'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday, 18 March 2011

डोरेमॉनचा देश

कुठल्या मातीची बनलीत ही माणसं कोणास ठाऊक? संकटांवर संकटं कोसळतात. हा हा म्हणता होत्याचं नव्हतं होतं. पण ही माणसं पुन्हा उभी राहतात. जगात नंबर वन होतात. ही केवळ तंत्रज्ञानाची जादू नव्हे बरं का. तिथल्या कष्टाळू, निकोप आणि एकोपा जपणा-या समाजाची ही ताकद आहे. आणि या समाजाचं प्रतिबिंब पाहायचं असेल ना, तर तुमच्या घरातली पोरं सध्या कोणती कार्टून्स पाहतात ते पाहा. ही सगळी कार्टून्स आहेत, जपानी! जपानमधलं समाजजीवन दाखवणारी. हॉलीवूडप्रमाणं कुठलीही भव्यदिव्यता, भपकेबाजपणा नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा बडेजाव नाही की पौराणिक कथा, राजपुत्र-राजकन्येच्या भरजरी गोष्टी नाहीत. आदर्शांचं अवडंबर नाही.
या कार्टूनमध्ये आहेत, अगदी साधी सरळ, आपल्याला अवती-भोवती दिसणारी, सामान्य जीवन जगणारी, आपल्याच कुटुंबातली वाटणारी पात्रं.
यात निगुतीनं घर चालवणारी आई आहे. कामावर जाणारे बाबा आहेत. प्रेमळ आजी-आजोबा आहेत. शाळा आहे, शिक्षक आहेत. लाडकं कुत्रं आहे, मांजर आहे. खेळणं आहे, भांडणं आहे. आनंद, दु:ख, हेवे-दावे, राग-लोभ प्रेम सारं सारं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपेक्षेचे धनी असलेले सुमार विद्यार्थी यांच्या कार्टून्सचे हिरो आहेत.


चुकून सोमवारी घरी होतो. बोनस म्हणून आमच्या बहुउद्योगी बाळराजांना सुट्टी होती. त्यामुळं टीव्ही फुल्ल व्हॉल्यूममध्ये अखंड सुरू होता. 'नोबिता', 'सुझुका', 'जियान' आणि 'डोरेमॉन'चा गोंधळ सुरू होता. त्यांचा मंडे अर्थात डोरेमन डेहोता.

आठवडा झाला जपानमधल्या भूकंपाला. जहाजं, बिल्डिंग्ज, घरं, गाड्या, माणसं पालापाचोळ्यासारखा वाहून नेणारा तो लोंढा डोळ्यापुढून हटत नाही. पुढचे काही दिवस फक्त त्रोटक कोरड्या बातम्या येत आहेत. वीज, दळणवळण ठप्प झाल्याच्या, अन्न-पाणी संपल्याच्या. किरणोत्सर्ग झाल्याच्या. मग जीव अस्वस्थ होत राहतो. बहुदा चॅनेल्समधल्या बातम्यांमध्ये काम करत असल्यानं. अपेक्षित व्हिज्युअल्सच मिळत नाहीत. कोसळलेल्या बिल्डिंग्ज, उद्‌ध्वस्त रस्ते, आक्रोश, याचना करणारे हात, काहीच डिटेल्स कसे नाहीत? मोठा किरणोत्सर्ग झाला तरीही.. कुठल्या धातूची बनली असतील ही माणसं? की यंत्रं बनवणारी ही माणसंही यंत्रच झालीत? यांना काही भाव भावना, संवेदना नसतील? सगळं कसं एका विचित्र घुमेपणानं सुरू आहे.

मी पिल्लाला विनवण्या करतो आहे, 'अरे मला, जरा बातम्या बघू दे ना'. तो ऐकत नाही. नोबिता, डोरेमॉनच्या करामती तन्मयतेनं बघत बसलाय. सगळ्या लालूच दाखवून झाल्या. शेवटी आयडिया सुचली. 'पिल्ला तुझ्या त्या नोबिताचं घर वाहून गेलंय'..'बघू बघू...'अविश्वासानं माझ्याकडं पाहात तो रिमोट माझ्याकडं देतो. न्यूज चॅनेल्सवर तीच लोंढ्याची व्हिज्युअल्स. 'ते काय आहे? काय झालंय? नोबिता आणि डोरेमॉनचं घर का वाहून गेलंय?' अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देताना पुरेवाट झाली. त्याला पुन्हा डोरेमॉन सुरू करून दिलं...

'या जापनीज कार्टून्सनी पोरांना अगदी खुळं केलंय. ते पाहून पाहून पोरं द्वाड झालीत. बंद करायला पाहिजे हे.' पालक कुरकुरताना दिसतात...असो.
मीही नाईलाजानं डोरेमन बघू लागतो. नेहमीप्रमाणं अपुरा होमवर्क पूर्ण करायला नोबिताला डोरेमॉन मदत करतोय. त्याची ती कम्प्युटर पेन्सील देऊन. हे डोरेमॉनच्या पोतडीतलं आणखी एक जादुई गॅजेट. या पेन्सीलमुळं नोबिताचा होमवर्क एका झटक्यात होतो. मग नोबिता म्हणतो, 'उद्या माझी टेस्ट आहे. मी घेऊन जातो शाळेत ही पेन्सिल'. त्यावर डोरेमॉन ठामपणे 'नाही' म्हणतो. 'तुला फक्त आजचा होमवर्क पूर्ण करण्यासाठी मी मदत केली. परीक्षेत असं आयतं साधन तुला वापरता येणार नाही. आणि तू ऐकणार नसशील तर मी तुला सोडून जाईन', असं बजावतो. पण नोबिता ऐकत नाही. तो कम्प्युटर पेन्सिल घेऊन शाळेत जातो. पेन्सिलनं पेपर सोडवायला घेतो. पण त्याच्या डोळ्यासमोर डोरेमॉनचा निग्रही चेहरा तरळू लागतो. तो त्या पेन्सिलनं न लिहिण्याचा निर्णय घेतो. दरम्यान मागच्या बेंचवर बसलेला नोबिताचा मित्र कम शत्रू जियान त्याची पेन्सिल चोरतो. आणि भराभर पेपर सोडवतो. एरवी पास होण्याचीही मारामार असणा-या जियानला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. पण जियानच्या आईचा काही त्याच्यावर विश्वास बसत नाही. याने काही तरी लबाडी केली असणार म्हणून ती त्याला चांगलीच बदडून काढते. जियान ती पेन्सिल डोरेमॉनला परत करतो... आमचं पिल्लू टीव्हीला खिळून असतं.

डोरेमॉनप्रमाणंच त्याची भावंडं असणारी मारुको, सिंचान, निंजा हातोडी, पोकेमॉन, किकरेत्सु ही कार्टून्स. बाकी सगळी कार्टून्स सोडून मुलं सध्या याच जापनीज कार्टून्सला चिकटून बसतायत. लाडके टॉम ऍन्ड जेरीही मागे पडलेत.

डोरेमॉन तर सुपर हिरोच झालाय. हा डोरेमॉन आहे, जपानी मांगा कॉमिक्स सीरिजमधलं एक पात्र. कान नसलेलं एक रोबेटीक मांजर. ते आलंय, 22व्या शतकातून. नोबी या मध्यमवर्गीय फॅमिलीतला ते एक घटक बनून गेलंय. घरातल्या नोबिता या चष्मेवाल्या, अभ्यासात सुमार वेंधळ्या, शाळकरी मुलाला डोरॅमॉन मदत करतो. नोबिताच्या अडचणी सोडवण्यासाठी पोटाच्या पिशवीतून वेगवेगळी गॅजेटस् काढतो. नोबिता या गॅजेटसच्या मदतीनं त्याच्या समस्या सोडवतो. आणि त्यांचा अतिरेकी वापर करून अडचणीतही सापडतो. पुन्हा त्यातून डोरेमॉनच त्याला सोडवतो.

या गॅजेटसच्या सहाय्यानं डोरेमॉन नोबिताच्या आईची घरकामं सोपी करून देतो. तिला बाजारातून वस्तू आणून देतो. कपडे धुवायला वाळवायला मदत करतो. टेन्शननं झोप गमावलेल्या नोबिताच्या बाबांना शांत झोप मिळवून देतो. खरं तर नोबितो हा या सीरिजमधला हिरो आहे. पण तो सुपरमॅनसारखा अचाट दैवी शक्ती असलेला अजिबात नाही. उलट तो धांदरट, आत्मविश्वास नसलेला, गणितात शून्य मार्क मिळवणारा, होमवर्कचा प्रचंड कंटाळा असणारा, मैदानी खेळ न खेळता येणारा, अंगात कसलंही कौशल्य नसणारा एक सामान्य मुलगा आहे. तो तशी खंत डोरेमॉनला बोलूनही दाखवतो. त्याचा मित्र जियान फुटबॉल चांगला खेळतो, सुझुका पियानो छान वाजवते, सुनियो सुंदर स्केचेस काढतो. माझ्याकडं यापैकी काहीच नाही. त्यावर डोरेमॉन म्हणतो, तुझ्याकडं मनाचा चांगुलपणा आहे. तू कुणाचंही वाईट करू शकत नाहीस. आणि म्हणूनच मी तुझ्या सोबत राहतो. नोबिताची मित्रमंडळीही अवतीभोवतीची सामान्य मुलं आहेत.


नोबितासह सर्वांची नेहमी 'पिटाई' करणारा दांडगा जियान एका गरीब भाजीवालीचा मुलगा आहे. आजोबांची सायकल घेऊन तो आईला भाजी पोहोचवायला मदत करतोय. भरपूर फळं आणि भाज्या खात असल्यामुळं तो स्ट्राँग बनलाय. इतरांची धुलाई करणारा जियान त्याच्या आईच्या मात्र फारच धाकात आहे. तिनं मारल्यावरच आपण काही चांगलं करू शकतो, असा त्याचा ठाम विश्वास आहे. जियानकडं मुकू नावाचा कुत्रा आहे.

सुझुका ही नोबिताची गोड मैत्रिण आहे. त्याला मोठेपणी तिच्याशी शादी करायची आहे. सुझुका एक चुणचुणीत, हुशार विद्यार्थिनी आहे. तिच्याकडं पिको नावाची सुंदर चिमणी आहे.

सुनियो हा त्यांचा श्रीमंत घरातला मुलगा आहे. बाजारातली महागडी खेळणी पहिल्यांदा त्याच्याकडं दिसतात. घरात बाजारातून खूप पैसे मोजून आणलेली मांजरंही आहेत. सुनियोकडं बंगला, फार्म हाऊस आणि कार आहे. कारपेट, सोफा खराब करू नका, नाही तर आई ओरडेल, असं सुनियो वारंवार घरी खेळायला आलेल्या मित्रांना बजावतो. जियान आणि सुनियो मिळून नोगिताला अडचणीत आणतात. त्याचा प्रतिकार करण्यासाठी डोरेमॉन नोबिताला वेगवेगळी गॅजेटस् देतो. हे सगळेजण एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. त्यांची गरीबी-श्रीमंती त्यांच्या दोस्तीच्या आड कधीही येत नाही.
डोरेमॉनकडं अद्भुत जादू नाही, तर आहेत, विज्ञानावर आधारलेली, माणसाचं जगणं सुसह्य करणारी छोटी छोटी गॅजेटस्‌. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जगणं शिकवणा-या छोट्या छोट्या गोष्टी. बंधुभाव, एकोपा, वास्तवाची जाणीव करून देणा-या, जीवनशिक्षण देणा-या लहानसहान बाबी. नोबिताची आई त्याला अभ्यासासोबतच घरातली बारीकसारीक कामं करायची सवय लावते. टॉयलेट, बाथरुमच्या लाईटस् आठवणीनं बंद करण्याची शिस्त लावते. नोबितानं ताटात उष्टं टाकल्यानंतर आफ्रिकेतल्या भुकेजलेल्या लोकांच्या गोष्टी सांगते. तरीही नोबिता ऐकला नाही, तर त्याला डोरेमॉनच्या मदतीनं काही वेळ उपाशी ठेऊन भुकेची जाणीव करून देते. गंमत, मौज, मजेतून जगणं शिकवणा-या, मुलांना परिस्थितीचा सामना करायला लावणा-या, तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर करायला सुचवणा-या, सांघिक भावना निर्माण करणा-या बोधकथा आहेत.
डोरेमॉनची इतर कार्टून भावंडंही हाच संदेश रुजवणारी आहेत.

भारतात बंदी घालण्याची मागणी झालेला शिंचान हे नोबिताच्या अगदी विरोधी असलेलं वात्रट कॅरेक्टर. सतत वटवट करणारं हे हजरजबाबी पात्र भल्याभल्यांची बोलती बंद करतं. त्याचे बाबा आणि तो ऐतखाऊ आणि कामचुकार आहेत, असं त्याची आई कुरकुरते. पण सिंचान त्याची धाकटी बहीण हिमावरीला सांभाळतो. अडचणीत सापडलेल्या फॅमिलीला अक्कलहुशारीनं सोडवतो. बोलबच्चनगिरी करून हताश फेरीवाल्याचे 'स्वीट पोटॅटो' विकून देतो.


नोबिताची बहीण म्हणावी अशी मारुको ही जपानमधल्या उपनगरात राहणारी एका सामान्य कुटुंबातली थर्ड ग्रेड विद्यार्थिनी आहे. अभ्यासात '' असलेली मारुको आळशी, उशिरा शाळेत जाणारी, होमवर्क न करणारी नऊ वर्षांची मुलगी आहे. विसराळू आजोबा आणि पाळलेल्या कासवासोबत मारुकोला टीव्ही पाहायला आवडतं. मारुकोच्या मित्रांमध्ये अभ्यासात हुशार असणारी तामाए, इतरांना कस्पट मानणारा जाड भिंगाचा चष्मा घालणारा वर्गाचा मॉनिटर असणारा अभ्यासू सुईओ, आईचं दुर्लक्ष असलेला श्रीमंत काझुहिको आहे.
मारुकोचे खोडकर मित्र मिळून एकदा तिच्या अंगणातल्या मधमाशांना डिवचतात. मधमाशा चवताळल्यावर मग एकच पळापळ होते. डायनिंग टेबलवर हा किस्सा सांगितल्यावर मारुकोला मग तिची आजी आणि कुटुंबातले लोक मधमाशांविषयी सविस्तर वैज्ञानिक माहिती सांगतात. लहान घटनांमधून मुलांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहचवण्याचा हा हुकमी जपानी मार्ग.

निंजा हातोडी या सध्या गाजणा-या कार्टूनमध्येही लढाई निंजा टेक्निक आत्मसात केलेला निंजा हातोडी केनेचि या भोळसट शाळकरी मुलाला मदत करतो. आणि प्रत्येक भागाच्या शेवटी 'मॉरल ऑफ द स्टोरी' सांगतो.

अद्भुत क्षमता असलेला पोकेमॉनही असाच गरीब मुलांचा मदतकर्ता आहे. दुसरे एक कितेरेत्सु नावाचे कार्टून आपल्या आजोबांचं सिक्रेट बुक वाचून त्यामधून नवनव्या वैज्ञानिक गोष्टी शोधून काढतो आणि लोकांना मदत करतो. कोरुसुके हा त्याचा सामुराई रोबोट मित्र त्याला यासाठी मदत करतो. कितेरेत्सुमध्ये जपानमधला ग्रामीण भाग, शेतकरी कुटुंबाचं दर्शन होतं. खरी मैत्री जोपासायला शिकवणारी ही जोडगोळी जपानमधल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा मित्र बनली आहे.

मुलांना वैज्ञानिक दृष्टी आणि नीतीमूल्यांची शिकवण देणारा डोरेमॉन जपानच्या संस्कृतीचं प्रतिक आहे. शाळेतल्या अभ्यासक्रमातला तो अविभाज्य भाग बनला आहे. त्याची सचोटी, धैर्य, नाती जपणं, पर्यावरणविषयक जागरुकता ही आता आख्ख्या जगाला भावलीय. म्हणूनच जगभर ही कॉमिक्स, कार्टून्स प्रचंड वेगानं खपत आहेत.

या सगळ्या जपानी कार्टून्समधून संकटावर मात करायला शिकवणारं तत्वज्ञान सांगितलं आहे. अडचणीतून आलेलं शहाणपण, आपत्तीवर एकजुटीनं मात करायला शिकवणा-या या गोष्टी आहेत.
ही कार्टून्सच दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणा-या जपानचा खराखुरा चेहरा आहेत. दुस-या महायुद्धानंतर जपानी जनतेनं धरलेल्या उभारीतूनच या कार्टून्सनी जन्म घेतला. यातील फुजिको फुजिओ यांनी सुरू केलेली मांगा कॉमिक्स, कार्टून सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली.
विशेषत: तरुणांमध्ये ही कॉमिक्स पॉप्युलर झाली. मनोरंजनासोबत या कार्टून्सनी जपानी तरुणांना साहसी बनण्याचा मंत्र दिला. निंजा कार्टून हे त्याचंच प्रतिक.
अणुयुद्धानंतर उध्वस्त झालेला आणि 72 टक्के डोंगराळ भूभाग असलेल्या जपानमध्ये अन्नधान्य आयात करावं लागतं. शेतीची मर्यादा असणा-या जपाननं बदलत्या जगातलं इलेक्ट्रॉनिक्सचं महत्व ओळखलं आणि अथक परिश्रमातून इलेक्ट्रॉनिक रिव्होल्यूशनच घडवून आणली. डोरेमॉनसारखी विज्ञानाच्या गोष्टी सांगणारी कार्टून्स या रिव्होल्यूशनची प्रतिकं आहेत.

जपानमध्ये तर कार्टून्सनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. डोरेमॉन नावानं तिथं चॅरिटी फंड सुरू झाला आहे. या कार्टूनच्या लक्षावधी प्रती आत्तापर्यंत संपल्या आहेत. बस, ट्रेन, बुलेट ट्रेन, विमानांवर ही कार्टून विराजमान झाली आहेत.
टाइम मॅगेझिनने डोरेमॉनला 2002चा एशियन हिरो म्हणूनही सन्मानित केलं आहे.

या तुलनेत भारतातील कॉमिक्स, कार्टून्स कुठे आहेत? ती आपल्या परीनं परदेशी कार्टून्सची कॉपी करण्याची खटपट करतायत. किंवा मुलांना दैववादी बनवतायत. या पाश्वभूमीवर अमर चित्रकथा लिहिणा-या अनंत पै आणि कार्टून्सना भारतीय चेहरा देणा-या प्राण यांच्या आपण ऋणातच राहावे लागेल. पण त्यांचाही वारसा प्रगल्भतेनं चालवताना सध्या तरी कुणी दिसत नाही.

आपत्तीवर मात करत जपान राखेतल्या फिनिक्स पक्षाप्रमाणं पुन्हा झेप घेईल. एकामागून एक येणारी संकटं परतवून लावेल. कारण जपानी माणसं या दिवसांत गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जाती-पाती, वर्ग-वर्ण भेद विसरून एकजुटीनं काम करत असतील. अगदी त्यांच्या कार्टून सीरिजमधल्या पात्रांप्रमाणं! 


'लोकसत्ता'नं हा लेख छापला होता. त्याची ही लिंक - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=146912:2011-04-01-08-47-26&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

पीडीएफ पान १ - http://epaper.loksatta.com/2655/indian-express/02-04-2011#p=page:n=25:z=2
पीडीएफ पान २ - http://epaper.loksatta.com/2655/indian-express/02-04-2011#p=page:n=30:z=2

7 comments:

  1. gr8 shabdcha nahit ..............................................!

    ReplyDelete
  2. रंगराव एकदम भारी, पुण्यात लोकमतमध्ये असताना रात्री अडीच वाजता घरी पोहचल्यावर आम्ही हेच कार्टुन पाहायचो. त्यामुळे तुमचा पण डोरेमॉनचा अभ्यास दांडगा आहे. हे पाहून आनंद झाला. म्हणजे पिल्लूमुळे तुझ्याही ज्ञानात भर पडली. यासाठी पिल्लाचे आभार मानले पाहिजे. पण ब्लॉग एकदम ठासू लिहिला....ग्रेट

    ReplyDelete
  3. tumchya likhanaat Post modernism chya theory cha purepur ansh milto ... Ekdum Liberal writing tee sudhaa bajarpeth kabeej karnaaree, tumhee sadhya udaharnatoon mandli,... apratim...

    ReplyDelete
  4. श्रीरंग, लई भारी रंगवलंय!!!
    - स्मिता पाटील- वळसंगकर.

    ReplyDelete