरी त्याचा मोठा भाऊ भेटला. ज्ञानू ठणठणीत होऊन मुंबईला गेल्याचं त्यानं सांगितलं. अलिकडं गावी गेलो, तेव्हा भाऊ म्हणाला, ‘तुला कळलं का रे, तो पिंपळमळ्यातला ज्ञानू गेल्याचं?... मुंबईत लोकल अपघातात गेला म्हणतात गेल्या महिन्यात... ’ माझ्या डोळ्यासमोर शाळेच्या स्वच्छ गणवेश घातलेला ज्ञानू, बंडू शिपाई न् ओढयाकाठची बेलाची उंच झाडं उभी राहिली...
या आठवणींसह मुंबईत दाखल झालो. आणि एक दिवस त्या बयेशी गाठ पडलीच. पाऊल न वाजवता ते प्रचंड धूड सरपटत समोर आलं. वाचलेलं, ऐकलेलं, फोटोंमध्ये पाहिलेलं, गोयंद्या, ज्ञानूला खाणारं आणि आईच्या मनात भीती निर्माण करणारं. गाडी-घोडं! मुंबईची लोकल!! अचानक भोवतालची गर्दी हलली. लाटेवर उचलला जाऊन मी थेट डब्यात पोहोचलो. फुफुसांवर प्रचंड दाब, गर्दीतून नाक वर काढण्याची धडपड...एकमेकांत मिसळलेले वास..घामाचे..तंबाखू-गुटख्याचे.. खाडीच्या ओशटपणाचे..झोपडपट्टीतल्या दुर्गंधीचे. आणि या वासाच्या जोडीनं येणारे विविध आवाज. असंख्य हातांनी जखडलेल्या, लटकणा-या, कुरकुरणा-या डब्याच्या छताच्या कड्या..लोकलच्या ओझ्यानं लपकणारे रूळ..लोखंडी चाकांचा खटक् खटक् आवाज..गर्दीचा अखंड ध्वनी..हमरी-तुमरीवर येणारे वैतागलेले जीव आणि या सगळ्यांवर कडी करणारी, कर्कश आवाजात शीळ घालत शेजारून वेगानं धडधडत जाणारी फास्ट ट्रेन...दचकण्यातून भानावर आल्यावर डब्यातलं विश्व दर्शन देऊ लागतं...
काळेकुट्ट झालेले, जळमटं लागलेले, अहोरात्र फिरणारे अशक्त फॅन. दुबळा पिवळा उजेड फेकणारे दिवे. सेक्स-कमजोरीवरच्या औषधांच्या बोल्ड टाईपातल्या जाहिराती..सेकंड क्लास! ज्याला जागा मिळेल तो खरा भाग्यवंत. पण खिडकीबाहेरचं जग मन डहुळणारं. पान, गुटख्याच्या पिचका-यांनी रंगलेली खिडकी. रुळाकडेची झोपडपट्टी..लोंबकळणा-या चिंध्या..कच-याचे ढीग..त्यात हुंगत हिंडणारी कुत्री..उघडी गटारं आणि त्याच्या कडेला खेळणारी नागडी पोरं..धुणीभांडी करणा-या, एकमेकींचं डोकं विंचरणा-या, विटक्या लुगड्यातल्या बायका..बिड्या फुंकत पत्ते खेळणारी टोळकी..खोकलणारे म्हातारे आणि रुळाकडेला डबे घेऊन बसलेली मंडळी..फर्स्ट क्लासच्या खिडकीतूनही हेच चित्र दिसतं.
पण दोन्ही डब्यांमध्ये जाणवणारे फरक असतात. सेंकड क्लासमधली गर्दी अखंडपणे बडबडत असते. तर फर्स्ट क्लासमधली गर्दी जणू मुकी असते. इकडं तारसुरात बंबैय्या भाषेत संभाषणं सुरू असतात तर तिकडं मोबाईलवरचं बोलणंही सहन न होऊन कपाळावर आठ्या पडतात. इकडं मोबाईलवर फुल्ल व्हाल्यूममध्ये गाणी तर तिकडं इअरफोन कानात अडकवून समाधी लागलेली. इथं प्रत्येकाच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले जेवणाचे डबे, तर तिकडं प्यअर लेदरच्या लॅपटॉपच्या बॅगा. सेकंडक्लासच्या गर्दीला चिकटलेला घामट वास, तर फर्स्ट क्लासच्या गर्दीला मंद सुवास. सेकंड क्लासच्या सीटवर हक्कानं चौथा माणूस बसणार. तर फर्स्ट क्लासमध्ये तीन सीटांच्या बाकड्यावर ऐसपैस बसणा-याकडं भुवया उंचावून पाहिलं जाणार. या माहोलात चुकून एखादा सेकंड क्लासवाला डब्यात आला तर त्याला हाड् हाड् करत पुढच्या स्टेशनावर उतरवून देणार. महिलांच्या डब्यातलं विश्वही हेच. त्या माऊल्या तर अशा गर्दीतही हळदी-कुंकवाचे कार्यक्रम करतात.
काळेकुट्ट झालेले, जळमटं लागलेले, अहोरात्र फिरणारे अशक्त फॅन. दुबळा पिवळा उजेड फेकणारे दिवे. सेक्स-कमजोरीवरच्या औषधांच्या बोल्ड टाईपातल्या जाहिराती..सेकंड क्लास! ज्याला जागा मिळेल तो खरा भाग्यवंत. पण खिडकीबाहेरचं जग मन डहुळणारं. पान, गुटख्याच्या पिचका-यांनी रंगलेली खिडकी. रुळाकडेची झोपडपट्टी..लोंबकळणा-या चिंध्या..कच-याचे ढीग..त्यात हुंगत हिंडणारी कुत्री..उघडी गटारं आणि त्याच्या कडेला खेळणारी नागडी पोरं..धुणीभांडी करणा-या, एकमेकींचं डोकं विंचरणा-या, विटक्या लुगड्यातल्या बायका..बिड्या फुंकत पत्ते खेळणारी टोळकी..खोकलणारे म्हातारे आणि रुळाकडेला डबे घेऊन बसलेली मंडळी..फर्स्ट क्लासच्या खिडकीतूनही हेच चित्र दिसतं.
पण दोन्ही डब्यांमध्ये जाणवणारे फरक असतात. सेंकड क्लासमधली गर्दी अखंडपणे बडबडत असते. तर फर्स्ट क्लासमधली गर्दी जणू मुकी असते. इकडं तारसुरात बंबैय्या भाषेत संभाषणं सुरू असतात तर तिकडं मोबाईलवरचं बोलणंही सहन न होऊन कपाळावर आठ्या पडतात. इकडं मोबाईलवर फुल्ल व्हाल्यूममध्ये गाणी तर तिकडं इअरफोन कानात अडकवून समाधी लागलेली. इथं प्रत्येकाच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले जेवणाचे डबे, तर तिकडं प्यअर लेदरच्या लॅपटॉपच्या बॅगा. सेकंडक्लासच्या गर्दीला चिकटलेला घामट वास, तर फर्स्ट क्लासच्या गर्दीला मंद सुवास. सेकंड क्लासच्या सीटवर हक्कानं चौथा माणूस बसणार. तर फर्स्ट क्लासमध्ये तीन सीटांच्या बाकड्यावर ऐसपैस बसणा-याकडं भुवया उंचावून पाहिलं जाणार. या माहोलात चुकून एखादा सेकंड क्लासवाला डब्यात आला तर त्याला हाड् हाड् करत पुढच्या स्टेशनावर उतरवून देणार. महिलांच्या डब्यातलं विश्वही हेच. त्या माऊल्या तर अशा गर्दीतही हळदी-कुंकवाचे कार्यक्रम करतात.
याशिवाय लोकलला आणखीही डबे असतात. अपंगांचे, लगेजचे. लगेजच्या डब्यात पाट्या, बोचकी घेऊन बसलेले मच्छीवाले, भाजीवाले, फेरीवाले, कोप-यात उकीडवे बसलेले, झोपलेले भिकारी गर्दुल्ले. कुठलाही दुजाभाव न करता लोकल या अठरापगड रंगाच्या माणसांना वाहून नेते. गर्दी, गोंधळ, गडबडीकडं दुर्लक्ष करत आपली चालत राहते.
लोकलच्या गर्दीत रोज अंग तिंबून घेऊन मन आंबलं होतं. गावची, घरची आठवण होऊ लागली. सुट्टी काढली. बायको आणि पिल्लाला घेऊन गावची वाट पकडली. ती दोघंही रानातल्या घरी चांगलीच रमली. मी मात्र उगाच चुकल्या चुकल्यासारखं वावरलो. सुटी संपली आणि पुन्हा मुंबईला निघालो. पांदीतल्या चिखलानं बूट माखले. ते धुण्यासाठी थांबलो तोच एसटी आली. तीही खचाखच भरलेली. धान्याची वगैरे बाचकी घेऊन मंडळी मुंबईला निघालेली. त्यांच्या अखंड कलकलीनं डोकं उठलं. एकदाची मुंबई आली. उतरलो न् रेल्वे स्टेशनवरच्या लोंढ्यात मिसळलो. गर्दीच्या लाटेवर बसून आपसूक डब्यात पोहोचलो. अन् खिडकीची जागा मिळाली. कलकलणारं डोकं शांत झालं. हायसं वाटलं..!!
sundar zalay mast ...
ReplyDeletelekhakala thodi usant milali ki to kitee aathwani creative padhatene utravu shakto he yache uttam udaharan ..
baki mala majhya lahanpaneechya shalechya aathwanee tajya zalya
धन्यवाद वैभव. आणि तुझ्याही ताज्या झालेल्या आठवणी लिहून टाक, शिळ्या होण्याआधी :]
ReplyDelete