'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday, 6 March 2011

माळावरचा वेडा

परवा मुंबईतल्या काही भागात पाणीकपात होती. बातमी वाचताना अचानक अरूण देशपांडे आठवले. सोलापूरचे. लगेच फोन केला. तर म्हणाले, कधी येताय इकडं? मारा आता टायटॅनिकमधून उडी..!’


अरूण देशपांडे म्हणजे एकदम सटक माणूस. जग कुठं चाललंय आणि याचं भलतंच...असं प्रथमदर्शनी तरी याचं बोलणं ऐकून वाटतं. १ लीटर दूध बनवण्यासाठी १० हजार लीटर पाणी लागतं. १ किलो मटण तयार होण्यासाठी ३५ हजार लीटर पाणी लागतं. शेतीमालाच्या विक्रीतून फक्त १ रुपया मिळवण्यासाठी १ हजार लीटर पाणी खर्च करावं लागतं. १ पंखा दिवसभर सुरू ठेवण्यासाठी कोयनेतलं शेकडो टन पाणी समुद्रात सोडावं लागतं...असा अफलातून हिशोब हा माणूस मांडतो. पण तो पुढं बोलत जातो, तसं आपण फारच अपराधी आहोत, असं वाटायला लागतं.

पाण्याचं ऑडिट
काही वर्षांपूर्वी पाणी परिषद कव्हर करण्यासाठी सोलापूर गेलो होतो. परिषदेत महाराष्ट्रातले अनेक मान्यवर तज्ज्ञ आले होते. पण हा मनुष्य नव्हता. कारण त्याला या सरकारी चर्चा मान्यच नाहीत. विविध प्रश्नांवरची मीडियामधली चर्चा म्हणजे तर त्याला रॅम्पवॉकवरचं कॅटवॉक वाटतं. पाणी परिषदेपेक्षा मला या माणसाचं आकर्षण वाटलं. गेलो भेटायला. सुमंगलताईंच्या हातचे गाजर-पोहे खात असतानाच या माणसाची टकळी सुरू झाली. म्हणाले चला, मी माझ्या शेतावर, हुर्डा खायला. म्हटलं चला, मज्जा. त्यांच्या मारुतिच्या जुन्या मॉडेलमध्ये बसून निघालो. वेशीबाहेर पडलो. खिडकीतून रस्त्यावर झेपावणा-या हिरव्या झापाच्या बाभळी पाहत होतो, तोच अरुणराव (त्यांचे गुरु धोंडेसर त्यांनाआदरानं अरुणराव म्हणतात.) ओरडले ते पाहा, पाणी चाललं मुंबईला...मी आजूबाजूला पाहिलं...कुठंही पाणी वगैरे दिसलं नाही. पुढं शेळ्या-मेंढ्या भरलेला एक टेम्पो 
पुढं चालला होता. मेंढरं बाहेर डोकावून बें बें करत होती. ते पाहत बसलो. तोच पुन्हा अरुणराव ओरडले ते पाहा आणखी पाणी चाललं शहरात...एक लाकडानं भरलेला ट्रक आमच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढं निघाला होता. मग बाकी विचारलं ही काय भानगड आहे हो? तर म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, ही मेंढरं काय आणि लाकडं काय, बनायला पाणी लागत नाही? एवढी वर्षे किती तरी पाणी पाजून मोठं करावं लागतं त्यांना. आणि आता हे पाणी बिनबोभाट निघालं की शहराकडं...मी म्हटलं हे काय नवंच लॉजिक? (आता मला काय माहिती, की हेच लॉजिक मला दिवसभर ऐकावं लागणार आहे ते) तर गंभीर चेह-यानं म्हणाले, याला भासमान पाणी म्हणतात. युरोपातल्या प्रगत देशांनी तर यावर प्रभावी उपायही करण्यासही सुरुवात केली आहे. मग अरूणराव वीज, पाणी, दूध आदींचे बारीक बारीक भासमान हिशोब सांगत राहतात.

रूरबनमध्ये अरूणराव विद्यार्थ्यांना धडे देतायत

पाश्चात्याचं अंधानुकरण
आता हेच पाहाना, आपल्या हवामानात गरज आहे, घाम शोषून घेणा-या सुती सैलसर कपड्यांची. हे कपडे कापसापासून बनतात. आणि कपाशीचं पीक जमिनीलाही पोषण देतं. पण आपल्याकडं वापरतात टेरिलीनचे कपडे. ज्याचे कारखाने नद्यांचं प्रदूषण करताहेत. आपण पाश्चिमात्यांच्या नको त्या गोष्टींचं अनुकरण करतो ते असं. आपल्याकडं आता घरासाठी वापरले जात आहेत, सिमेंटचे ठोकळे. ही सिमेंटची घरं उन्हाळ्यात तापतात आणि हिवाळ्यात थंड पडतात. लोखंडासारखे धातू तर उकरायला, शुद्ध करायला किती खर्च येतो माहितेय? यापेक्षा स्वस्त आणि आपल्याला सुटेबल असतं ते लाकूड. पण आपण ते वापरत नाही. धातूंचे साठे संपले की संपले आपण ते पुन्हा नाही तयार करू शकत. पण लाकडांची गरज भागवण्यासाठी आपण भरपूर झाडं लावू शकतो ना. शेतीबाबतच्या सरकारी धोरणाबद्दल तर आनंदीआनंदच आहे. विषुववृत्तावर प्रचंड पाऊस पडतो. या पाण्यावर तिथं एक गोड गवत वाढतं. ते आपल्याकडं आणलं गेलं. आणि अगदी सोलापूरसारख्या अवर्षणग्रस्त भागातही ते वाढवलं जातंय. त्याला आपण ऊस म्हणतो. या बारमाही पिकाच्या पाण्यासाठी कितीतरी यातायात केली जाते. म्हणजे जिथं हवेतल्या आर्द्रतेवर जोंधळ्यासारखं पीक येतं, तिथं आता ऊस पोसणारे साखरकारखाने उभे राहिलेत.

शहरांवर राग
शहरात राहणा-या लोकांवर तर अरूणरावांचा प्रचंड राग. तुम्ही एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजे हवेतला फुकटचा प्राणवायू वापरता. एक लीटर पेट्रोल जाळायचं असेल तर हवा परत शुद्ध करण्यासाठी दहा हजार घनफुटांची हिरवळ, झाडं जिवंत ठेवावी लागतील. ही क्षमता आहे का तुमच्या कुठल्याही शहरात? पुणेकर तर एवढे पाणी वापरतात की तेवढं देशातल्या कुठल्याही शहरात मिळत नाही. ही पाणी वाळायला टाकलेली धरणं आहेत ना, ती तुमच्या सोयीसाठी बांधली गेलीत. शेतक-यांसाठी नाहीत. ती काही दिवसांनी गाळांनी भरून जाणार आहेत, हे काय ठाऊक नाही काय यांना? वर अप्पलपोटे लोक पाणी अडवा जिरवाचा मंत्र देतात. म्हणजे तुम्ही पाणी अडवा, जिरवा आणि आमच्याकडं पाठवा!
आयुष्य नीट घालवायचं असेल ना, तर खेड्याकडं चला. तुम्ही जगा आणि दुस-यांना जगू द्या...अरूणराव सल्ला देतात.
गुरु-शिष्याचा वनवास
अरुणराव सत्तरीच्या आसपास आहेत. हार्ट ऑपरेशन्स वगैरे झालीत. पण झाड एकदम ताठ आहे. तरूणपणी तर फारच खटपटी केल्या. ते पुण्याचे शेतीऔजारे बनवणारे कृषीक्षेत्रातले भगिरथ, प्रसिद्ध धोंडेसर यांचे गुरू. म्हणजे गुरू-शिष्य सारख्याला वारके. शेतक-यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून या जोडगोळीनं वेगवेगळी शेती औजारे बनवली. हाताळायला सोपी आणि स्वस्त. ही औजारं घरोघर पोहेचली. त्यांनी बनवलेलं सारायंत्र माहित नाही, असा एकही शेतकरी सापडायचा नाही. पण याच औजारांनी या गुरू-शिष्याचं दिवाळं काढलं. ७१च्या मोठ्या दुष्काळात शेतक-यांनी या औजारांकडं पाठ फिरवली. आणि यांचं बँकेचं कर्ज थकलं. बँकांनी जप्ती वगैरे केली. कंटाळून जीव द्यायला निघालेल्या अरूणरावांना मित्रांनी थोपवलं. मग हमाली वगैरे सुरू झाली. तिकडं धोंडेसरांच्या कारखान्यालाही बँकेनं सील ठोकलंच होतं. मग पत्नी सुमंगलसह अरूणराव आणि मुलांसह धोंडेसर पुण्यातल्या रस्त्यावर उतरले. औजारांसाठी मिळालेली पारितोषिकं हातगाडीवर ठेवून साबण, हँगर्सची विक्री केली. त्यानंतर अरूणरावांनी दोन-तीन कंपन्यांमध्ये नोक-या पत्करल्या. निर्वासितांच्या छावणीत, बाबा आमटेंच्या आनंदवनात राहिले. कर्जानं तिथंही पाठ पुरवलीच. मग टोकाचं म्हणजे पेपरमध्ये स्वत:ची किडनी आणि डोळा विकण्याची जाहिरात दिली. यांच्या कर्जाचं गा-हाणं सरकार दरबारी मांडण्यात आलं. या मातीतल्या शास्त्रज्ञाचं कर्ज फेडण्यासाठी ४० खासदारांनी सरकारला विनंती केली. अखेर हे कर्जप्रकरण राजीव गांधींनी निकालात काढलं. भटकंती पुन्हा सुरू झाली. ग्रहण बघण्याचे अल्प किंमतीतले चष्मे, विज्ञान यात्रा-जत्रा, एरो मॉडलिंग, भोपाळ घटनेनंतरची जनविज्ञान जथा विज्ञान प्रसारासाठीचे स्लाईड शो आणि काय काय...
रूरबन - शहर आणि खेड्याचा संगम

मंतरलेला माळ
बोलता बोलता आम्ही मंगळवेढा रस्त्यावरच्या अरूणरावांच्या मालकीच्या माळावर पोहोचलो. त्यांची टकळी सुरूच होती. मला आठवतं, पूर्वी या माळावर गर्द झाडी होती. पिढ्यान पिढ्या जोपासलेली. भावंडांच्या शिक्षणासाठी ती तोडली गेली. परिसरातली इतर झाडंही या ना त्या कारणानं तुटली. वनराईचं माळरान झालं. त्याचं कोणाला काही सोयरसुतक नाही. अमेरिकेत गेलो होतं. तिथं हे माळ डोळ्यापुढं यायला लागलं. मन खायला लागलं. अमरिकेत राहून प्रगत शेती करण्याची ऑफर होती. नाकारली. शहरात राहण्याचा मोह टाळला. आणि या माळावर आलो. इथंच, भैरोबाच्या अंकोलीत प्रयोग परिवार आणि भगीरथ लोकविज्ञान केंद्र सुरू झालं.

गांधीजींच्या स्वप्नातलं स्वयंपूर्ण खेडं रूरबन (रूरल + अर्बन = रूरबन. शहर आणि खेड्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन उभारलेलं गाव.) साकारण्याचा ध्यास अरूणरावांनी घेतला. त्यासाठी आधार ज्ञानविज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा. पोटासाठी गाव सोडून पुण्या-मंबईला गेलेल्यांना परत आणायचं अरूणरावांचं स्वप्न आहे. त्यांना प्रतिष्ठीत, स्वावलंबी जीवन द्यायचंय. माळावर त्याची पायाभरणी सुरू झालीय. याची सुरुवात शेती आणि शेती औजारांपासून.
माळावर उन्हाला तोटा नाही. ते धरून ठेवण्याचं आणि त्याचं संपत्तीत रुपांर करण्याचं सामर्थ्य फक्त झाडातच. म्हणून माळावर पहिल्यांदा झाडं लावली. धोंडेसरांनी तयार केलेल्या प्रसिद्ध कंटूरमार्क या जमिनीचा उंचसखलपणा तपासणा-या तपासणा-या उपरकणाच्या सहाय्यानं लावलेली ही झाडं शंभर टक्के जगली. ही झाडं जमिनीचं रुपांतर स्पंजात करतात. हे स्पंज सुमारे दोन हजार मिलीमीटरपर्यंत पाणी साठवून ठेवतात. आसपासच्या शेतक-यांनाही हे पटलं. त्यानंतर माळानं अनेक प्रयोग पाहिले. शेती आणि ग्रामीण विकासाचे. सर्वसामान्य शेतक-यांच्या फायद्याचे. कमी खर्चाचे. बिगर भांडवलाचे.

शेती औजारं
माळावर राहणारा आपला विद्यार्थी विद्यापीठांपेक्षा हजार पटींनी कमी खर्च करून हजारपट मोलाचं संशोधन करतो, असं सांगताना धोंडेसर अरुणरावांनी बनवलेल्या बैझल पॉवर टीलरचा दाखला देतात. बैझल म्हणजे बैल आणि डिझेल इंजिनचं एकत्रीकरण. औताला जाड विळ्यासारखी वीतभर लांबीची पाती बसवायची. औतावर बसवलेल्या इंजीनच्या सहाय्यानं ती फिरतात. मशागतीची बहुतेक कामं हे यंत्र करतं. शिवाय ट्रॅक्टरऐवजी बैलांनी ओढल्यानं डिझेल कमी लागतं. बैलाला जमिनीच्या कडक, मऊपणाचा अंदाज येतो. त्यामुळं बैझलची पाती तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
दुसरं सारवण यंत्र. चिखल-शेणाचा गारा करून एका नरसाळ्यात ओतायचा आणि कॉम्प्रेसरच्या सहाय्यानं गा-याचा फव्वारा उडवायचा. यातून हातानं भिंती, कुडं सारवण्याचा त्रास वाचतो. सारवणही सुरेख होतं. बैलाच्या मानेलाजू रुतू नये म्हणून बैलाच्या मानेवर ठेवण्याचा फआयबरचा साचा असो, किंवा हाताला घट्टे पडू नयेत म्हणून नांगराच्या मुठीवर कातडंचढवण्याची आयडिया असो. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत अरूणरावांची कल्पक जाणवते, अरूणरावांची कल्पक बुद्धी. इथल्या शेतक-यांचे लहानसहान प्रश्न अरुणरावांनी सोडवलेत. हरणांच्या त्रासापासून पिकं वाचवण्यासाठी त्यांनी दर तीन सेकंदांनी ०.३ सेकंद वीजप्रवाह वाहणारं आणि आपोआप बंद पडणारं कुंपण बनवलं. त्यातून बारीक झटका बसण्याव्यतिरिक्त काही अपाय होत नाही. पण झटका बसणारी हरणं शेताकडं फिरकत नाहीत. पाखरं पिकावर उतरू नयेत म्हणून चमचमणा-या चंदेरी पट्ट्या शेतात बांधण्याचा प्रयोग त्यांनीच पहिल्यांदा केला.


महिलांची जलबँक
दुधा-तुपासारखी पाण्याची जपणूक करून सामान्यांचं जगणं सुसह्य करण्याच्या वेडानं सध्या हा माणूस झपाटलाय. त्यानं माळरानावर तळं खोदलंय. तळ्याभोवती तो उभी करतोय घरं. गरीबाला परवडणारी. तंत्रज्ञानानं परीपूर्ण असलेली. त्यात राहतील शेतीच्या उत्पन्नावर स्वावलंबी झालेली कुटुंबं. या तळ्याचं नुकतंच उदघाटन झालं. हा आहे महिलांचा जलबँक प्रकल्प. त्याच्या उभारणीमागं काही गणितं आहेत. विचित्र वाटत असलं तरी वास्तव आहे. या प्रकल्पात सहभागी होणा-या घरोघरच्या लक्ष्मी आता हे पाण्याचे साठे जपणार आहेत. अशी पहिली ७० हजार घनमीटर क्षमतेची जलबँक नुकतीच अंकोलीच्या माळावर उभी राहिली आहे. कुठल्याही देशी-विदेशी देणग्या अनुदान न घेता. बँकेकडून रितसर कर्ज घेऊन. वीस हजार हेक्टरवर एक जलबँक. पाच ते दहा महिलांच्या गटांची एक बँक. एक हेक्टर जमिनीवर २२० बाय २२० फूट बाय ३० फूट खोल अत्याधुनिक शेततळं. या बँकेत बचतखाती, मुदत ठेवी, कर्जखाती असतील. सर्व व्यवहार नॉर्मल बँकेप्रमाणेच असतील. आता या बँकेच्या भोवती २० हेक्टरवर उभी राहतेय, अत्याधुनिक रूरबन कृषी औद्योगिक वसाहत. वॉटर बँकेतले पाणी शेतीसाठी किंवा शहरासाठी नसून मूलभूत गरजांसाठी आहे. तळ्याच्या बांधाभोवती घरं आणि बांधावर रस्ता आहे. (त्रिकोण एकमेकांना जोडून त्याची घुमटाकार घरं बांधण्याची यशस्वी प्रात्यक्षिकं अरुणरावांनी भूजच्या भूकंपानंतर करून दाखवली. विशिष्ट भूमितीय आकारामुळं या घरांना येणारा नैसर्गिकपणा वादातीत आहे. हीच घरं नैसर्गिक रूरबन वसाहतीत उभी राहत आहेत.) प्रयोग परिवाराला सोलापूर जिल्ह्यात अशा ५० ते ६० अत्याधुनिक रूरबन पंचक्रोशी उभ्या करायच्या आहेत. अशा वसाहती देशभर उभारायचंही अरूणरावांचं स्वप्न आहे. या वसाहतींमध्ये राहायला येणारी माणसं असतील, इथलेच भूमीपुत्र. शेतीवर भागेना म्हणून पोटापाण्यासाठी शहर गाठलेली. अरूणराव त्यांना रूरबन वसाहतीविषयी सांगत आहेत. गावाकडं पुन्हा परतण्यासाठी मनं वळवताहेत.

शहरातल्या माणसांना माळावर येण्याचा आग्रह

पुण्या-मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये जाऊन आवाहनं करत आहेत. यात्रेसाठी येणा-या गावच्या सुपुत्रांना आवाहन करत आहेत. तूर्तास इथं भेट द्यायला येणा-या शहरी बाबूंना आम्ही महिलांच्या जलबँकेच्या एक लाखाच्या कर्जप्रकरणाला जामीन राहा म्हणून विनवतो. तर अंगावर पाल पडल्यासारखे हे लोक दचकतात...असं सांगत अरूणराव खो खो हसत सुटतात.

परवा फोन केला तर म्हणाले, काय करताय शहरात? तुमचं शहर म्हणजे बुडणारं टायटॅनिक आहे. ते बुडणारच आहे. तुम्हा लोकांना तर पोहताही येत नाहीये. शहाणे असाल तर लवकर या. इथं माळावर तुमच्यासाठी निवारा आणि पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवलीय..!

2 comments:

  1. होय, वानखडेजी रूरबन पाहण्यासारखं आहे!

    ReplyDelete